कुलदैवत - शंकराचं लगीन
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
शंकराच्या लग्नाला आधी नेमला गणपती
तिथं शारदा उभी होती
राजामध्ये दक्षराजा करीत असे कारभार
त्या राजाला सात कन्या ऐका त्यांचा विस्तार
इकडे या ग बायानो तुम्ही कुणाचं भाग्य खाता
सांगा मजला खरं
आम्ही खातो तुमचं भाग्य ऐका आमुचं उत्तर
सातवी कन्या गिरजाबाई रुसून बसली सुंदर
इकडं ये ग गिरजा तू कुणाचं भाग्य खाती?
सांग मजला खरं
त्या राजाला राग आला झाला लाल नंबर
प्रधानजीला हुकूम केला जावे तुम्ही देशावर
भलता सलता आणा म्हातारा करा गिरजेचं स्वयंवर
धुंडीत धुंडीत प्रधान गेले गाव लागलं शिंगणापूर
उघडे संन्यासी देव होते निजले होते राखेवर
त्याला गडबड करुनी बसविले नंदीवर
तडफडीने ताबडतोब उतरले कचेरीसमोर
गावामंधी दिली आरोळी यावं भेटीशी लौकर
भेटूनशानी गावामंधी गोसावी आणलं सारं
गिरजाबाईचं वर्हाड आलं ऐका चार हजार
कुठं आहे गांजा कुठं आहे तंबाखू येऊ द्या गुडगुडी लौकर
तिसरा म्हणतो भांग कुरुंबीचं डेरं येऊं दे झडकरी
वडील मेहुणी शाणी होती भलती गोष्टी सांगणारी
असं काहो भाऊजी करता तुमची तीन नेम दिसते
लांब दाढी मिशा पिंगट डंबरु तुमच्या हाती
दुसरी मेव्हणी घोंगडी घेऊनी आंथरु लागली आंगणात
तिसरी मेहुणी तुंबा घेऊनी पळू लागली महालात
चवथी मेहुणी त्रिशूळ घेऊन नाचू लागली दारात
पाचवी मेहुणी सांगत गेली मातेच्या महालात
देव नव्हे वेडा आहे गिरजाबाईचं संचित
तीच माता पार्वती आदिशक्तीचा अवतार
ब्रह्मा विष्णू महेश महादेवा अवघ्याहुनी थोर
हार हार हार शिव शिव शिव स्वार झाले नंदीवर
गिरजाबाईचं लगीन लागलं दिवस होता सोमवार
लगीन झालं साडं झालं सरला वेडा आवतार
भर पंचवीसाच्या भरात आला रुप दिसते दाणेदार
ह्या रुपाला भाळूनशानी नारी पडल्या धरणीवर
सहावी मेहुणी सांगत गेली मातेच्या जवळ
वेड नव्हे देव आहे गिरजाबाईचं दैव थोर
तीच माता पार्वती आदिशक्तीचा अवतार
ब्रह्मा विष्णू महेश्वर, महादेव अवघ्याहून थोर
गिरजाबाईला दागिने घालीत आले दिल्लीचे सोनार
शंकर निघाले शिंगणापूरला नेतो म्हणती गिरजेला
आईवडील घालवीत गेले नेत्र लागले गळायला
N/A
References :
संग्राहक: श्री. ना. ना. शिंदे
Last Updated : October 17, 2012
TOP