पंचक - मूर्खपणपंचक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१॥
येथें काय रे वाजतें ।
कोठें काय गजबजतें ॥१॥
उगा करिती कोल्हाळ ।
माझे उठलें कपाळ ॥२॥
हांका मारूनि वरडती ।
टाळ अवघेचि कूटिती ॥३॥
कोठें कैंचे आले लुटे ।
वायां झाले टाळकुटे ॥४॥
वेडीं संसार सांडिला ।
व्यर्थ गलबला मांडिला ॥५॥
दास म्हणे या मूर्खाला ।
हरिकथेचा कंटाळा ॥६॥
॥२॥
हरिकथेचा आला राग ।
खेळ होतां घाली त्याग ॥१॥
ऐसे प्रकारचे जन ।
नाहीं देवाचें भजन ॥२॥
कळावंताचें तों गाणें ।
ऐकतांचि जीव माने ॥३॥
करिती लग्राचा उत्सव ।
नाहीं देव महोत्सव ॥४॥
भूतदया नाहीं पोटीं ।
खाती लोभावीं चोरटीं ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
देव धर्म कोण जाणे ॥६॥
॥३॥
स्वार्थ केला जन्मवरी ।
लोभें राहिला श्रीहरी ॥१॥
धन धान्य अहर्निशीं ।
गाई महिषी घोडे दासी ॥२॥
शेत वाडे घर ठावो ।
प्राणी जीवीं धरी हावो ॥३॥
माता पिता बहिणी भ्राता ।
कन्या पुत्र आणि कांता ॥४॥
व्याही जावई आपुले ।
इष्ट मित्र सुखी केले ॥५॥
दास म्हणे हो शेवटीं ।
प्राप्त झाली मसणवटी ॥६॥
॥४॥
जन्मवरी शीण केला ।
अंतकाळीं व्यर्थ गेला ॥१॥
काया स्मशानीं घातली ।
कन्या पुत्र मुरडलीं ॥२॥
घर वाडा तो राहिला ।
प्राणी जातसे एकला ॥३॥
धन्य धान्य तें राहिलें ।
प्राणी चर्फडित गेले ॥४॥
इष्ट मित्र आणि सांगाती ।
आपुलाले घरा जाती ॥५॥
दास म्हणे प्राणी मेले ।
कांहीं पुण्य नाहीं केलें ॥६॥
॥५॥
दैन्यवाणा झाला प्राणी ।
चंद्री लागली नयनीं ॥१॥
म्हणती उचला उचला ।
आतां भूमीभार झाला ॥२॥
घोर लागला अमूप ।
प्राणी झाला प्रेतरूप ॥३॥
दांतखीळ बसली वाणी ।
ताठा भरला करचरणीं ॥४॥
डोळे विक्ताळ दसिती ।
झांका झांका मुलें भीती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
अवधीं सुखाची पीसून नें ॥६॥
॥६॥
एक म्हणती कां पळावें ।
एक म्हणती कां बैसावें ॥१॥
लोक बोलती मत्सरें ।
काय मानावें तें खरें ॥२॥
एक म्हणती काम सोडावें ।
एक म्हणती कां मोडावें ॥३॥
दास म्हणे हो तत्त्वता ।
जान अवघी बाष्कळता ॥४॥
॥७॥
नाहीं ज्ञानावा विचार ।
केला अज्ञानें संचार ॥१॥
मना आलें तें बोलती ।
चालों नये तें चालती ॥२॥
अवघा स्वधर्म बुडाळा ।
देह प्रपंचीं लविला ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अविद्येंचीं हीं लक्षणें ॥४॥
॥८॥
स्रान नाही संध्या नाहीं ।
देव नाहीं धर्म नाहीम ॥१॥
उगाच बसुनियां घरीं ।
सज्जनाची निंदा करी ॥२॥
तीर्थ नाहीं क्षेत्र नाहीं ।
दान नाहीं पुण्य नाहीं ॥३॥
तप नाहीं शास्र नाहीं ।
मंत्र नाहीं गायत्री नाहीं ॥४॥
पोटीं नाहीं निस्पृहता ।
नाहीं विधेनें पूरता ॥५॥
रामदास सांगे खुणें ।
पापी सर्वापरी उणे ॥६॥
॥९॥
कपटी कुटिळ आळसी ।
घरीं मिळेना खायासी ॥१॥
उगाच धरितसे ताठा ।
पापी हरिद्री करंटा ॥२॥
पोरें म्हणती काय खावें ।
स्रिया म्हणती कोठें जावें ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
अवघीं हासतीं पीसुनें ॥४॥
॥१०॥
स्वयें आचरावें पाप ।
विशेष निंदा वज्रलेप ॥१॥
निद्रा मत्सर टवाळी ।
मायवापाशीं ढवाळी ॥२॥
अनाचारी परद्वारीं ।
मना आलें तेंचि करी ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
असे जितांचि मरणें ॥४॥
॥ अभंगसंख्या ॥५३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 30, 2014
TOP