श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय चौदावा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणेशायनम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
ॐ नमोजी गणनायका । सर्वाद्य सगुण विश्वपालका । भक्तवत्सला विघ्नांतका । भवभयहारका दयानिधे ॥१॥
तूंचि शारदा तूंचि सद्गुरु । भक्तवरद कुलस्वामी निर्धारु । बौध्दरुप तूंचि जगदुध्दारु । रुक्मिणीवरु पांडुरंगा ॥२॥
जो पंढरीची वारी करुन । चंद्रभागेंत करील स्नान । त्याचें सर्व जाऊनि अज्ञान । वासना संतान न वाढे ॥३॥
ध्यानीं मनीं विठ्ठल वसे । विठ्ठल जनीं व्यापिला दिसे । बुध्दि वदनीं विठ्ठल बैसे । विठ्ठल भासे नाममात्र ॥४॥
विठ्ठलावांचूनि आन कांहीं । ज्यातें जगीं उरलेंच नाहीं । त्याचा विठ्ठल संसार सर्वही । स्वानंदें पाहीं वावरे तो ॥५॥
असो त्रयोदशाध्यायाचे अंतीं । रामपुरीं गुंडा असती । ग्रामास येण्यास्तव जन इच्छिती । केली विनंती बहुतांपरी ॥६॥
तंव गुंडा स्तब्ध राहिले । लोक परतोनि ग्रामासी आले । नित्य अयाचित येऊं लागलें । वृत्त कळले सर्वांसी ॥७॥
जाती येती बहुत लोक । मुखें गुंडासी स्तविती कित्येक । कोणी राहिले तेथेंचि नि:शंक । घेती भाविक अनुग्रह ॥८॥
संतमहंतांचें आगमन । तेथें होतसे विशेषं करुन । स्थितिगती गुंडाची विलोकून । आश्चर्य जन मानिती ॥९॥
एक म्हणती हा रुक्मिणीवर । किंवा अवतरला श्रीशंकर । कीं साक्षात् वेदव्यासकुमर । शुकावतार भासतो ॥१०॥
असो दोन वेळां पंढरीसी । गुंडा वारीसी जाय प्रतिवर्षी । पुन्हां येऊनि रामपुरासी । अयाचित्तवृत्तीसी राहती ॥११॥
तंव रामपुरीं एके समयीं । गर्भिणी जाहली राजाबाई । नवमास संपतां नवलाई । वर्तली तेठायीं ऐका तें ॥१२॥
भरत आले जेव्हां नवमास । कोणी नाहीं तेथें प्रसूतीस । मग त्या समयीं जगन्निवास । निजकांतेस बोलावी ॥१३॥
सत्वर येई वो रुक्मिणी । भक्त गुंडा बैसला माझे ध्यानीं । राजाई असोनि पूर्ण गर्भिणी । जवळी कोणी नाहीं तिच्या ॥१४॥
प्रसूतिकाळ तों समीप आला । त्यानें मजवरी भार घातला । मजवीण कोण सांग त्याला । दोष ब्रीदाला लागेल कीं ॥१५॥
ऐसें ऐकतांची वचन । रुक्मिणी निघाली हरीस नमून । सर्व साहित्य संगें घेऊन । शीघ्र येऊन पातली ॥१६॥
हीन स्त्रीचा धरुनि वेष । काकुलती बोले राजाईस । मज ताप झाला असंमास । तो कोणा न सांगवे ॥१७॥
मज पतीनें घातलें बाहेरी । मी राहीन तुमच्या घरीं । तुम्ही सदय साधु अंतरीं । म्हणोनि सत्वरी आले येथें ॥१८॥
ऐसें ऐकोनि त्या स्त्रीचें वचन । राजाईचें द्रवलें अंत:करण । म्हणे अवश्य शांत मनेंकरुन । रहावें जाण मायबहिणी ॥१९॥
जेथें पातली जगन्माता । तेथें काय न्यून पडे आतां । जरी कल्पतरु होय दाता । मग काय चिंता उरेल ॥२०॥
असो राजाई प्रसूत झाली । रुक्मिणी तईं जवळ बैसली । बाळ देखोनि आनंद पावली । मनीं द्रवली अत्यंत ॥२१॥
रुक्मिणी स्वयें काष्ठें वेंचून । स्वकरें केलें पाणी उष्ण । बाळकासी न्हाऊं घालून । तृण मेळवून गुंफा केली ॥२२॥
रुक्मिणीपाशीं कुंकुमपेटारी । त्यांतूनि भांडीं काढी सत्वरी । औषधी होत्या त्याच माझारीं । देत करीं राजाईस ॥२३॥
जें जें पाहिजे प्रसूतिकाळीं । तेतें सिध्द रुक्मिणीजवळी । औषधोपचार सकळी । घाली प्रात:काळीं पथ्यासीही ॥२४॥
प्यावयासी उष्णोदक दीधलें । ऐसे एक मासाधिक दिन गेले । राजाईसी देहभान जालें । सर्व कळलें हरिकृत्य ॥२५॥
रुक्मिणी तेव्हां अदृश्य होत । गुंडासी कळविली ही मात । धिक् धिक् म्हणे व्यर्थ जीवित । लक्ष्मीकांत कष्टविला कीं ॥२६॥
सद्गद होऊनि अंत:करणीं । करुणा भाकी नारायणीं । स्मरतां भेटला चक्रपाणी । गुंडा चरणीं लागला ॥२७॥
प्रभो कष्टविली रुक्मिणीमाता । हा केवढा अपराध माझे माथां । या मोहप्रसादें होय व्यथा । काय मी आतां करुं यासी ॥२८॥
भो प्रभो श्रीहरि दीनदयाळा । किती शिणसी वेळोवेळां । या अर्भकासाठीं भीमकबाळा । व्यर्थ गोपाळा शिणविली ॥२९॥
विषयात्मक हा जाणोनि संसार । त्रासोनि त्यागिलें निजनगर । या वनींही प्रपंच विखार । लागला दुर्धर पाठीसी ॥३०॥
या अन्याया देहत्यागचि भला । योग्य प्रायश्चित्त हें वाटे मला । या वचनावरी हरि बोलिला । कांहो राहिला संशय हा ॥३१॥
ऐक बापा गुंडा भक्तप्रिया । ही अवघीच आहे माझी माया । तिचा प्रताप विस्तारावया । अनेक काया धरितों मी ॥३२॥
माइक जाण हें सकल चिन्ह । जेंवि वोडंबरींचें भूषण । गंधर्वनगरींचें वर्हाड पूर्ण । लाविती लग्न समारंभें ॥३३॥
तेंवि प्रपंच मृषा हा सकळ । केंवि सत्य होय मायागोंधळ । यांतील पापपुण्याचें फळ । निरस केवळ शोभती ॥३४॥
कैंचें पाप कैंचें तें पुण्य । इंद्रियस्वभावाचा गुण । आपण वेगळा इंद्रियांहून । साक्षी जाण स्वसंवेद्य ॥३५॥
इंद्रियस्वभावें वर्ततां । स्वयें कां धरावी त्याची अहंता । पापपुण्य व्यर्थ घेऊनि माथां । मीच कर्ता म्हणावें कां ॥३६॥
अहंकर्तृत्वाचा जो वृथा गोवा । हाचि सुखदु:खाचा असे ठेवा । ज्ञात्याचा हा मुळीं विरोनि जावा । कदापि न यावा मनामाजीं ॥३७॥
जो कां रत झाला माझे नामीं । जरी इंद्रियें वर्तती कर्मीं । तरी तो जाण माझा त्याचा मी । त्याचे कामीं झुरणें मज ॥३८॥
आतां ऐक बापा गुंडोराया । तूं सत्य वेगळा आहेसी इंद्रियां । मग कां खेद करिसी वाया । सर्वमाया जाणोनि ही ॥३९॥
ऐसा गुंडा बोधूनि श्रीहरी । अंतर्धान पावला झडकरी । गुंडा शांत जाहला अंतरीं । स्वानंदें करी नामघोष ॥४०॥
यावरी एक भाविक ब्राह्मण । साधकवृत्ति ज्ञानसंपन्न । त्रिविधतापें निघाला तापून । उत्सुकपूर्ण हरिप्राप्तीसी ॥४१॥
एकसप्तक राहिला प्रभासीं । अघोर तप करी उपवासी । म्हणे कधीं भेटेल हृषीकेशी । ध्यास मानसीं लागला ॥४२॥
तेव्हां स्वप्नीं येवोनि द्विज एक । गुह्य सांगें वृत्त सकळिक । गुंडापासीं भक्तपालक । लक्ष्मीनायक तिष्ठतसे ॥४३॥
देगलूरासमीप रामपुरीं । राहे सदा भजना माझारीं । त्याचेयोगें जाण तो श्रीहरि । कृपा तुजवरी करील ॥४४॥
ऐसा होतां विप्रासी दृष्टांत । तो आला रामपुरात्वरित । पाहूनि गुंडा स्वानंदभरित । केला प्रणिपात साष्टांग ॥४५॥
अष्ट सात्विकभावें दाटोनि । सद्गद कंठ जोडोनि पाणी । प्रार्थना केली श्लोकें करुनी । गुंडाची ते क्षणीं ऐका ती ॥४६॥
श्लोक ॥
अखंडानंद रुपाय । संविज्ज्ञानप्रदायिने । भवध्वांतदिनेशाय । गुंडाख्यगुरवे नम: ॥
या श्लोकें श्रीगुंडाध्यान विशेष । करोनि घेतला उपदेश । अखंड तेथेंचि केला वास । विराग अभ्यास ज्ञानास ॥४७॥
असो रामपुरीं गुंडा असतां । नवल वर्तली एक कथा । कोणी एका श्रीमंताची कांता । पक्वान्न माथां आणित ॥४८॥
दधिघृतनवनीतशर्करा । चातुर्यें पक्वान्न करोनि सुंदरा । घेऊनि गुंडाचे उपाहारा । रामपुरा त्वरित येत ॥४९॥
मार्ग चालतां अकस्मात । विखारी सर्प दंश करित । तेथेंचि ती पडली मूर्च्छित । आला प्राणांत समय तो ॥५०॥
तेथें बहुत आकांत जाहला । तेव्हां लोकसमुदाय जमला । पुण्य करितां प्राप्त पापघाला । निमित्त झाला गुंडा त्यासी ॥५१॥
तें गुंडासी कळलें वर्तमान । कीं आपणासीं आलें दूषण । सवेंचि तो नेत्रपातीं लावून । जगजीवन आठविला ॥५२॥
हरेराम हरेराम उच्चारी । येवोनि त्या कुणपाशेजारीं । हात फिरवितां अंगावरी । बैसली सुंदरी उठोनी ॥५३॥
जेंवि कां निद्रित जागी झाली । तेंवि सती उठोनि बैसली । सद्गुरु गुंडाचरणीं लागली । मंडळी आनंदलीसंबंधीक ॥५४॥
तिच्या भ्रतारें हें सर्व । पाहोनि मानिलें अभिनव । धन्यधन्य म्हणे सद्गुरुराव । दिलें अपूर्व जीवदान ॥५५॥
भ्रतारकांता दोघें मिळोन । अपार करिती सद्गुरुस्तवन । तनुमनधनें झाले शरण । घेती प्रार्थून उपदेश ॥५६॥
असो कोणी एका देशींची । स्त्री धनकणसंपन्न घरची । कीर्ति ऐकोनि श्रीगुंडाची । करी पतीची प्रार्थना ॥५७॥
उत्तम नरदेहासी येऊन । कांहीं करावी जी सोडवण । तुम्ही अपार प्रजा पीडून । संचय पूर्ण केला असे ॥५८॥
लोभ धरावा संपत्तीसी । तरी गति मधुमक्षिकेऐसी । रक्षोनि लाभ नाहीं त्यासी । व्यर्थ कष्टासी पात्र होती ॥५९॥
जरी संचलें अपार धन । त्याचें करावें अन्नदान । हेंचि मज आवडे मनांतून । साधुजन तोषवावे ॥६०॥
उत्तम किंवा अधोगती । यासि कारण स्त्रियाचि निश्चिती । त्या जिकडे पूर्ण लक्ष देती । सर्वांची गती तिकडेचि ॥६१॥
असो स्त्री म्हणे पतीसि धुंडा । तो भक्तचूडामणि गुंडा । जेथें तल्लीन साधुसंतझुंडा । पदीं मुरकुंडा जनाच्या ॥६२॥
आम्ही सहपरिवारें जाऊन । पाहूं त्या श्रीगुंडाचे चरण । तेथें अपार मिळवूनि ब्राह्मण । करुं प्रयोजन यथामति ॥६३॥
ऐसें स्त्रीचें वचन ऐकतां । मान्य करीतसे तिचा भर्ता । दहासहस्त्र द्रव्य स्वतां । घेऊनि तत्वतां पातला ॥६४॥
शीघ्र घेऊनि गुंडाची भेटी । मंडप घातला तीर्थातटीं । प्रयोजन करोनि असंख्य शेवटीं । आनंद पोटीं नसमाये ॥६५॥
तों वसंतकाळ प्राप्त जाहला । चैत्रमासीं प्रतीपदेला । एक गुंडासि दृष्टांत जाहला । रामनवमीला आरंभावें ॥६६॥
ऐसें होतां गुंडासि स्वप्न । मनीं धरिली दृष्टांतखूण । प्रात:समईं करुनि स्नान । मंडपीं भजन आरंभिलें ॥६७॥
तृतीयप्रहारापर्यंत । भजन जाहलें अत्यद्भुत । पाकसिध्द जाहला तेव्हां निश्चित । विप्र समस्त मिळाले ॥६८॥
गुंडा स्वयें होऊनि सोंवळा । नैवेद्यवैश्वदेव करी त्यावेळां । भोजना बैसविलें सकळां । जाहला सोहळा अपरिमित ॥६९॥
तंव रामनवमीचे दिनी । गुंडा उभे असतां भजनीं । मध्यान्हीं आला वासरमणी । जाहली दाटणी जनांची ॥७०॥
चापबाण घेऊनि हातीं । रामलक्ष्मणसीतासती । हनुमंत उभा सेवेपुढती । प्रकट होती भजनांत ॥७१॥
तेथें होती मंडळी अनेक । परी त्यांत जे प्रेमी भाविक । त्यांसी दर्शन जाहलें नि:शंक । प्रत्यक्ष देख श्रीरामाचें ॥७२॥
गुंडा करोनि रामस्तवन । आणीक रामजन्मवर्णन । समारंभ जाहला दशदिन । उत्साह पूर्ण जाहला ॥७३॥
मधुमाधव तेथ क्रमिला । यावरी गुंडा पंढरीसी गेला । महाद्वारीं लोटांगण घातला । उभा राहिला भजनासी ॥७४॥
असो भजन होतसे गजरीं । देवदंदुभी वाजविती वरी । स्वर्लोक सोडूनि भूवरी । आले सत्वरीं पहावया ॥७५॥
बैसोनि आपापल्या वहनीं । देव पातले गुंडाभजनीं । तांडव मांडिलें हरिचिंतनीं । न दिसे कोणी हरिवीण ॥७६॥
विणा घालूनि वैकुंठपती । चक्राकार फिरे गुंडाभोवतीं । वेळोवेळां रक्षी गुंडाप्रती । देहभ्रांति नसे म्हणोनि ॥७७॥
प्रेम नावरोनि तेव्हां शिव । नाचूं लागले आपणही तंव । वसन गेलें नाहीं देहभाव । नृत्य अपूर्व मांडिलें ॥७८॥
विदेहस्थिति हरिहर । नाचूं लागले एकाकार । तें पाहूनि सर्व निर्जर । विदेह साचार जाहले ॥७९॥
श्रोत्यांचेंही गेलें देहभान । स्त्री कीं पुरुष नाहीं आठवण । अवघें एकाकार दिसे पूर्ण । नारायण अद्वय भासे ॥८०॥
जेव्हां गुंडाचें भजन संपलें । तेव्हा सर्वही देहावरी आले । आरती करुनि आपुलाले । स्थानासि गेले समुदाय ॥८१॥
गुंडा जावोनि पावले गृहीं । प्रत्यक्ष ज्ञानेश आले त्या समईं । दर्शन देवोनि लवलाहीं । अर्पिली पाही ज्ञानेश्वरी ॥८२॥
ती ज्ञानेश्वरी सानुक्रम । गुंडा वाचिती नित्य नेम । आणीक एक कथा अनुपम । ऐका उत्तम श्रोते हो ॥८३॥
एकदां गुंडा पंढरीसी जातां । तान्हा बाळक संगें होता । थकली राजाई कडिये घेतां । मार्ग चालतां वर्षाकाळीं ॥८४॥
चिखलकांटे सरितातुंबळ । आषाढीयात्रा कठिणकेवळ । असो पंढरी पाहोनि जवळ । बैसलें निश्चळ वोढयावरी ॥८५॥
तेथें गुंडा बैसले ध्यानीं । बाळा स्तन दे राजाई निजोनी । सुषुप्तीमाजी निभ्रांत होवोनी । भूशयनीं लोळत ॥८६॥
गुंडा होवोनि सावध । आज दशमी की आषाढ शुध्द । व्यर्थ कां बैसलों मी असावध । घेवोनि नाद स्त्रियेचा ॥८७॥
तत्काळ तेथोनियां निघाले । येवोनि महाद्वारीं पातले । हरिसी नमोनि उभे राहिले । नाचूं लागले भजनानंदें ॥८८॥
तंव राजाई होवोनि जागृत । गुंडासी चहूंकडे पाहत । उद्विग्न मन व्याकुळ होत । देहभ्रांत विसरली ॥८९॥
बाळकाचें नसोनि स्मरण । तैसीच चालिली सती उठोन । चंद्रभागेवरी पाहे येऊन । गुंडाकारण चहूंकडे ॥९०॥
इकडे आक्रंदोनि रडे बाळ । तेथें कोणीच नाहीं जवळ । रुक्मिणी माता येवोनि तत्काळ । बाळ सुशील स्तनीं लावी ॥९१॥
दुग्धामृतें बाळा शांत केली । हरिपाशीं आणोनि ठेविली । मग राजाईपासीं पातली । पुसूम लागली तूम कोणकोठें ॥९२॥
परिविरहें होवोनि घाबरी । राजाई आक्रंदोनि रुदन करी । म्हणे काय सांगूं अग्नि अंतरीं । पेटला निर्धारींगे माये ॥९३॥
प्राणनाथ गेले मज सोडून । पुन्हां त्यांतें मी केव्हां पाहीन । माझे जाऊं पाहती पंचप्राण । तुझीच आण सखये बाई ॥९४॥
कीं हरी मजवरी कोपला । म्हणोनि ऐसा प्रसंग जाहला । कोण भेटवी प्राणप्रियाला । म्हणोनि महीला लोळत ॥९५॥
रुक्मिणी म्हणे वो राजाई । तुझा गुंडा राउळीं या समई । भजनीं नाचतो स्वानंदें बाई । सत्वर जाई सुशीले ॥९६॥
तंव राजाई सुहास्यवदन । म्हणे खरी तूं मायबहिण । त्वां दिधलें मज प्राणदान । केंवि उत्तीर्ण होऊं यातें ॥९७॥
तंव पुसे रुक्मिणी पुढती । तुज पोटीं कायगे संतती । ऐकूनि राजाई व्याकुळ चित्तीं । नेत्रीं गळती अश्रुपात ॥९८॥
तंव रमा म्हणे हें जाहलें काय । सत्वर फेडीं माझा संशय । येरु वदे काय सांगू माय । कांहीं उपाय सुचेना ॥९९॥
घाबरी होऊनि मी पापिणी । बाळ विसरोनि आलें वनीं । आतां मार्ग न सुचे काननीं । केंवी जावोनि आणूं म्हणे ॥१००॥
तत्काळ गुंडाकडे गेली । पतीसी पाहतां बाळा विसरली । हरिनामीं सती मुराली । नाहीं राहिली देहभ्रांति ॥१॥
रुक्मिणीनें पाहूनि उभयतां । धन्य म्हणे हे पुरुषकांता । या उभयां प्रसवोनि धन्य माता । ज्यांनीं ममता सोडिली सर्व ॥२॥
हरिसी सांगूनि सर्व वृत्तांत । बाळक घेवोनि आली तेथ । राजाईच्या करीं देत । परी भ्रांत तैसीच ॥३॥
इतक्यांत भजन संपलें । देहभ्रांतीनें पुढें पाहिलें । प्रेमानंदें चुंबन दिलें । स्तनीं लाविलें बाळासी ॥४॥
गुंडा घेउनि हरिदर्शन । जात आपुल्या बिर्हाडालागून । राजाईही मागें बाळ घेऊन । गृहासी जाण पातली ॥५॥
असो हरिपदीं लावून चित्त । एके दिनीं गुंडा भजनीं नाचत । तंव हरि स्वमुगुट निश्चित । शिरीं घालित गुंडाचे ॥६॥
देवासी पाहूनि चकित लोक । म्हणति आजि कैसें हें कौतुक । कोणाचें घेऊनि जीर्ण चिंधुक । मुगुट देख दिला कोणा ॥७॥
तंव गुंडा तेथें दुसरे दिनीं । उभा राहिला चक्रीं भजनीं । गुंडामस्तकीं मुगुट पाहोनी । आश्चर्य मनीं मानिती ॥८॥
सकळ म्हणती हें विपरीत । तंव सुज्ञ एक बोले त्यात । हा विठ्ठलाचा आवडता बहुत । कां संशयांत पडलां हो ॥९॥
सर्वांनी तें सत्य मानून । गेले आपुलाले गृहा उठोन । ऐसी गुंडाभक्ति गहन । करिती वर्णन परोपरी ॥११०॥
श्रीगुंडामाहात्म्य रुचिर । सेवोत संतश्रोते प्रियकर । जो पाध्येयासि दाविला चमत्कार । गुंडा साचार पंढरींत ॥११॥
नारायणमानस राजहंसा । तुलसीभूषा पंढरीनिवासा । अनंतकृपा स्वानंदविलासा । भक्तिसुरसा प्रेरका ॥१२॥
इति श्रीगुंडामाहात्म्य प्रसिध्द । संकटीं गुंडा रक्षी भक्तबुध । वनीं बाळ रक्षोनि कथिला बोध । गोड अगाध चतुर्दशाध्याय ॥११३॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय १४ वा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP