श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय सातवा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणेशायनम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
जयजय चिन्मंगलधामा । मंगलमूर्ति कामकल्पद्रुमा । शारदादेवि वरदनिरुपमा । सद्गुरुमहिमा अगाध ॥१॥
पूर्वाध्यायीं झालें कथन । श्रीगुरुनें गुंडासी महावाक्यपूर्ण । बोधूनि अध्याय संपविला जाण । आतां वर्णन ऐका पुढें ॥२॥
चार्ही महावाक्यांचा सारांश । ज्ञानचि ब्रह्म कथिलें अविनाश । पिंडब्रह्मांडी पृथक ज्यास । नामें सावकाश ऐकावीं ॥३॥
आतां ऐकावें पिंडींचें नांव । साक्षी आत्माकूटस्थ जीव । क्षेत्रज्ञ संवित् ज्ञप्ति जाणीव । चैतन्यभाव चिदादि ॥४॥
ब्रह्मांदींचें नाम ऐक साचार । शिव सर्वज्ञ ईशईश्वर । परमात्मा सर्वात्मा विश्वंभर । सगुणपर ऐसे किती ॥५॥
क्रियापरत्वें पृथक नाम । याविरहित पूर्ण ब्रह्म । त्यातेंही निर्गुणनिष्काम । सर्वोत्तम अनंतनामें ॥६॥
असो ऐसा किती विस्तार । वर्णितां थकले सुरासुर । द्विजिव्ह झाला धरणीधर । वेदमुनिवर मौन घेती ॥७॥
या ज्ञानांतही दोन पक्ष । परोक्ष आणीक अपरोक्ष । वाच्यांश जाणावें तें परोक्ष । अपरोक्ष लक्ष्यांश शुध्द ॥८॥
परोक्ष म्हणजे वेगळेपणा । शब्देंच बोलती आत्मलक्षणा । अनुभव नसूनि दाविती खुणा । या नांव जाणा परोक्षत्व ॥९॥
साधोनियां शुध्द लक्ष्यांश । तेणें अनुभवाअ आला सर्वेश । तो एक मी एक हा गेला भ्रंश । अपरोक्ष यास म्हणावें ॥१०॥
तें अनुभवज्ञान दो प्रकार । अन्वयव्यतिरेक निर्धार । व्यतिरेकीं ब्रह्म सर्वांसी पर । अन्वयीं साचार सर्वांसह ॥११॥
यदृष्टं तन्नष्टं ही श्रुति । दृश्यभासादि अनित्य जगतीं । आत्मा शाश्वत आहे म्हणती । ही द्वैतरीति ज्यामाजीं ॥१२॥
सर्वं खल्विदं ब्रह्मवचन । दृश्यभास सर्वही ब्रह्मपूर्ण । अद्वयसमाधी ज्यांत जाण । अन्वय खूण या नांव ॥१३॥
व्यतिरकसमाधीचें स्वरुप । निर्गुणनिर्विशेष निर्विकल्प । शुध्दज्ञप्तिमात्र जें नि:संकल्प । या नामरुप असंप्रज्ञात ॥१४॥
जरी बीजापासुनि होय झाड । आदि अंती फल असे उघड । परी मध्येंचि वृक्ष दिसे प्रौढ । उपाधी लबाडत्यागावी ॥१५॥
तैसी ही उपाधी जगदाकार । ब्रह्मीच जाहले चराचर । परी ते ब्रह्म नोहे साचार । अनित्यपर परब्रह्म ॥१६॥
म्हणजे ब्रह्मीं जी माया झाली । तीच त्रिगुणहि प्रसवली । सुविद्या अविद्यात्मक नटली । भूतें जन्मलीं तेथोनी ॥१७॥
पंचभूतात्मक पिंडब्रह्मांड । चराचर निर्माण झालें उदंड । परि ते उपाधी ऐशी प्रचंड । ब्रह्म अखंड नोहे कदा ॥१८॥
यासाठीं इदं न इदं न श्रुति । गर्जत केली असे पुढती । म्हणोनि पिंड ब्रह्मांडशास्त्ररीती । त्यागोनि घेती नि:शेष ब्रह्म ॥१९॥
त्यागोनि जडदृश्यादि स्थूल । प्राणासह मनोभास समूल । ज्ञप्तिमात्र समाधि अचल । व्यतिरेक केवल या नांव ॥२०॥
सारांश आदिअंतीं ब्रह्म वसे । मध्येंचि उपाधि अनित्य भासे । अनित्य त्यागितां ब्रह्म विलसे । त्या नांव असे व्यतिरेक ॥२१॥
ऐका अन्वयाचें नामरुप । म्हणती संप्रज्ञात सविकल्प । ज्याचें अद्वयस्वरुप । दृश्य संकल्प सर्व ब्रह्म ॥२२॥
जेंवि आदिअंतीं सत्यबीज । मध्यें बीजाकार वृक्ष सहज । त्रिकालींही ग्राह्य स्वरुप निज । कळलें तुज हें नाहीं ॥२३॥
अरे आदिअंतीं हेमसाचार । जरी मध्यें भासले अलंकार । तरी ग्राहक हेम निर्धार । करोनि घेणार नगहि ते ॥२४॥
जळरुपचि लहरी निर्धारा । जळ गोठोनि होती जळगारा । पदार्थ जाहली असे शर्करा । अनेकाकारा नाममात्र ॥२५॥
जरी तुम्हांतें उपाधि भासली । म्हणोनि काय वेगळी जाहली । एकचि वस्तु असे त्रिकालीं । पदार्थ बोली भासमात्र ॥२६॥
तेंवि जग हें नाममात्र भासे । परी तें यथार्थ ब्रह्मचि असे । ज्ञानेंचि सर्व कांहीं विलसे । अनायासें प्रज्ञानमय ॥२७॥
स्वप्नीं जो दृश्यभास भासला । तो पंचतत्त्वांचा प्रत्यक्ष दिसला । तो ज्ञानाविण कोणीं केला । हा सर्वांला प्रत्ययो असे ॥२८॥
मग जागृतींत जें कां पाहिलें । तेंही ज्ञानाविण केले । जेंवि दृश्य तेंवि भास झाले । आलें गेलें पाहिलें ज्ञान ॥२९॥
जर कां तें एक ज्ञान नाहीं । मग दिसे भासे नासेल कांहीं । ज्ञानानेंचि कें हें सर्वही । यथार्थ पाही विचारोनी ॥३०॥
ज्ञानेंचि दृश्य ज्ञानेंचि भास । देवदानव मानव भ्रंश । धनकणदारावृत्तिसायास । प्रपंचसोस सुखदु:खादि ॥३१॥
वाटेल ज्ञानाज्ञानविज्ञान । एकाचि रुपीं ऐसें कां भिन्न । जरी तें उपाधिबुध्दि करुन । तरी श्रेष्ठपण बुध्दीसी ॥३२॥
अरे भिंगारीं कांचगुण असे । म्हणोनि पीतादि वर्ण दिसे । ती उपाधी कांहीं दीपीं नसे । वृथा भासे आरोपित ॥३३॥
तैसें ज्ञानावरी बुध्दिपटल । तेणें अज्ञानादि भास सकळ । जेविं किरणीं च शोभे मृगजळ । बुध्दिकल्लोळ ज्ञानाब्धि तेंवि ॥३४॥
म्हणाल बुध्दियोगें ज्ञान राहे । तरी बुध्दिपूर्वीच तें आहे । सुषुप्तिठायीं बुध्दि कैंची पाहें । जागृति वाहे निद्रासुख ॥३५॥
युगवर्षमासदिन अनेक । सर्वकालींही तें ज्ञान एक । रोगभोग गोडी सुखदु:ख । अभेद नि:शंक केव्हांही ॥३६॥
असो ऐशी हे अन्वयसमाधि । सर्वशिरोभाग मुख्य प्रसिध्दी । तुज सांगितली यथाविधि । अद्वयसिध्दि सुलभ जेणें ॥१३७॥
व्यतिरेक दिवसाचा चंद्र । कलाहीन निष्प्रभ अभद्र । अन्वय हा अद्वयामृतसमुद्र । सकलां सुभद्रकारक ॥३८॥
काय नग जेव्हां आटवावे । तेव्हांचि त्यांतें सुवर्ण म्हणावें । आटवी नाटवितांही जाणावें । हेम स्वभावें असे सत्य ॥३९॥
तेंवि प्रपंचसह समुदाय । त्यागावा लागे दृश्यभास काय । नसतां कीं हातींचें ब्रह्म जाय । ऐसा उपाय मुळीं नको ॥४०॥
ब्रह्म कदापि जात येत नाहीं । त्यागग्रहण कधीं नको कांहीं । तुज अपाय वाटतो ज्याठायीं । तेथेंचि पाहीं ब्रह्म अद्वय ॥४१॥
जें जें कांहीं तुज भासूं लागलें । तें सर्वही ज्ञानमय शोभलें । वस्तुमात्र ब्रह्मरुप एकलें । द्वैत बुडालें नेणो कोठें ॥४२॥
मग कोठें कैंचा होय अपाय । दिसे भासे तें ब्रह्मचि होय । अपायचि झाला जेव्हां उपाय । उरले काय आन सांगें ॥४३॥
ऐसा ज्ञानानुभव झाल्यावरी । कैसें वर्तावें म्हणाल तरी । ब्रह्माभेद जाणोनियां परी । शांति धरी निर्वैरभावें ॥४४॥
जेव्हां एकचि सगुननिर्गुण । तेंचि अद्वय आहों आपण । तेव्हां कुलस्वामीचें ध्यान । करावें सगुण सावेग ॥४५॥
विस्तीर्ण मंडप कल्पित । देवालयीं सिंहासन जडित । त्यावरी सर्वेश भार्येसहित । पूजावा मनांत सर्वोपचारें ॥४६॥
बाह्य यथासांग देवतार्चन । स्वधर्मकर्मादि आचरण । कुलधर्मकुलाचार वर्तन । अतिथिपूजन नेमनिष्ठें ॥४७॥
सारांश मनीं क्षणैकभरी । विसंबू नये ध्यावा हरी । तेणेंचि सर्वही कलाकुसरी । येती करीं अनायासें ॥४८॥
देव तो सद्गुरुचि जाणावा । सर्वां भूतीं भगवद्भाव धरावा । कोणाचे मना क्षोभ न करावा । येणेंचि ठेवा सर्व साधे ॥४९॥
पूर्वीच देव असे सर्वां घटीं । अज्ञानें वृथा जाहली तुटी । ज्ञानें साधिल्या या सर्व गोष्टी । शांति पोटीं उद्भवेल ॥५०॥
बध्दमुक्तता मृषाज्ञानें केली । ही तरी गोष्ट शास्त्रोक्त ठरली । तैसेंचि पापपुण्यस्वर्गही कळली । नरकादि बोली सर्व खोटी ॥५१॥
कारण देह तरी येथें नासे । आत्मा निष्क्रिय अलिप्त असे । दोहोंसी बध्दता कधीं कोठें नसे । मामुक्त पिसें कोण सोशी ॥५२॥
जरी बध्दमुक्तत्व मना आहे । मन तरी माया सिध्दांत पाहे । या मा सा माया हें वेद बाहे । जें कांहींच नोहे ती माया ॥५३॥
तथापि भ्रमें माया खरी । मग ती सोशील बिचारी । तुम्ही कां घेतां बळें अंगावरी । असोनि विचारी बध्दमुक्तता ॥५४॥
ऐसेचि पापपुण्य स्वर्गनरक । प्रारब्ध संचित क्रिया अनेक । अनेक जन्मादि सोशितां दु:ख । ज्ञात्या मूर्ख कैसें म्हणावें ॥५५॥
म्हणे गुंडा कैसेंही वर्ततां । आत्मा अद्वय वाटे माझ्या मता । खोटी ठरली बध्दमुक्तता । गुरुकृपें आतां निश्चयें ॥५६॥
धन्य रे शिष्य तूं म्हणती स्वामी । सुज्ञ झाला परमार्थ कामी । सदुगुर्सी ऊर्मि । आलिंगिला प्रेमें हृदयासी ॥५७॥
ज्यातें श्रीहरी कळला यथार्थ । त्यासी प्रपंचचि तो परमार्थ । नसतां बुडवी प्रपंचस्वार्थ । अज्ञानें व्यर्थ ममत्वें ॥५८॥
ज्ञानाज्ञानी दोघेही मुक्त परी । प्रपंचसुखाचा ज्ञात्यासि निर्धारीं । मूढ स्वार्थदु:खें प्रपंच करी । दोघां माझारी हें अंतर ॥५९॥
खरा व्याघ्र असे जो पाहिला । जरी श्वानासंगें नाडला । तरी तो काय व्याघ्रत्वा मुकला । तैसा हा जाहला ज्ञानाज्ञानी ॥६०॥
परी अंतर हेंचि लोकदृष्टी । ज्ञात्या सुखमय व्यष्टिसमष्टि । अज्ञानी दु:खें होतसे कष्टी । तरी हेहि गोष्टी मायावी ॥६१॥
लोकसंग्रहार्थ जरी हें कृत्य । तरी मुक्तीसी ज्ञानची अगत्य । ज्ञानानेंचि आत्मा कळे नित्य । अग्राह्य अनित्य हेंही खरें ॥६२॥
ज्ञान व्हावया पाहिजे शास्त्र । नंतर गुरुवाक्य तें पवित्र । मग प्रत्यय होतसे स्वतंत्र । पुन्हां अणुमात्र द्वैत नुरे ॥६३॥
म्हणाल आत्मा असोनि अद्वय । तेथें सुखदु:ख म्हणणें हें काय । प्रत्यक्ष दिसतो कीं अन्याय । याचाही उपाय ऐकें तूं ॥६४॥
याचें रुप मूळ आनंद । म्हणोनि प्रपंचीं हुडकी मंद । कैचें तेथें मिळे सुख अभेद । केवळ खेद सुख इच्छे ॥६५॥
खरें सुख पाहतां आत्मयाठायीं । त्याविण हुडकितां कोठेंही नाहीं । मूढासी वाटे प्रपंचीं कांही । परी लेशही खरा नोहे ॥६६॥
अज्ञानी मायामोहें भुलला । सुख इच्छा मात्र असे त्याला । मूळ सुखाचा मार्ग विसरला । धुंडूं लागला प्रपंचांत ॥६७॥
प्रपंच म्हणजे पंचविषय । वेगळाले सेविती ज्ञानेंद्रिय । या व्यापाराचें नांव होय । वेद गाय प्रपंच ऐसा ॥६८॥
इंद्रियविषयां होतां तुटी । तेणें ज्ञान उपजतसे पोटीं । ज्ञानाविण न भेटे जगजेठी । पूर्वीच गोष्टी ठरल्या ह्या ॥६९॥
यासाठीं ज्ञानचि असे मुख्य । तेणे आत्म्यासी होईल सख्य । सख्यत्वें सुख मिळे असंख्य । ज्ञानें शक्य सर्व गोष्टी ॥७०॥
अज्ञानचि तें ज्ञान असे । दु:खचि तें सुखमय विलसे । प्रपंचचि परमार्थ भासे । गुरुकृपा असे धन्य ऐसी ॥७१॥
धन्य तें शास्त्र धन्य ते सद्गुरु । ज्याच्या कृपेचा अंत ना पारु । अनंत बोधें शांत महिवरु । भवाब्धि तारु तूं नारायणा ॥७२॥
ऐसें धन्यत्व वर्णन करितां । समाधि लागली उभयतां । गुरुशिष्यत्व गेलें पाहतां । यातायाता हरपली ॥७३॥
तेव्हां आयुष्य सरलें आला काळ । जाणोनि चूडामणीतें समूळ । म्हणती गुंडा आतां नाहीं वेळ । जातों सांभाळ ब्रीद माझें ॥७४॥
बोधामृततपानें तृप्त त्या समयीं । जवळीच होती कन्या राजाई । चूडामणि वदे ऐक गे आई । सांभाळ जांवई गुंडा माझा ॥७५॥
पतिसेवा करीं तूं सादर । प्राणांतींही न वदे कठिणोत्तर । आपत्कालीं धरी देई धीर । कधीं अंतर पडों नेदी ॥७६॥
दोघां शिरीं ठेविला अभयहस्त । पंचमहाभूतादि देवांसमस्त । विनवी सांभाळ निराश्रित । रत्नखचित दोन्ही बाळ हे ॥७७॥
तत्काळ चढविली योगमुद्रा । साधिली समाधि अद्वयनिद्रा । सर्वोंद्रिय सेविती सुखसमुद्रा । साधोनि भद्रातिथियोग ॥७८॥
गुंडा स्वसुखसमाधींत निमग्न । असतां ऐकिलें तेव्हां वचन । येवोनि साधिलें श्रीगुरुप्रयाण । किंचित खिन्न झाले मनीं ॥७९॥
दु:ख सांवरोनियां त्या क्षणां । नारददत्त चिपळयाविणा । घेवोनि आरंभिलें गुरुभजना । नामगर्जना प्रेमभरें ॥८०॥
जमली शिष्यमंडळी सकळ । श्रीगुरुविरहें करिती तळमळ । ग्रामस्थ जन जमले तत्काळ । होती उतावीळ दर्शना ॥८१॥
किंचित् उदया आला चंडांश । शुक्लनवमी भाद्रपदमास । शके सोळाशें एक संवत्सरास । ठेविलें देहास श्रीगुरु ॥८२॥
चूडामणि मृत्यू पाहोनि दृष्टी । आक्रंदती लोक बहू कष्टी । धन्यधन्य म्हणती योगी सृष्टी । करिती वृष्टि पुष्पबुका ॥८३॥
वाद्यें वाजती घनदाट । विमानीं स्थापिती करोनि थाट । मेवामिठाई उधळिती अफाट । अजातिस्पष्ट प्रसाद घेती ॥८४॥
उद्दालिकातीरीं देवलभूमि । धन्यधन्य ते संत ज्या ग्रामीं । त्रयमूर्ति अवतरले नामी । रतयोगकर्मी सर्वदा जे ॥८५॥
चूडामणि सद्गुरु योगिराज । तैसाच शिष्य श्रीगुंडामहाराज । मस्तानसाहेबवली हा सहज । भक्तासी पद निज देणार ॥८६॥
ऐसें जातां कांही दिवस । गुंडा कुटुंबासह गेले स्वगृहास । सराफी धंदा करितां संतोष । अनायास उदरपूर्ति ॥८७॥
या सात अध्यायांचें तात्पर्य । परमार्थासी मूळ जो उपाय । तो गुंडासी घडला असे काय । हा न्याय वर्णिला ॥८८॥
गुंडा बाळपणीं दु:खी झाला । शास्त्रदृष्टी नित्यानित्य जाणिला । तेणें इहपरसुखा विटला । आणि लाधला षट्कसंपत्ति ॥८९॥
मोक्ष इच्छें सद्गुरु शोधोनी । गुरु केला योगी चूडामणी । आत्मा जाणिला श्रीगुरुवचनीं । प्रत्ययचिद्घनीं ठसावला ॥९०॥
ज्या जिज्ञासूतें परमार्थचांड । त्यासी सत्य मी सांगतों उघड । श्रीगुरु चूडामणि त्याचें कोड । पुरवील दृढकृपेनें ॥९१॥
याचि पंथें श्रीगुंडा प्रत्यक्ष । त्रिजगीं मान्य तो पावला मोक्ष । तुम्ही मुमुक्षु येणेंचि दक्ष । पावाल अलक्ष्य निश्चयें ॥९२॥
नारायण अनंत कृपादुग्ध । पिऊनि जाहला जो वत्स शुध्द । तो कळिकाळा नभी प्रसिध्द । गुडाभक्त बोध धन्य ऐसा ॥९३॥
आतां चिद्गुंडांज्ञान मार्तंड । उदेला अखंडानंद प्रचंड । विराग कला ज्या त्याच्या उदंड । विस्तृत ब्रह्मांड ऐका पुढें ॥९४॥
आतां संपवावा हा अध्याय । उल्हास नावरे करुं काय । धन्यधन्य गुंडा बापमाय । मोक्ष उपाय धन्य तुझा ॥९५॥
अद्वयमतोपदेश शांकरी । भक्तगुंडा सांप्रदाय वरी । जो अनंत कृपाहस्त धरी । नारायण शिरीं धन्य तो ॥९६॥
कुळलेखकदेशाधिकारीद्विज । जयवंतात्मज सुततनयानुज । नारायणा अनंत कृपें निज । प्रेरक गुज महीवरु ॥९७॥
इति श्रीगुरुगुंडाचरित्र । सप्तमोध्याय सुरसपवित्र । अध्यात्मबोध वेदांतसूत्र । निर्याण स्वतंत्र चूडामणीचें ॥९८॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ७ वा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP