पंचक - भक्तिपर अभंगपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
भक्ति नलगे भाव नलगे । देव नलगे आम्हांसी ॥१॥
आम्ही पोटाचे पाइक ॥ आम्हा नलगे आणिक ॥२॥
आम्ही खाऊं ज्यांची रोटी । त्यांची कीर्ति करूं मोठी ॥३॥
रामीं रामदास म्हणे । ऐशीं मूर्खाचीं लक्षणें ॥४॥
॥२॥
आम्हां अन्न झालें पुरे । अन्नावीण काय नुरे ॥१॥  
पोटभरी मिळे अन्न । आम्हां तेंचि ब्रह्मज्ञान ॥२॥
अन्नावांचून दुसरा । देव आहे कोण खरा ॥३॥
भगवंताची नाहीं गोडी । काय म्हणे ते बापुडीं ॥४॥
रामीं रामदास म्हणे । मूर्ख बोले दैन्यवाणें ॥५॥
॥३॥
अन्न व्हावें पोटभरी । मग ते ज्ञानचर्चा करी ॥१॥
ऐसें बोलती अज्ञान । ज्यांसि नाहीं समाधान ॥२॥
आधीं अन्न तें पाहिजे । मग व्यानस्थ राहिजे ॥३॥
अन्नावीन तळमळ । अन्न करितें सकळ ॥४॥
कैंचा राम कैंचा दास । अवघे पोटाचे सायास ॥५॥
॥४॥
अन्न देणार श्रीहरी । तोचि प्रतिपाळ करी ॥१॥
ज्या देवाचे आज्ञेवरी । मेघ वर्षती अंबरी ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास म्हणे ऐक । आदि अंती देव एक ॥४॥
॥५॥
देव तारी देव मारी । देव सर्व कांहीं करी ॥१॥
अन्नोदक देवें केलें । सर्व तेणेंचि निर्मिले ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास म्हणे ऐक । देव त्रैलोक्यनायक ॥४॥
॥६॥
देव घालितो संसारी । देव सर्व कांहीं करी ॥१॥
लक्ष चौर्‍यांशीं हिंडतां । तेथें देव सांभाळिता ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
दास म्हणे ही अंतर । देव कृपेचा सागर ॥४॥
॥७॥
देव एका भाग्य देतो । एका भीकेसि लवितो ॥१॥
न कळे भगवंताचे करणें । राव रंक ततक्षणें ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास म्हणे पाही । देवावीण कांहीं नाहीम ॥४॥
॥८॥
माया लाविली माईक । आदि अंतीं देव एक ॥१॥
देव संकटीं पावता । देव अंतीं सोडविता ॥२॥
तयासि चुकलीं बापुडीं । अन्न अन्न करिती वेडीं ॥३॥
रामदास नवल परी । देव सर्वांचे अंतरी ॥४॥
॥९॥
क्षुधा लागतांचि अन्न । तृषा लागतां जीवन ॥१॥
निद्रा लागतां शयन । आळस येतां चुके मन ॥२॥
मळभूत्र संपादणें । शौच आचमन करणें ॥३॥
खानें लागे नानापरी । सर्वकाळ भरोवरी ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसंदिवस काळ गेला ॥५॥
रामीं रामदास म्हणे । देह सुरवाडा करणें ॥६॥
॥१०॥
हात धुणें पाय धुणें । नाना उपचार करणें ॥१॥
सर्वकाळ लोभासंगें । करणें लागे हो अव्यंगें ॥२॥
वस्रें अलंकार पाहतां । पुढती घालितां काढितां ॥३॥
सदा इंद्रिय गळतां । त्यासि करावी शुद्धता ॥४॥
अवधा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
रामदास म्हणे हित । कैसें घडावें स्वहित ॥६॥
॥११॥
शीतकाळींच हुताश । उष्णकाळीं वारावास ॥१॥
आले पर्जन्याचे दिवस । केले घराचे सायास ॥२॥
नाना व्याधींचीं औषधें । पथ्य करावें निरोधें ॥३॥
विषयी मनासि आदर । करणें लागे निरंतर ॥४॥
अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
दास म्हणे सांगो किती । ऐसी देहाची संगति ॥६॥
॥१२॥
धनाधान्याचें संचित । करणें लागे सावचित ॥१॥
अर्थाजातो एकला रे । कलह करावे आदरें ॥२॥
नाना पशूंतें पाळावीं । नाना कृत्यें सांभाळावीं ॥३॥
सार विचार जतन । करणें लागे सावधान ॥४॥
अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
रामदास म्हणे देवा । जीव किती हा घालावा ॥६॥
॥१३॥
पोटधंदा जन्मवरी । करूं जातां नाहीं पुरी ॥१॥
करितां संसारीं सायास । नाहीं क्षणाचा अवकाश ॥२॥
अन्न निर्माण कराया । सर्वकाळ पीडी काया ॥३॥
काम करिताम दिवस थोडा । ऐसा कष्टा नाहीं जोडा ॥४॥
अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥
दास म्हणे सावधान । झालें सदृढ बंधन ॥६॥
॥१४॥
शिंक जांभई खोकला । तितुका काळ व्यर्थ गेला ॥१॥
आतां ऐसें न करावें । नाम जीवीं तें धरावें ॥२॥
श्वास उच्छ्‍वास निघतो । तितुका काळ व्यर्थ जातो ॥३॥
पात्या पातें नलगत । तितुकें वय व्यर्थ जात ॥४॥
लागे अवचित उचकी । तितुकें वय काळ लेखी ॥५॥
म्हणे रामीं रामदास । होतो आयुष्याचा नाश ॥६॥

॥अभंगसंख्या ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP