भक्तिपर पदे - भाग ४
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१३६१
( राग-देसी; ताल-धुमाळी )
धन्य आतां जिणें । या रघुनाथाच्या गुणें ॥ध्रु०॥
जळचर वनचर फणिवर ध्याती । सुरवर नर किन्नर गुण गाती ॥१॥
तनमनधनजन जनवनविजन । हिनदिन पावन राम गुणालय ॥२॥
मर मर नर किंकर खर पामार । परतरपर सुंदर पददाता ॥३॥
गतिहीण मतिहिण अति हिण लाजे । निंद्यचि ते जगद्वंद्य विराजे ॥४॥
१३६२
( चाल-नमामध्यें उ० )
आत्माराम सर्वांचे अंतरीं रे । आत्माराम हा नित्य निरंतरीं रे । आत्माराम वर्ततो देहभरी रे । आत्माराम नसतां कैंची उरी रे ॥ध्रु०॥
आत्माराम वर्तवी ब्रह्यादिक रे । आत्माराम चालवी तिनी लोक रे । आत्माराम तो सर्वहि विवेक रे । आत्माराम नसतां कैंचे लोक रे ॥१॥
दास म्हणे हे माझी उपासना रे । पाहूं जातां पुरली त्रिभुवना रे । पिंड ब्रह्मांड हे तत्त्व-विवंचना रे । ज्ञानरूपें दाखवी निरंजना रे ॥२॥
१३६३
( चाल-देव पावाला रे । )
मनाची वासना रे ॥ध्रु०॥
सगुण भावें जनीं भजावें । सज्जना रे ॥१॥
भजनयोग नको वियोग । कामना रे ॥२॥
राघवदासीं अंतरवासी । वेधना रे ॥३॥
१३६४
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
हरि कल्याणकारी । दुःखशोक निवारी ॥ध्रु०॥
तो जगजीवन तो मनमोहन । ओळखतां जन तारी ॥१॥
दास म्हणे तो अंतर माझें । भिन्नमेद अपहारी ॥२॥
१३६५
( राग-मांड; ताल-दीपचंदी; चाल-कैसी बजायी वन्सी )
भजा भजनें तरावें । प्रथम भजन विवरावें ॥ध्रु०॥
नाम जयाचें रूप तयाचें । ध्यानमुळें समजावें ॥१॥
देव विलासी त्रैलोक्यवासी । कांहीं एक पुरवावें ॥२॥
दास म्हणे जन पालकलीला । अनन्य भक्त स्वभावें ॥३॥
१३६६
( चाल-झाली संध्या संदे० )
जन्म दुर्लभ रे न घडे मागुता । विवेकानें उगवीं सर्व गुंता । आले वाटेनें सत्वर परता । रंग शाश्चत पाहोनि तेथें रता ॥ध्रु०॥
लोकांसारिखें चालतां बरें नाहीं । अनुमानें न कलें हित कांहीं । खरें खोटें विचारूनि पाहीं । पद शाश्वत पाहोनि तेथें राहीं ॥१॥
दास म्हणे भजन राघवाचे । मूळ तोडिल सकळ या भवाचें । कर्मबंधन तुटेल या जीवाचें । ध्यान दुर्लभ लामे सदाशिवाचें ॥२॥
१३६७
( चाल-वरील )
पाप चढतें पडतें पुण्य मागें । जातें आयुष्य सकळ लागवेगें । कांहीं कळतें लागतां संतसंग । मायाजाळ तुटतें अनुरागें ॥ध्रु०॥
प्रचितीचें बोलणें आहे पाहें । अनुमानें सांडून तेथें राहें । सर्व संपदा हे कांहीं न राहे । लागवेगें देवाला करीं साह्य ॥१॥
वय थोडें ठाकेना तीर्थाटन । बुद्धि थोडी घडेना पारायण । एका भावें भजावा नारायण । पुढें सहजचि सार्थकाचा क्षण ॥२॥
खटपट करितां जन्म गेला । लटपटेनें स्वहित मुकला । चटपटेनें कासावीस जाला । पुढें पाहतां अवचिता आला घाला ॥३॥
ज्याचें त्यानें रे स्वहित जाणावें । कष्टी होता मग कोणाला म्हणावें संसारीं कां व्यर्थचि शिणावें । भ्रमें भुलोनि कासया वोसणावें ॥४॥
दास म्हणे भजन पंथ सोपा । हळुहळु पावसी पद बापा । कष्ट करुनी कासया देसि धांपा । रामकृपेनें अनुभव सोपा ॥५॥
१३६८
( चाल-दद्धवा शांतवन० )
तूं भज रे भज रे भज रे । मानवा या रघुवीरा ॥ध्रु०॥
नरदेहा आलिया प्राणी । जो राम बदेना वाणी । त्यासी यम पाडिल धरणी । सोडविता नाहीं कोणी ॥१॥
पळ पळ हें आयुष्य जातें । नरदेह नये मागुतें । तूं शरण जाईं संतांतें । निजपद ते दाविति तूतें ॥२॥
रामदास विनंति करी । गुरुकृपा आम्हांवरी । सबाह्य अभ्यंतरीं । अवलोकीं सचराचरीं ॥३॥
१३६९
( चाल-कैवारी हनुमान० )
भजा भक्तवत्सल तो भगवान् ॥ध्रु०॥
पावेल किंवा न पावेल ऐसा । सोडुनि द्या अनुमान ॥१॥
भजनरहित सकळ आडवाट । घेऊं नका आडरान ॥२॥
संचित तें भरलेंज तन तारूं । मारिल काळ तुफान ॥३॥
एक देव तो दृढ धरावा । वरकड काय गुमान ॥४॥
दास म्हणे मज कोणीच नाहीं । त्याचे पाय जमान ॥५॥
१३७०
( चाल-वरील )
रामाचीक रणी । अशी ही ॥ध्रु०॥
पहा दशगुणें आवरणोदकीं । तारियली धरणी ॥१॥
सुरवर पन्नग निर्मुनियां जग । नांदवी लोक तिन्ही ॥२॥
अंडज जारज स्वेदज उद्भिज । निवडिलिया खाणी ॥३॥
रात्नीं सुधाकर तारा उगवती । दिवसां तो तरणी ॥४॥
सत्तामात्रें वर्षति जलधर । पीक पिके धरणी ॥५॥
रामदास म्हणे आपण निर्गुण । नांदे ह्रदयभुवनीं ॥६॥
१३७१
( राग-खमाज; ताल-धुमाळी )
पाहा पाहा या जगांत राम आहे । राम आहे राम आहे राम आहे ॥ध्रु०॥
जग हें अवघें रामच सारा । अंतरिं पाहे करीं विचारा ॥१॥
एक सुवर्णीं बहु अलंकारा । तद्वत पाहीं सर्व पसारा ॥२॥
विना कछु नाहीं थारा । रामच रामही घे घे सारा ॥३॥
दास म्हणे हा रामच भरला । भरला उरला बोलच खुंटला ॥४॥
१३७२
( चाल-राजीवनयन० )
यागकाळीं ऋषिकुळीं आस केली । बाळपणीं ताटिका वधिली । रे गोवळा । खरदुषणादिक संहारले । मात लंकेसी रावणा जाणवली । रे गोवळा ॥१॥
रविकुळदीप पुण्यपरायण । राम अंतरंग जप त्या शिवाया । रे गोवळा । मुनिजनाम सुरवरां कोंवसा जो । बंद खलास सकळिकां देवांचा । रे गोवळा ॥२॥
लाता होणोनी शकट मोडियला । बाळपणीं रिठासुरासी रगडिला । रे वानरा । लाळ गळतां थोर नवलावो । मुखीं अशुद्ध वाहे भडभडां । रे वानरा ॥३॥ आमुचा कान्हया कां तूं नेणसी रे । यासी करूं नये आणिकेसी सरी । रे वानरा । अयोनिसंभव जाला जन्म जया । कृष्ण नाटक गोपींचें चित्त हरी । रे वानरा ॥४॥
देवा दानवा वाळी आवरेना । जाया अनुजाचि अमिळासी जाला । रे गोवळा । एक्या बाणघातें तया निपातिलें । तारा देऊना सुग्रीव राजा केला । रे गोवळा ॥५॥
मावशी पुतना येणें सोखियेली । कागा बगा कृष्णें खेळतां चिरिलें । रे वानरा । अश्वरुप दैत्य तोही वधियेला । पायीं धरूनि धेनुका आपटिलें । रे वानरा ॥६॥
जानकीसैंवरी थोर नवलावो । तेथें कोदंडानें रावणा पाडिलें । रे गोवळा ॥७॥
रुक्मियासी रणीं विटंबना केली । कृष्णें भीमकी आणिली अवलीळा । रे वानरा । वेणुनादें भुलवितो ब्रजनारी । निमासुर मुख मदनपुतळा । रे वानरा ॥८॥
असंख्य वानररीस समुदाव । सिंधु पालाणुनी भार कोसळले । रे गोवळा ॥ लंकालागीं खवळले निशाचर । ऎसें देखोनि ताडित मिसळले ताडित्त मिसळले । रे गोवळा ॥९॥
चेंडुमिसें काळिया नाथियेलें । कृष्णें सिळा वरुषतां नवल केलें । रे वानरा । गिरी वाम करें येणें उचलिला । मोठया बळें तेव्हां गोकुळ राखिलें । रे वानरा ॥१०॥
तेहीं लंकावासीं थोर युद्धें केलीं । रामें तितुकें ही ढिसाळें निर्दाळिलीं । रे गोवळा । घोर घोष होतां च्यवती तारांगणें । सीतटणत्कारें धरा थरकली । रे गोवळा ॥११॥
वणवा गिळुनी पोरें राखियेलीं । गोपी आणुनी वधिलें भोमासुरा । रे वानरा । यासी तुळे ऐसा कोणी आडळेना । जरासंधासी लाविलें घायवारें । रे वानरा ॥१२॥
रावण वधुनी देव सुखी केले । दिला राज्यपट तया बिभीषणा । रे गोवळा लोकिकाकारणें दिव्य जानकीचें । चिंता सकळिकांची तया नारायणा । रे गोवळा ॥१३॥
लहान लेंकुरें समागमें होतीं । येणें गोपाळें चाणूर घुस्मारिला । रे वानरा । पळाले सकळ लंडी मल्ल त्यांचे । एके बुक्कीनें हाणोनी पुरा केला । रे वानरा ॥१४॥
विजयी होउनी अयोध्येसी आले । देखोनि भरत धांविन्नला आळिंगना । रे गोवळा । बहुत दिवस रामें राज्य केलें । सेखीं पुरी नेली वैर्कुंठभुवना । रे गोवळा ॥१५॥
कंसराव देखिला सिंहासनीं । तया वधुनि पिता सोडविला । रे वानरा । दासांकारणें घेणें अवतार । जाला कैवारी त्या पांडुकुमरां । रे वानरा ॥१६॥
तुम्ही आम्ही रामदास रे एकचि । देव एकचि हा नाना वेषधारी । रे सखया । लटिकें म्हणसी तरी तुझा देव । माझा होउनी मज हृदयीं घरी । रे सखया ॥१७॥
१३७३
( राग-केदार; ताल-धुमाळी )
हरी जगदांतरीं रे । हेत बरा विवरीं रे ॥ध्रु०॥
सकळ तारी सकळ मारी । सकळ कळा विवरी ॥१॥
चाळितसे रे पाळितसे रे । दास म्हणे विलसे रे ॥२॥
१३७४
( चालल-कैवारी हनुमान० )
कृपा पाहिजे । राघव । कृपा पाहिजे ॥ध्रु०॥
मन उदासिन इंद्रियदमन । तरिच लाहिजे ॥१॥
निंदक जनीं समाधानी । तरिच राहिजे ॥२॥
दास निरंतर नीच उत्तर । तरिच साहिजे ॥३॥
१३७५
( राग-धनाश्री; ताल-दादरा )
देवां सोडविता देवराय ॥ध्रु०॥
बंधविमोचन विबुधविमोचन । सुरवरांसी उपाय ॥१॥
भुवनकंटक रावणा मारुनि । चुकविले कीं अपाय ॥२॥
दास म्हणे हा पूर्ण प्रतापी । महिमा सांगुं मी काय ॥३॥
१३७६
( राग-खमाज; ताल-धुमाळी. )
ऐसे महिमे अपार । कोण जाणतो पार । कैसा तरी उद्धार । सुटोत बापुडे नर ॥ध्रु०॥
एके नदीचे पोटीं । शाळिग्रामाच्या कोटी । महिमा उदंड सेवटीं । वास होतो वैकुंठीं ॥१॥
नर्मदेचे गणेश । वाळवंटी उदास । करणें नलगे सायास । त्यांचा महिमा विशेष ॥२॥
काश्मिर देश तो एक । तेथें उदंडा स्फटिक । त्याचे देव अनेक । पूजितां होतें सार्थक ॥३॥
एका श्वापद शिंगें । कित्येक पूजिती लिंगे । देवां मानलीं चांगें । पुण्य तयाच्या योगें ॥४॥
रानडुकराचे केश । त्यांचा महिमा विशेष । उद्वर्चनें मूतींस । पाप राहेना लेश ॥५॥
हरिणांवाघांचीं मढीं । त्यांचीं घ्यावीं कांतडीं । पुण्य येतें तांतडी । होते देवाची जोडी ॥६॥
सोमयाग करिती । तेथें मांसे मक्षिती । तेणें होतसे गती । महिमा उदंड सांगती ॥७॥
दाढया डोया बोडाव्या । हातीं खापर्या घ्याव्या । उदंड बोंबा माराव्या । पूर्वज पावती पदव्या ॥८॥
ज्ञानेंविण तो पशु । जेथें तेथें विश्वासु । केला वयाचा नाशु । ठायीं न पडे जगदीशु ॥९॥
लोक ऐसाचि वेढा । उगाचि मारितो झडा । काय करिल बापुडा । संग सांपडला कुडा ॥१०॥
अघोर मंत्राचीं ढालें । एक पूजिती दैवतें । जनास घालिती भूतें । एक राखती प्रेतें । तेणें द्रव्य साधतें ॥१२॥
मलें अवघेंचि सांडा । आधीं देवाला धुंडा । आशा ममता उलंडा । ज्ञानें काळाला दंडा ॥१३॥
देव ध्यानीं भाविजे । ज्ञानें मोक्ष पाविजे । जन्मसार्थक कीजे । कानकोंडें न कीजे ॥१४॥
दास म्हणे उदास । घरा देवाची कांस । भक्तिमार्ग विशेष । तेणें पावे जगदीश ॥१५॥.
N/A
References : N/A
Last Updated : May 16, 2011
TOP