श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय सोळावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

ॐ नमो रुक्मिणीरमणा । शिवशक्त्यात्मक जगजीवना । मंगल गणाद्या गजवदना । नारायणा वरदाधीशा ॥१॥
हंसशारदा जगद्विलासा । अगद्योनी निर्गुणगुणाभासा । मायानियंत्या सद्गुरु सर्वेशा । श्रीव्यंकटेशा नमोस्तुते ॥२॥
पूर्वाध्यायाचे अंतीं । श्रीगुंडासी पत्रिला आपुले हातीं । लिहोनि प्रिय सज्जना सांगाती । मूळ धाडिती शिबिका स्वार ॥३॥
चंदुलाल स्वहस्तें पत्रिका । लिहिली ते सज्जन श्रोते ऐका । स्वस्तिश्री सद्गुरु ज्ञानार्का । भक्ततिलका योगिराया ॥४॥
श्रीगुरुबोधाद्वया प्रत्यग्व्यक्ति । कारण तारकतरणी भक्ती । तुज संगें लाभे भवाब्धिमुक्ति । म्हणोनि युक्ति योजिली कीं ॥५॥
यास्तव नाम श्रीगुरुगुंडा । तुज शोभे ज्ञानमार्तंडा । अद्वय पदें दास हा गुंडा । उध्दरीं अखंडानंदरुप ॥६॥
विनंति उपरी प्रार्थना विशेष । हीच कीं तुमच्या दर्शनाची आस । लागली तेणें अति उदास । जाहला दास स्वामिया ॥७॥
कांहीं एक न घेतां संशय । येथें येऊनि दाखवीं पाय । म्लेंच्छराज्यांत हिंसाभय । तरी उपाय करीन त्याचा ॥८॥
सुगंधिक पदार्थांचें दुकान । लावूनि मार्ग पवित्र करीन । उतरावया प्रशस्त स्थान । उपवनीं देईन तुम्हांसी ॥९॥
सिंहासन करीन लक्षाचें एक । लक्षाचे अलंकार नि:शंक । वस्त्रभूषणें देईन अनेक । लक्ष आणिक ठेवीन पुढें ॥१०॥
ऐसें स्वहस्तें लिहूनि पत्र । संगें द्रव्य दिलें सहासहस्त्र । प्रेमीं एक धाडिला मित्र । गुंडा पवित्र आणावया ॥११॥
श्रीगुरु होते प्रेमपुरांत । भगवद्भजनीं आनंदित । तेथें पाचारणा अकस्मात । आली समस्त मंडळी ती ॥१२॥
तंव श्रीगुंडासी नमूनि समग्र । चंदूचा वृत्तांत कळविला साग्र । वाचोनि दाविती पत्र अव्यग्र । म्हणती शीघ्र चलावें ॥१३॥
सांगती तुमचें पद पहावया । बोलाविलें तुम्हां श्रीगुरुराया । चंदूलाल फार योग्य असूनियां । ध्यातसे पायां निशिदिनीं ॥१४॥
तो अत्यंत असे भाविक । म्हणोनि प्रार्थना केली ही एक । मान्य करोनि आपण नि:शंक । चला सकळिक शिष्यांसह ॥१५॥
गुंडा करोनि पत्रश्रवण । म्हणती जरी कोट्यवधि धन । देऊनि तो करिल पूजन । तरी येथून येणें न घडे ॥१६॥
न येऊं मैलाराहून पुढें । गुंडावचन ऐकूनि एवढें । दहासहस्त्रांचे तेव्हां तोडे । ओतिले तेवढे गुरुपाशीं ॥१७॥
जें द्रव्य ज्याचे हातीं लागलें । त्यांनीं ते सर्व लुटूनि नेलें । तेथें कांहींच नाहीं राहिलें । पाहूनि म्हणाले धन्य श्रीगुरु ॥१८॥
तेथें करुनि प्रसादग्रहण । सर्वही गेले शहरा परतून । चंदूलालासी साग्र वर्तमान । केलें निवेदन सर्वांनी ॥१९॥
चंदूसी अत्यंत खेद वाटला । देवगृहीं जाऊनि बैसला । सद्गुरु गुंडाचा ध्यास लागला । नेत्रीं लोटला अश्रुप्रवाह ॥२०॥
म्हणे हीन दैव माझें करंटें । मज अभाग्या गुंडा कैसा भेटे । मुळीं राज्यासन हें खोटें । साधन मोठें नरकाचें ॥२१॥
हा चंदूलाल अपमानिला । हाही जनीं उपहास झाला । पात्र जाहलों अपकीर्तीला । आतां याला काय करुं ॥२२॥
एकांतस्थानीं दिवसरात्र । याचि दु:खें स्त्रवती नेत्र । ध्यास लागला तेणें पवित्र । जाहलें विचित्र ऐका पुढें ॥२३॥
चाकरीसाठीं कोणी विद्वान । चंदुलालापासीं होता ब्राह्मण । तंव चंदूसी लागलें गुंडाध्यान । गेले देहभान विसरोनी ॥२४॥
ब्राह्मण पुसे कांहो लाला । असे कां तुम्ही सचिंत बैसलां । कारण याचें सांगा मजला । मीही आपला मानूनी ॥२५॥
काय सांगूं तुज विप्रवर्या । कोणी दु:खनाशक या समया । दिसेना म्हणूनि जळते काया । गुंतोनि मायामोहीं व्यर्थ ॥२६॥
ऐसें बोलतांचि मौन पडलें । दोन्हीं नेत्र आसवें भरले । पुन्हां मुत्सद्यानें विचारलें । तेव्हां बोलिले तयासी ॥२७॥
पुण्यें घडले जें आजवरी । उपयोगी न आलें कांही तरी । व्यर्थ कर्मधर्म आचरी । शीण अंतरीं जाहला ॥२८॥
जरी असतें पुण्य कांहीं । तरी सद्गुरु भेटता पाहीं । खराच मी पापी आलों देहीं । भारवाही संसारीं ॥२९॥
अशांत माझा व्हावा शेवट । हेंचि मजला वाटतें नीट । नसतां व्हावी श्रीगुंडाभेट । ही खूणगांठ शपथ निदानीं ॥३०॥
कोणी तरी करोनि उपकार । आतांच आणील गुंडा सत्वर । त्यासी द्रव्य चाकरी निर्धार । देईन साचार मागे तें ॥३१॥
मुत्सद्दी म्हणे कर जोडून । आणावया जातों गुंडा लागून । लाला म्हणे मी आभारी होईन । हां, जी, म्हणून ऊठला ॥३२॥
म्हणे यथामति प्रयत्न याला । करीन म्हणतां चंदूनें नमिला । चालत तेव्हां पायीं निघाला । रामपुराहून गेला मैलारा ॥३३॥
तंव गुंडा मैलारीं होते भजनीं । मुत्सद्दी येऊनि लागला चरणीं । उभा राहिला कर जोडोनी । भजन श्रवणीं ऐकत ॥३४॥
विश्रांति पाहूनि भजनोत्तर । गुंडापदीं लागला दृढतर । म्हणती काय संकट सांग सत्वर । करीन दूर विप्रवर्या ॥३५॥
मुत्सद्यानें पूर्वीं विचार केला । जरी चंदू बोलावी म्हणूं याला । तरी समान मानिती रावरंकाला । अमान्य बोला करितील ॥३६॥
जरी दावावी द्रव्यलालूच । तरी मज शापितील स्वच्छ । त्रिभुवनराज्यही ज्यातें तुच्छ । विरागी अनिच्छ ऐसा जो ॥३७॥
मुत्सद्दी करुन विचारगुज । नमूनि म्हणे हो श्रीगुरुराज । मज दीनाचें आहे एक काज । होय सहज आपणायोगें ॥३८॥
मी जन्माचा दरिद्री पूर्ण । संतति गृहीं परी नाहीं अन्न । म्हणोनि केला बहुत यत्न । दारिद्र्य अजून सरेना ॥३९॥
गृहीं अन्नान्नगती । स्त्रीपुत्र मज बहु जाचिती । त्रासोनि मग निघालों पुढती । भाग्यनगराप्रती पावलों ॥४०॥
घेतली चंदूलालाची भेट । त्यांनीं उत्तर दिलें स्पष्ट । ती जरी उत्तम असे गोष्ट । परी अदृष्ट काय नेणों ॥४१॥
तुमचे भेटीस्तव चंदूलाल । निशिदिनीं झुरतो केवळ । म्हणाला श्रीगुंडा घेऊनि याल । देऊं तात्काळ चाकरी ॥४२॥
मजही चाकरीची आशा । परी चालतां जाहली दुर्दशा । कृपें चला सद्गुरु ईशा । माझी मनीषा पुरवावी ॥४३॥
तंव गुंडा ब्राह्मणासी बोलिला । ज्यांत लाभ होईल तुजला । तें अवश्य कर्तव्य मजला । जाण या बोला सत्य विप्रा ॥४४॥
आतां तूं मात्र सत्वर येथून । भाग्यनगरा करावें गमन । तुजामागेंच मी येईन । सत्यवचन जाण माझें ॥४५॥
विप्र निघाला तेथूनि सत्वर । वाटेनें चिंता करी इहनापर । कैंचे येतील गुंडा साचार । मनीं विचार करित चाले ॥४६॥
तों इकडे चंदू रात्रंदिवस । श्रीगुंडाचा करितसे ध्यास । अन्नपाणी वर्जिलें खास । श्वासोच्छवास आठव करी ॥४७॥
चंदूचा दृढभाव पाहून । गुंडाचें कळवळलें अंत:करण । प्रगट केलें रुप सगुण । चंदू देखोन संतोषला ॥४८॥
सर्व शिष्यमंडळीसहित । रामा कृष्ण हरी उच्चारित । मंजुलरवें वीणा वाजत । मूर्तिमंत उभा पुढें ॥४९॥
जेंवि स्मर्तृ ग्रामीं नारद कोठें । भक्तसंकटीं तत्काल प्रगटे । कार्य साधूनियां चोखटें । लागे वाटे पुन्हां जेंवि ॥५०॥
तेंवि देखोनि श्रीगुंडामूर्ति । चंदूलाल तटस्थ चित्तीं । सिंहासनीं बैसवोनि प्रति । पद नमिती प्रेमभरें ॥५१॥
अपार करुनि गुंडास्तवन । षोडशोपचारें केलें पूजन । उत्तम पीतांबर नेसवून । पांघरविला जाण दुशाला ॥५२॥
धूपदीप नाना परिमळ । गंधाक्षता सुमनमाळ । अर्पिले नैवेद्य तांबूल । ठेविलें फळ अपार पुढें ॥५३॥
नंतर करोनि पंचारती । पुष्पांजलि सुमन वाहती । बध्दांजलि प्रार्थना करिती । हृदयीं मूर्ति रेखूनि ॥५४॥
मग गुंडा म्हणेरे चंदू । हाचि तुज आमचा आशीर्वादू । साधुसंतांचा नित्य घडो संबंधू । होईल आनंदु तुजलागीं ॥५५॥
तुजवरी माझें अत्यंत मन । म्हणूनि आलों बोधाकारण । आतां नित्य करीं तूं नामस्मरण । भवबंधन तुटे जेणें ॥५६॥
धन्यधन्य चंदूचें वैभव । ध्यानीं प्रगटले गुंडा स्वयमेव । विज्ञानबोध करुनियां सर्व । दाविली ठेव स्वरुपाची ॥५७॥
पीतांबर प्रसाद अर्पिला । तो चंदूनें शिरीं बांधिला । उभयांसी अत्यानंद झाला । गुंडा पावला अंतर्धान ॥५९॥
तोच पीतांबर शिरीं बांधोन । सभे बैसला देदीप्यमान । आश्चर्य करिती सभाजन । म्हणती कारण काय याचें ॥६०॥
पूर्वीं जे लोक गेले पाचारण । मुत्सद्दी स्वार गुंडाकारण । तेही पीतांबर पाहूनि पूर्ण । आश्चर्य जाण करिताती ॥६१॥
गुंडा तरी येथें नाहीं आला । लालासी पीतांबर कैसा लाधला । हा पीतांबर गुंडाकटीं देखिला । विचित्र लीला सद्गुरुची ॥६२॥
चंदूलाल पाहोनी मुत्सद्यासी । साष्टांग नमन घातलें त्यासी । बोले तुमच्या उपकारासी । न विसरे मानसीं आजन्म ॥६३॥
तुम्हासी घातली मी जी पैज । ती तुम्हीं पूर्ण केली सहज । आतां चाकरीसी जावें आज । सत्वर महाराज येथूनि ॥६४॥
शतमान घेऊनि पगार । खामगिरीसी जावें सतवर । किंवा येथेच रहावें समोर । वाटे विचार तैसा करा ॥६५॥
किंवा मनसब तुम्हां व्हावी । कीं जाहगीर कांहीं द्यावी । जें काय रुचेल मनोभावीं । आज्ञा करावी विप्रवर्या ॥६६॥
तंव विप्र म्हणे हें बोलतां काय । तुम्हां भेटला केव्हां श्रीगुरुराय । किंवा हा विनोदचि होय । करा अन्याय क्षमा तुम्ही ॥६७॥
श्रीगुंडा देऊनियां वचन । म्हणाले जा येतों मागून । आज झाले सहा दिन । निघोनि तेथून मजलाही ॥६८॥
तंव चंदू म्हणे सहा दिन झाले । प्रत्यक्ष गुंडा भेटोनि गेले । पीतांबरासी मज दिधलें । शिरीं ठेविले कृपाहस्त ॥६९॥
विप्र म्हणे निघालों ज्यावेळीं । त्याच दिनीं गुंडा सायंकाळीं । पूजिले म्हणतां पद कमळीं । हें समूळीं मिथ्या भासे ॥७०॥
मज वाटे कीं करितां विनोद । ज्यायोगें मज व्हावा खेद । परी सद्गुरुमहिमा अगाध । हेही शब्द न बोलवती ॥७१॥
ऐसें ऐकूनि विप्रवचन । चंदूसी आनंद जाहला पूर्ण । धन्यधन्य श्रीगुरुमहिना । कोणासी जाण नेणवे ॥७२॥
चंदूलाल घेवोनि शपथ । म्हणे गुंडा आले होते येथ । ऐसी ऐकतां त्यांची मात । जाहला चकित ब्राह्मण ॥७३॥
धिक्‍धिक्‍ आतां काय बोलावें । या चंदूनें काय चाकरीस द्यावें । आणि त्या मजूरीस मीं करावें । जन्म मरावें पोटासाठीं ॥७४॥
धि:कार असो त्या स्त्रीपुत्रांसी । स्वार्थासाठी विकिती मजसी । अहाहा गिळूं पाहे प्रपंचविवशी । दांत घशीं घालोनि ॥७५॥
ऐसा सद्गुरु गुंडा सोडून । कोणासी पसरुं दीनवदन । प्रत्यक्ष प्रगटला भक्तनिधान । सोडूनि शरण जाऊ कोणा ॥७६॥
चंदूसी साष्टांग प्रणाम केला । म्हणे पुरे धालों चाकरीला । वस्त्र जाळोनि लाविलें रक्षेला । तसाच निघाला गुंडाकडे ॥७७॥
येवोनियां गुंडाचे समोर । स्तवन केलें अपरंपार । आतां सांभाळीं दीन किंकर । लागे वारंवार चरणासी ॥७८॥
गुंडा ठेवी शिरीं अभयहस्त । म्हणे विप्रा शांतहो राहें स्वस्थ । दुश्चित होतां कैंचा परमार्थ । लाभे निश्चित तुजलागीं ॥७९॥
गुंडाचा घेऊनि उपदेश । सेवेंत राहिला रात्रंदिवस । सोडिली सर्व प्रपंचाची आस । स्वस्थ मानस होऊनी ॥८०॥
ज्यासी होईल सद्गुरुकृपा । त्यासीच सर्व मार्ग होय सोपा । आणि तोच योग्य बापा । स्वस्वरुपा पहावया ॥८१॥
धन्य चंदूचें भाग्य परिपूर्ण । म्हणूनि श्रीगुंडाचें झालें दर्शन । पूर्वीचें सर्व पालटलें चिन्ह । अखंड भजन करीतसे ॥८२॥
एकदां जाहलें विचित्र । भाविक हो ते ऐका चरित्र । कोणी एके ग्रामीं श्रीगुंडा स्वतंत्र । भजन पवित्र संपवी ॥८३॥
तेथें देशाधिकार्‍याच्या गृहीं संतर्पण होतें त्या समयीं । ब्राह्मणमंडळी तेथें कांहीं । जमली पाहीं थोरथोर ॥८४॥
श्रीगुंडासत्कीर्ति तेथ । सुज्ञ वर्णित असतां अकस्मात । देशाधिकार्‍यासह त्यांत । विरुध्द मत दुष्टांचें ॥८५॥
म्हणती तुम्ही हें बोलतां काय । गुंडा केवळ करितो अन्याय । साधु कैंचा दांभिक होय । सांगावा न्याय काय आम्हीं ॥८६॥
विधवा असती सदां सेवेसी । भोंदितो हा भाळ्याभोळ्यांसी । वेषधारी फिरतो देशोदेशीं । पोटपोशी घेऊनि संगें ॥८७॥
अंतरी धनाशा धरुन । वरी दावितो विरागपूर्ण । अशा दुष्टाशीं न करावें भाषण । नको दर्शन जन्मांतही ॥८८॥
मोठमोठयांची परीक्षा करीन । मग गुंडा काय आम्हांपुढें जाण । तेव्हां जमीनदाराचा वंश पूर्ण सत्य म्हणून वाटे तुम्हां ॥८९॥
ऐसें ऐकोनि ज्ञाते सकल । गृहासि उठोनि जाती तत्काळ । त्यांसी अहंतेनें ग्रासिलें समूळ । घात केवळ प्राप्त झाला ॥९०॥
ऐसा तो महादुष्ट दुर्मति । अहंतेनें बोलूनि गर्वोक्ति । अत्यंत धरोनि कुभाव चित्तीं । म्हणे प्रतीती पाहूं आता ॥९१॥
महान्‍ विषाचा रांधा करुन । अर्क काढिला जैसा प्रळयाग्न । स्वानंदेंचि परत्रा जावा प्राण । उलती पाषाण बिंदुमात्रें ॥९२॥
ऐसा अर्क सिध्द केला कठोर । घट भरोनि आणिला सत्वर । ठेवूनियां श्रीगुंडासमोर । जोडोनि कर उभा पुढें ॥९३॥
म्हणे आज आहे हरिदिनी । यालागीं उत्तम तुम्हालागुनी । इक्षुरस नूतन काढोनी । दिधला आणूनि सेवावा ॥९४॥
श्रीगुंडानें तो छलक ओळखिला । म्हणे ऐशा प्रखर विषाला । सेवितांचि प्राणांत ठेविला । परी हरीला आवडलें हें ॥९५॥
केव्हां तरी आहेच तें मरण । परी हें सर्व मायिक लक्षण । तरी आतां करोनि देवीपूजन । करुं प्राशन मग विषातें ॥९६।
संगें घेवोनि शिष्यमंडळी । स्वानंदें पूजिली हिमनगबाळी । अभिषेक करोनि त्या वेळीं । वाही सकळी उपचार ॥९७॥
धूपदीप नैवेद्यतांबूल । आदिमायेसी अर्पिलें सकळ । तीर्थप्रसाद स्वहस्तें केवळ । देतसे तत्काळ शिष्यांस ॥९८॥
मग गुंडानें तो विषघट । प्राशन केला तेव्हां सगट । जैसें सिंधूंतील काळकूट । नीलकंठ ग्रहण करी ॥९९॥
मग ऐशा बोधानंदीं । ब्रह्मरसें कोंदला प्रसिध्दि । सभोवती शिष्यामांदी । निमग्न बोधी तटस्थ ॥१००॥
त्या प्रखरविषानें जावा प्राण । परी श्रीगुंडाप्रताप गहन । देहीं देवी प्रवेश करुन । करी आकर्षण विष सर्व ॥१॥
संबंध घट सेवोनि निश्चिती । समाधान नाहीं झालें चित्तीं । तेव्हां बोलावी त्या दुष्टाप्रती । आण म्हणती आणीकही ॥२॥
ऐसें ऐकतां दुष्ट दचकला । गुंडाचे भयानक रुपासी भ्याला । उगाच बाजूसी उभा राहिला । कांपूं लागला थरथर ॥३॥
कुटिलासी गुंडा बोलत । आम्हीं घेतलें तुमचें तीर्थ । तुम्हीं घ्यावें आमुचें किंचित । म्हणोनि देत खलकरीं ॥४॥
येरु सेवितांचि तीर्थासी । बोबडी वळली तैं वाचेसी । शक्ति नाहीं उठावयासी । पडे धरणीसी अचेतन ॥५॥
असो गुंडा चाळ बांधोनि पायीं । भजनासी उभे राहिले त्याठायीं । भजनीं आळविली विठाई । हराया त्यासमयीं विषबाधा ॥६॥
सर्वदेहसाक्षी जो तेथ । प्रत्यगात्मा श्रीपंढरीनाथ । म्हणोनि प्रथम गाती यथार्थ । भजनीं येथ पंढरीनाथा ॥७॥

भजन ॥१॥
जयजयविठोबारुखमाई ॥

अभंग ॥१॥
येगा भीमातट दिगंबरा ये । कळवळोनी प्रेमप्रीतीसी ॥
विठ्ठला आलिंगन मज दे ॥ विठोबारे आलिं० ॥ पंढरिराया० ॥१॥
आठवसी मनीं नयनी सांवळे रुप तुझें पाहीन ॥
न विसंबे जीवीं अंतरीं तुजला । धरोनियां राहीन ॥ विठोबारे० ॥ पंढरिराया० ॥२॥
मीनसेफरी परी तळमळीत । तुझी प्राप्ति कधीं लाहीन ॥
मघमघीत मोहहृदयकमळ माझें । तेंही तुजला वाहीन ॥ विठोबारे० ॥ पंढरिराया ॥३॥
क्षणभरी परी मज विसर न पडे । काय मी करुं यासी ॥
अचेतनतन तन्मय हें मन । गुंतलें तुजपाशीं ॥ विठोबारे० ॥ पंढरिराया ॥४॥
चकोर चंद्राकडे लक्षीतसे । तेंवि वाट मीं पाहें दासी ॥
हृदय उलों पाहे वियोग न साहे । कठीण कां झालासी ॥ विठोबा० ॥ पंढरिराया० ॥५॥
प्राणाचा तूं प्राण आत्माराम । भेटी खंतुनी वाटपाहे ॥
पांडुरंगा तुजवांचोनी न गमे । नयनीं नीर वाहे ॥ विठोबा० ॥ पंढरिराया० ॥६॥
उदास न करी सखया श्रीहरी । ग्लांनि तूं पाहे पाहे ॥
तुजवांचोनी सखासोयरा आणीक । मालूसी कोण आहे ॥ विठोबा० ॥ पंढरिराया० ॥७॥

भजन ॥२॥
जयजय पंढरिनाथ पंढरी ॥ जयजय पंढरिराया० ॥
ध्यानीं आणोनी रुप सुंदर । अभंग आरंभिला रुपावर । हरि स्तविला दशनामें साचार । वदी मी पामर अपराधी ॥१०८॥

आर्या ॥
अपराधिनमपराधिनमपराधिअनमप्राधिनमर्भकं रघूत्तंस । पालय पालय पालय जननिश्रीरामनार्थये किंचित्‍ ॥१॥

नाम ॥१०॥
केशव, माधव, विठ्ठल, मुकुंद, मुरारे, राम, कृष्ण, गोविंद, नारायण, हरे ॥१०॥

अभंग ॥२॥

सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणी विराजित ॥२॥
गळां तुळशीहार कांसे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥३॥
तुका म्हणे माझें सर्व हेंचि सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥
रामकृष्णा हरी मुकुंदा मुरारी । अच्युता नरहरी नारायणा ॥५॥

भजन ॥३॥
जयजय गोविंद राम गोविंद ॥

सर्वागीं दाह होय ज्या वेळीं । गुंडानें भजन आरंभिलें तें काळीं । नामें शांत जाहला समूळीं । तेथें वनमाळी प्रगटला ॥९॥
हरि वदे काय तुज संकट । गुंडा म्हणे तुज ऐसा श्रेष्ठ । असतां आम्ही काळासी वरिष्ठ । म्हणोनि स्पष्ट अभंग वदे ॥११०॥

अभंग ॥३॥
रामा कृष्णा हरी आळवितां सुख । ब्रह्मादिक मुख पाहताती ॥१॥
रामा अच्युता नारायणा ॥
ब्रह्मलोकीं नाहीं वैकुंठीं हें सुख । अवघें सर्व दु:ख मानिताती ॥२॥
रामा अच्युता नारायणा ॥
गोपाळाचा वेष घेऊनि भूतळा । प्रेमाचा सोहळा भोगिताती ॥३॥
रामा अच्युता नारायणा ॥
गुंडा म्हणे देव येती वाळवंटीं । भक्त पायीं मिठी घालिताती ॥४॥
रामा अच्युता नारायणा ॥

ऐसें ऐकोनी स्वानंदें श्रीहरी । गुंडासी तेव्हां भेटला सत्वरी । नाचती दोघे स्वानंदा माझारीं । नारायण हरी म्हणोनी ॥११॥

भजन ॥४॥
नारायण हरी । जयजय नारायण० ॥
असो तो दुष्ट सोडूनि देहभान ॥ निर्भ्रांत पडला अचेतन । श्रीगुंडासी सांगती शिष्यगण । पावला दुर्जन मृत्यु हा ॥१२॥
तेव्हां श्रीगुंडा तेथें पातला । देवही गुंडासंगें आला । गुंडा पाचारी त्या दुर्जनाला । देव बोलिला हें काय ॥१३॥
प्रतियुगीं माझा अवतार । दुष्ट नाशोनी जगदुध्दार । करावयासाठीं असे साचार । दुष्टासी आधार नको देऊं ॥१४॥
तेव्हां गुंडा हरीसी विनवी । या अपराधाची क्षमा असावी । विलंब न करितां यासी उठवी । भाळ मी ठेवीं पदीं देवा ॥१५॥
कारण हा मूढ लेंकुरवाळा । ही वार्ता स्त्रीसी कळतां या वेळां । परदेशी म्हणोनी रडेल दयाळा । म्हणूनी कळवळा वाटतो ॥१६॥
देवा तूं म्हणशील हा चांडाळ । असो परी अज्ञानी केवळ । तुझें ब्रीद दीनदयाळ । म्हणोनी सांभाळ करावा ॥१७॥

अभंग ॥४॥
देवा तुझे स्मरणें नाम । हें तो नेणत्याचें काम ॥१॥
कृष्णाराम० ॥
नेणत्यावरी प्रीती फार । माय झांकी आपुला पदर ॥२॥
कृष्णाराम० ॥
तुज धरोनी हृदयांतरीं । दुजें न पाहे श्रीहरी ॥३॥
कृष्णाराम० ॥
म्हणे गुंडा नाम गाऊं । येग आऊ म्हणोनि बाहूं ॥४॥
कृष्णाराम० ॥

देव म्हणे काय करावें यास । हा गुंडा आतां देईल त्रास । म्हणूनि गुप्त झाला सर्वेश । जाणूनि मानस गुंडाचें ॥१८॥
त्या दुष्टाचें दैव खोटें । म्हणूनि देव न दिसे कोठें । गुंडासी फार तळमळ वाटे । साठीं नेटें भजन करी ॥१९॥

भजन ॥५॥
जयजय विठोबारुखमाई ॥ जय० ॥
गुंडा म्हणे वत्स अचेतन । पडलें करवीं स्तनपान । परदेशी विठाई तुजवीण । येईं धाऊन त्वरेसी ॥१२०॥

अभंग ॥५॥
गोवर्धन गडीचे गडीचे आऊ । यमुनाथडीचे थडीचे आऊ ॥१॥
सावळ्या वानाचे वानाचे आऊ । कोवळ्या मनाचे मनाचे आऊ ॥१॥
वृंदावनींचे वनींचे आऊ । शंकरा मनींचे मनींचें आऊ ॥३॥
तुझ्या चरणीं गंगागे गंगागे आऊ । त्रिताप भंगागे भंगागे आऊ ॥४॥
तुझ्या नखीं ग्रहण ग्रहण आऊ । चंद्र धरण धरण आऊ ॥५॥
तुझे घोटे पोटर्‍या पोटर्‍या आऊ । मांडया बरव्या बरव्या आऊ ॥६॥
पिवळा पाटोळा पाटोळा साजे । वरते मेखळा मेखळा लाजे ॥७॥
तुझें नाभिकमळ कमळ खोल । ब्रह्म आकळ आकळ बाळ ॥८॥
तुझे हृदयीं पदक पदक बरा । महिमा अटक अटक खरा ॥९॥
आजानुभुजागे भुजागे आऊ । भेटेन गुजागे गुजागे आऊ ॥१०॥
तुझ्या कर्णीं कुंडल कुंडल साजे । कोटी सूर्याचें सूर्याचें तेजे ॥११॥
तुझे ओठ पोवळे पोवळे रंग । दंत दाळिंब दाळिंब भंग ॥१२॥
तुझें सरळ नासिक नासिक साजे । डोळा कमळ कमळ लाजे ॥१३॥
तुझ्या भ्रुकुटी मेढगे मेढगे आऊ । लाविसी वेडगे वेडगे आऊ ॥१४॥
तुझ्या भाळीं कस्तुरी कस्तुरी टिळा । अक्षता माणीक माणीक टिळा ॥१५॥
तुझ्या मुगुटीं मयूर मयूरपत्र । दिसतें मधुर मधुर वक्त्र ॥१६॥
देवा दुर्लभ दुर्लभ आऊ । दासा सुलभ सुलभ आऊ ॥१७॥
भावार्थ गोंधळी गोंधळी आऊ । प्रेमें नाचतो नाचतो बहू ॥१८॥
रमावल्लभा वल्लभा दासा । समागमेंची गमेंची आशा ॥१९॥

गुंडा म्हणे आतां रुक्मिणीकांत । ऐसा कां कोपला अद्भुत । म्हणूनि पुल्लिंग नामें तेथ । भजन करीत हरीचें ॥२१॥

भजन ॥६॥
विठोबा रामा कृष्णा हरी ॥ विठोबा० ॥
भजनकेलें मुहूर्त एक । तरी न प्रगटे विश्वपालक । गुंडा म्हणे बाळलीला अनेक । स्त्रीवाचक गाऊं आतां ॥२२॥

अभंग ॥६॥
माथा मुगुट झळाळी । कस्तूरीचा मळवट भाळीं । कुरळे जावळ सावळी । रंगंमा माझी ॥१॥
मुक्ताफळ नथ नाकीं । पीतांबर अंग झाकी । चरणी ल्याली वाळेवांकी । रंगंमा माझी ॥२॥
पिवळा झगा अंगीं ल्याली । वरती बाजूबंद घाली । सदा दिसे साली धाली । रंगमां माझी ॥३॥
गाईपाठीं लागली । वळतां नाहीं भागली । मायबहिण चांगली । रंगंमा माझी ॥४॥
खांद्यावरी कांबळी । पायघोळ लोंबली । पांघरली धाबळी । रंगंमा माझी ॥५॥
पावा वाहे रंगीत । आंत गाये संगीत । दैत्यदानव भंगीत । रंगंमा माझी ॥६॥
तुळसीवनमाळा कंठीं । यमुनेचे वाळवंटीं । वृंदावनीं काळ कंठी । रंगंमा माझी ॥७॥
गजेंद्रें आळविली । पुंडलीक चाळविली । चंद्रभागातीरीं आली । रंगंमा माझी ॥९॥
कर ठेउनि कटावरी । उभी विठाई सुंदरी । द्रौपदीची कैवारी । रंगंमा माझी ॥१०॥
विटेवरी उभी राहे । व्येंकट दृष्टि पाहे । देखिल्यानें मन धाये । रंगंमा माझी ॥११॥
मध्वनाथे देखिली । हृदयीं धरोनी आलिंगली । मदनमूर्ति रेखिली । रंगंमा माझी ॥१२॥

गुंडा कुंठित जाहले चित्तीं । रामकृष्ण राम भजन करिती । म्हणती धांवधांव गा श्रीपती । वाटे मजप्रती संकटे हें ॥२३॥

भजन ॥७॥
रामकृष्ण रामराम ॥जय० ॥

हातरी असे दुष्ट दुर्जन । परी मजवरी आलें कीं दूषण । मीं शापिलें यास म्हणून । आप्तगण म्हणतील कीं ॥२४॥
जनापवादाची ही लाज । शपथ देवा नाहीं कांहीं मज । प्रत्यगात्म्यासी कोप सहज । होईल आज निष्कारण ॥२५॥
पुढें त्याच्या स्त्रीची विटंबना । जगीं होईल जगजीवना । निष्कारण ते रुक्मिणीरमणा । खेद मना वाटे हा ॥२६॥
हें तरी मी जाणें यथार्थ । की सर्वकर्ता तूंचि समर्थ । मग पापपुण्य मायिक व्यर्थ । नाहीं स्वार्थ आणीकही ॥२७॥
आणि प्रपंच आशा मुळीं नाहीं । किंवा स्वार्थही नसे कांहीं । नलगे स्वर्ग आणि सिध्दि तेही । दिली पायीं मिठी तुझ्य़ा ॥१२८॥

अभंग ॥७॥
पायीं दिधला पिंड । आतां दंड नाही ॥ ध्रु० ॥
भक्ता संसाराचें भय । नाहीं गा विठोबा ॥ पायीं० ॥१॥
संपत्तीची सखी ती मीं आप्त केली । तेही मजला टाकूनि गेली । गेली गा विठोबा ॥ पायीं० ॥२॥
अन्यायी अन्यायी म्हणूनि हाका मारी । नरहरी मालो उभा तुझ्या द्वारीं गा विठोबा ॥पायीं० ॥३॥
दुष्टानें दिलें होतें विष । तेणें जरी होता प्राणनाश । तरी मज होता संतोष । आतां त्रास त्याहूनी वाटे ॥२९॥

भजन ॥८॥
जयजय विठ्ठल ॥ जयजय० ॥
ऐसें भजन करित करित । प्राण सोडावा हें वाटे निश्चित । ऐसा निर्धार करोनी यथार्थ । भजन अद्भुत मांडिलें ॥३०॥
देवा तुझें कळलें थोरपण । तुज भक्तवत्सल ब्रीद दिलें कोण । तूं कृपणांतील होसी कृपण । ऐसेंचि पूर्ण अभंग वदे ॥३१॥

अभंग ॥८॥
पतित पावन नाम ऐकुनि आलों मी द्वारा । विठोबा आलों० ॥ध्रु०॥
पतित पावन नाहींस म्हणुनि जातों माघारा ॥ पति० ॥१॥
सोडीं ब्रीद देवा आतां नव्हेसी अभिमानी । पतित पावन नाम तुजला ठेविलें कोणी ॥२॥पति०॥
उच्छिष्टाचें शीत न टाकिसी बाहेरी । कोणी दिधली देवा तुजला भूषणाची थोरी ॥३॥ पति० ॥
घेसी तेव्हां देसी ऐसा अससी उदार । काय रोधूं देवा तुझें कृपणाचें द्वार ॥४॥ पति० ॥
नामा म्हणे देव तुझें नलगे मज कांहीं । प्रेम असूंद्या चित्तीं तुजला आठवीन पायीं ॥५॥पति०॥

ऐसें भजन ऐकोनि श्रीहरी । प्रगटला तेथें भक्तकैवारी । म्हणे गुंडा हें काय मांडिले तरी । प्राणांतें निर्धारीं लोकांसाठीं ॥३२॥
गुंडा म्हणे तुज मागणें नाहीं । किंवा देवा तूं देऊं नको कांहीं । मात्र प्रेम असूं दे तुझे पायीं । हें एवढें देईं शेवटीं ॥३३॥
हरि म्हणे गुंडा काय संकट । तुजला वाटे सांग स्पष्ट । तें निवारीन जरी दुर्घट । बोल नीट प्रियसख्या ॥३४॥
तंव गुंडा नमोनी हरिपायीं । म्हणे हा दीन पडलासे याठायीं । यासी उठवी याच समयीं । वेगीं विठाई सप्रेमें ॥३५॥
तेव्हां गुंडासि बोले श्रीहरी । त्या दुष्टासी तूंचि पाचारी । म्हणजे उठेल आतां सत्वरी । आज्ञा शिरीं वंदी गुंडा ॥३६॥
गुंडा त्या दुष्टाचें घेऊनि नांव । ऊठ म्हणोनि हांक मारिती जंव । जोजावोनि उठला दुर्जन तंव । जाहले देव गुप्त तेव्हां ॥३७॥
खल नमोनी म्हणे अन्याय । घडला प्रमाद मज नि:संशय । त्याची क्षमा असो श्रीगुरुराय । म्हणोनी पाय धरियेले ॥३८॥
अपराध स्मरोनि जेव्हां रडे । तेव्हां सद्गुरु शांतवी सुरवाडे । नमोनी जातसे ग्रामाकडे । गुंडारुपडें आठवीत ॥३९॥
असो ऐसा पतितपावन । आठवूनी गुंडा करी भजन । नंतर आरती उजळून । भजन पूर्ण जाहलें ॥१४०॥

भजन ॥९॥
पतित पावना रामा ॥ जयजय पावना रामा ॥

आरती पांडुरंगाची
नामदेवकृत व गुंडामहाराजकृत ॥
घालीन लोटांगण वंदी० ॥ कायेन वाचा० ॥
बापा विठ्ठला रे । सखया विठ्ठला रे ॥
बापा विठ्ठला रे । सखया विठ्ठला रे ॥

भजन ॥१०॥
हरि नारायण । हरि नारायण । माझा भार तुजवरी० ॥

ऐसें अद्वितीय श्रीगुंडामाहात्म्य । तें पुढील अध्यायीं सप्रेम । श्रोतीं श्रवण करावें उत्तम । जेणें परमपद लाभे ॥४१॥
भो भक्तवरदा पांडुरंगा । नारायणा देईं सत्संगा । ही कथारुपिणी महागंगा । करो भवभंगा दीनाच्या ॥४२॥
इति श्रीगुंडामाहात्म्य कथन । चंदूसी जाहले गुंडादर्शन । विष पिउनी तारिला दुर्जन । जाहला पूर्ण षोडशोध्याय ॥१४३॥

श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय १६ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP