कुलदैवत - हरहर महादेव
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
देवा गा देवा देवा तुझ्या वाटी
झालीसे पाच कणसाची चोरी
कुणबी होता गा मैयावरी
त्यानं काय ठोकली आरोळी
उतरला मैयाच्या तो खाली
उधळली धूर्याची अंबाळी
सळवली सांबाच्या पाठीवरी
टाकली हातामध्ये हातबेडी गा
पायामधी टाकुनी पायबेडी
गिरजा माता भोळी गा हात कुणब्याला जोळी
देवा गा देवा देवा तुझ्यासाठी
सारवल्यासे गा म्या उभ्या भिंती
त्यावर काढिले म्या गा चित्रकोटी
डाव्या बाजूला शोभे सरोसती
उजव्या बाजूला शोभे गणपती
समोर पारबतीच्या गा मूर्ती
अंजनीच्या पोटी बाळ जन्मला मारोती
दशरथाला चार मुलं
राम गा लक्षीमन
आणिक भरत शत्रुघन
गेले ते लंकेवर चालून
मारीलासे लंकेचा रावन
राज ते करीतो बिभीषन
आले काय जानकीला घेऊन
आनिक सीतेला घेऊन
अंजनीचे सुत त्याचे नाव हनुमंत
देवा देवा तुझ्या वाटी
आहे कोकनाचे बन
त्यावर संभाचे राखन
त्याची सोनेरी गोफन
गोटा मारला झोकून
मोती झाले दानोदान
गिरजा माझी माता मोती घेतसे येचून
अन बेलगंगेला आला पूर
तिचे पानी झाले लाल
भोळ्या संभाचे लगीन
दिले गुलाबाचे पाल
बेलगंगेला आला पूर
तो काय आलासे चौफेर
आलासे चौफेर गा
मंधी गोसायाचे घर
बेलगंगेला आला पूर
तो काय आलासे चौकोनी
आलासे चौकोनी गा
मधी गोसायाची धूनी
अनु खांद्यावर खांदा
घेतला घाई घाई
घेतला घाई घाई गा
घराच्या वैतागा पायी
बानावाल्या दादा गा
तुझ्या बानाले तनाई
चवर्याचे गडावरी गा
लागते नेत्रात पनाई
काठीवाल्या दादा गा तुझ्या काठीचा पैसा घे जो
तुझ्या काठीचा पैसा घे जो काठी वाजवीत ने जो
देव देव करता गा संभा तुझे नाव गा
संभा तुझे नाव तुह्या चरणी महाभाव
अनु भरल्या दुपारी पोवा चालला हासत
अरं संभा संभा करता गा संभा सुंबरत
आम्ही गाईचे वासईरं गा आलो हुंबरत
संभा संभा करता गा संभा नाही घरी
डोईवर शिदोरी संभा गिरजाच्या माहेरी
अरं संभा संभा करता संभा तुझ्या वाटी
सांडली गा सुपारी पोवा चालला दुपारी
अरं संभा संभा करता संभा तुझ्या वाटी
सांडल्या गा लवंगा पोवा चालला तेलंगा
अरं संभा संभा करता संभा नाई दिसे
अरे भयान्या वनामंधी पोथी वाचयीत बसे
अगं मांगणीच्या पोरी तुवा मांग कुठी गेला
आला वर्हाडाचा पोवा त्यानं वाजवत नेला
अगं बारनीच्या पोरी पानं देजो बारा तेरा
संभाच्या लग्नासाठी विळा नेजो न गोजरा
सकाळच्या पारी कोंबडा देतो बांग
अनु संभाच्या बागेमंधी केळीच्या पानावरी लह्या देतो डोब्या नाग
अरं डोब्या म्हणून नसे त्याले राग लई हाये
माह्या संभाच्या गळ्यामंधी राजा सृष्टीचा हाये
अरं गडावरी गड गा गडावरी ताडं
दुरुन दिसते गा नदी नर्मदाची धार
अरं गडावरी गड गडावरी येळू गा
दुरुन दिसते नदी नर्मदाची वाळू गा
अरं गडावरी गड गड चवर्याचा बाका
तोंडी धरनी टाकू नका
अरं गडावरी गड एका गडाला कुलूप
गड चढता दिसला टोपीवाल्याचा मुलूख
अरं भिमाच्या मयावून मारे गीरजामाय हाका
झाडी वर्हाडाच्या लोका तुम्ही गर्दी करु नोका
अरं चौसर खेळता हात दुमता पळला
अरं गीरजाबाईची साडी केसावून गा बारीक
केसावून गा बारीक नेसन्यावाल्याची तारीफ
गीरजाबाईची साडी दिसे बुट्टेबाज
साडी दिसे बुट्टेबाज गा मिरी पळे शंभर साठ
गीरजाबाईचा चुळा हिरवा कंकर
ढवळ्या नंदीवर बसून आले शंकर
गाडीचा लोखंड सर्या रुळाले आटलं
झाडी वर्हाडच्या लोका त्याचं नवल वाटलं
शंकराच्या वाटी गा जातील भले भले
चवर्या येंगता येंगता झाले पखालीचे हेले
देवा तुझ्या वाटीनं गा असे टोंगया टोंगया पानी
सांबाच्या लग्नामंधी नंदी लागले पोहाळनी
भयान्या वनामंधी गा वाद्याचा लागे मोठा भेव
वर्हाडच्या लोकांसाठी तथी बसे महादेव
वाघाचा केला नंदी अन सर्पाची केली येसन
शंकर पारबती गा आले त्यावर बसून
N/A
References :
संग्राहक: श्री. बाजीराव पाटील
Last Updated : October 17, 2012
TOP