|
उ.क्रि. उभें करणें ; रचणें ; स्थापन करणें ; सरळ , लंबरेषेंत बसविणें . परी महाभूतांचें दळवाडे । उभारी भलें । - ज्ञा ५ . ७८ . चालू करणें ; सुरु करणें ; गति देणें ( धंदा , काम वगैरे ) स्थापना करणें . लॉर्ड रेडिंग यांनीं लष्करी कोर्टे उभारण्याची चुकी केली . - के १० . ६ . ३० . वर आणणें ; ऊर्जितावस्थेस आणणें ; पुढें आणणें ( व्यापार , धंदा ). प्रवृत्त करणें ; पुढें करणें . वर उचलणें ; उंची वाढविणें ( ठेंगण्या वस्तूची किंवा इमारतीची ). उत्पन्न करणें ; कल्पिणें ; मनाशीं बांधणें ( तर्क , कल्पना , पद्धति वगैरे ). म्हणुनी तर्क उभारिती कामिनी । ( शिवण ) एखादें शिवावयाचें वस्त्र तुकडे जोडून व धांवदोरा घालून एकत्र करणें ; कच्चें काम करणें ; एखादा सांगाडा वगैरे तात्पुरता रचणें . - अक्रि . उठणें ; उभें राहणें ; ताठ , खडा होणें ; सरळ होणें . पालवितो करीं उभारुनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे । उभें राहणें ; सरळ होणें ( केस वगैरे ). वर येणें ; उठणें ; उत्पन्न होणें ; बाहेर पडणें ( पुळी , गळूं वगैरे ). तो तसा गिळितसा न उभारे - गजेंद्रमोक्ष ( रघुनाथ पंडित ) ३७ . [ उभा , उभार ]
|