पंचक - कथापंचक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१॥
धन्य धन्य तें नगर ।
जेथें कथा निरंतर ॥१॥
गुण गाती भगवंताचे ।
तेचि मानावे दैवाचे ॥२॥
स्वयें बोले जगजीवन ।
थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥
रामदास म्हणे भले ।
हरिभक्तीं उद्धरले ॥४॥
॥२॥
रामनामावीणें कांहीं ।
अंतीं सोडवण नाहीं ॥१॥
गंगातीरीं योगेश्वर ।
अथवा प्रपंचीं ईश्वर ॥२॥
थोरपणें धरितां तांठा ।
तरि तो नागवे करंटा ॥३॥
बहुत पूजिलीं दैवते ।
योग याग नाना मतें ॥४॥
धोती पोती हो भुजंगी ।
लोकीं कर्म करिता योगी ॥५॥
विनवी रामीं रामदास ।
नाना साधनीं सायास ॥६॥
॥३॥
सकळ साधनांचें फळ ।
रामनामचि केवळ ॥१॥
जप तप अनुष्ठान ।
अंतीं नामचि प्रमाण ॥२॥
नाना मंत्र मंत्रावळी ।
सोडवीना अंतकाळीं ॥३॥
महापातकी पतित ।
नामें तारिले अनंत ॥४॥
नाम साराचेंहि सार ।
नाम सकळांसी आधार ॥५॥
दास म्हणे सांगो किती ।
नामावीण नाहीं गति ॥६॥
॥ अभंगसंख्या ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 30, 2014
TOP