पंचक - वैराग्यपंचक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१॥
प्रपंच सांडुनियां बुद्धि ।
जडली परमार्थ उपाधि ॥१॥
मना होईं सावचित ।
त्याग करणें हा उचित ॥२॥
संप्रदाय समुदाव ।
तेणें जडे अहंभाव ॥३॥
रामदास म्हणे नेम ।
भिक्षा मागणें उत्तम ॥४॥
॥२॥
प्रपंच केला ताडातोडी ।
जडली परमार्थाची बेडी ॥१॥
सावधान होईं जीवा ।
त्याग केलचि करावा ॥२॥
काम क्रोध राग द्वेष ।
अंगीं जडले विशेष ॥३॥
रामदासें बरें केलें ।
अवघें जाणोनी त्यागिलें ॥४॥
॥३॥
कोण कैंचा रे भिकारी ।
भीक मागे दारोदारीं ॥१॥
ऐसें म्हणे तेथें जावें ।
सुखें वैराग्यें फिरावें ॥२॥
आहे ब्राह्मण विदेशी ।
नाहीं ठाऊक आम्हांसी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
कोण आहे कोण जाणे ॥४॥
॥४॥
नका ओळखीचे जन ।
अंगीं वाजे अभिमान ॥१॥
आतां तेथें जावें मना ।
जेथें कोणी वोळखीना ॥२॥
लोक म्हणती कोण काये ।
पुसों जातां सांगो नये ॥३॥
रामदास म्हणे पाही ।
तेथें कांहीं चिंता नाहीं ॥४॥
॥५॥
देह जावो अथवा राहो ।
रामें फेडिला संदेहो ॥१॥
रामालागीं देशवटा ।
संसाराच्या बारा वाटा ॥२॥
जीवालागीं आदि अंतीं ।
एक रामाची संगति ॥३॥
रामदासीं रामरावी ।
नाहीं आणिक उपावो ॥४॥
॥६॥
सांज वोसरतां सात ।
वायां करावा आकांत ॥१॥
तैसीं सखीं जीवलगें ।
जाती एकमेकांमागें ॥२॥
चार दिवस यात्रा भरे ।
सवेंचि मागुती वोसरे ॥३॥
पूर्ण होतां महोत्सवो ।
फुटे अवघा समुदावो ॥४॥
बहुत वराडी मिळाले ।
जैसे आले तैसे गेले ॥५॥
एक येती एक जाती ।
नाना कौतुक पाहाती ॥६॥
बंधु बहिणी माता पिता ।
कन्या पुत्र आणि कांता ॥७॥
ऋणानुबंधाचें कारण ।
वायां शोक नि:कारण ॥८॥
एक बहुसाल जिती ।
एक वेळ वरी जाती ॥९॥
बहु झाले दासदासी ।
नाना पशू गाई महिषी ॥१०॥
धन धान्याचें संचित ।
कांहीं होत कांहीं जात ॥११॥
रामीं रामदास म्हणे ।
संसारासी येणें जाणें ॥१२॥
॥७॥
कोणी पुत्र कामां नये ।
मित्र करी तो उपाये ॥१॥
कैंचें आपुलें परावें ।
अवघें ऋणानुबंधें घ्यावें ॥२॥
जीवलगाचिये परी ।
मातेहुनी लोभ करी ॥३॥
आहे कोण जाणे कैची ।
परी ते जीवाचे जीवींची ॥४॥
जीवलग जीव घेती ।
त्यासि परावीं रक्षिती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
न कळे देवाचें करणें ॥६॥
॥८॥
जे जे संसारासी आले ।
ते ते तितुकेही एकले ॥१॥
वायां आपुलीं मानिलीं ।
शेखीं दुरी दुरावलीं ॥२॥
सखीं सांडूनियाम देशीं ।
मृत्यु पावलीं विदेशीं ॥३॥
खाती व्याघ्र आणि लांडगे ।
तेथें कैंचीं जीवलगें ॥४॥
जीवलग जीव घेती ।
त्यासि परावीं रक्षिती ॥५॥
राभीं रामदास म्हणे ।
अवघीं जाणावीं पिशुनें ॥६॥
॥९॥
देह बहुतांचें खाजें ।
मुर्ख म्हणे माझें माझे ॥१॥
विंचु विखारें अजगर ।
नाना श्वापदें अपार ॥२॥
नाना पक्षी गीध काक ।
श्वान मार्जार जंबुक ॥३॥
लाव लासी भुत खेत ।
सांगों जातां असंख्यात ॥४॥
किती सांगो वारंवार ।
जीव जीवाचा आहार ॥५॥
म्हणे रामीं रामदास ।
कैंचा देहाचा विश्वास ॥६॥
॥१०॥
घात करूनि आपुला ।
काय रडसी पुढिला ॥१॥
बहु मोलाचें आयुष्य ।
विषयलोभें केला नाश ॥२॥
नाहीं ओळखिलें सत्या ।
तेणें होते आत्महत्या ॥३॥
नरदेहाची संगति ।
गेली गेली हातोहातीं ॥४॥
नाहीं देहाचा भरंवसा ।
गेली गेलीरे वयसा ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
भुलूं नको मूर्खपणें ॥६॥
॥११॥
कोणें कोणासी रडावें ।
एकामागें एकें जावें ॥१॥
एक वेळ गेली माता ।
एक वेळ गेली पिता ॥२॥
द्रव्य दारा जाती पुत्र ।
जीवलगें आणि मित्र ॥३॥
प्राणी संसारासी आला ।
तितुका मृत्युपंथें गेला ॥४॥
पूर्वज गेले देवापासीं ।
तेचि वाट आपणासी ॥५॥
रामदास म्हणे लोक ।
करी गेलियांचा शोक ॥६॥
॥१२॥
ज्याचें होतें तेणें नेलें ।
तेथें तुझें काय गेलें ॥१॥
वेगीं होई सावधान ।
करी देवाचें भजन ॥२॥
गति नकळे होणाराची ।
हे तंव इच्छा भगवंताची ॥३॥
पूर्वसंचिताचीं फळें ।
येती दु:खाचे होलाळे ॥४॥
पूर्वीं केलें जें संचित ।
तें गें भोगावेम निश्चित ॥५॥
दास म्हणे पूर्व रेखा ।
प्राप्त न टळे ब्रह्मादिकां ॥६॥
॥१३॥
वाटे संसार दुस्तर ।
होती दु:खाचे डोंगर ॥१॥
तरी श्रवण करावें ।
तेणें दु:ख विसरावें ॥२॥
पुढें काय करूं आतां ।
वाटे संसाराची चिंत्ता ॥३॥
येतां उभंड भरेना ।
मायाजाळ आवरेना ॥४॥
दुरी जाउनी विवेक ।
आणि आदळतो शोक ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
दु:ख जीवें धरी उणें ॥६॥
॥१४॥
काम क्रोध मद मत्सर ।
जरि झाले अनावर ॥१॥
त्यांसि करावें साधन ।
सदा श्रवण मनन ॥२॥
बोला ऐसें चालवेना ।
जीवभ्रांति हालवेना ॥३॥
दृढ लौकिक सांडेना ।
ज्ञान विवेक मांडेना ॥४॥
पोटीं विकल्प सुटेना ।
नष्ट संदेह तुटेना ॥५॥
दास म्हणे निर्बुजलें ।
मन संसारीं बुडालें ॥६॥
अभंगसंख्या ॥८०॥
N/A
References : N/A
Last Updated : March 30, 2014
TOP