पद १ ले- राग जोगी - अजुनि कां रे न येसी या चालीवर.
मंद भाग्य मी ऐसा ॥ सुखि होय कसा ॥ मंद ॥धृ०॥
राज्यश्रीच्युत झालों, विपिनासि आलों ॥ मातातातसुत्द्दत्प्रियस्वजनां मुकलों ॥
परि तें मी सीतायोगें, नाहीं स्मरलें ॥ त्याहि तशा देवीला कैसा मुकलों ॥ मंद० ॥१॥
या विरहींच मरावें, परि कां चुकलों ॥ होते हे डोळ्याचे, सोहळे उरले ॥
होता बंधु सुत्द्दत्प्रिय, मग या विरलों ॥ रक्षुनि बहुधा मजला, बहु धैर्य दिलें ॥ मंद० ॥२॥
म्हणे मी होतों. याच्या, भुजशक्तिवरी ॥ दुष्टशिरोमणि रावण, मारिन समरीं ॥
अंकीं घेइन पुनरपि, क्षितिची कुमरी ॥ अर्पिन राज्य बिभीषणा, निजभक्त करीं ॥ मंद० ॥३॥
बा सखया सुग्रीवा, तुज कष्टविलें ॥ तूंही श्रम बहु केले, परि नाहीं फळलें ॥
पाहुनि लक्ष्मण गतिला, त्द्ददय चुरलें ॥ कैकयि नवस समस्तहि, आजिबा पुरले ॥ मंद० ॥४॥
तूं तरी वृथा कां मरसी, मम मित्रवरा ॥ यश कोठुनिया हा मी, दुर्दैव पुरा ॥
तूं तरी क्षेम असे बा, जा निज नगरा ॥ लक्ष्मणवद्नति माझी हा नेम खरा ॥ मंद० ॥५॥
सर्वहि पूर्वजकीर्ति, म्यां मालविली ॥ सून सुमित्रेची उगी, आज नागविली ॥
जन्मुनि मी कौसल्या, उगि भागविली ॥ तत्पदिं विठ्ठलपंतें मति वागविली ॥ मंद० ॥६॥
राम लक्ष्मणाकरितां प्राकृत जनासारखा शोक करितो. मारुती श्रीरामाचें सांत्वन करितो.
पद २ रे - (माझ्या रामाला आणा कोणी जागे) या चालीवर.
येक होतांची स्वामी कृपा पूर्ण ॥ तृणें होतील पर्वतही चूर्ण ॥धृ०॥
पहा या भीं माकडें काय देवा ॥ शत योजन वारिधी उल्लंघावा ॥
रावणाचा आराम भंगीजावा ॥ वीर अखया रिपुपुत्र मारिजावा ॥
काय व्हावा जानकी शोध तूर्ण ॥ येक० ॥१॥
उभे सारे हे वीर महाबाहू ॥ करा आज्ञा अमृतार्थ स्वर्ग पाहूं ॥
दस्त्रधन्वंतरि देववैद्य बाहूं ॥ औषधीचे अठराहि भार वाहूं ॥
आणु लक्ष्मण यद्यपी कालगीर्ण ॥ येक० ॥२॥
क्षीरसिंधूच्या असे पार पैल ॥ फार विस्तीर्ण प्रभो द्रोणशैल ॥
मोहरीचा पाहुनी तप्ततैल ॥ शब्द होतां घेऊनी दास यैल ॥
न हो स्वामीचें त्द्ददय दु:खदीर्ण ॥ येक० ॥३॥
करा आज्ञा स्वामिया निष्कलंका ॥ क्षणामाजी पालथी घालुं लंका ॥
काय आम्हा दु:साध्य भवद्रंका ॥ उक्ति ऐसी परिसोनि निर्विशंका ॥
पंतविठ्ठलविभु होय हर्ष पूर्ण ॥ येक० ॥४॥
मारुती, लक्ष्मणास उठविण्याकरितां द्रोणाचल घेऊन नंदिग्रामावरून आकाश मार्गानें जात असतां हा राक्षसच रामावर जात आहे; अशा संशयानें भरत, बाण मारून त्यास खालीं पाडतो. भरताचा पराक्रम पाहून नमस्कार करून मारुती, भरतस्तुति करितो.
पद ३ रे - राग जोगी (माझा कृष्ण० या चालीवर)
धन्य धन्य धन्य तूं बा भर सख्या ॥धृ०॥
समरीं लक्ष्मण होतां घाय ॥ कपिगण करिती हाय हाय ॥
तव तुज स्मरला श्रीरघुराय ॥ तुज किति काय भाग्य वदूं ॥ध०॥१॥
तुझा रघुपतिचणीं ठाव ॥ गंगाजलसा निर्मल भाव ॥
या रघुवंशीं भरतराव ॥ हें तुज नांव साजतसे ॥ ध० ॥२॥
जैसी ही तव चापाकृष्टी ॥ ऐसी न दिसे पाहातां सृष्टीं ॥
झाली पोटीं मज बहु तुष्टी ॥ होइल द्दष्टी बा तुजला ॥ ध० ॥३॥
ऐसे सद्भक्ति श्रीमंत ॥ मिळतां एके ठायीं संत ॥
आला प्रेमापूर अनंत ॥ विठ्ठापंत वाहतसे ॥ ध० ॥४॥
सूर्योदयापूर्वीं मारुती येत नाहीं असें वाटून राम अत्यंत शोकाकूल होतो. औषधीचा प्रकाश, हा सूर्याचा नव्हे, मारुती द्रोणाचल घेऊन आला, आतां लक्ष्मण खचित उठेल असें जाणून, सुग्रीव रामाचें सांत्वन करितो.
पद ४ थे - राग कानडा.
पहा आला आला, सखा मारुती ॥ राम राम राम अशी मंजुळ ध्वनि ऊठती ॥धृ०॥
मूर्तिमंत प्राण हा आमुचा; येतो मनोगती ॥ प० ॥१॥
रविरश्मिसन्निभ औषधि पहा झळकती ॥ प० ॥२॥
महाशैल द्रोण हा दिसतो, कंदुकसा हातीं ॥ प० ॥३॥
तो हा संत लवो, प्रभुचिये पदीं ॥ पंतविठ्ठलाची मती ॥ प० ॥४॥