मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १७६ ते १८०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १७६

करशिलना कर खाली ? धरशिलना वनमाली । पदरी ? ॥धृ॥

दुस्तर हा भव-सागर वाटे, तुजविण कोणि न वाली । ध ० ॥१॥

काम-क्रोध अति क्रूर श्वापदे, बहुत अनावर झाली । ध ० ॥२॥

आश्रये तुझिया काळ निभवला, अजवरि वेळहि गेली । ध ० ॥३॥

तुकड्यादास म्हणे शेवट हा, तुझिया स्वरुपी घाली । ध ० ॥४॥

भजन - १७७

येशिलना गुरुराया ! येशिलना गुरुराया ! मनि या ? ॥धृ॥

सत्य ज्ञान तू, ज्योति-स्वरूपचि, तुज अर्पिन ही काया ॥१॥

स्थापिन तुजला हृदयमंदिरी, चित्त लाविन गुण गाया ॥२॥

लक्षि ठेवुनी बोध-वचन तव, मग वळविन तशि काया ॥३॥

तुकड्यादास म्हणे घे करुणा, उध्दरि मज दीना या ॥४॥

भजन - १७८

कृष्ण मनी रमला हा, कृष्ण मनी रमला हा, अमुचा ॥धृ॥

रूप सावळे अति सुंदर हे, जीव तिथे नमला हा ॥१॥

मोर-मुकुट कुंडल अति साजे, भावरुपी गमला हा ॥२॥

वाजवि अधरी मंजुळ पावा, ध्वनि कर्णी घुमला हा ॥३॥

तुकड्यादास म्हणे अति मोहक, मार्ग जीव क्रमला हा ॥४॥

भजन - १७९

नश्वर या जगडोही, कोणि न सुख तिळ घेई । कळले ॥धृ॥

'माझे माझे' म्हणता म्हणता, प्राण फुकाचा जाई । कोणि ० ॥१॥

धडपड करिता ढोरासमही, जागिच अती राही । कोणि ० ॥२॥

साथि न येई देहहि अपुला, धन-दारा सुत-व्याही । कोणि ० ॥३॥

तुकड्यादास म्हणे हरिवाचुनि, शांति जिवा न जराही । कोणि ० ॥४॥

भजन - १८०

जिव पक्ष्यासम झाला, थार न कुणि दे याला हरि रे ! ॥धृ॥

जिकडे जावे तिकडे भ्यावे, निर्भय सुख न मनाला । थार ० ॥१॥

सकल जगत हे स्वार्थे भरले, दूर करी गरिबाला । थार ० ॥२॥

अपुले म्हणुनी परके होती, कसची नाति तयाला ? थार ० ॥३॥

तुकड्यादास म्हणे पदरी घे, देउनि नाम अम्हाला । थार ० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP