विविधविषयपर पदे - षड्रिपु

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१२०१.
( राग-जैमिनी कल्याण; ताल-दीपचंदी )
गुरुध्यान करावे । तेणेंचि तरावे ॥ध्रु०॥
नित्य निर्विकार ज्याचेनि बोधे । व्हावे स्वतःसिद्ध ॥१॥
आकार विकार मां त्यासि कोठे । वस्तु घनदाट ॥२॥
दृश्यभासातीत आत्मा अविनाश । होती ज्याचे दास ॥३॥

१२०२.
( राग-काफी; ताल-धुमाळी )
देखोदेखी गुरु करिती । शिष्य शिणती ।
गुरुची परीक्षा नेणती । झकोनि जाती ॥ध्रु०॥
भसेसी पडिले बापुडे । कळेना वेडे ।
फिटेना जन्माचे सांकडे । शिणती मूढे ॥१॥
मंत्र देऊनियां गोंविती । देखणी किती ।
मुद्रा लाऊनियां बैसती । नाही प्रचीती ॥२॥
शाक्तमार्गकवळ घेती । ऐसे हे किती ।
जळो जळो रे महंती । नाही की गती ॥३॥
एक ते सांगती आगम । अघोरकर्म ।
परि हे जाणावे कुकर्म । सर्वही ब्रह्म ॥४॥
प्रचीती नसतां विपत्ती । सांगणे किती ।
रामदास म्हणे शिणती । ज्ञान नेणती ॥५॥

१२०३
( राग व ताल-वरीलप्रमाणे )
एक तो गुरु दुसरा एक सद्गुरु ।
सद्गुरुकृपेवांचुनि न कळे ज्ञानविचारु ॥ध्रु०॥
पारखी नेणती ज्ञानी ओळखती ।
गुरु केला परि ते नाही आत्मप्रचीति ॥१॥
म्हणोनि वेगळा सद्गुरु निराळा ।
लक्षामध्ये कोणीएक साधु विरळा ॥२॥
सद्यःप्रचीति नसतां विपत्ति । रामदास म्हणे कैसी होईल रे गति ॥३॥

१२०४
( राग-खमाज; ताल-दादरा )
सद्गुरु सेवी रे मना । चुकती जन्ममृत्यु संसारयातना ॥ध्रु०॥
सज्जनसंगति धरा । धरोनी बरे तत्त्वज्ञान विवरा ॥१॥
सद्गुरुवेगळी गती । कदापि नाही भले सज्जन सांगती ॥२॥
पिंड ब्रह्मांड रचना । सद्गुरुविण कांही च उमजेना ॥३॥
दास म्हणे रे कवी । सज्जनसंग जन्ममृत्यु चुकवी ॥४॥

१२०५.
( राग-कल्याण; ताल-त्रिताल )
सद्गुरु लवकर नेती पार ॥ध्रु०॥
थोर भयंकर दुस्तर जो अति । हा भवसिंधु पार ॥१॥
षड्वैर्‍यादिक क्रूर महा मिन । त्रासक हे अनिवार ॥२॥
घाबरला मनि तीव्र मुमुक्षु । प्रार्थिति वारंवार ॥३॥
अनन्य शरण दास दयाघन । दीन जनां आधार ॥४॥

१२०६
आवडतो प्रिय परि गवसेना ॥ध्रु०॥
स्वजनाहुनि प्रिय देह आपुला ।
तोहि विटे परि आपण विटेना ॥१॥
ज्यावरी धांवती इंद्रिय मन ही ।
सर्वहि दाउनि आपण दिसेना ॥२॥
श्रीगुरुदास्य अनन्य घडे जरि ।
अनुभवतंतु कधी तुटेना ॥३॥

१२०७
( राग-मारु; ताल-दादरा )
छपन्न कोटि वसुंधरा महिमा कोण जाणे ।
तीर्थे क्षेत्रे गिरिकपाटे काय आहे उणे ॥१॥
वाया शिणतोसी । आहे तुझे तुजचिपाशी ॥२॥
नाना कर्मे आचरितां देव कैसेनि भेटे ।
दास म्हणे सद्गुरुविण संशय न तुटे ॥३॥

१२०८
( चाल-श्रीगुरुचे चरणकंज० )
तुजविण गुरुराज आज कोण प्रतीपाळी ।
माय बाप कामा नये कोणी अंतकाळी ॥ध्रु०॥
जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोही ।
तुजविण मज वाटे तसे धांव लवलाही ॥१॥
चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा ।
पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा ॥२॥
रामदास धरुनि आस पाहे वास दिवसरात ।
खास करिल काळ ग्रास ध्यास हा मनासी ॥३॥

१२०९
अपराधी आहे मोठा । मारणे कृपेचा सोटा ॥ध्रु०॥
गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निज छंद ।
तेणे पावलो मी बंध । जालो निंद्य सर्वस्वी ॥१॥
तारी तारी सद्गुरुराया । वारी माझे तापत्रया ।
तुझे पायी काशी गया । आहे मजला सर्वस्वी ॥२॥
आतां अंत पहासी काय । तूंचि माझा बाप माय ।
रामदास तुझे पाय । वारंवार वंदीतो ॥३॥

१२१०
( राग-वसंत भैरव; ताल-त्रिताल )
गुरुदातारे दातारे । अभिनव कैसे केले ॥ध्रु०॥
एकचि वचन न बोलत बोलुनि । मानस विलया नेले ॥१॥
भूतसंगकृत नश्वर ओझे । निजबोधे उतरीले ॥२॥
दास म्हणे मज मीपणविरहित । निजपदी नांदविले ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP