उपदेशपर पदे - भाग ६
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१४८१
( चाल-लावणीची )
करीं राम सोयरा । मनुजा । भुलूं नको संसारा ॥ध्रु०॥
आप्त जीवलग सोयरे । सखे मानसिल खरे । जंवरी धन असे पदरीं । तंवरी म्हणतिल बरी । सरल्या न करी सुउच्चारा ॥१॥
गाई म्हैशी आणिक घोडी । ह्मणशिल माझी जोडी ।
दासादासीची आवडी । संगें नये कवडी । आवघा व्यर्थचि पसारा ॥२॥
वाडा घरदार सुंदर । माझा कीं संसारा । जागा मिरासीचा जमीदार । लौकिकभूषण थोर । सेवटीं काळ देईल पैजारा ॥३॥
प्रीति अत्यंत जायेची । खरी नव्हे मायेची । जंवरी वेळ असे लाभाची । तंवरी स्त्री सेजाची । नसल्या भलत्यासी चर्चरा ॥४॥
साधुसंताचा निज छंद । घरीं होय सावध । देह विचारिल्या मनु दंग । नाहीं जाला भंग । सेवटीं काळ घेईल खबरा ॥५॥
रामदास हा बोलिला । प्रपंच हा सोडिला । राम सोयरा जोडिला । शरण निघाला त्याला । कांहीं परमार्थ विचारा ॥६॥
१४८२
( राग-धनाश्री; चाल-कैवारी हनुमान० )
पारिखा कां केला । राघव । पारिखा कां केला ॥ध्रु०॥
कामना कामीं रंगोनी रामीं ॥ कानकोंडा अंत आला ॥१॥
तारुण्य कांहीं बैसत नाहीं ॥ काय पाहतां जन्म गेला ॥२॥
सोयरे येती खाउनि जाती ॥ अंतीं राघव सोडायाला ॥३॥
रामदास म्हणे सावधान होणें ॥ साह्य करा देवाजीला ॥४॥
१४८३
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
अबद्धी रंगचि नाहीं । नाहीं विचारूनी पाहीं ॥ध्रु०॥
भक्ति अबद्ध स्वधर्म अबद्ध । ज्ञान वैराग्य अबद्ध ॥१॥
कथा मोकळी ज्ञान मोकळें । लोक मोकळा वळवेना ॥२॥
बाष्कळ बोले बाष्कळ चाले । दास म्हणे ते बुडाले ॥३॥
१४८४
( चाल-धर्म जागो० )
रामासी विसरावें । मग कासया जियावें ॥ स्वहित दुरी तेव्हां । दुःख पालवीं घ्यावें ॥
रौख कुंभपाक । अहोरात्न भोगावें ॥ तेधवां कोण सोडी । वर्म न पडे ठावें ॥ध्रु०॥
भजनीं कानाकोंडें । राम न म्हणे तोंडें ॥ आद्ळे दुःख आंगीं । भोग भोगितां रडे ॥
कर्तृत्व आपुलेंचि । कैसें नाठवे एवढें ॥ देवासी बोल ठेवी । केवीं स्वसुख जोडे ॥१॥
विषयीं चित्त गोंवी । ह्रदयस्थ नाठवी ॥ कामक्रोधलोभसंगें । त्नास नुपजे जीवीं ॥
ममता दुःख परी । आपणातें वाहवी ॥ विनवी रामदास । भवसागर तरवी ॥२॥
१४८५
( राग-पहाडी; ताल-धुमाळी )
अवघड संग प्रसंग नको रे देवराया । मतिमंद कदापि हि बंद नसे परितप्त काया । नसे पल्लव लंबित धस उमा परि कोण छाया । अप्रमाण प्रमाण कळा न सुचे त्याची व्यर्थ माया ॥ध्रु०॥
नीति सांडुनि हुंबरतो रडतो मूढ बैल जैसा । नसे कांहींच द्दढ अद्दढ जीवीं नर जाण तैसा । नावरेचि अनावरण मरतो आवरेल कैसा । सुटतां मत्त उन्मत्त धांवतो जैसा थोर म्हैसा ॥१॥
सुखदायक गायक नेमक साधक तो असावा । धट उद्धट वाजट चावट लंपट तो नसावा । बहु चाट अचाट कचाट करी धीट तो त्यजावा । हरिभक्त विरक्त संयुक्त विवेकी तो भजावा ॥२॥
१४८६
( राग-कामोद; ताल-द्रुतएकताल )
जाणत जाणत राम । कासया विषयकाम । होईल विराम । सत्य जाणे रे ॥ध्रु०॥
देहाचा भरंवसा कोण । कोणे वेळे मरण । होईल स्मरण विस्मरण रे ॥१॥
चालतें तंवरी गोड । शेवटीं होईल जड । अंतकाळीं वाढे चर्फड रे ॥२॥
देखतां आपुलें आपुले द्दष्टीं । जातसे सकळ सृष्टि । रहायाची कोण गोष्टी सांग रे ॥३॥
जाणेंसें असेल जरी । आपुलें स्मरण घरीं । विस्मरण करी गर्भवास रे ॥४॥
रामीरामदास म्हणे । तें चि तें सार्थकवाणें । जयासी न घडे येणें जाणें रे ॥५॥
१४८७
( चाल-धर्म जागो० )
तोचि एक पुण्यवंत । जया अंतरीं भगवंत । काया वाचा जीवें प्राणें । जगदीशाचा शरणांगत ॥ध्रु०॥
नवविधा भजन करी । चित्ता बरें विवरी । साराचार विचारणा । संग साधूचा घरीं ॥१॥
हरिकथानिरूपणें । काळ सार्थक करणें । जया नाहीं येणें जाणें । गर्भवास भोगणें ॥२॥
कर्मकांड उपासना । अधिकार त्या ज्ञाना । उदासीन दंभ नाहीं । भ्रष्टाकार करीना ॥३॥
प्रत्ययाचें समाधान । कांहीं नाहीं अनुमान । निरंजनीं निरंजन । दास म्हणे तो पावन ॥४॥
१४८८
भूतकाळीं कर्म केलें वर्तमानीं आलें । त्याचें सुख मानूनियां भोगितो आपुलें ॥ध्रु०॥
सुखदुःखभोग जाला तोचि मागिल ठेवा । आतां दुःख मानूं नको करीं रामसेवा ॥१॥
बाईल मेली पोर मेलें द्रव्य नाहीं गांठीं । तळमळ लागली जीवीं कांरे होशी कष्टी ॥२॥
जें जें दुःख होतें जीवा तेंचि मागिल कर्म । आतां त्याचें सुख मानीं स्मरे राम नाम ॥३॥
नामाविण राहूं नको असा फजित होशी । पुन्हां घडि नये बापा नरकामध्यें जाशी ॥४॥
भविष्याचा धोका तुझे हातामध्यें आहे । पळभर विसरूं नको नाहीं कोणी साह्ये ॥५॥
सावध होईं सावध होईं किती सांगूं तुजला । परिणाम कठिण मोठा शरणा जाईं गुरूला ॥६॥
दास म्हणे जालें तें तरी होउनियां गेलें । नको नको म्हणतांहि भोगवितें केलें ॥७॥
१४८९
( राग-पिलू; ताल-धुमाळी )
काय संग त्या मूर्खाचा । जैसा जन्म दर्दुराचा । सुवासु सुमनांचा । मधुकर घेउनी गेला ॥ध्रु०॥
मुक्ताफळें सुपाणी । वायसाला खाणी । तयासी सांडुनी धणी । घे अभेध्याची ॥१॥
आहेती उदंड गोटे । परीसेंसी संघटे । झगटतां पालटे । ऐसा एकही नाहीं ॥२॥
रामीरामदासी मूर्ख । साधा असतां सुख । परी त्या पढतमूर्खाचें । दुःख देखवेना ॥३॥
१४९०
( राग-मैरवी, ताल-दादरा )
आळस करा आळस करा । आळस करा वासनेचा ॥ध्रु०॥
घर माझें दारा माझें । वासनावोझें जड जालें ॥१॥
धन माझें वित्त माझें । गोत माझें घरमरी ॥२॥
रामदासीं नवल जालें । आळसें केलें सावचित्त ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP