पंचक - सख्यपंचक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१॥
एक लक्ष दिनमणी ।
तृप्त होतसे कमळिणी ॥१॥
तैसा देव आहे दूरी ।
परि तो भक्तांचे अंतरीं ॥२॥
दोन लक्ष निशापति ।
जेणें चकोर तृप्त होती ॥३॥
रामदास म्हणे घन ।
देता चातका जीवन ॥४॥
॥२॥
बाळक जाणेना मातेसी ।
तिचें मन तयापासीं ॥१॥
तैसा देव हा दयाळ ।
करी भक्तांचा सांभाळ ॥२॥
धेनु वत्साचेनि लागें ।
धांवे त्याच्या मागें मागें ॥३॥
पक्षी घेतसे गगन ।
पिल्यांपासीं त्याचें मन ॥४॥
मत्स्य आठवितां पाळी ।
कूर्म दृष्टीनें सांभाळी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
मायाजाळाचीं लक्षणें ॥६॥
॥३॥
बाळपणीं लोभ करी ।
माता नाहीं जन्मवरी ॥१॥
तैसा देव हा दयाळ ।
दास-पाळ सर्वकाळ ॥२॥
मनासारिखें न होतां ।
बाळकासी मारी माता ॥३॥
दास म्हणे सांगों किती ।
बाप लेंकासि मारिती ॥४॥
॥४॥
मायबापें सांभाळिती ।
लोभाकारणें पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव ।
त्याचा कृपाळू स्वभाव ॥२॥
चंद्रसूर्य मावळती ।
घन आकाशीं होरपळती ॥३॥
रामीं रामदासीं भाव ।
केली संसाराची वाव ॥४॥
॥५॥
एक सहस्र कोटीवरी ।
जहाली अन्यायाची परी ॥१॥
तरी देव उपेक्षिना ।
कधीं निष्ठुर होईना ॥२॥
शरणागत भांबावले ।
भजन देवाचें चुकलें ॥३॥
रामीं राम-दास म्हणे ।
सर्वगुणें भक्तिउणें ॥४॥
॥ अभंगसंख्या ॥२२॥
Last Updated : March 30, 2014
TOP