भजन - १८१
रमशिलना या देही ? सावळिये गुरु आई ! अमुचे ॥धृ॥
न्हाणिन तुजला अश्रु-जलाने, वाहिन भाव-फुले ही । सा ० ॥१॥
बसविन सिंहासनि हृदयाच्या, सोहं दीपक-छायी । सा ० ॥२॥
जीवभाव तुज अर्पण करुनी, देह तुझ्या पदि वाही । सा ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे वर दे हा, न उरो भेद कुठेही । सा ० ॥४॥
भजन - १८२
निरखुनि वाट चला रे ! निरखुनि वाट चला रे ! गडे हो ! ॥धृ॥
'जे जे द्यावे ते ते घ्यावे' हीच हरीचि कला रे ! ॥१॥
'दुसर्या सुख द्या आपण सुख घ्या', नियम असे हे सारे ॥२॥
वधता दुसर्या आपण मरतो, टाळा ऎसि बला रे ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे सुविचारे, पावे मोक्ष भला रे ! ॥४॥
भजन - १८३
कष्ट करा हरि भेटे, कष्ट करा हरि भेटे । गडे हो ! ॥धृ॥
दीन जनांची सेवा साधा, सोडा व्यसने खोटे ॥१॥
प्राण खर्चि द्या धर्माकरिता, घेउनि हाती नरोटे ॥२॥
मान जगाचा समुळचि त्यागा, वाहु नका त्या लाटे ॥३॥
तुकड्यादास म्हणे गा हरिला, मग भव-भय हे खुंटे ॥४॥
भजन - १८४
साक्षि असा जगती या, साक्षि असा जगती या । गडे हो ! ॥धृ॥
मायेचा हा सकल पसारा, भ्रमवु नका मन वाया ॥१॥
जड देहाचा बंध जिवासी, आत्मा अमर सदा या ॥२॥
सुख-दुःखे ही लिंगतनूसी, आशेची पडछाया ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्भय व्हा, धरुनी गुरुच्या पाया ॥४॥
भजन - १८५
कधि भेटशि यदुराया ! कधि भेटशि यदुराया ! सखया ! ॥धृ॥
संसाराचा पाश कठिण हा, मोहविते मन काया ॥१॥
क्षणिक तनूचा नाहि भरवसा, जाइल वैभव वाया ॥२॥
आवड ही सम अंतरि वाहे, ठेवु देह तव पाया ॥३॥
तुकड्यादास म्हणे करुणा कर, लावि मती गुण गाया ॥४॥