पंचक - बंधनपंचक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१॥
सर्वकाळ शेंडा मूळा ।
येत जातसे मुंगळा ॥१॥
तैशा कां कारसी येरझारा ।
शरण जावें रघुवीरा ॥२॥
हातीं धरूनियां सूत ।
खालीं वरती येत जात ॥३॥
दास म्हणे जळावरी ।
जैसी फिरती कीं भिगोरी ॥४॥
॥२॥
पायीं लाउनियां दोरी ।
भोंगा बांधिला लेंकुरीं ॥१॥
तैसे पावसी बंधन ।
मग तुजला सोडील कोण ॥२॥
एक धरोनि वानर ।
हिंडविती दारोदार ॥३॥
रामदास म्हणे पाहे ।
रीस धापा देत आहे ॥४॥
॥३॥
नको करूं अभिमान ।
होणार तें देवाधीन ॥१॥
बहु द्रव्यानेम भुलले ।
काळें सर्वहि ग्रासिले ॥२॥
जे म्हणती मी शक्त ।
तेणें जाहले आसक्त ॥३॥
रामदास सांगे वाट ।
कैसा होईल शेवट ॥४॥
॥४॥
डोळां अज्ञान झांपडी ।
पायीं देहबुद्धि बेडी ॥१॥
असे अज्ञान पशुजना ।
जुंपियेले संसारघाणा ॥२॥
खांदीं ओझें विषयाचें ।
पाठीं फटके सुखदु:खाचे ॥३॥
रामीं राम दास म्हणे ।
व्यर्थ गेलें त्याचें जिणें ॥४॥
॥५॥
आलें संसाराचें ज्ञान ।
तेणें झालें समाधान ॥१॥
सकळ साराचेंहि सार ।
ऐसा माझा हा संसार ॥२॥
कैंचा देव कैंचा धर्म ।
तीर्थयात्रा कैंचा भ्रम ॥३॥
कैंचें ज्ञान कैंचें ध्यान ।
अन्न हेंचि समाधान ॥४॥
व्यर्थ गेला रे लैकिकीं ।
येणें पोट भरेना कीं ॥५॥
रामीं रामदास भले ।
आम्हां सौख्य हो मानलेम ॥६॥
॥६॥
कल्पनेचे बरोबरी ।
मन सर्वकाळ करी ॥१॥
स्वप्र सत्यचि वाटले ।
दृढ जीवेंसीं धरिलें ॥२॥
अवघा माईक विचारा ।
नाना मंदिर सुंदर ॥३॥
तोचि मानिला साचार ।
दिव्यांबर मनोहर ॥४॥
जीव सुखें सुखावला ।
थोर आनंद मानिला ॥५॥
रामदास म्हणे मंद ।
लिंगदेहाचा आनंद ॥६॥
॥७॥
कांहीं कळेना विचार ।
अवघा झाला शून्याकार ॥१॥
उमजेना संसारिक ।
आठवेना परलोक ॥२॥
अंध विचारीं पडियेले ।
अंधकारीं सांपडले ॥३॥
मायाजाळें गुंडाळले ।
वासनेनें वेटाळिले ॥४॥
कामक्रोधें जाजावले ।
मदमत्सरें पीडिले ॥५॥
रामीं रामदास म्हने ।
अज्ञानाचीं हीं लक्षणें ॥६॥
॥८॥
अंध अंधारीं बैसले ।
त्यांसि हातें पालविलें ॥१॥
त्यांसि कळेना कळेना ।
त्यांचि वृत्ति निवळेना ।
॥२॥ संतसंगाचें बोलणें संसारिक काय जाणे ॥३॥
म्हणे रामीं रामदास ।
केला नसता अभ्यास ॥४॥
॥९॥
केला संसार अभ्यास ।
झाला आयुष्याचा नाश ॥१॥
सदा उठतां बसतां ।
रामाविण केली चिंता ॥२॥
नाहीं साक्षेपांचा वेग ।
उगाच मांडिला उद्योग ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐसे जीतचि मरणें ॥४॥
॥ अभंगसंख्या ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 30, 2014
TOP