कुलदैवत - गौरीबाळा
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
१
यावे नाचत गौरीबाळा
हाती घेऊनी पुष्पांच्या माळा
सर्वे ठायी मी वंदितो तुला
यावे नाचत गौरीबाळा
चौदा विद्येचा तू माता पिता
सर्वे ठायी हाये तुजी सत्ता
चार वेदा घ्यावे वेळोवेळा
यावे नाचत गौरीबाळा
साही शास्त्रे अठरा पुराण
तुझ्यापासून झाले निर्माण
भक्त देवी येती मंडपाला
यावे नाचत गौरीबाळा
मुळारंभी सत्व धरी पाया
संगे घेत सरस्वती माया
किती विनवी तुला भक्तमेळा
यावे नाचत गौरीबाळा
२
मोरया गणपती रे गणराजा
किती विनवू तुला म्हाराजा
तेहतीस कोटी देव दैवता
सर्वा आधी गणनायका
दैत्य मारुनी केलीस दशा
लावली पळवून धाही दिशा
चेडा झुटिंग वेताळ म्हैशा
दुष्टाला देशी तू सजा
किती विनवू तुला म्हाराजा
तुझा धाक तिन्ही ताळाला
दिला सराप तू चंद्राला
चतुर्भुज तू मंगलमूर्ति
संगे घेऊनी सारजा सती
हाती त्रिशूळ डमरु बाजा
किती विनवू तुला म्हाराजा
अष्टभैरव सिद्ध सोळा
चौसष्ट जोगणींचा मेळा
गण शंभर कोटी जमले
माझ्या अंगणी येऊनी गमले
पीर पैगंबर हे रमले
गाऊ नाम लावू ध्वजा
किती विनवू तुला म्हाराजा
N/A
References :
संग्राहिका: डॉ. सरोजिनी बाबर
Last Updated : October 17, 2012
TOP