कुलदैवत - हरिजागर
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
नमन माझे सदगुरुनाथा शिव शंकराच्या सुता
त्याचे चरणी ठेवूनि माथा पंढरीनाथा आळविते
रुक्मिणीचा प्रीय कांत प्रगटला ह्रदयात
जागर केलासे त्वरित जागर माथा आळविते
आश्विन शुद्ध दशमीचे दिवशी
आरंभ होतो जागरणासी
तेहतीस कोटी देव ऋषी
दही दुधासी पाहु येती
देव सर्वांगी सावळा पंचामृताचा सोहळा
मुखी लोणीयाचा गोळा अनंत कळा नकळे
पहाटेचे प्रहर रात्री आनंद होतो घरोघरी
दह्या दुधाच्या घागरी श्रीहरीसी अर्पिती
साखर मधाचे मर्दन मोगरेल अर्भजा चर्चून
उष्ण उदक शुद्ध स्नान मनमोहना शोभतो
पुजार्याचे पुण्य थोर अखंड पूजा करती लवकर
नाना परींचे उपचार दिनोद्धारा भोगिती
पूजा पहाती थोर थोर काशीखंडाचे शंकर
त्रिशुळ हातीचा डमरु गळा हार शेषाचा
भैरव शोधी बाळराजा याच्या तिही क्षेत्री ध्वजा
हाती काठी सन्निध उभा पाहातो शोभा देवाची
चतुर्भुज गजानन यांचे उंदिराचे वाहन
प्रेमे नाचे आनंदाने जगज्जीवना पाहातसे
वायुपुत्र हनुमंत याची सेवा अखंडित
दोन्ही जोडुनीया हस्त चरणी मस्तक ठेवितसे
ब्रह्मदेव शिरोमणी तिन्ही त्रिभुवनींचा तो धनी
पंचामृताशी पाहुनी अंतरी ध्यान करीतसे
राधा रखुमाई भामा त्यांची प्रिती असे मेघश्यामा
मिळुनी गेली आत्मारामा देहभान विसरल्या
लक्ष्मीचा अहंकार नारायणे केला दूर
झाली पायांची किंकर सर्वाहूनी वरिष्ट
पुंडलिक भीमरथी मुख्य गोदा भागिरथी
नित्य नेमाशी येती हरी जागरा सावध
नारद म्हणे ऋषिश्वर विणा योगेश्वर
रामनामाचा गजर निरंतर ध्यान असे
तुळजापूरची निवासीनी नाव तुझे वरदायिनी
घाट शिळेचे वरुनी अंतरी ध्यान करितसे
नरसिंगपुरचा नरहरी कोळे नरसिंगपूर भोवरी
अतुल अनुष्ठान करी हरी जागरा सावध
करवीर कोल्हापूरवासिनी तू तर विश्वाची जननी
दक्षिण केदार घेऊनी धाऊनी येसी जागरा
निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई सोपानदेव चौथा भाई
चोखा नामदेव जनाबाई अक्षयपायी राहिले
पैठणचा एकनाथ अरण भेडींचा सावता
तो तर देवाचा पंडियता प्रति येतो जागरा
नरसिंह हुंडिवाला गोरा कुंभार बहुत भला
बालक तुडवूनि काला केला आत्मा नेला जागरा
नमन माझे सदगुरुनाथा शिवशंकराच्या सुता
त्याचे चरणी ठेवूनी माथा पंढरीनाथा आळविते
N/A
References :
संग्राहिका: सौ. मंगला नावडीकर
Last Updated : October 17, 2012
TOP