पंचक - भ्रमपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
झाला स्वरूपीं निश्चय ।
तरी कां वाटतसे भय ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपण आपण ॥२॥
क्षण एक निराभास ।
क्षण एक मी माणूस ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
देहबुद्धीचेनी गुणें ॥४॥
॥२॥
छाया देखोनि आपुली ।
जीव झाला दिशाभुली ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपणा आपण ॥२॥
मुखें बोलतां उत्तर ।
तेथें जालें प्रत्युत्तर ॥३॥
डोळां घालितां आंगोळी ।
एकाचीं तीं दोन जालीं ॥४॥
पोटीं आपण कल्पिलें ।
तेंच आलेंसें वाटलें ॥५॥
दास म्हणे हे उपाधि ।
शंका धरितां अधिक बाधी ॥६॥
॥३॥
पोते आहे खांद्यावरी ।
गेलें म्हणोनि हांका मारी ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपणा आपण ॥२॥
नेणोनियां जना पुसे ।
पाहों जातां हातीं असे ॥३॥
शोक जाहला विकल ।
पाहों जातां कंठीं माळ ॥४॥
वस्तु बांधोनि पदरीं ।
पुसतसे दारोदारीं ॥५॥
रामदास म्हणे जना ।
जवळी असोनि कळेना ॥६॥
॥४॥
कांहीं दिसे अकस्मात ।
तेथें आलें वाटे भूत ॥१॥
वायां पडावें संदेहीं ।
मुळीं तेथें कांहीं नाहीं ॥२॥
पुढें देखतां अंधारें ।
तेथें आलेम वाटभरें ॥३॥
झाडझुडूप देखिले ।
जीवीं वाटे कोणी आलें ॥४॥
पुढें रोविलासे झेंडा ।
भ्रांत्या म्हणे कोण उभा ॥५॥
रामदास सांगे खूण ।
भितो आपणा आपण ॥६॥
॥५॥
वाजे पाऊल आपुलें ।
म्हणे मागें कोण आलें ॥१॥
कोण धांवतसे आड ।
पाहों जातां झालें झाड ॥२॥
भावितसे अभ्यंतरीं ।
कोण चाले बरोबरी ॥३॥
शब्दपडसाद ऊठिला ।
म्हणे कोणी रे बोलिला ॥४॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐसीं शंकेची लक्षणें ॥५॥
॥६॥
आला आला रे बागुला ।
म्हणतां शंका धरी मूल ॥१॥
परी ते शाहाणे जाणती ।
तैसी माया हे मानिती ॥२॥
मृगें म्हणती मृगजळ ।
अवघे दाटलें तुंबळ ॥३॥
पाहो जातां दृष्टीचें बंधन ।
मूर्खा होय समाधान ॥४॥
पाहे स्वप्रींची संपत्ति ।
सत्य मानी मंदमती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐसीं मूर्खाचीं लक्षणें ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP