श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय पाचवा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
ॐ नमो भगवते सच्चिदानंदा । विघ्नांतका गणाध्यक्ष सुहृदा । निर्गुणसगुणद्वय मुकुंदा । मंगलवरदा नारायणा ॥१॥
तूंचि शारदा माय ईश । देवदेवी सर्वात्मा व्यंकटेश । कर्ता हर्ता भोक्ता सर्वेश । वाग्विलास तुझेनी ॥२॥
तूं सद्गुरु होऊनि ज्ञाता । जडजीवां तारिसी समर्था । गुंडा अद्वय शंकर ज्ञानदाता । तुज अनंता नमन असो ॥३॥
आतां लागलें पूर्वानुसंधान । पूर्वाध्यायीं गुंडा करिती प्रश्न । माया तरावया उपाय कोण । श्री गुरु लागून सप्रेमें ॥४॥
श्रीगुरु बोले गुंडा जो विरागी । त्रिविधतापें तापला अंगीं । तोचि येथें परमार्था उपयोगी । प्रपंचरोगी कामा नये ॥५॥
त्या त्रिविधतापाचें रुप ऐक । प्रथम ताप असे अध्यात्मिक । दुसरा जाणावा आधिभौतिक । आधिदैविक तीसरा ॥६॥
अध्यात्मिक जो कां ताप पहिला । गृहदाराचिंता सदा मनाला । रागद्वेषसुखदु:खें गांजला । ज्वरादि पीडिला व्याधीनें ॥७॥
आतां आधिभौतिकाचें रुप । व्याघ्रवृश्चिकादि दुष्टसर्प । सारांश दुजे भूतांचा ताप । होतां स्वरुप दुजें हें ॥८॥
आधिदैविक ताप तिसरा । गांजितां देवभूतांदि आसरा । अनावृष्टि दुष्काळ नाहीं थारा । दु:खसारा दैविक ॥९॥
एवंच जो कां आपला आपणा । ताप होय तो अध्यात्मिक जाणा । दुसरे भूतांचा जो ताप मना । तोचि माना आधिभौतिक ॥१०॥
आधिदैविक तिसरा प्रकार । दैवयोगें जे पीडा होणार । ऐसे त्रिताप त्यागोनि चतुर । भजावा ईश्वर एकभावें ॥११॥
ऐसा जो त्रिविधताप तापला । चहूं साधनीं संपन्न जाहला । तो भक्ति ज्ञानवैराग्याला । पात्र जाहला गुरुकृपें ॥१२॥
असो स्वायुष राहिलें एक वर्ष । जाणोनि चूडामणि पावले हर्ष । साधनचतुष्टयादि सावकाश । बोधिती नि:शेष गुंडातें ॥१३॥
आतां तें चतु:साधन ऐकावें । नित्यानित्य प्रथम जाणावें । इहामुत्र फलभोग भावें । वैराग्य धरावें हें दुजें ॥१४॥
तिसरें साधन तें कठिण महा । शमदमादिक ऐसे सहा । मुमुक्षुत्व हें चौथें पहा । ऐसेनि हा साधनक्रम ॥१५॥
नित्य म्हणजे आत्मा तो शाश्वत । अनित्य दृश्यभास अशाश्वत । हें जाणोनि स्वानंदीं होणें रत । ऐसें निश्चित प्रथम हें ॥१६॥
दुजें जाण इहलोकराज्य । अमुत्रीं तें स्वर्गादि साम्राज्य । दोन्ही तुच्छ मानिल्या अपूज्य । विराग पूज्य या नांव ॥१७॥
आतां ऐका शमदमादिषटक् । तिसरें साधन तुम्ही भाविक । विस्तारें साहीचें रुप नि:शंक । जाणोनी सम्यक् साधावें ॥१८॥
शम म्हणजे अनावर मन । तें दुष्टवासनेपासून । ठायीं स्वस्थ ठेविता फिरवून । प्रथम साधन बोलिलें हें ॥१९॥
दम म्हणजे शब्दादि विषयां । पासूनि श्रोत्रादि बाह्येंद्रियां । बळें वळवूनि ठायीं ठेविल्या । म्हणावें तया दुजें हें ॥२०॥
प्रपंचत्रास पावूनि अंतरीं । बाह्य विषय वळवोनि निर्धारीं । चित्त भजनीं लावितां ती खरी । जाण तिसरी उपरती ॥२१॥
इहलोकीं किंवा परलोकीं स्वतां । अन्यायाविण आपणां जाचितां । तें साहणें क्षोभोर्मि न उठतं । तितिक्षा सुता ती चौथी ॥२२॥
श्रध्दा म्हणजे सद्गुरुवचन । विश्वासें वेदोक्त सत्य मानून । सुखें अनुभव घेतां आपण । पंचम जाण साधन हें ॥२३॥
अल्प कीं साम्राज्य वेळोवेळे । जें प्राप्त होय प्रारब्धबळें । हर्षविषादें धैर्य न ढळे । सहावें मिळे समाधान हें ॥२४॥
ऐसे हे शमदमादि सहा । तिसरें साधन कठिण महा । आतां मुमुक्षुत्व चौथें पहा । शेवट जो हा मुक्तिमार्ग ॥२५॥
या जन्ममरणावेगळा आधीं । होवोनि आत्मा मी पाहीन कधीं । झुरे ऐसा सद्गुरुप्रबोधीं । भेटती कधीं म्हणोनियां ॥२६॥
रात्रंदिवस झुरणें ऐसें । या नांव जाण मुमुक्षुत्व असे । जो त्रिविधतापें तापलासे । तो अनायासें पावे यातें ॥२७॥
तव गुंडा म्हणे हो चूडामणी । एक शंका थोर माझे मनीं । ते निवारावी कृपा करुनी । मज बोधोनि स्वामिया ॥२८॥
या त्रिविधतापाचा अनुभव । घेत आहेत प्राणी सर्व । परी कोणी स्वार्थी भुलले जीव । कोणी मानव अलिप्त ॥२९॥
ऐसेचि ते साधन हे चारी । सर्वांसीच घडती निर्धारीं । नित्य देव जाणती नरनारी । बोलती वरी प्रपंच मृषा ॥३०॥
खोटें या लोकींचें सर्व सुख । तैसेचि भोगस्वर्गादि सुरेख । जाणोनि कित्येक लंपट मूर्ख । विरागी देख आसक्त ॥३१॥
आतां ते शमदम अनायासें । निरुपायें सर्वांसीच घडतसे । उपरति क्षणोक्षणीं विलसे । प्रपंचत्रासें प्राण्यांसी ॥३२॥
निरपराधें आपणासि जरी । कोठेंही कोणीं गांजिलें तरी । स्वार्थें सहजीं सहन करी । कोणीही शांति धरी विचारें ॥३३॥
सहजीं सर्वा ईशप्राप्तिइच्छा । तेथें कोणी न धरी अनेच्छा । विश्वासें वेदोक्त धरोनि वांछा । गुरुसी इच्छा करिताती ॥३४॥
प्राक्तनें जो कां आला समय । सहजीं तो त्यासी प्राप्त होय । प्राक्तन टळावया नांहीं उपाय । म्हणोनि निरुपायें सेविती ॥३५॥
ऐसें हे तिसरें साधन साही । घडत आहेती सर्वही देही । आतांच येथें मुमुक्षुत्व पाहीं । सर्वांसिही आहेच ॥३६॥
कोणीही प्रपंचीं त्रास पावे । देवप्राप्तीची इच्छा धरी भावें । कळावया गुरुसाठीं झुरावें । सहज स्वभावें आहे ऐसें ॥३७॥
यावरुनि मज वाटे दातारा । सर्वसाधन हो घडती नरा । परी कोणी न जाणे ईश्वरा । तया विचारा प्रवर्तले ॥३८॥
निर्गुणीं न जाय मनोवृत्ति । सगुण ध्यातां भूत ये पुढती । कोणा पुसतां शास्त्रोक्त सांगती । परी प्रचीती नेणोनि ॥३९॥
यासाठीं अनेक साधनें कष्टी । जाहलें परी देव न पडे द्रुष्टी । म्हणोनि करावी कृपादृष्टी । अभय दृष्टी देऊनियां ॥४०॥
देव कोण कोठें मज कळावें । प्रत्यक्षपणें प्रत्यया यावें । दीनासि तुम्हीं पदरीं घ्यावें । म्हणोनि भावें लागे पदीं ॥४१॥
पूर्वपुण्यें नारदही भेटले । कृपे चाळविणाचिपुळ्याही दिले । रामकृष्णहरी मंत्रें बोधिलें । पुन्हां धाडिलें तुम्हांकडे ॥४२॥
त्यांसी तत्त्वबोध पुसतां । आज्ञा मज दीधली तूं जाय आतां । चूडामणी सांगतील ही वार्ता । प्रपंच सर्वथा सोडूं नको ॥४३॥
ऐकूनि शिष्य गुंडाचे शब्द । स्वामीसि जाहला अति आनंद । प्रसन्नचित्तें आरंभिला बोध । चारी वेद महावाक्यार्थ ॥४४॥
तत्त्वंपद आणि जडचैतन्य । या दोहींचा निवाडा कळल्यावीण । मोक्ष होय ना देव दिसे जाण । श्रीगुरु खूण ही सांगे ॥४५॥
स्वामी म्हणती त्वंपद म्हणजे । पिंडींच्या जीवात्म्यासी जाणिजे । आणि तत्पद ईश सहजें । ब्रह्मांडी विराजे प्रत्यगात्मा ॥४६॥
यांत ज्ञान तें शुध्दशबल । जाणावे वाच्यांश बोल । शुध्द म्हणजे लक्षांश निर्मल । ऐसे केवळ दो प्रकार ॥४७॥
जड म्हणजे आपणासि नेणें । आणि दुसर्यांसि हीन जाणणें । चैतन्य तें दुजें आणि आपणा जाणे । या ईशज्ञान मोक्ष घडे ॥४८॥
गुंडा म्हणे हें कळलें आतां । परी काय देव आला हातां । कोठें कैंचा सविस्तर वार्ता । सांगा समर्था मजलागीं ॥४९॥
तंव श्रीगुरु तूं कोणरे पुसती । तेव्हां वदे अमुक मज वदती । तें नाम कशास आलें बोलती । गुंडा म्हणती देहासी ॥५०॥
स्वामी वदती हा देह जड । मी आणि दुजा कोण नेणें मूढ । पितृरेत मातृरक्त द्वाड । पिंड उघड अमंगळ ॥५१॥
ही पंचतत्त्वांची देहमूस । यासि अलिप्त आत्मा निर्दोष । देहासी केव्हांही असे नाश । आत्मा अविनाश सर्वदा ॥५२॥
हस्तपाद चर्म कर्णनासिक । हे माझे तूं म्हणशी नि:शंक । मग यांहूनि तूं होसी पृथक । कोणीएक साक्षी याचा ॥५३॥
यावरुनि तूं जड कीं जडसाक्ष । याचा विचार करी हे समक्ष । देह अस्थिमांसमय प्रत्यक्ष । कीट भक्ष्य हे अमंगळ ॥५४॥
तें जड दृश्य तूं कैसा होसी । याचा साक्षीमात्र तूं आहेसि । तें जड पंचभूतांचें जाणसी । पाहें यासी पुढें आता ॥५५॥
पृथ्वी आपतेजवायुनभ । या पंचमहाभूतांचे स्वयंभ । पंचवीस विकार होती गर्भ । सांगतों सुलभ कळावया ॥५६॥
पृथ्वीचे पांच विकार कर्दम । अस्थिमांसत्वचानाडीरोम । लाळ मूत्र मज्जा रेत धर्म । रक्त पंचम आपाचे ॥५७॥
तेजापासून क्षुधा तृषा साच । आलस्यनिद्रामैथुन हे पांच । वायूचे चलनधावन अकुंच । प्रसार तैसेच निरोधही ॥५८॥
आकाशापासूनि कामक्रोध । शोकमोहभय हे पांच सिद्ध । ऐसा पंचभूतांचा अशुध्द । विकार प्रसिध्द पंचवीस ॥५९॥
टेबल
ऐसा हा स्थूल देह पावसी । जडदृश्य तो तूं कैसा होसी । याचा साक्षी चैतन्य नाहींस कीं होसी । सांग मानसीं विचारुनी ॥६०॥
स्थूलाचे विकार सहा जाण । उत्पत्ति अस्तित्व आणि वर्धन । स्थित्यंतर आणिक वृध्दपण । संहरण यासीच असे ॥६१॥
गुंडा म्हणे मी देह नोहें खरा । तरी अंध मुका निर्नासिक बहिरा । खुळा पंगू असेन निर्धारा । किंवा वारा होय मी ॥६२॥
श्रीगुरु म्हणती बारे ऐक । तेंही तुज सांगतों सकळिक । लिंग देहविस्तार नि:शंक । सांगतों देख तुजलागीं ॥६३॥
टेबल
प्रत्येक पंचमहाभूतांपासून । पंचविध झालें अंत:करण । ज्ञानेंद्रियें विषयां भोगून । कमीं वर्तन प्राणाधारें ॥६४॥
प्रथम जाणा पंचमहाभूत । त्याचें अंत:करणपंचक होत । अंत:करणमनबुध्दिचित्त । अहंता निश्चित पांचवी ॥६५॥
आतां ऐका ज्ञानेंद्रियपंचक । श्रोत्रत्वचाचक्षु जिव्हानासिक । पंचविषय शब्दस्पर्शदेख । रुप आणिक रसगंध ॥६६॥
कर्मेंद्रिय पंचक तें विशद । जिव्हाहस्तपाद उपस्थगुद । व्यान उदानसमान प्रसिध्द । प्राणापानभेद पंच वायू ॥६७॥
अंत:करणस्फुरण निर्विकल्प । मन करी अनेक संकल्प । निश्चयात्मक बुध्दीचें स्वरुप । चित्तरुप स्मरणविस्मरण ॥६८॥
मीपणात्मक असे अहंकार । ऐसें अंत:करण एकाकार । असोनि झाले पांच प्रकार । ते विकार क्रियापरत्वें ॥६९॥
एक प्राण झाला पंचविध । स्थान क्रियापरत्वें प्रसिध्द । नामही वेगळालें झालें सिध्द । क्रिया अगाध देहीं ज्याची ॥७०॥
व्यान राहे सर्वशरीरीं समान । नाभिस्थ उद्गार करी उदान । कंठीं शब्दातें उच्चारी प्राण । हृदयांतरीं कल्पित ॥७१॥
अपान गुदें करी मलोत्सर्ग । ऐसा पंचप्राणांचा उद्योग । यांचेनेंच सकलदेही रोग । सर्वोपभोग प्रपंचाचे ॥७२॥
आणि उपप्राणही पांच असती । नागकूर्मकृकल जे ख्याती । देवदत्त धनंजय म्हणती । याचीही गति ऐकावी ॥७३॥
नाग म्हणजे जाणावी ढेंकर । कूर्म नेत्र झांकूनि उघडणार । कृकल जाणावी शिंक साचार । जांभई कर देवदत्त ॥७४॥
धनंजय सर्वदेहीं राहे । मरणानंतरही सूक्ष्म वाहे । एकाच वायूचें दशनाम हें । पृथक पाहें क्रियेवरुनि ॥७५॥
आतां जे कां श्रोत्रादिइंद्रिय । मनें भोगिती शब्दादि विषय । वाचादि कर्मेंद्रियें क्रिया होय । परी प्राण सहाय सर्वांसी ॥७६॥
ऐकावे इंद्रियव्यापार खरे । अंत:करण व्यानप्राणाधारें । शब्द विषयां घे श्रोत्रेंद्रियद्वारें । वाचेनें अक्षरें बोलत ॥७७॥
समान प्राणाधारें तें मन । वागिंद्रियामाजी रिघून । स्पर्शविषयातें सुखें भोगून । हस्तानें जाण देतघेत ॥७८॥
बुध्दि उदान प्राणाच्या बळें । चक्षु इंद्रियीं जेव्हां उचंबळे । रुप विषयातें घेऊनि त्यावेळे । पादयुगुलें येतजात ॥७९॥
प्राणवायूआधारें तें चित्त । जिव्हेंद्रियीं जयीं रिघत । रसविषयातें घेऊनि निश्चित । गुह्यें करीत मूत्रोत्सर्ग ॥८०॥
अहंकार अपान प्राणाधारें । घ्राणेंद्रियीं रिघोनि निर्धारें । गंधविषय सेवूनि विचारें । गुदद्वारें मळ त्यागी ॥८१॥
ऐसें तें अंत:करणपंचक । व्यवहार करिताती नि:शंक । मग तूं यातें जाणतां पृथक । साक्षी एक आहेसी ॥८२॥
स्थूळभूतें आणि तदंश जैसें । इंद्रियहीं जडदृश्य तैसें । अंत:करणपंचकही तेविं असे । तुज भासे दृश्य हें ॥८३॥
प्रत्ययें म्हणसी माझें इंद्रिय । कर्णनासिकादि हातपाय । प्राणमन माझी बुध्दि होय । तरी काय लिंग देह होसी ॥८४॥
गुंडा म्हणे जी श्रीगुरुराया । पंचभूतात्मक जड दृश्यकाया । आणि लिंगदेहा वेगळा मीतया । आलें निश्चया यथार्थ ॥८५॥
परी देव आणि मी कोण वर्म । हें नाहीं कळलें कोणासी नाम । कांहीं सुचेना जाहला भ्रम । मज परम स्वामिया ॥८६॥
स्वामी म्हणती म्हणसि मी नेणें । मग त्या नेणिवेसी कोण जाणें । न कळण्याचें जें कांहीं कळणें । तें जाणणें साक्षी तूं ॥८७॥
जरी वेडा म्हणे मी वेडा आहें । तरी तो नि:संशय वेडा नोहे । याचा जाणता वेगळा साक्षी हें । तेंवि तूं पाहें ज्ञाता होसी ॥८८॥
तत्रापि जरी खरा वेडा असे । तेथेंही क्षुधातृषादि ज्ञान वसे । पिपीलिका ब्रह्मान्त तें विलसे । ज्ञान दिसे पूर्णाद्वय ॥८९॥
ते नेणीव म्हणजे अज्ञान । तोचि तुझा देह कारण । जन्ममरणदायक म्हणून । त्याचें निरसन तोचि मोक्ष ॥९०॥
तरी स्वामी या अज्ञानावेगळा । ज्ञप्तिमात्र आत्मा मी मोकळा । परी आहें म्हणणार जी ज्ञानकळा । न दिसे दयाळा मजमाजी ॥९१॥
स्वामी म्हणे भलारे या देहत्रया । जाण तें जें तेचि ज्ञान सखया । तुझी ती महाकारण काया । जाणोनियां मोकळा होइ ॥९२॥
तिन्ही देह जैसे जडदृश्य होत । तैसाची हाही चौथा निश्चित । तया जाणपणावेगळा शांत । आहेसी शाश्वत शुध्द एक ॥९३॥
देह जड दृश्य हे चार जाण । तेंवि अवस्था भोगाभिमान । स्थान वाचामात्रा गुण । हेही संपूर्ण जडदृश्य ॥९४॥
परी याचे विवरण नि:शंक । करुनि सांगतों भावें ऐक । जागृतिस्वप्नसुषुप्ति आणिक । तुर्या देख चौथी अवस्था ॥९५॥
अभिमानी विश्वतैजस प्रसिध्द । प्राज्ञ प्रत्यगात्मा चवथा शुध्द । भोग स्थूलप्रविविक्त आनंद । परमानंद चवथा हा ॥९६॥
स्थान नेत्रहृदयकंठमूर्ध्नि । वैखरीमध्यमापश्यंति आणि । परा चवथी वाचा सांगोनि । गुण ऐकूनि घ्यावे चारि ॥९७॥
रजतमसत्वशुध्दसत्व । अकार मकार उकार अर्धपर्व । चवथी अर्धमात्रा अपूर्व । मिळोनि सर्व ॐकार ॥९८॥
ऐसें देहचतुष्टय साचार । त्वंपद शबलवाच्यांश क्षर । त्यावेगळें त्वंपद तें निर्धार । शुध्द अक्षर लक्षांश ॥९९॥
टेबल
या चतुष्टयदेहाचा केल्या निरास । जाय शबलत्वंपदवाच्यांश । हरपल्या जीवपणाचा भास । राहसी अनायास साक्षी तूं ॥१००॥
आतां तत्पदशोधन उत्तम । आणिक सांगतीं सृष्टिकम । या सृष्टिपूर्वी एक सर्वोत्तम । चैतन्य ब्रह्मस्वानंदें होतें ॥१॥
तेथें जाहली अहंब्रह्मास्मिस्फूर्ति । ती माया जाण मूळ प्रकृति । त्या स्फूर्तिदर्पणीं चैतन्याकृति । उठिलें म्हणती बिंब तेथ ॥२॥
त्या प्रतिबिंबाचे नांव ईश्वर । त्या ईशातें जग व्हावें साचार । इच्छा जाहली म्हणती निर्धार । ज्ञाते चतुर वेदोक्त ॥३॥
त्या इच्छेचें नांव महत्तत्व । ती गुणसाम्य माया धरी गर्व । जगद्रूपें होईन स्वयमेव । याचें नांव त्रिविध अहंता ॥४॥
ऐसे जें जें कांहीं होत चालिलें । तें तें बिंबोपाधि ईशें व्यापिलें । जेवीं घटापूर्वी नभ संचलें । व्यापूं लागलें होणार्यासी ॥५॥
ऐसा झाला त्रिविध अहंकार । त्यापासूनि ब्रह्माविष्णुरुद्र । दिशावायुसूर्यवरुण इंद्र । अग्निकुमार उपेंद्र्ब्रह्म ॥६॥
ऐसे देवता मिळोनि स्वयंभ । ईश्वराचा लिंगदेह सुप्रभ । त्याचें नांव असे हिरण्यगर्भ । विस्तार सुलभ ऐक याचा ॥७॥
जेवीं पिंडीं दशेंद्रिय आणिक । पंचप्राण अंत:करणपंचक । तैसेंचि एथें ब्रह्मांडींचे देख । सांगतों पृथक कळावया ॥८॥
अंत:करण विष्णु मन चंद्रमा । चित्त नारायण बुध्दि ब्रह्मा । अहंकार रुद्र पंचविध धर्मा । जाण वर्मा अंत:करणाचे ॥९॥
आतां ज्ञानेंद्रिय तें दिशाकर्ण । त्वचावायू चक्षुसूर्य जाण । जिव्हा असे तो प्रत्यक्ष वरुण । असे घ्राण अश्विनीकुमर ॥११०॥
मुख अग्नि हस्त इंद्र होय । गुह्य प्रजापती उपेंद्र पाय । गुद नैऋत्य करी निश्चय । कर्मेंद्रिय पंचक हें ॥११॥
ऐसें दशेंद्रिय इच्छापूर्वक । वर्तन तेचि पंचप्राण देख । ते सर्व मिळोनि जाहले एक । ईशाचा एक लिंगदेह ॥१२॥
परी स्थूळ देहावीण भोग । सूक्ष्मा न घडे म्हणोनि चांग । विराट निर्मिले यथासांग । ते ऐका अव्यंग श्रोतेपुढें ॥१३॥
लक्ष्मीरमणा हरीमुकुंदा । श्रीअनंता नारायणवरदा । शंकर सद्गुरु अनंदकंदा । हरी आपदा पांडुरंगा ॥१४॥
इति श्रीगुंडामाहात्म्य निधान । त्रितापांसह चारही साधन । कथोनि पिंडीचें पंचीकरण । अध्यायपूर्ण पंचम हा ॥११५॥
श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ५ वा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP