श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय पहिला
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्री गणेशाय नम: ॥ श्रीगुरु-सर्वज्ञाय नम: ॥
स्वस्तिश्रीचिन्मय गणाधीश । शारदाशक्तिवृत्तिनिमेषोन्मेष । ग्रंथारंभीं सद्गुरु सर्वेश । श्रीव्यंकटेश नमियला ॥१॥
ॐ नमो भगवते वासुदेवा । निर्गुणचि जो सगुणठेवा । तारक असे या भवार्णवा । मूळ जाणावा भगवंत ॥२॥
सर्वाद्य जो चिन्मंगलमूर्ति । ज्यातें नेतिनेति बोलती श्रुति । ते निर्गुण वर्णावया अल्पमती । मी किती समर्थ ॥३॥
गणेशपुराणीं ज्याचा महिमा । ऐकतां लोटली हर्षाब्धीसीमा । निर्गुणचि सगुणधर्मा । निजवर्मा दाविलें ॥४॥
सामवेद महावाक्यधारें । तत्वमसि श्रुति गर्जे निर्धारे । साठी निर्गुणचि सगुण खरें । ऐसे विचार ठरले हे ॥५॥
जेव्हां सगुणरुप वर्णावें । तेव्हां सहजीं तें निर्गुणीं पावे । जेवीं नग घेतां स्वभावें । सुवर्ण यावें हातासी ॥६॥
असो आता निर्गुणचि सगुण । वर्णितों शिवपुत्र गजवदन । ज्याची लीला करितां वर्णन । सर्वविघ्न लया जाती ॥७॥
गजासुर अत्यंत मातला । देवसमुदाय शरण आला । शंकर क्रोधें युध्दा निघाला । सुरपाळांसहित ॥८॥
इकडे मंगलस्नान निर्धारे । माया मळीचा गणेश स्वकरें । निर्मोनि द्वारी स्थापिला विचारें । न यावें दुसरें आत कोणी ॥९॥
शिवें गजासुरासि मारिलें । शिर देवीसी दावाया आणिलें । द्वारी गणेशानीं अडविलें । युध्द लागलें पित्यापुत्रां ॥१०॥
गणेश शिर शिव उडवित । देवी शोकें आंतून येत । शिवा कळवितां पूर्ववृत्तांत । शिर लावित गजासुराचें ॥११॥
तेव्हापासोनियां गजानन । नाम देवोनि दिलें वरदान । विघ्नेश गणेश गजवदन । आधीं पूजन होय यांचे ॥१२॥
सगुणसंवित् जे लक्ष्यालक्ष्य । ब्रह्मादि स्थावरांत तें अपरोक्ष । तेचि सगुण गणेश प्रत्यक्ष । सर्वसाक्षजगद्रूप ॥१३॥
ऐसा हा सगुण वक्रतुंड । धीसिंहासनस्थ जो अखंड । फिरवी हर्षें कल्पनाशुंड । मुख प्रचंड अद्वय ॥१४॥
नेत्र आविर्भाव तिरोभाव सृष्टी । वृत्त्युन्मेष निमेष दृष्टी । कर्ण फडकती व्यष्टिसमष्टि । घेतां पृष्ठी अभय त्या ॥१५॥
अद्वयमुगुट स्वानंदशिरीं । प्रेममोदक तृप्तिउदरीं । अभेद विशाळभाळावरी । टिळा धरी निर्विघ्न ॥१६॥
चारी भुजा चारी वेद । दयाक्षमादि ज्याचें आयुध । श्रुतिस्मृति चाल निर्द्वंद्व । मूषकप्रसिध्दवृत्तीतें ॥१७॥
ऐसा गणेश तनुमनधन । पूजिला निर्विघ्न हृदिं रेखून । आतां शारदा महामायाध्यान । वाग्वरदान जिच्या कृपे ॥१८॥
प्रणवरुपिणी सोहंहंसारुढ । जिचें जगदाकार नृत्य उघड । भोग भोगोनि कुमारी प्रौढ । प्रसवली जड असंभास ॥१९॥
