श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय चोविसावा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणाधिपयते नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
स्वस्ति श्रीनमो गणपती । ज्यातें श्रुतिस्मृति वर्णिती । आणि नमिली शारदाशक्ती । श्रीगुरुमूर्ति स्वानंदें ॥१॥
जाहलें पूर्वाध्यायीं कथन । श्रीहरिमहाराजांचें वर्णन । पुढें वर्णूं शिष्य पूर्ण । श्रीगुंडाचे जाण कांहीं ॥२॥
कोणी आत्मारामनामक । श्रीगुंडाचा शिष्य होता भाविक । त्यासी बहुप्रकारें बोलती लोक । तो न बोले देख कांहीं कोणा ॥६॥
असे तो बाळब्रह्मचारी । अखंड नामीं रंगली वैखरी । ज्याचे ध्यानीं प्रगटे श्रीहरी । परी निर्धारीं कळों नेदी ॥४॥
ते सदा राहती एकांतीं । आपणा आपण गोष्टी बोलती । कोणी कांहीं पुसावया येती । तोंड फिरविती पराड्मुख ॥५॥
सदा फिरावें वाटे त्या स्थानीं । कोठें न जाती बोलवितां कोणी । अखंड राहावें नामस्मरणीं । दिनरजनीं स्वानंदें ॥६॥
कोणी ब्राह्मण देगलुरकर । श्रीगुंडासेवेंत होता निरंतर । गुंडासी कोणी बोलतां समोर । करी करकर व्यर्थ मध्यें ॥७॥
एकदां कोणी श्रीगुंडाजवळ । आपला सांगे वृत्तांत सकळ । येरुनें मध्यें मांडिला गोंधळ । बोले बाष्कळ वाटे ऐसें ॥८॥
गुंडा ऐकोनि त्याचें वचन । म्हणती मध्यें कां बोलसी भाषण । सोडी ऐसें बाष्कळपण । मानखंडन कां करिसी ॥९॥
आजपासूनि तूं मौन राहे । तो म्हणे श्रीगुरुसमर्थ आहे । गुंडा म्हणती गुरु करिल हें । तत्काळ पाहे मौन धरी ॥१०॥
पूर्वीं कोणी न बोलतां त्यासी । व्यर्थ वटवट करी वाचेसी । गुरुकृपा झाली ज्या दिवशीं । मौनमानसीं धरियेलें ॥११॥
कोणी बोलतांही कांहीं न बोले । नाममुखीं अखंड चालिलें । वाचा सिध्द झाली जें जें बोले । नाम ठेविलें मौनीबुवा हें ॥१२॥
मृत्युसमयीं त्याचा प्राण । गेला ब्रह्मरंध भेदून । ऐसें गुरुकृपेचें महिमान । तारक पूर्ण भक्तालागीं ॥१३॥
हें गुंडामाहात्म्य अतिसुरस । श्रोते सेवोत सावकाश । ज्याचे अध्याय असती चोवीस । इच्छिलें अनायास पाविजे ॥१४॥
त्या अध्यायांचे निरुपण । संक्षेपें सांगतों श्रोत्यांलागून । कृपा करो रुक्मिणीरमण । नारायण भक्तालागी ॥१५॥
गुरुकथा अध्यायसप्तक । पुढें पंधरा गुंडा कथानक । दोन अध्यायीं शिष्य भाविक । चोवीस देख ऐशापरी ॥१६॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । कविदेवादि अनुबंधवर्णन । पूर्वजांसह श्रीगुंडाभजन । चूडामणिव्याख्यान वर्णिले ॥१७॥
द्वितीयाध्यायीं स्वकन्या गुंडास । देवोनि दिला गुरुपदेश । गुरुपरंपरा सांगूनि त्यास । आले ग्रामास गंगेहूनि ॥१८॥
तिसर्यांत गुरुपुत्रा जागीर । मिळाली आणि दीपावलीप्रकार । भाग्यनगरीं कथेंतूनि सत्वर । विरागें साचार गुंडा गेले ॥१९॥
तपांतीं घेऊनि नारदमंत्र । गुंडा जाहला गुरुसेवेपात्र । गुरुपत्नी निर्याण स्वतंत्र । बोध पवित्र चतुर्थाध्यायें ॥२०॥
पंचमाध्यायामाजी प्रकार । त्रिविधताप कथूनि साचार । पंचीकरणादि साधनें चार । कथिला व्यापार पिंडींचा ॥२१॥
सहाव्यांत कथा ब्रह्मांड काय । इंद्रिय वर्णिलें देवतामय । आणि पिंडब्रह्मांडाचा प्रळय । महावाक्यनिर्णय चारीही ॥२२॥
सातव्यांत अन्वयव्यतिरेक । बध्दमुक्त मृषा जन्म अनेक । निर्णय कथिला सच्चित्सुख । पावले परलोक श्रीगुरु ॥२३॥
विप्रासी नथेंचें दान दिलें । गुंडांनीं प्रेमें गृह लुटिलें । स्त्रीसह वाराणसीस निघाले । हें निरुपिलें आठव्यांत ॥२४॥
भागीरथी यमुना सरस्वती । प्रार्थूनि गुंडासी अयाचित देती । हुंडी वटवितां विश्वेश येती । स्त्रीदान घेती नवव्यामाजी ॥२५॥
विप्र बाईसी सोडी घोर वनीं । स्त्री दे गुंडासी देहदान घेवोनी । ग्रामा आले नारदबोध ऐकोनी । निमग्न भजनीं दहाव्यांत \।२६॥
गर्भिणीचा आरोप गुंडावरी । येतां अवमानिती दुराचारी । उध्दरिली गर्भिणी भवसागरीं । जाती वनांतरीं अकराव्यांत ॥२७॥
गुंडाचें रामपुरासी गमन । व्याघ्रादि रुपें देवदर्शन । चौदा अभंगे देव स्तवून । केलें भजन बाराव्यांत ॥२८॥
त्रयोदशाध्यायीं सगुण भेट । गुंडा संतांत मिळविला स्पष्ट । पंढरी तुळजापुराहूनि नीट । मैलारा शेवट गुंडा नेले ॥२९॥
रामपुरीं बाळंतपण । सर्पदंश कथा रामदर्शन । ज्ञानेश भेट बाळाचें रक्षण । श्लोकें स्तवन चौदाव्यांत ॥३०॥
पंधराव्यांत कथा चातुर्मास । श्रीक्षेत्रीं पाध्याचे संशयास । नाशूनि गुंडा गेले मैलारास । स्मशानवास देवपुरीं ॥३१॥
स्वप्नीं अनुग्रह चंदूसी दिला । मुत्सद्दी विरागें सेवेंत राहिला । श्रीगुंडा विषरांधा प्याला । दुष्ट उठविला सोळाव्यांत ॥३२॥
सतराव्यांत वंजरेंत राहिले । गोविंदबक्षा उपदेशिलें । व्याघ्रभक्षित मुलास उठविलें । गुंडा भेटले रामदासा ॥३३॥
भ्रष्ट विप्राचें तीसवर्षा जाण । शेषाचलीं करवीं मौंजीलग्न । बाजीराव परीक्षा पाहे येऊन । गुंडाभजन अठराव्यांत ॥३४॥
बाजीरावासी उपदेश दिला । साधुरायाचा संशय हरिला । गुंडासी प्रार्थिलें यावें ग्रामाला । अध्याय संपला एकोणीस ॥३५॥
गुंडासी विटंबिलें आंब्यांत । शामराजादिकां उपदेश होत । साधूसी भेटले कंधारांत । आले परत विसाव्यामाजीं ॥३६॥
श्रीधरभेट विप्रासी वैराग्य । वीरपासी दे अनुग्रहभाग्य । समाधि डोलवी अंब्यासी योग्य । वीरास भाग्य एकविसावीं ॥३७॥
आढीवमोघें जागीर वर्णन । गुंडास्त्रीनिर्याण जादु कथन । हरिसंवाद अग्नि शांतवन । श्रीगुंडानिर्याण बाविसावीं ॥३८॥
तेविसावें अध्यायी आतां । श्रीहरिमहाराजांची कथा । जन्मापासोनि निर्याणवार्ता । वर्णिली तत्वतां गुरुकृपे ॥३९॥
श्रीगुंडाचे शिष्यांतील । दोघां शिष्यां कथूनि प्रेमळ । चोविसावा अध्याय हा निर्मळ । समाप्त केवळ जाहला ॥४०॥
ऐसे चोवीस अध्याय हे पूर्ण । जे करितील भावें श्रवण । त्यांचें दु:ख दारिद्र हरपोन । सर्व विघ्नें लया जाती ॥४१॥
हे गुंडामाहात्म्य अति मधुर । यासी वरदायक रुक्मिणीवर । जैसा गुंडा तरला भवसागर । श्रोत्यां साचार तेंवि लाभे ॥४२॥
सेवितां कथा सुधारस । जीव ब्रह्म होती समरस । उठो नेणिचि जेथूनि मानस । सेवितां सुरस भक्तासी ॥४३॥
कैचे सेविती वायस कुटिल । मददोषें दूषिले जे केवळ । ज्ञानांधासी होय निफळ । करी निर्मूळ अभाविका ॥४४॥
ऐसें हें गुंडामाहात्म्य सुंदर । श्रोत्यावक्त्यांसि मुक्ति देणार । जो जें इच्छील त्यासी तें साचार । मिळे प्रियकर सद्भावें ॥४५॥
देउळीं गुंडामूर्ति सन्निधान । अथवा हृदयीं करोनि ध्यान । जो करी साग्र एक पारायण । त्याचें विघ्न लया जाय ॥४६॥
किंवा पारायण सात दिवस । सप्ताह करील जो उपोष । त्याचे सर्व हरतील दोष । अंतीं सर्वेशपदप्राप्ति ॥४७॥
मौन निराहार सर्व कृत्य । त्यागूनि साग्र पारायण नित्य । ऐसें करितां सप्तकांत अगत्य । श्रीगुंडा सत्य त्यासी भेटे ॥४८॥
पुत्राथ्यानें चातुर्मास । एक मंडळ धनार्थी यास । कामिक रोग्यासी सप्ताह उपोष । फलप्राप्ति विशेष निश्चयें ॥४९॥
श्रीगुंडाचें प्रिय शिष्य कोणी । होते त्र्यंबकबुवा म्हणोनी । सदा गुंडासेवेंत राहूनि । कृपा ज्यांनीं संपादिली ॥५०॥
श्रीगुंडानिर्याण झाल्यावरी । ते आयुर्मर्यादे होते परी । श्रीगुरुगुंडापद निर्धारीं । अखंड अंतरीं आठविती ॥५१॥
उजळंब ग्रामीं कोणी भाविक । व्यासराव कुळलेखक । यांचे गृहीं राहिल नि:शंक । बुवा देख वृध्दापकाळीं ॥५२॥
त्र्यंबकबुवा प्रेमे करुनी । अखंड राहती श्रीगुरुध्यानीं । श्रीगुरुगुंडाच्या लीला कांहीं मनीं । आठवूनी डोलती ॥५३॥
व्यासराव त्यांचे सेवेंत । जवळीच राहती सदोदित । पुसती काय आनंद होत । सांगा त्वरित स्वामिया ॥५४॥
जी कांहीं गुंडालीला ज्या काळीं । आठविती तें सांगती सकळीं । व्यासराव स्मरण ठेवूनि समूळीं । लिहूनि जवळी ठेविती ॥५५॥
श्रीगुंडाच्या कथा अनेक । वरचेवर ओंवीबध्द लेख । लिहूनि गुंडामाहात्म्य सकळिक । अध्याय देख अठरा केले ॥५६॥
देगलुरीं कोणी एक ब्राह्मण । मठांत निघतां वर्तमान । आहे गृहीं गुंडामाहात्म्य पूर्ण । म्हणूनि आणून दीधलें ॥५७॥
पाहतां त्यांतील कथा अपूर्व । परी मागें पुढें कथेचा भाव । म्हणूनी अनुक्रमें कथा तव । लिहिली सर्व जन्मांतही ॥५८॥
ओंवी साडेचारचरणीं पाही । माहात्म्य चोवीस अध्याय सर्वही । प्रेरक श्रीगुरु त्याचा तो याठायीं । ऐशा सद्गुरुपायीं पावो हें ॥५९॥
वक्ता त्र्यंबकबुवा समर्थ । लेखक व्यासराव हे यथार्थ । या उभयांचा उपकार अद्भुत । नसतां प्राप्त कैचें होते ॥६०॥
अध्याय चोवीस हे रसराज । सेवोत श्रोते व्यासमथित निज । जयवंतात्मजसुततनयानुज । वदे गुज अनंत कृपें ॥६१॥
ऐसें गुंडामाहात्म्य हें विख्यात । श्रीगुरुमहिमा महिपतीसंमत । नारायणमुखें जें वदवीत । असे समर्थ त्याचा तोची ॥६२॥
श्रोते सावध ऐका उत्तम । आतां संपलें श्रीगुंडामाहात्म्य । तें अमृताहुनी गोड परम । पांडुरंगा सप्रेम पावो हें ॥६३॥
इति श्रीगुंडामाहात्म्य विख्यात । गुंडाशिष्यांची कथा अद्भुत । चोवीस अध्याय समाप्त । केलें कृतकृत्य नारायणा ॥६४॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय २४ वा समाप्त.
॥ श्रीगुंडामाहात्म्य संपूर्णम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP