विविधविषयपर पदे - निंदक

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११७९.
( राग-रामकली; ताल-धुमाळी )
जळो रे जळो निंदकजिणे । सर्वथा लाजिरवाणे ।
मुखे मळ धुणे । सर्वकाळ ॥ध्रु०॥
करुनी सज्जनसेवा । सभाग्य तो सेवी देवा ।
हतभाग्याचिया जीवा । निंदेचा भरु ॥१॥
आपुलिया हितावरी । जरी होऊं उपकारी ।
तरि हेहि कुसरी । तयाऐसी ॥२॥
रामीरामदास म्हणे । मना तुज शिकवणे ।
ऐकतां शहाणे । पालटईल ॥३॥

११८०.
( राग-कामोद; ताल-द्रुत एकताल; चाल-कारण पाहिजे० )
पुण्य ते प्रगट करी । पाप ते अंतरी चोरी ।
केली यमपुरी तयालागी रे ॥ध्रु०॥
पापी तोचि आपण । सज्जना निंदितो जाण ।
तयासि कवण । सोडवील रे ॥१॥
पातकी जो आहे । पातके चि तो पाहे ।
भल्यासि न साहे । पापबुद्धि रे ॥२॥
द्वेष ते करुनि दुरी । गुण घ्यावे अंतरी ।
तरीच संसारी । तरिजेल रे ॥३॥
रामदास म्हणे भावे । हित तेंचि धरावे ।
कासया करावे । अनहीत रे ॥४॥

११८१.
( राग-रामकली; ताल-धुमाळी )
जळो जळो जाणिव । जळो जळो शहाणीव ।
संतनिंदेची हाव । जयाचे जीवी ॥ध्रु०॥
तेणे गुणे आत्माराम । भक्तजन पूर्ण काम ।
जया आहे वर्म । वाहिला संती ॥१॥
सज्जन स्वरुपरवि । कलंक लागेल केवी ।
परि तो दुर्जन लावी । आपुल्या मुखे ॥२॥
रामीरामदास म्हणे । मना तुज शिकवणे ।
श्रीरामी पावणे । तरी निंदा त्यजी ॥३॥

११८२.
( चाल-नामामध्ये उत्तम रामनाम० )
मातापुर बहुत आहे दूर रे । पितापुर सन्निध हे शरीर रे ।
पिंड ब्रह्मांड पाहतां विचार रे । सारासारे पाविजे पैलपार रे ॥ध्रु०॥
जवळिचे सांडूनि दूरि जावे रे । कष्टरुप तीर्थाटण करावे रे ।
नाना देशी ते विदेशी भरावे रे । एकाएकी कोठे तरी मरावे रे ॥१॥
नाना लोक बोलती अनुमाने रे । तेथे भाव ठेविला वेडियाने रे ।
गेले प्राणी बुडाले संदेहाने रे । शरिराच्या साभिमाने गुमाने रे ॥२॥
प्रचितीचा जाणता साधुजन रे । त्याचे भावार्थ करावे भजन रे ।
प्रचितीने सांगति संतजन रे । तेथे नाही कांहीच अनुमान रे ॥३॥
अनुमाने अनुमान वाढतो रे । दृश्यामध्ये अनुमान पैसावतो रे ।
दृश्यत्यागे संदेह अवघा जातो रे । दास म्हणे मानव धन्य होतो रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP