भजन - ९६
काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऎसे ।
दुःख हे मोहपाशाचे, अता तिळमात्र ना सोसे ॥धृ॥
क्षणक्षण काळ हा टपला, लिहाया कर्म जे केले ।
चुकेना भोग कोणाला, करू जैसे भरू तैसे ॥१॥
स्वार्थि हे लोक अवघेची, न कोणी साथ दे अंती ।
न कामी देह-इंद्रिय हे, न लागू याचिये कासे ॥२॥
सखा जो पंढरी-राणा, जिवाचा एक कनवाळू ।
भजू त्यासी मनोभावे, यथामति जाणतो जैसे ॥३॥
म्हणे तुकड्या जगाची ही, उपाधी घात करणारी ।
कळो आले अता सगळे, न कोणी यात संतोषे ॥४॥
भजन - ९७
मना रे ! नाम जप हरिचे, सुखाचे घोस लाभाया ।
भटकशी कां विषय-मार्गी ? अधिकसे दुःख भोगाया ॥धृ॥
कुणी सत् प्रेम धरुनीया, हरीच्या ध्यानि रत होती ।
मिळे साम्राज्य मोक्षाचे, परी ना सोडि हरि-पाया ॥१॥
भक्तिच्या सुख-स्वातंत्र्यी, मोक्षही तुच्छ संतासी ।
अनुभवा घेउनी पाहे, भजुनिया पंढरीराया ॥२॥
म्हणे तुकड्या ऊठ वेगे, साध सत्संगती आधी ।
प्राप्त कर मार्ग प्रेमाचा. दुरावुनि संशयी माया ॥३॥
भजन - ९८
कुणाचा धाक बाळगुनी, आपुला धर्मे त्यजता का ? ।
नीति ही सोडुनी सारी, प्राण परक्यासी विकता का ? ॥धृ॥
आठवा बाळ अज्ञानी, गुरु गोविंदसिंहाचे ।
पुरवि भिंतीमधी त्यांना, न सोडी धर्म तरि ते का ? ॥१॥
सोडता धर्म जरी संभा , न उंचचि राहती डोकी ।
मर्द हा मरती गळ फासे, न दुसर्यासी म्हणे 'काका' ॥२॥
धर्म तो शिकवितो सकळा, अमर हा अंतरी आत्मा ।
मराया का भिता ऎसे ? ना तरी देह राहिल का ? ॥३॥
बाळगा धाक देवाचा, जरी पापे करी कोणी ।
आपुल्या सुखस्वातंत्र्या, म्हणे तुकड्या विसरता का ? ॥४॥
भजन - ९९
कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ?
सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥
न कोणी वीर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी ।
लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥
मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली ।
बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुख फिरती ॥२॥
मिळेना अन्न कोणाला, कुणी धन सांचुनी ठेवी ।
प्रेम स्वार्थाविना कोठे, कुणाचे ना कुणावरती ॥३॥
न साधू बोध दे कोणा, मौन धरि बघुनि पापासी ।
तो तुकड्यादास सांगतसे, तुझ्याविण ना मिटे भ्रांती ॥४॥
भजन - १००
हरीच्या नाम-स्मरणाने, हरीचे तेज ये अंगी ।
मनाची दुष्टना नाशे, रमे मनही हरी-रंगी ॥धृ॥
मान-अभिमान टाकोनी, कुणी हरिनाम घे वाचे ।
तयासह नाचतो हसतो, हरी करि दास्य निःसंगी ॥१॥
हरीसी जाणुनी कोणी, हरीचे ध्यान धरि चित्ती ।
प्रकाशे तेज हृदयी त्या, लखलखे ब्रह्म सत्संगी ॥२॥
हरी म्हणता हरी होतो, हरी-रुपि साठुनी जातो ।
तो तुकड्यादास सांगतसे, तयाचे सुख ना भंगी ॥३॥