मन मुक्तलग आरक्तांबर । कसोनि झोडिले महावीर । कामक्रोधादि असुरसंभार । नकळे पार सुरासुरां ॥२०॥
जिचा अंत नेणती श्रुतिस्मृति । तेथें मज मूढाची काय गती । उगीच नमावी शारदाशक्ती । यथामती जैसी तैसी ॥२१॥
कीर्ती सत् ना असत् असे । मृषाचि नाममात्रें विलसे । जें जें काहीं दिसे भासे नासे । चैतन्य वसे मायामय ॥२२॥
ऐसी ती शारदा महामाया । कोणासिही नये वर्णावया । म्हणोनि ग्रंथस्फूर्तीस्तव पायां । नमोनियां प्रार्थिली ॥२३॥
आतां नमितों शिवसद्गुरु । जगदोध्दारक जो शंकरु । अनंतरुपे जडजीवतारु । गुंडा अवतारु प्रत्यक्ष ॥२४॥
ज्या सद्गुरुकृपें नरकस्वर्ग । पापपुण्यादि भवरोग । जन्ममृत्यु नासती सवेग । कर्मभोग सर्वही ॥२५॥
गुरुकर्णोदय होईल जेव्हां । सृष्टिसहित तनुही तेव्हां । दृश्यभास सर्व प्रत्यक्ष हा । चिन्मय पहा दिसों लागे ॥२६॥
आईबाप देतील स्वमिरास । पुत्र त्यातें रक्षितां पावे त्रास । गुरुदाता दे वृत्ति अविनाश । अढळ संतोषदायक ॥२७॥
देवप्रसादें पुरुषार्थ चारी । श्रीगुरु असद्रूपें तुच्छ करी । जपतयोगें सिध्दवैखरी । चहूं वाचेवरी गुरु नेत ॥२८॥
प्रतिष्ठित करील जरी विद्या । गुरु सोडवी विद्याविद्या । ध्यानें सगुणप्राप्ति परी सद्या । स्वसंवेद्या गुरु दावी ॥२९॥
असो किती वर्णूं गुरुपकार । वर्णितां न लागे अंतपार । पुढें बोलूं याचा विस्तार । गुरुदातार कल्पतरु ॥३०॥
आतां प्राचीन कवी श्रेष्ठ श्रेष्ठ । कवनाब्धि ज्यांचे अति वरिष्ठ । सूत्रभाष्यादि पदक्रमलोट । श्लोक उत्कृष्ट मोदकर ॥३१॥
वेद क्ष्रीराब्धि सखोल परम । प्रभुबोध रवि विधी सुवर्म । चारी ते घनजटापदक्रम । उपक्रम अधोभाग ॥३२॥
त्यावरी योजिलें व्याससूत्र । श्रीशांकरी भाष्यमथन पवित्र । पंचदृश्यादि नवनीतवक्त्र । सेवनापात्र सज्जनांचे ॥३३॥
धन्यधन्य काव्यकर्ते । पाहतां मना ये आनंदभरतें । ऐशा कविवर्यां नमूनि ते । कवि आरते प्राकृतही ॥३४॥
वेद दुर्ज्ञेय म्हणोनि पद । त्यावरी सूत्र केलें विशद । तेंही नेणती म्हणोनि प्रसिध्द । भाष्यप्रबंध रचियेले ॥३५॥
सुलभ गीर्वाणी टीका झाली । तरी ते कोणा नाहीं कळली । म्हणोनी मथितरचना केली । प्राकृत बोली अतिस्वल्प ॥३६॥
पद आर्या प्रबंध श्लोक । अभंग ओव्या शास्त्रोक्त अनेक । कविवर्य ज्ञाते केले अचुकसंत । कित्येक दयालुत्वें ॥३७॥
ऐसे दीनदयालु संतकवि । ज्यांचे कवित्वश्रवणेंचि व्हावी । भक्तिमुक्तिनिजात्मपदवी । भाळ मी ठेवीं पदीं त्यांच्या ॥३८॥
नमन असो त्या सत्कुलाला । ज्या कुळीं संत गुंडा झाला । परंपरा सच्छील बुध्दीला । कोण्या काला पालट नोहे ॥३९॥
प्रेरक धरापति नारायणा । नमन असो तुमच्या चरणा । तवाज्ञे प्रवर्तलों या कारणा । तुमची जाणा लाज तुम्हां ॥४०॥
कुलदेशाधिकारी स्वकुल । वंदूं मातृपितृपदकमल । सज्जन ज्ञाते सोयरे सकल । व्हावे अनुकूल कीर्तनासी ॥४१॥
नमिला कुलस्वामी श्रीनिवास । कुलदीपक सर्वात्मा सर्वेश । ज्याच्या कृपें सर्वही सायास । पूर्ण अनायास होताती ॥४२॥
ऐशा संतसज्जनदेवचरणी । नमोनी प्रार्थितों येक्षणीं । नमिला हेतु तडीस नेवोनी । अक्षय भजनीं स्थापावें ॥४३॥
निर्गुण वर्णिता मन न राहें । मग मनमौजा कैंची लाहे । कैसेंही राहतां आहे तें आहे । परमात्मा हे अभेद एक ॥४४॥
म्हणाल ब्रह्मज्ञानी झाल्यावरी । कैसे वर्तती सिध्द तरी । प्रभुसंतलीला गावी निर्धारीं । क्षणैकभरी विसंबूं नये ॥४५॥
मग मनमौजा वाटेशा करुं । सगुण लीला काहीं तरी स्मरुं । प्रेरक झाला महीवरु । हे आधारु ग्रंथाचा ॥४६॥
ऐसेंचि जेव्हां नारायणमत । तेव्हां वाटे हेचि प्रभुसंमत । उगीच जडातें येत निमित्त । त्याचा तो येथ कर्ता करविता ॥४७॥
गुंडाशिष्य त्र्यंबकाज्ञेवर । व्यासराव उजळंबकर । रचिलें जें कां गुंडाचरित्र । मूळाधार तेंचि येथें ॥४८॥
वडिलश्रुत काहीं कथा होती । तीही यांत वर्णूं यथामति । गुंडामाहात्म्यनाम प्रख्याती । भक्तिमुक्तिपद भाविकां ॥४९॥
मूळजन्मापासोनि ते शेवट । चरित्र ऐकावें उत्कृष्ट । श्रोते सावधानमनें अतुट । वैराग्य अफाट भक्ति ज्याची ॥५०॥
ग्रंथीं अनुबंध चतुष्टय । आरंभी राहणें अवश्य होय । म्हणाल अनुबंध तें काय । ऐका निर्णय त्याचा आतां ॥५१॥
प्रथम कोण ग्रंथाधिकारी । दुजा ग्रंथासी संबंध काय तरी । तिसरा विषय कोण निर्धारीं । चवथें परी प्रयोजन ॥५२॥
मलविक्षेपरहित मुमुक्षु । किंवा साधनसंपन्न ज्ञाता साक्षु । मात्र असावा भाविक दक्षु । तो प्रत्यक्षु अधिकारी येथें ॥५३॥
मल म्हणजे जाणावें अज्ञान । विक्षेप म्हणजे असमाधान । चिंतल्या ऐसें कार्य न होणें । हे त्यागूनि दोन शुध्द जो ॥५४॥
साधनांत असती दोन मार्ग । अंतरंग आणि बहिरंग । दोहोंचेही आठ आठ भाग । फलभोग सकाम निष्काम ॥५५॥
प्रथम नित्यानित्य विवेक । इहामुत्र भोगविराग देख । तिसरें साधन संपत्तिषट्क । चौथें नि:शंक मुमुक्षुत्व ॥५६॥
प्रपंचज्ञात्या हीं साधनें चार । आतां मुमुक्षुत्वानंतर । श्रीगुरुबोध झाल्यावर । तो प्रकार ऐका पुढें ॥५७॥
गुरोबोध होतांचि श्रवण । त्याचेंच मनीं करावे मनन । मग निदिध्यास होतां पूर्ण । उपदेश जाण महावाक्य ॥५८॥
ऐसीं अष्टसाधनें अंतरंग । निष्कामफलप्राप्तीसी सुरंग । जे फलेच्छारहित नि:संग । शास्त्रोक्त अव्यंग चित्तशुध्दि ॥५९॥
