विविधविषयपर पदे - षड्रिपु

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११९६.
( राग-कौशिया; ताल-धुमाळी )
हरि हरि ध्यान रे । वरि वरि ध्यान रे ॥ध्रु०॥
सगळा आगळा बगळा मासा गट्ट करि गिळतो कैसा ।
हालेना ना चालेना ध्यानी कोण तमासा ॥१॥
मांजर उंदीर लक्षी तेव्हां तटस्थ होउनि राहे ।
तैसा कपटी लोचन लावुनि विषये वास पाहे ॥२॥
रुद्राक्षाच्या माळा सोळा आणि वीस तीस ।
कांही स्फटिक कांही तुळसी म्हणवी शंकर उदास ॥३॥
उगीच अवघी खटपट केली परि हो वेषधारी ।
रामदास होसील तरी तो राम रौरव वारी ॥४॥

११९७
( राग-कमोद; ताल-दादरा )
अंतरी अभिमान । कापट्य शब्दज्ञान । जैसे वृंदावन । शोभिवंत रे ॥ध्रु०॥
क्रियेवीण वाचाळ । वायांची खळखळ । पोटी तळमळ । स्वार्थबुद्धि रे ॥१॥
अंतरी नाही धाले । शब्दज्ञान बोलिले । दिवाळे निघाले । आपें आप ॥२॥
दंभ केला लोकाचारी । लोलंगता अंतरी । देवापासी चोरी । कामा नये रे ॥३॥

१९९८
( राग-धनाश्री; ताल-धुमाळी )
प्राणी मीपणे व्यर्थ चि मेला । नेणतां काळ सर्व ही गेला ॥ध्रु०॥
दुसर्‍याला सांगतो आपण चुकतो । बोलतां चालतां राग येतो ।
नाना प्रकारी ठेकणे लावितो । विवेकी जनाला कंटाळतो ॥१॥
नसतां उत्तम गुण । आणितो थोरपण । तेणे होत असे भंड पुराण ।
पाहो जातां तेथे कैचे रे प्रमाण । प्रत्यये पाहतां अप्रमाण ॥२॥
आपणा माने तो थोर । कामा नये इतर । पाहो जातां तेथे कैंचा रे विचार ।
जन्मादारभ्य नावडे सारासार । सत्य नव्हे कृत्रिम व्यवहार ॥३॥
दया रघुनाथाची । चुकवी सकळ ची ची । खोडी काढितो कोण रे अंतरीची ।
हरीहर हो कां इंद्रादि विरंची । दास म्हणे नाही मीपणचि ॥४॥

१९९९.
( राग-काफी; ताल-दादरा )
घात करा घात करा घात करा ममतेचा ॥ध्रु०॥
ममतागुणे खवळे दुणे । राग-सुणे आवरेना ॥१॥
ममता मनी लागतां झणी । संतजनी दुरावली ॥२॥
दास म्हणे बुद्धि हरि । ममता करी देशधडी ॥३॥

१२००
( राग-कामोद; ताल-द्रुत एकताल )
एका देखतां एक । मरती सकळ लोक । जाणोनि विवेक ।
काय जाले रे ॥ध्रु०॥
आतांची घडी कळेना । मनाची वृत्ति वळेना । ममता गळेना ।
कोण्या गुणे रे ॥१॥
जाणता चुकोनि गेला । पोहणार बुडाला । ज्ञानिया दडाला ।
मायाजाळी रे ॥२॥
रामीरामदास म्हणे । अविद्येचे करणे । उमजोनि भुलणे ।
सर्वकाळ रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP