श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय एकोणिसावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशायनम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

नम: श्रीसगुण गणपती । नामस्मरणें विघ्नें पळती । नमोनि शारदा माया पुढती । सद्गुरुमूर्ति नमियेली ॥१॥
सर्वांसी अधिष्ठान जें मूळ । श्रीवेंकटेश कुलस्वामी केवळ । ग्रंथारंभीं नमूनि पदकमळ । नारायण निर्मळ गुण गातो ॥२॥
असो आतां पूर्वाध्यायीं । पश्चात्तापें बाजीराव हृदयीं । श्रीगुंडासी शरण जात लवलाहीं । ऐकावी श्रोत्यांहीं कथा पुढें ॥३॥
गर्वाचा परिहार झाला । आटोपिलें प्रात:स्नानसंध्येला । साहित्यासह उपदेश घेण्याला । गुंडापाशीं आला प्रात:काळीं ॥४॥
वस्त्रालंकार बहुविध । पूजासामग्री घेतली प्रसिध्द । फलतांबूलदक्षिणा विविध । घेतले बुध सांगाती ॥५॥
षड्रस पक्वान्न सुगंधित । ताट भरिलें रत्नखचित । आला तेथें लोटांगण घालित । त्राहि त्राहि म्हणत श्रीगुरुसी ॥६॥
ध्यानीं स्थिर श्रीगुंडा बैसला । स्वानंदामाजी निमग्न जाहला । भोवंतीं शिष्यसमुदाय जमला । नाहीं गलबला अणुमात्र ॥७॥
बाजीराव आणि पंडित जन । शास्त्रोक्त मुखें करिती स्तवन । गुंडा न पाहे उघडोनि नयन । उभे पूर्ण मुहूर्त एक ॥८॥
तेथें जमली थोर मंडळी । ती मनामाजी तळमळी । गुंडासमाधी कोणे काळीं । उतरे मुळीं कळेना ॥९॥
तंव उभे समोर । सर्व करिती हरिनाम गजर । तेव्हां कांहीसे देहावर । आले साचार श्रीसद्गुरु ॥१०॥
बाजीराव उभा होता तेथ । साष्टांग केला प्रणिपात । उभा राहोनि प्रार्थना करित । गुंडासी निश्चित एकभावें ॥११॥
अखंडानंदमूर्ति जगद्गुरु । तुज अनन्य शरण मी लेकरुं । होई संसारभयतारु । कृपा करु मज दीना ॥१२॥
मी आजवरी जन्मा येऊन । कांहीं सार्थक न केलें जाण । कुसंगें अत्यंत जाहलों मळीण । आलों शरण तुजलागीं ॥१३॥
माझे मस्तकीं ठेवूनि कर । सत्वर करी आतां भवपार । म्हणोनि लोळे चरणावर । स्तुति अपार मांडिली ॥१४॥
ऐसें ऐकोनियां स्तवन । गुंडानीं ओळखिलें त्याचें चिन्ह । अनधिकारी आलासी शरण । राज्यहीन होसी पुढें ॥१५॥
गुरुवाक्य हें ऐकूनि त्या वेळां । बाजीराव कांपत चळचळ । येरु दृढ धरितां पदकमळा । आला कळवळा गुंडासी ॥१६॥
नुपेक्षावें शरणागतासी । म्हणोनि मग बोलावित त्यासी । उपदेश दिला बाजीरावासी । नंतर पूजेसी आरंभिलें ॥१७॥
नानालंकार रत्नमाला । उत्तम पीतांबर नेसविला । वस्त्र देऊनि देत दुशाला । सद्गुरु पूजिला यथाविधी ॥१८॥
नैवेद्या वाढिलीं पक्वान्नें नाना । वरी दिधली गुरुदक्षिणा । सव्वालक्षाची जाहागीर जाणा । मानापानासह सनद ॥१९॥
गुरु होते भजनानंदीं । तेव्हां सनद ठेविली पदीं । गुंडा म्हणती काय या कागदीं । लिहिलें आधीं सांगा मज ॥२०॥
उत्तर देती राजाश्रित जन । चौपन्न ग्राम आपणाकारण । जाहागीर दिधली सनद करुन । भावेंकरुन श्रीमंतीं ॥२१॥
ऐसें वचन ऐकोनियां । गुंडा म्हणती कासया वायां । मूळ संसार सोडूनि या ठायां । फिरतों राया आनंदांत ॥२२॥
नलगे ग्राम ग्रामाधिपत्य । ठेवीरेवीसंचय अनित्य । नाहीं थोरपणाचें अगत्य । आम्ही भृत्य विठ्ठलाचे ॥२३॥
ही लक्ष्मी केवळ चंचळ । तिचा विश्वास नाहींच केवळ । तूं स्वराज्य मानिसी अढळ । परी समूळ क्षणिक हें ॥२४॥
तेव्हां बाजीरावें चरणावरी । लोळण घेतली निर्धारीं । म्हणे सद्गुरु मज घ्या पदरीं । उपेक्षा न करी दीनाची ॥२५॥
मग त्यासी म्हणती श्रीगुरु । बारे तूं आमचें लेंकरुं । आमचाच । मानूनि राज्यभारु । चालवी निर्धारु अखंड ॥२६॥
ऐसा रायासी बोध करुन । गुंडा गेले भजनालागून । तेथें पडिला महापर्जन्य । श्रीगुरु पूर्ण भिजोनि गेले ॥२७॥
तें पाहूनियां बाजीराव । तेथें मंडप बांधिला तंव । द्रव्य खर्चूनि असंख्य अपूर्व । श्रोते सर्व न भिजती ऐसा ॥२८॥
असो जळोजी महाविरक्त । विठ्ठलाचा जो प्रियभक्त । सदा भजनीं राहे सक्त । विदेही मुक्त होता तेथें ॥२९॥
द्रव्यदारा त्यागूनि संकल्प । भिक्षा मागोनि करी कालक्षेप । ध्यानीं आणूनि सगुणरुप । बैसे समीप ओवरींत ॥३०॥
बाजारीं कळलें राया लागून । घ्यावया आला त्यांचें दर्शन । द्रव्य सहस्त्र ठेविलें नेऊन । पुढें जाण बाजीरावें ॥३१॥
गोदडी लेऊनि अंगावरी । काष्ठाच्या दोन टिपर्‍या करीं । प्रेमभरें भजन करी । आनंदनिर्भरीं हरींचे ॥३२॥
तेव्हां पुढें द्रव्य ठेवून । बाजीराव म्हणे घ्या म्हणून । येरु पुसे तूं आहेस कोण । काय कारण येथे येण्या ॥३३॥
येरु म्हणे मी बाजीराव । माझें असे पुणें गांव । तुमच्या कृपें हें राज्यवैभव । माझा भाव म्हणूनि देतों ॥३४॥
जळोजी म्हणे पंढरिराया । काय तुझी विपरीत माया । दुकाळी मेले लोक तया । करोनियां अन्नान्न ॥३५॥
तेव्हां काय होतासी निजला । आतांचि तुज चेव आला । व्यर्थ त्रास देसी मजला । न मागे त्याला बळेंची ॥३६॥
संन्यासी नव कामिनी । नपूंसका देतोसि पद्मिनी । खरासी काय सुगंध लाऊनी । हिमकरा व्यजनीं वारिसी ॥३७॥
तंव बाजीराव म्हणे संतमूर्ति । संतर्पण करा आपुले हातीं । येरु म्हणे मी सुतार निश्चिती । दक्षिणा मजप्रती कासया ॥३८॥
अरे उचल येथूनि पोतडें । बोलूनि गेला देवाकडे । येरु म्हणे सत्यासत्य पाहूं येवढें । म्हणूनि पुढें दूर बैसे ॥३९॥
तंव मळोजी नामक दुसरा । प्रदक्षिणा करोनि आला घरा । पायीं लागल्या धनठोकरा । म्हणोनि विचारा करितसे ॥४०॥
म्हणे कोण ऐसा चांडाळ । नरक टाकोनि भ्रष्टविलें स्थळ । स्पर्श जाहला मज केवळ । व्हावें अमळ तीर्थस्थानें ॥४१॥
म्हणोनि हातीं घेतला खराटा । लोटित आणिलें तें दारवंटा । त्यागोनि गेला भीमातटा । बैसे वाळवंटा स्नोनोत्तर ॥४२॥
घागर भरोनि आणिलें पाणी । द्रव्य ठेविलें होतें ज्या स्थानीं । तें स्वच्छ काढिलें धुवोनि । मग जावोनी स्वस्थ बैसे ॥४३॥
ऐशी त्या विरक्ताची कथा । बाजीरावें पाहिली स्वतां । द्रव्य देवोनि तें दूतमाथां । अर्पी समस्तां याचकां ॥४४॥
याचक केवळ हीन करंटे । अवनीं फिरताती ते खोटे । चरणीं रुपती अनर्थ कांटे । चालतां वाटे इच्छेच्या ॥४५॥
भक्तिकवच लेइती सिध्द । तेणें उपाधि त्यांना नसे प्रसिध्द । शीतोष्णताप होता अगाध । त्यासी संबंध नसे कांहीं ॥४६॥
असो मुख्य भाग्य वैराग्य जाणा । जनराहटी ही त्याची विटंबना । स्वानुभवीं पंढरिराणा । न्यून त्यांना पडों नेदी ॥४७॥
असो बाजीराव घेऊनि प्रसाद । ग्रामासी गेला मंद मंद । प्रतिवर्षीं येवोनियां विशद । पाहे पद श्रीगुरुचें ॥४८॥
गुंडा चातुर्मास्यीं पंढरपुरीं । चक्रीं भजन करी महाद्वारीं । नित्य पुराण होत गजरीं । सप्रेमें हरिनाम गात ॥४९॥
संतमाळिकेचें पुराण । नित्य ऐके प्रीती करुन । नाभाजी काव्य ग्वालेर भाषण । गोड जाण अतिप्रिय ॥५०॥
यथाविधि धर्मकर्म तत्काळीं । गुंडा करिती त्या त्यावेळीम । शिवविष्णुव्रतादि सकळी । अखंड नामावळी चालत ॥५१॥
असो कार्तिकीचा करोनि काला । उल्लंघिलें चंद्रभागेला । वाटे लावीत श्रीहरि निघाला । याचकाला धर्म करी ॥५२॥
चंद्रभागेच्या पूर्वतटीं । गुंडा उतरला वाळवंटी । तेथें याचकांची जाहली दाटी । तंव जगजेठी योजना करी ॥५३॥
आपण होऊन सावकार । द्रव्य आणविलें तेथें अपार । याचकांसी वांटिलें सत्वर । परतले समग्र संतोषें ॥५४॥
सर्व बैसले वांटणी करित । गुंडा मधुर वीणा वाजवीत । रामा कृष्णा हरि उच्चारीत । आढिवापर्यंत पातले ॥५५॥
सूर्यास्तीं गुंडा तेथें उतरले । भाविकांनीं अयाचित दिलें । करोनि करोनि भोजना बैसले । तृप्त झाले सर्वही ॥५६॥
नंतर सर्वांनी केलें शयन । गुंडा ध्यानस्थ बैसले पूर्ण । साधु महाराज कंधाराहून । तेथेंच येऊन उतरले ॥५७॥
ते केवळ दत्तावतार । राजयोगी ज्ञानदिवाकर । प्रगटले भक्त तारावया भूवर । सगुण साक्षात्कार जयासी ॥५८॥
पूर्वीं ते एका राजाचे दिवाण । परी म्लेच्छराजा अति दुर्जन । खल न करी प्रजापालन । पशूहनन सदा करी ॥५९॥
पंडित ज्ञाते घाली बंदीं । दानधर्म नेणे स्वप्नीं कधीं । गाईब्राह्मण शोधोनि वधी । पशुपारधी दुरात्मा ॥६०॥
स्त्रैण जेणे कटिशूळ । बळें स्त्रिया भ्रष्टवी चांडाळ । राज्यांत करी अनर्थ गोंधळ । जनां तळमळ राज्यघाताची ॥६१॥
प्रजा पिडिली समस्त । अन्नावीण मेली बहुत । तृणजीवन पशूंतें न घालित । जाहला आकांत प्रजेमाजीं ॥६२॥
बहुतांनीं केली शिष्टाई । परी तो कोणाचें नायके कांहीं । तंव जीवनावीण एके समयीं । खर कूपाठायीं पडियेला ॥६३॥
तृषेंनें जातसे त्याचा प्राण । तें पाहे हनुमंतराव दिवाण । काढी वस्त्रासी तांब्या बांधून । तें जीवन घाली खरा ॥६४॥
तो वृत्तांत राजासी कळला । विनोदें गदगदा हांसूं लागला । म्हणे हा दिवाण दिवाणा झाला । पाणी खराला पाजितो ॥६५॥
येवोनि राजा खरासी पाहे । तंव तें उठोनि बैसलें आहे । राजा मनीं आश्चर्य लाहे । हांसतील मला हे सर्वही ॥६६॥
प्रधाना योग्य नोहे हें कर्म । हें केवळ कैकाडयाचें काम । तंव प्रधान म्हणे पुरुषोत्तम । आत्माराम सर्वांठायीं ॥६७॥
धिक्कार असो तुजला राजा । अन्नावीण मारिसी प्रजा । कैसी लाज न वाटे निर्लज्जा । हांससी माझ्या कृत्यासी ॥६८॥
कोपला जाण तुजवरी देव । प्रजाही उठोनि जाईल सर्व । मग राज्यास येईल खेंव । कां वृथा गर्व तूं धरिसी ॥६९॥
आजापासूनि मी तुझी चाकरी । शपथ असे कदापि न करी । तसाचि येवोनियां झडकरी । ठेवी गृहावरी तुलसीपत्र ॥७०॥
सर्व लुटवोनि आपलें सदन । होती राधाई त्याची कामीन । दोघांसी दोन ठेवोनि वसन । द्रव्य संपूर्ण लुटविलें ॥७१॥
रायासी तें वर्तमान कळलें । हनुमंतरायें घर लुटविलें । मग तत्काळ तेथें आले । स्तवन केलें अपार ॥७२॥
येरु म्हणे येथें रहावें स्वस्थ । तुम्हां लागे तो देतों पदार्थ । प्रधान म्हणे आतां कां व्यर्थ । राहूनि येथ काळ घालूं ॥७३॥
राजाज्ञेनें राहे कांहीं दिवस । परी लागला ईशप्राप्तिध्यास । एकदां स्त्रीसह गंगापर्वास । गेले अनायास तेथूनी ॥७४॥
आकंठ उदकीं उभा राहोनी । म्हणे धन्य गंगे मायबहिणी । तूं आलासी ज्या पदाहुनी । तो चक्रपाणी भेटवीं ॥७५॥
तुझ्या जीवनीं घडलें स्नान । तेणें गेले माझे दोष संपूर्ण । अहो रजनी राहे सप्तदिन । उभा जाण गंगेत ॥७६॥
म्हणे सत्वर करवीं भेटी । नातरी सांठवीं तुझिया पोटीं । ऐसा निग्रह करोनि शेवटीं । तेथें हट्टी उभा राहे ॥७७॥
प्रगटला तेथें दत्तात्रय । षड्रभुजा वदन सुहास्य । पीतांबरधारी तेजोमय । रुप अद्वय साजिरें ॥७८॥
शंखचक्रगदापद्यधारी । दंडकमंडलु शोभे करीं । जडितकमंडलु मुगुट शिरीं । धांवला हरि भक्तकाजा ॥७९॥
श्रीदत्त साधूसी आलिंगूनी । गंगाबाहेर आणिलें तेक्षणीं । साधुराय लागला चरणीं । केली विनवणी मनोभावें ॥८०॥
दत्त म्हणेरे सखया प्रसिध्द । मी अखंड असे तुज सन्निध । आता वाराणसी महिमा अगाध । जाऊनि शुध्द पिंड देईं ॥८१॥
निघाला श्रीदत्तआज्ञा वंदून । काशींत केलें लिंगार्चन । गयेमाजीं गयावर्जन । माघस्नान प्रयागांत ॥८२॥
एका ब्राह्मणाचे कार्यासाठीं । स्त्रीगहाण ठेविली शेवटीं । द्रव्य देवोनि जगजेठी । सती संकटीं सोडवी ॥८३॥
पुन्हां स्त्रीसह ग्रामातें आला । करी तीर्थयात्रेचे मावंद्याला । असो एक मनांत साधूला । संशय आला दृढतर ॥८४॥
म्हणे हें आतां पुसावें कोणा । म्हणोनि आठवी दत्तराणा । प्रगटोनि सांगे गुंडा खुणा । पूर्ण जाणा तो मद्रूप ॥८५॥
सर्व स्थानींही मी व्यापक । परी मी आणि गुंडा आहों एक । त्याचे मुखें समाधान देख । होईल नि:शंक साधुराया ॥८६॥
जैसे मैत्रेयाचे मुखें विदुर । कीं नैमिष्यारण्यीं पूर्वीं साचार । बादरायणासी जाण विचार । जाहला निर्धार नारदमुखें ॥८७॥
तेंवि गुंडामुखें निरुपण । फलद्रूप होईल तुजलागून । ऐसें ऐकतांचि दत्तवचन । निघाला तेथून पंढरीसी ॥८८॥
गुंडा आढिवेवरी उतरले । साधुरायेंही तेथें डेरे दिले । एकांतीं जावोनि गुंडासी भेटले । चरण धरिले प्रीतीनें ॥८९॥
गुंडा उठोनि त्या समया । धांवे साधुपद धरावया । साधुराय आवरी तया । गुंडेराया वरिच्यावरी ॥९०॥
येरु म्हणे तुम्ही समर्थ । मीदास तुमचा असें यथार्थ । शंका पुसावया आलों येथ । दत्तजगन्नाथ आज्ञेनें ॥९१॥
दोघेही डेरियामाजी आले । सप्रेमें भजन सारिलें । एकांतीं जाऊनि बैसलें । शंकेतें विचारिलें साधुरायें ॥९२॥
तेव्हां सद्गुरु गुंडासखा । साधुरायाची निवारिली शंका । जें कां न कळे ब्रह्मादिकां । तें लापणिका दावित ॥९३॥
गुंडाअंतरीचें गुह्यज्ञान । न निघे कधीं अधिकार्‍यावीण । क्षेत्र न पिके गर्भा आल्यावांचून । तेंवि ज्ञानघन गुंडा होय ॥९४॥
साधुरायें गुंडा बोल ऐकिला । तेव्हां त्यांचा बोल खुंटला । सर्वांगीं शीतळ जाहला । मौनें राहिला तेधवां ॥९५॥
हरिनामें ज्ञान आतुडे । ज्ञानानें साक्षात्कार घडे । निर्गुणप्रत्ययें सगुणरुपडें । हाता चढे साधकारी ॥९६॥
असो साधूचा सर्व संशय । जावोनि लाधला बोध अद्वय । तंव झाला अरुणोदय । निघे गुंडोराय तेथूनी ॥९७॥
तंव वंदोनियां पदांबुज । विनविती साधुमहाराज । एवढें एक वचन द्यावें मज । कंधारा सहज यावें तुम्ही ॥९८॥
यासी उत्तर न देतां गेले । मग आपल्या मंडळींत आले । निवांत आसनावरी बैसले । तेव्हां उदेलें सूर्यबिंब ॥९९॥
स्नानसंध्या सारुनि सत्वरीं । पुढे निघाले तेथूनि झडकरी । नाम गाती रामाकृष्णहरि । सह परिवारीं मार्गानें ॥१००॥
प्रतिवर्षाचा सोडूनि मार्ग । उत्तरपंथ धरिला सवेग । मंडळीसी नकळे कांहीं योग । काय प्रसंग पुढें होतो ॥१॥
पुढें कथा श्रोतीं ऐकावी श्रेष्ठ । शिष्यानुग्रह साधुराय भेट । भक्तवरद नारायणा स्पष्ट । करी शेवट गोड तूं ॥२॥
इति श्रीगुंडामाहात्म्य स्वप्रकाश । बाजीरावास गुंडा उपदेश । साधूचा केला संशयनाश । अध्याय एकोणीस गोड हा ॥१०३॥

॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय १९ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP