पंचक - शिकवणपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
काम क्रोध आवरावे ।
मद मत्सर वारावे ॥१॥
सांडोनियां कुलक्षणें ।
शुद्ध धरावीं लक्षणें ॥२॥
लोभदंभांसी लुटावें ।
मीपणासी आटेपावें ॥३॥
विवेक वैराग्य विश्वास ।
धरणें म्हणे रामदास ॥४॥
॥२॥
हो कां मुमुक्षु अथवा मुक्त ।
आहे विशेष आसक्त ॥१॥
विवेक वैराग्यसंग्रह ।
करणें लागे यावद्देह ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
शांति ज्याच्या दृढपणें ॥३॥
॥३॥
मना तूंचि शिकविसी ।
शेखीं तूंचि नायकसी ॥१॥
काय सूचसि पाहेरा ।
शरण जावें रघुवीरा ॥२॥
कांति साचाचियें परी ।
करिसी शब्द भरोवरीं ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
जळो बहिर्मुखाचें जिणें ॥४॥
॥४॥
खोडी वाउगीच वाळी ।
एक राम नामावळी ॥१॥
प्रेम सोडी देहबुद्धि ।
मांडी श्रवणीं सभाधि ॥२॥
रामीं रामदास म्हणे ।
अकस्मात लागे जाणें ॥३॥
॥५॥
ईश्वरासी कानकोंडें ।
अंती जाईल कोण्या तोंडें ॥१॥
लाजे हरीच्या रंगणीं ।
जावयासि लोटांगणीं ॥२॥
धर्म न करी दुराचारी ।
नागविलें राजद्वारीं ॥३॥
ना दे फुटका कवडा ।
चोरें घातला दरवडा ॥४॥
म्हणे रामीं रामदास ।
प्रानी नागवला सुखास ॥५॥
॥६॥
पूर्व भूमिका सोडिली ।
जीव झाला दिशाभुली ॥१॥
ऐसें भ्रमाचें लक्षण ।
भुले आपणा आपण ॥२॥
द्रव्य आपण ठेविलें ।
त्याचें तयासि चुकलें ॥३॥
रामदास म्हणे घरीं ।
वाट चुकले अंधारीं ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP