पंचक - भ्रांतिपंचक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१॥
गळा बांधिला पाषाण ।
आत्मलिंग जाणे कोण ॥१॥
जिवाशिवाचें स्वरूप ।
कोण जाणे कैसें रूप ॥२॥
लिंग चुकलें स्वयंभ ।
धरी पाषाणाचा लाभ ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
भेद जाणती शाहाणे ॥४॥
॥२॥
पृथ्वी अवघी लिंगाकार ।
अवघा लिंगाचा विस्तार ॥१॥
आतां कोठें ठेवूं भाव ।
जेथें तेथें महादेव ॥२॥
अवघा देव विस्तारला ।
ऐसें देवचि बोलिला ॥३॥
राम-दासा विसरला ।
अवघा देवचि भरला ॥४॥
॥३॥
एकविस स्वर्ग विस्तारला ।
देव संपुष्टीं घातला ॥१॥
केलें देवासी बंधन ।
तेंचि पावला आपण ॥२॥
देव ठाईंचा अनंत ।
त्यासि म्हणती अंतवंत ॥३॥
रामदास म्हणे भावें ।
जैसें द्यावें तैसें घ्यावें ॥४॥
॥४॥
अंत नाहीं तो अनंत ।
त्यासि दोरी करी भ्रांत ॥१॥
ऐसें जनाचें करणें ।
कैसा संसार तरणें ॥२॥
देव व्यापक अर्वांसी ।
त्यासि म्हणती एकदेशी ॥३॥
रामदासीं देव पूर्ण ।
त्यासि म्हणती अपूर्ण ॥४॥
॥५॥
देव पाषान भाविला ।
तोचि अंतरीं दाविला ॥१॥
जैसा भाव असे जेथें ।
तैसा देव वसे तेथें ॥२॥
दृश्य बांधोनियां गळा ।
देव जाहला निराळा ॥३॥
दास म्हणे भावातीत ।
होतां प्रगत अनंत ॥४॥
॥६॥
अवघे पाषाण मांडिले ।
कोण म्हणती आपुलाले ॥१॥
सर्व घटीं देव एक ।
भेदें भाविला अनेक ॥२॥
देव निर्भळ निश्चळ ।
पाहती पाषाणाची खोळ ॥३॥
राम-दासाचें अंतर ।
देवापासीं निरंतर ॥४॥
॥७॥
धान्य अवघेंचि टाकिती ।
बळ देखतां तोंडीं माती ॥१॥
देव सर्वाचें अंतरीं ।
सोडूं जातां तैसी परी ॥२॥
तूप सांडूनि आपण ।
खाऊं पाहे सांठवण ॥३॥
दास म्हणे ते राउळा ।
सोडून पूजिती देउळा ॥४॥
॥८॥
सांठवणेवीण धान्य ।
धान्येंवीण सांठवण ॥१॥
एकावीण एक काय ।
कामा नये वायां जाय ॥२॥
ज्ञानेंवीन उपासन ।
उपासनेवीण ज्ञान ॥३॥
रामीं रामदासा-वीण ।
करी नुस्तेंचि भजन ॥४॥
॥ अभंगासंख्या ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 30, 2014
TOP