करूणापर पदे - भाग ३
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१२६१
( राग, ताल व चाल-वरील )
अरे तूं पावना रे ॥ध्रु०॥
चंचळ हें मन निश्चळवावें । निरसी विपरित भावना रे ॥१॥
आशा ममता तृष्णा खाती । वारीं या मायावना रे ॥२॥
दास म्हणे शरणांगता तुझा । निश्चय माझा भावना रे ॥३॥
१२६२
(राग-जोगी, ताल-धुमाळी )
धांव रे रामराया । किती अंती पहासी । प्राणांत मांडला कीं । न ये करुणा कैसी ॥ध्रु०॥
पाहीन धणीवरी । चरण झाडीन केशीं । नयन शिणले बा । आतां केधवां येसी ॥१॥
मीपण अहंकारें । अंगीं भरला ताठा । विषयकर्दमांत । लाज नाहीं लोळतां । चिळस उपजेना । ऐसें जालें बा आतां ॥२॥
मारुतिस्कंघभागीं । शीघ्र बैसोनी यावें । राघवें विद्यराजें । कृपाऔषध द्यावें । दयेच्या पद्महस्ता । माझे शिरीं ठेवावें ॥३॥
या भवीं रामदास । थोर पावतो व्यथा । कौतुक पाह्तोसी । काय जानकीकांता । दयाळा दीनबंधो । भक्तवत्सला आतां ॥४॥
१२६३
( राग-काफी, ताल-दीपचंदी, चाल-जयज्यी श्रीगुराया० )
अहो जी रामराया ॥ध्रु०॥
बहुत शीण कठीण अपाया । निरासीं दुर्घट माया ॥१॥
व्यर्थ प्रपंचें व्याकुळ काया । मार्ग नसेचि सुटाया ॥२॥
मानुनि गेलों जिवलग जाया । योग नव्हेचि भजाया ॥३॥
दुर्घट आला काळ कुटाया । सर्व सुख उलटाया ॥४॥
दास म्हणे मज बुद्धि कळाया । भक्तिमार्ग निवळाया ॥५॥
१२६४
( राग व ताल- वरील )
रामा कल्याणधामा । क० ॥ध्रु०॥
भवभयानक रंक पळाले । पुरित सकळ निष्कामा ॥१॥
दुःखनिरसन सुखरूपा सुखालय । सुखमूर्ति गुणग्रामा ॥२॥
दास विलास करी तव कृपा । अमिनव नामगरीमा ॥३॥
१२६५
( चाल-इस तन धनकी० )
तुजवीण शीण होतो दयाळा । तनुमनघनभुवनपाळा ॥ध्रु०॥
नित्य निरंतर अंतर माझें । पळ पळ विकळ जातो दयाळा ॥१॥
धीर उदार मनोहर लीळा । रूप हें नयनीं न जात दयाळा ॥२॥
दास उदास मनीं गुण तूझे । कळत न कळत गातो दयाळा ॥३॥
१२६६
( चाल-भाग्यहीन मी देवकि० )
दिनेशकुळमंडणा रामा शरयूतीरविवरणा । तुजविण भवयातना निवारी कोण भुजारमणा ॥
धांव पाव सत्वर जगज्जीवना पौलस्तीकुलदमना । मायबाप तूं सखा रे तुजविण शरण मी जाऊं कवणा रे ॥१॥
जगन्नायका कृपा करावी न करीं निर्दय ह्रदयीं । झणीं उपेक्षिसि मजला तरि बा आतां मी करूं कायी ॥
कांहीं नाठवे भ्रमिष्ट मन हें न सुचे आन उपायीं । दासें दासपण विसरुनि विव्हळ होउनि मोकळ धाई ॥२॥
१२६७
( राग-कल्याण; ताल-दादरा )
येईं वो रामाबाई माय । ये० ॥ध्रु०॥
अनंत व्यापकरुपे दानवदपें पूर्णप्रतापे । तव नामें कळिकाळ कांपे ॥१॥
तुझा छंदु लागला गे माय निशिदिनिं या जिवासी । तुजविण मी परदेशी वो ॥२॥
रामदासा आराम करणें होंचि तुजला उचित । भवसंकट निवारूनि रामे पुरवी माझे आर्त ॥३॥
१२६८
( रग-मैरव; ताल-धुमाळी )
दीनदयाळा राघवा पावें बा वेगीं ॥ध्रु०॥
दीन अनाथ पतित अगुणी भजन नेणें कांहीं । तुजविण भज जनीं पाहतां रे कोणीच येथ नाहीं ॥१॥
युक्ति कळेना बुद्धि कळेना मन वळेना देव । विद्या नाहीं वैमव नाहीं हा तों पूर्विल ठेवा ॥२॥
भक्ति असेना भाव असेना शांति वसेना आंगीं । रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी ॥३॥
१२६९
( राग-पूर्वी; ताल-त्निवत )
कंठत नाहीं सुटत नाहीं । पराधीनता मारी ॥ध्रु०॥
चटपट लागली संसारीं । कंठेना घरदारीं ॥१॥
शोक सरेना धीर धरेना । अहंममता दुःखकारी ॥२॥
दास म्हणे तो लोमें शिणतो । राघव हा अपहारी ॥३॥
१२७०
( राग-शंकराभरण किंवा गारा; ताल-दादरा; चाल द्दश्य पाहतां० )
अंकित मी तुझें दीन । न करीं उदासीन । न पाहें माझें निर्वाण रे रामा ॥ध्रु०॥
मी तुझें पाडस । वरि पडिले भवपाश । धीर धरवेल कैसा रे रामा ॥१॥
उदय न होतां शशी । जिणें कैचें चकोरासी । तैसी परी आम्हांसी रे रामा ॥२॥
जरि न वोळे घन । चातक न ठेवि प्राण । तेंवि तूं अंतर जान रे राम ॥३॥
कूर्मीं अवलोकन । न करितां बाळां मरण । तैसा तूं निश्वयें जाण रे रामा ॥४॥
निजब्रीद साच करीं । दिनांसि अंगिकारीं । दास चरण धरी रे रामा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2011
TOP