विविधविषयपर पदे - षड्रिपु

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१२३१
( राग-काफी; ताल-दादरा )
जन्मलाचि नाहीं तो मरेल काई । जीणें मरणें दोन्हीं नाहीं रे ॥ध्रु०॥
जनीं जीवन्मुक्त वर्ततात हरिभक्त । सद्‌‍गुरुबोधें ते अच्युत रे ॥१॥
जिणें आणि मरणें येणें आणि जाणें । साधु तो अचळ पूर्णपणें रे ॥२॥
सेवितां साधुचे चरण बाधीना दक्षिणायन । रामीरामदासीं निजखूण रे ॥३॥

१२३२
( राग-असावरी; ताल-दीपचंदी; चाल-प्रगट निरंजन० )
धन्य हरिजन धन्य हरिजन धन्य हरिजन ज्ञानी । सारासार विवेकविचारें सहज समाधानी ॥ध्रु०॥
निर्मळ सुशीळ भक्त चि केवळ बोलति निवळ वाचा । जाणति सकळ भूमंडळ सेवक चि देवाचा ॥१॥
सर्व उदासिन तो जनपावन नित्य निरंजन ध्यातो । श्रवणें मनेनें सत्य विवंचुनि सर्वकाळ गुन गातो ॥२॥
देव परात्पर शोधित अंतरा लावितसे भगवंतीं । दास म्हणे वर तारक ते नर सेवावे बुद्धिवंतीं ॥३॥

१२३३
( राग-कामोद ताल-धुमाळी; चाल-लवुनियां लोचन० )
सुगंधें षट्‌‍पद लोघें । चंद्रासी चकोर बोधे । चातकासी शोधे । जलधरु रे ॥धु०॥
तैसे हे सज्जन मज । वाटती परम गुज । तयापाशीं माझें । निजबीज रे ॥१॥
तयासी बोलणें घडे । श्रवणीं वचन पडे । तेणें हें निवडे । समाधान रे ॥२॥
रामीरामदास पाहे । सगुन शोधिताहे । क्षणहि न लाहे । त्याचा संग रे ॥३॥

१२३४
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
संगति साधूची मज जाली । निश्चळ पदवई आली ॥ध्रु०॥
सर्वीं मी सर्वात्मा ऐसी अंतरिं द्दढ मति जाली । जागृतिसहित अवस्था तुर्या स्वरूपीं समुळ निमाली ॥१॥
बहु जन्माची जप तप संपत्ति विमळ फळेसी आली । मी माझें हे सरली ममता समुळीं भ्रांति विराली ॥२॥
रामीं अमिन्न दास असी हे जाणि समुळीं गेली । न चळे न कळे अढळ कृपा हे श्रीगुरुरायें केली ॥३॥

१२३५
( चाल-हे दयाळुवा० )
पावलों गति संतसंगति । सांगणें किती सदा प्रचीति ॥ध्रु०॥
भ्रांति हरली शांति थारली । खेप वारिली जन्म तो नसे ॥१॥
वियोग तुटला राम भेटला । भवाब्धि आटला सुख विलसे ॥२॥
जीवन्मुक्त रे ऐक्य भक्त रे । रामदास रे भिन्न तो नसे ॥३॥

१२३६
( चाल-झाळी संध्या० )
साधुसंतां मागणें हेंचि आतां । प्रीति लागो गोविंदगुण गातां ॥१॥
वृत्ति शून्य जालीया संसारा । संतांपदीं घेतला आम्हीं थारा ॥२॥
आशा तृष्णा राहिल्या नाहीं कांहीं । देहप्रारब्ध भोगिता भय नाहीं ॥३॥
गाऊं धांऊ आठवूं कृष्ण हरी । दास म्हणे सप्रेम निरंतरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP