कुलदैवत - शिव पार्वती प्रश्नोत्तरे
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
पार्वती: ऐकाहो शंकरा बोधाचे प्रश्न करा
शंकर: सांग ग पार्वती बोधाचे अर्थ किती?
कोणाला अडपीत होतीस?
कोणाला दडपीत होतीस?
कोणाला हातात धरुन बंधन तू करीत होतीस?
पार्वती: दाराला अडपीत होते
अडसराला दडपीत होते
कडीला हातात धरुन बंधन मी करीत होते
ऐका हो शंकरा...
शंकर: कोणाला बांधीत होतीस?
कोणाला सोडीत होतीस?
कोणाला हाती धरुन घरात आणीत होतीस?
पार्वती: गाईला बांधीत होते
वत्साला सोडीत होते
चरवीला हाती धरुन घरात आणीत होते
ऐका हो शंकरा...
शंकर: कोणाला घुसळीत होतीस?
कोणाला काढीत होतीस?
कोणाच्या छंदाकडे बघून नाचत होतीस?
पार्वती: दह्याला घुसळत होते
लोण्याला काढीत होते
रवीच्या छंदाकडे पाहून मी नाचत होते
ऐका हो शंकरा...
शंकर: कोणाला लावीत होतीस?
कोणाला कोरीत होतीस?
कुणाच्या मुखाकडे पाहून तूं हासत होतीस?
पार्वती: कुंकवाला लावीत होते
काजळाला कोरीत होते
आरशातल्या मुखाकडे पाहून मी हासत होते
ऐका हो शंकरा...
शंकर: कोणाला हात देत होतीस?
कोणाला पाय देत होतीस?
कोणाच्या पलंगावरी निद्रा तूं केली होतीस?
पार्वती: कासाराला हात देत होते
सोनाराला पाय देत होते
शंभोच्या पलंगावरी निद्रा मी केली होती
ऐका हो शंकरा बोधाचे प्रश्न करा
N/A
References : संग्राहिका: सौ. कमलाबाई सोहनी
Last Updated : October 17, 2012
TOP