आतां स्वर्गादि भोग इच्छा सकाम । हे बहिरंग अष्टसाधन धर्म । जें का यज्ञादि विधिकर्म । बोलिलें वर्मफल इच्छे ॥६०॥
स्वानुभवीं यज्ञादी न संभवे । साठीं बहिरंग दूर जावें । विवेकादि हे समीप संभवे । म्हणोनि म्हणावें अंतरंग ॥६१॥
विवेकादिवीण श्रवणादि कांहीं । बहिर्मुख नरा घडणें नाहीं । म्हणोनी अंतरंग घ्यावी हीं । बहिरंग पाही त्यागावें ॥६२॥
श्रवणादि अपेक्षा विवेकासी । साठीं हे बहिरंग वाटे मानसीं । प्रत्यक्ष ज्ञानफल साधनासी । वेदही त्यासी म्हणे ग्राह्य ॥६३॥
विवेकादि त्याज्य यज्ञादिका ऐसे । यज्ञादि अपेक्षा हो तरी नसे । खरें ते तत्वमसि अनायासें । साधन दिसे अंतरंग ॥६४॥
असो अज्ञानीपरी भाविक । जे अष्टसाधनयुक्त लोक । सकामनिष्काम इच्छा अनेक । असोत विवेकसंपन्नही ॥६५॥
किंवा गुरुकृपें ब्रह्मज्ञान । जरी जाहलें असेल पूर्ण । त्यांनींही पहावें गुरुवर्तन । ज्ञानोत्तर जाण भक्ति कैसी ॥६६॥
भक्तिज्ञानविरागादि विचार । गुरुवर्तन कोण प्रकार । तें पाहून तदनुसार । शिष्यें निरंतर वर्तावें ॥६७॥
त्यांना गुरुज्ञान कैसें झालें । स्वात्मज्ञानें भक्ति काय पावले । नंतर वैराग्य केंवि धरिलें । पाहिजे जाणिलें अवश्य हें ॥६८॥
भक्तीचे असती प्रकार दोन । कोणी भावनाची भक्ति म्हणती अज्ञान । ज्ञात्याची भक्ति ब्रह्म अद्वयपूर्ण । वेगळेपण नसे जेथें ॥६९॥
देव आणि भक्त हें द्वैत जेथ । उरलें नाहीं किंचिदर्थ । तेच भक्ति अद्वय यथार्थ । इतर व्यर्थ वाचारंभ ॥७०॥
या ग्रंथविचारें मूढा ज्ञान घडे । मुमुक्षूसी अवश्य मोक्ष जोडे । सकामा कामनाफल आतुडे । निष्कामीं विरुढे चित्तशुध्दि ॥७१॥
या ग्रंथीं करितां विवेक । सद्गुरुकृपा होय नि:शंक । गुरुबोधानंतर आवश्यक । वर्तनही देख आतुडे ॥७२॥
मलविक्षेपरहित पवित्र । जिज्ञासु असावा भाविकमात्र । तोचि या ग्रंथासी गुरुपुत्र । अधिकारी स्वतंत्र बोलिला ॥७३॥
असो राहिले जे का अनुबंध । तो आतां पुढें बोलूं प्रसिध्द । दुसरां जाणा ग्रंथासी संबंध । ग्रंथार्थबोध विचारकर्त्या ॥७४॥
मूळ यांत गुरुक्रिया पाहून । तैसें वर्तावें भाविकजन । तें तरि प्रत्यक्ष न दिसे म्हणून । ग्रंथावलोकन करावें ॥७५॥
प्रतिपादन कर्ता असे ग्रंथ । विषय प्रतिपाद्य होय तेथ । प्रतिपादनायोग्य जे यथार्थ । प्रतिपाद्य येथ संबंध ॥७६॥
ज्यासी प्राप्त तो प्रापक नि:शंक । प्राप्त होण्यायोग्य तें प्राप्य देख । फल प्राप्य अधिकारी प्रापक । ऐसा ओळख संबंध दोघां ॥७७॥
अधिकारी आणि विचारासी । कर्तृकर्तव्यसंबंध दोघांसी । ग्रंथाधिकारी जाण कर्ता त्यासी । असे विचारासी कर्तव्य ॥७८॥
ज्ञानाचा जनक ग्रंथ साचार । ज्ञान तें अन्य उत्पन्न होणार । ग्रंथ ज्ञानातें उत्पन्न करणार । संबंध विचार ऐसा दोघां ॥७९॥
आतां तिसरा अनुबंध पाहीं । जीवब्रह्मौक्यज्ञान जें काहीं । या नांव भक्ति बोलती सर्वही । याग्रंथाठायीं विषय हा ॥८०॥
पूर्वीच श्रुति केलीसे कथन । जीवशीव दोनीही ज्ञानघन । अभेदता तेचि भक्तिपूर्ण । जाणीव हें ज्ञान सर्वांठायी ॥८१॥
भक्ति ज्ञान आणि विराग । तीन शब्द परी एकचि अंग । सरीमुदीकंकण जेंवि नग । एकचि अव्यंग तीनीही ॥८२॥
सर्वीं सर्व जाणीव ज्ञानकळा । भक्तितें नसे भेद निराळा । द्वैतभेद जातांचि ते वेळा । असे मोकळा विराग तो ॥८३॥
सारांश एक भक्तिज्ञान होतां । तिनीही येती आपोआप हाता । म्हणोनि भक्तिविषय या ग्रंथा । साधकें हा आतां साधावा ॥८४॥
आतां चौथें जें का प्रयोजन । अखिल प्रपंच असत जाण । तेथें अनर्थ प्रतीती म्हणोन । सज्ञानें पूर्णत्यागश्रम ॥८५॥
त्याग हेंचि असे द्वैत । कारण शाश्वत आणि अशाश्वत । म्हणोनि त्यागात्याग श्रम होत । यासाठीं अद्वैत असावें ॥८६॥
ज्ञानाविण न होय कांही कार्य । म्हणोनि ज्ञात्या स्वसंवेद्यप्रत्यय । असत् शब्दचि मात्रजाय । सहज चिदद्वयप्रतीती ॥८७॥
जो प्रपंची भासला अनर्थ । तोचि चित्प्रत्ययें होय परमार्थ । हें दावी गुरुवर्तन यथार्थ । प्रयोजन निश्चित या नांव ॥८८॥
आतां संक्षेपें तुम्हां कळावया । वर्णितों अनुबंध चतुष्टया । प्रथम कैशाही भाविका मात्र त्या । बोलिले ग्रंथीं या अधिकारी ॥८९॥
दुजे विचार होण्यास्तव शुध्द । ग्रंथासी अधिकार्याचा संबंध । तिसरा भक्तिविषय प्रसिध्द । ऐसा हा बोध अद्वय येथें ॥९०॥
चौथें प्रयोजन नि:संशय । प्रपंचचि तो परमार्थ अद्वय । ऐसें ग्रंथाचें प्रयोजन होय । केला निर्णय संक्षेपें ॥९१॥
असो आतां विवरण बहुत । गुंडा जन्मला कोणे कुळांत । आणि वर्णूं वर्तन निर्याणांत । ऐका सावचित्त श्रोतेहो ॥९२॥
उद्दालकग्रामीं कोणी एक । मूळपुरुष तिमाजी नाइक । आश्वलायन ब्राह्मण भाविक । ऋग्वेदी देखशांडिल्यगोत्र ॥९३॥
षट्कर्मधर्मासी रत सदा । भजनपूजायुक्त हरिपदा । गृहीं व्यापार सराफी धंदा । प्रपंचीं आपदा नेणें काहीं ॥९४॥
ज्यासी स्त्रीपुत्रही अनुकूल । महीपति नामक वडील । दुजा हैबती नाईक प्रेमल । केवळ सुशील दोघेही ॥९५॥
ज्येष्ठ महीपती नाईकें भल्या । संतानार्थ सात स्त्रिया केल्या । म्हणे व्यापारें द्रव्य जोडिल्या । अनुभवावया पुत्र नाहीं ॥९६॥
केले दानधर्म यात्रा अमूप । भार झाला नवस संकल्प । खंडेराय कधीं कुलदीप । पुत्ररुप दावील म्हणे ॥९७॥
मैलारयात्रा प्रतिवर्षीं । करावी इच्छा योजिली मानसीं । यात्रापुण्यें गर्भकुशीं । राहिला स्त्रीशीं तेधवां ॥९८॥
नवमास गर्भा भरले साचार । शके सोळाशें पंचाहत्तर । होतें श्रीमुखनाम संवत्सर । रविवार माघशुध्द ॥९९॥
जन्मला पुत्र विदेही गुंडा । ज्यानें लाविला परमार्थी झेंडा । पुढें त्या वर्णूं प्रज्ञान-मार्तंडा । जो अखंदानंदरुप ॥१००॥
तिमाजीचा कनिष्ठ पुत्र । हैबती नाईक जाणा सत्पात्र । आनंदीबाई त्यांची स्त्री पवित्र । रुप सुगात्र महासाध्वी ॥१॥
मग त्या हैबती नाईकाला । यशवंत नामक पुत्र झाला । त्या स्वधर्मातें व्यापार केला । जिगाई त्याला भार्या होती ॥२॥
धनकण वाढलें अपार । संपत्तिवैभव अपरंपार । सर्वस्व जनसोयरेविस्तार । मिळाला संभार एकेठायीं ॥३॥
त्यांत वृध्द तिमाजी नाईक । स्त्रीसह पावले परलोक । मग त्या क्रिया केल्या सम्यक् । बंधु देख यथाविधी ॥५॥
सर्व मंडळी एकेठाई होती । दोघेही व्यापार करिती । आणिक द्रव्यसंचय पुढती । केले प्रीति दृढ गांठी ॥५॥
तस्कर मातले अतिप्रबल । गणगोत पळाले सकळ । अरिष्ट थोर कीं हे धनमूळ । अतिव्याकुळ दोघे बंधू ॥६॥
द्रव्यापाशीं पंधरा अनर्थ । भागवतीं भिक्षुक कथी यथार्थ । तेचि गति आम्हां आली येथ । मनें स्वार्थही न सोडवे ॥७॥
ऐशा विचारें देवपुरासी । येवोनि जागा केली मिरासी । महीपति नाईकापासीं । ठेवी द्रव्यासी रोकड ॥८॥
महीपति नाईक राहिले येथ । खातेबाकी उद्दालकग्रामीं । जिवित क्रमिती व्यापारकर्मीं । पूजी कुलस्वामी खंडेराव ॥११०॥
येथें देगलूरीं गुंडा नाईक । त्याचें ऐका चरित्रकौतुक । मातापित्यासी आनंददायक । पुत्र एक श्रीगुंडा ॥११॥
असो महिपती नाइकालागीं । पुत्र गुंडा जाहला सुयोगी । केलें मौजीबंधन त्याप्रसंगी । गुंडा अंगीं सप्तवर्षे ॥१२॥
पुढें चारवर्ष गत झाले । गुंडासी अकरावें वर्ष लागलें । तों आईबाप परधामा गेले । गुंडा राहिले एकटे ॥१३॥
तंव आप्तांतील कोणी एक । होती वृध्दा पुण्यश्लोक । ती शिशु गुंडा आणि द्रव्यादिक । केले देख लालनपालन ॥१४॥
व्यापारखातें बाकी बुडाली । स्वजनसोयरीं सर्व उडालीं । काहीं रोकड होती दडाली । रक्षी जुडाली वृध्दा ते ॥१५॥
शाळेंत महाराष्ट्र बालबोध । शिकला गुंडा गणित प्रसिध्द । वृध्दा करी ज्याचे हितबोध । परी छंद गायनाचा ॥१६॥
भजन गायन पद अभंग । बालत्वापासोनी हाचि व्यासंग । उपजीविके व्यापार उद्योग । परी मनीं रंग कीर्तनाचा ॥१७॥
करी व्यापारसराफी धंदा । पहात गात अखंड पदा । कोठेंही कीर्तनभजनीं सदा । जाय अमर्याद बाळ गुंडा ॥१८॥
तव कोणी एक आत्रेयगोत्रिज । होते चूडामणीमहाराज । योगाभ्यासीं मंत्रमुखद्विज । पंडितपूज्य हरिदास ॥१९॥
योगामाजी ब्रह्मानुसंधान । ज्यातें सगुणसाक्षात्कारपूर्ण । सगुणचि तें निर्गुणज्ञान । दिसे चिध्दन अखिल अद्वय ॥१२०॥
भजनपूजन योगसमाधी । स्वधर्मकर्मीं रत यथाविधी । सेवेसी तिष्ठति ऋध्दिसिध्दि । प्रपंचसंबंधी विरक्त जो ॥२१॥
स्त्री साध्वी परमार्था अनुकूल । अमोल कीर्तनाआख्यानीं डौल । गुरुसांप्रदाय आदिनाथमूल । शिष्य केवल जयाचे ॥२२॥
कोणी शास्त्र कोणी याज्ञिकी । कोणी ज्योतिष कोणी वैदिकी । कोणी गायनस्वरचि घोकी । मृदंग ढोलकी तंतुवाद्य ॥२३॥
गुंडा व्यापार करित करित । जात येत तेथें सदोदित । कांहीं पदगाणेंही म्हणत । मंत्र घोकीत पोरांसवें ॥२४॥
गुंडासह शिष्यमंडळी । संहिता घोकिती एक वेळीं । स्वामी चूडामणी आले जवळी । म्हणती याकाळींद्यापरीक्षा ॥२५॥
परीक्षा दिधली सर्वानींही । परी यथार्थ उतरली नाहीं । ऐकींव वदतां गुंडा कांही । परीक्षा पाही शुध्द आली ॥२६॥
गुरु म्हणती अरे हा कोण । गुंडा म्हणजे मी महीपतिनंदन । गुरु म्हणती हे केवढे सधन । संततिसंपन्नगृह यांचें ॥२७॥
गुंडातें म्हणे ऐलीकडे येंईरे बाळा । मातापिताहीन तूं या वेळा । परी बापा हिंडू नको मोकळा । धरुनि कंटाळा विद्येचा ॥२८॥
व्यापारीं धरावी धैर्यमती । सावध शिकावी विद्या पुढती । अखंड असावी सत्संगती । मनीं कुमति येवों नेदी ॥२९॥
गुंडाचे सामुद्रिकचिन्ह । पाहोनि हर्षलें सुद्रुरुमन । म्हणती हा परमात्मा सगुण । चैतन्यघन प्रगटला ॥१३०॥
हा शांत दांत होय योगीश्वर । नामघोषें करील जगदोध्दार । सत्कीर्तिझेंडाच गुंडा साचार । पावे निरंतर स्वात्मसुखा ॥३१॥
असो गुंडा तूं एक ऐकावें । नित्य येवोनि आम्हां भेटावें । येणें लाभदायक जाणावें । मनोभावें वाटे मज ॥३२॥
गुरुआज्ञा वंदोनि शिरीं । नित्य येत जात व्यापर करी । कांही गुरु आज्ञा होतां निर्धारीं । दुर्घट तरी पुरवीत ॥३३॥
गुरुदर्शन त्रिकाळ नित्य । करिती विचार नित्यानित्य । मग सारिती व्यापारकृत्य । वागती सत्य गुरुआज्ञे ॥३४॥
जेव्हां चूडामणी कथा करिती । तेव्हां गुंडा त्यांचेमागें राहती । श्लोकपदअभंगस्मरण देती । सहाय होती गायनासी ॥३५॥
आतां पुढें कथा मनोहर । श्रोतीं श्रवण करावी सादर । श्रीगुरुकृपा प्रेम निरंतर । गुंडासी साचार करील ॥३६॥
शेषशयना लक्ष्मीविलासा । नारायणा हृत्कमलाधीशा । दीनोध्दारा तारकभवपाशा । आदिपुरुषा मंगलधामा ॥३७॥
इति श्रीगुरु गुंडामाहात्म्य । गुंडापूर्वज कथा उत्तम । श्रीगुरुतारक कथोनि सप्रेम । अध्याय प्रथम संपविला ॥१३८॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय १ ला समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 13, 2022
TOP