श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय सहावा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
ॐ नमो चिन्मंगलमूर्ति । तूंचि शारदा विश्वस्फूर्ति । लक्ष्मीकांत यास्तव बोलती । साक्षी म्हणती श्रीगुरु तुला ॥१॥
असो पूर्वाध्यायीं निरुपण । पिंडींचे चार देह करुन । ब्रह्मांडींचा हिरण्यगर्भ पूर्ण । कथिला जाण सूक्ष्म देह ॥२॥
परी स्थूलावीण व्यवहार नाहीं । म्हणोनी स्थूल प्रत्यक्ष सर्वही । देवतामय असे पाही । आतां रुप तेंही ऐकावें ॥३॥
याचें कर्म करितें मुख्य येथ । ब्रह्मा विष्णु महेश समर्थ । ब्रह्मा रजोगुणी विष्णु सत्वस्थ । रुद्र यथार्थ तमोगुणी ॥४॥
रजोगुणीं क्रिया शक्ति बोलिली । सत्वगुणीं ज्ञानशक्ति वर्णिली । तमोगुणी द्रव्यशक्ति निर्मिली । द्रव्यें झालीं पंचभूतें ॥५॥
त्यापासाव चतुर्दश भुवन । ब्रह्मांड जाहलें असे निर्माण । तें ऐका भूलोक उदरस्थान । हृदय जाण भुवर्लोक ॥६॥
स्वर्लोक जाणावें वक्षस्थळ । महर्लोक असे ग्रीवा केवळ । जनलोक मुख असे निखळ । शिरकमळ तपोलोक ॥७॥
ब्रह्मरंध्र सत्यलोक असे । सप्तभुवन ऊर्ध्वभागीं ऐसें । सत्यभुवन अधोभागीं कैसें । तेंही अनायासें ऐकावें ॥८॥
अतळ कटिस्थानीं पाहें । वितल जानुठायीं राहे । सुतळ गुडघे बोलिलें आहे । तळातळ हें घोटेस्थानीं ॥९॥
महातळ पाउलें जाणावें । रसातळ पोटरिया ओळखावें । पाताळ तें असती तळवे । यांसी म्हणावें अधोभा ॥१०॥
मध्यभाग सप्तसिंधू उदर । पर्वतपाषाण अस्थि साचार । वृक्षलता रोमावळी अपार । पृथ्वी निर्धार मांस असे ॥११॥
नद्या नाडया पर्जन्य रेत । नक्षत्र माळा यम दाढा होत । जीवराशीकृमिकीट समस्त । ऐसी निश्चित विराटदेह ॥१२॥
सर्व ऐसा समूह मिळाला । विराटदेह ईश्वराचा झाला । आतां त्याच्या अवस्थादिकांला । सांगतों तुजला ऐकावें ॥१३॥
टेबल
विराट हिरण्यगर्भमाया । माहामाया ही चौथी काया । उत्पत्तिस्थितिप्रळयावस्थासि या । चौथी तुर्या साक्षिणी ॥१४॥
आतां ऐका रजतमसत्व । चौथा गुण असे शुध्दसत्व । ब्रह्माविष्णुरुद्रईशदेव । हे चार पूर्व अभिमानी ॥१५॥
स्थान तें सूर्यचंद्रकैलास । कैवल्य म्हणती त्या चौथ्यास । ऋग्यजुसाम अथर्व यास । चारी वाचेस म्हणताती ॥१६॥
अकार उकार आणि मकार । अर्धमात्रा ऐशा मात्रा चार । त्वंपद शबलांश वाच्यप्रकार । बोलिला साचार ऐसा हा ॥१७॥
या अस्तित्वें मी कर्ताभर्ताहर्ता । विराटादि देहांतें निरसितां । उरलें जें तत्पद तें आतां । जाण सुता शुध्द लक्षांश ॥१८॥
आतां असिपद जें बोलिजें । जहदाजहल्लक्षणीं जाणिजे । याचें रुप कैसें म्हणजे । तेही ऐकिजे सांगतों ॥१९॥
जहल्लक्षणा म्हणजे त्याग । अजहल्लक्षणा जाण अत्याग । जहदाजहत् तो त्यागात्याग । ऐसा विभाग लक्षणेचा ॥२०॥
त्वंपद शबलवाच्यांश । आणि तत्पद शबल जें यास । ऐसा दोहींचा करितां निरास । जहत् त्यास म्हणावें ॥२१॥
जें कां शुध्द लक्षांश त्वंपद । आणि शुध्द लक्ष तें तत्पद । या दोन्ही लक्ष्यांशांसी घेतां प्रसिध्द । अजहत् बुध म्हणताती ॥२२॥
पिंडीं शबलत्यागें शुध्द घेणें । तैसेंचि ब्रह्मांडीचें जाणणें । या नाव जहदाजहत् म्हणणें । असिपद येणें विचारें ॥२३॥
हा पिंडात्मक जीवपणा गेला । ब्रह्मांडीचा शिवपणा हरपला । दोहींवीण एकात्मभाव उरला । म्हणती याला असिपद ॥२४॥
तें असिपद शुध्दचैतन्य । अंगीं आहेसि स्वानंदघन । होसी कीं नोहे हें सांग पूर्ण । बोले नमून होय मी स्वामी ॥२५॥
मी होय हेंही म्हणणें न साहे । म्हणोनि पूर्णस्वानुभवाच्या मोहें । स्वामिपदीं नमूनि डोलताहे । स्वमुख वाहे अभेदपणें ॥२६॥
श्रीगुरु मनीं आल्हादून । उठवूनि दिलें क्षेमालिंगन । म्हणती गुंडा आपला आपण । प्रळयपूर्ण जाणावा ॥२७॥
आधीं जाण पिंडींचा प्रळय । अंत:करणीं मिळे श्रोतेंद्रिय । वाचेसहित शब्दविषय । व्यानीं जाय अंत:करणही ॥२८॥
त्वचा ते मनाचेठायीं मिळत ।हस्तस्पर्शविषयां सहित । मन तें मिळे समानवायूंत । पुढें निश्चित ऐकावें ॥२९॥
पदरुप विषयांसह मेळें । चक्षुइंद्रिय बुध्दींत मावळे । बुध्दि उदानप्राणीं त्यावेळे । जाऊनि मिळे निश्चित ॥३०॥
रस विषयासह जाण । जिव्हाइंद्रियीं होय लीन । जिव्हा चित्तांत जाय मिळोन । चित्तातें प्राण ग्रासित ॥३१॥
घ्राण मिळतसे अहंकारी । गुद गंधविषयासह निर्धारीं । अहंकार मिळे अपानांतरीं । प्राणा माघारीं अपान ॥३२॥
प्राण उदानीं समानीं । समान व्यानीं जाय मिळोनी । व्यान क्रियाशक्तींत जिरोनी । मिळे रजोगुणीं क्रियाशक्ति ॥३३॥
रजोगुण ब्रह्मयाठायीं मिळतो । तेव्हां देह अचेतन पडतो । अज्ञान गेलिया मोहो तो । नसतां येतो पुन्हां जन्मा ॥३४॥
होवोनि जन्ममरणाधिकारी । फिरे लक्षचौर्यांशी योनी माझारीं । सुखदु:ख भोगी परोपरी । ऐसापरी पिंडप्रळय ॥३५॥
आतां सांगतों सृष्टिप्रळयास । जाण पंचमहाभूतें सावकाश । पृथ्वीआपतेजवायूआकाश । विस्तारें सारांश पांच हे ॥३६॥
पृथ्वी दहासहस्त्र योजन । त्या दशगुणें समुद्र विस्तीर्ण । वडवानळ त्याचे दशगुण । दशगुणेम त्याहून वायू तो ॥३७॥
वायूचे दशगुणें तें आकाश । अहंकार त्या दशगुणें विशेष । महत्तत्व त्या गुणांहूनि दश । श्रेष्ठ त्या समूळ प्रकृति ॥३८॥
मूळ प्रकृतीहूनि अपार । अधिक तें चैतन्य निर्विकार । तें तूं होसी कीं नोहे साचार । करुनि विचार होय म्हणे ॥३९॥
ऐसेंही चालतां चक्रसृष्टि । कित्येक वर्षे जाहली अनावृष्टि । बारा सूर्य तपतां त्यांचे दृष्टि । जळती कोटी वनस्पति ॥४०॥
पुढें पर्जन्यवृष्टि शुंडधारा । तेणें सर्व विराली वसुंधरा । कित्येक वर्षें जलमय निर्धारा । मग त्या नीरा शोषी अग्नि ॥४१॥
अग्नि असतां कित्येक वर्ष । त्यासि वायू गिळी नि:शेष । वायुच राहिला किती दिवस । वायूसी आकाशा गिळीत ॥४२॥
द्रव्यशक्ति आकाशा गिळिली । द्रव्यशक्ति तमोगुणीं मिळाली । अहंकारीं गेला मिळोन । आतां त्रिगुणवार्ता ऐक ॥४४॥
त्या त्रिंविध अहंकृतीत । ब्रह्माविष्णुशिव मिळत । अहंकृति महत्तत्वीं लोपत । गेलें प्रकृतींत महत्तत्व ॥४५॥
मूळप्रकृति त्या शुध्द चैतन्यीं । मिळाल्या मग तूंचि तूं होवोनि । निर्विकल्प एक राहसी निदानीं । म्हणे ऐकूनि होय स्वामी ॥४६॥
स्वामीच्या कृपे ज्ञाता जो प्रत्यक्ष । आत्मा मी ओळखिला अपरोक्ष । उत्पत्तिस्थितिप्रळय दक्ष । जाणिजे लक्ष देवोनि ॥४७॥
आतां स्वामीउपकारा निश्चित । काय उतराई होऊं म्हणत । प्रेमभरें होवोनि सद्गदीत । केला प्रणिपात साष्टांग ॥४८॥
स्वामीनीं त्यास हृदयीं धरिलें । आलिंगोनी बापा म्हणूं लागले । ही स्थिति जिरवावया पहिलें । पाहिजे ऐकिलें पुढें आतां ॥४९॥
परी तें जिरवावया जाणिजे । भक्तिज्ञानवैराग्य पाहिजे । शास्त्रदृष्टि गुरुवाक्यें लाहिजे । स्वसुख तें जें आत्मनिश्चयें ॥५०॥
त्रिविधतापें तापूनि संसारीं । देव कोण कैंचा मी या विचारीं । शास्त्रदृष्टि कांहीं होईल जरी । गुरुवाक्य तरी केव्हां कळे ॥५१॥
मूढातें भासूनि प्रपंचीं सुख । स्वार्थमोहें आजन्म भोगी दु:ख । षड्रिपु पीडित मूर्ख । परमार्थी देख कामा नये ॥५२॥
मग त्याची येथें वार्ताही नाहीं । प्रपंचविरागी सुज्ञें जो पाही । तोचि शास्त्रज्ञ गुरुवाक्यही । योग्य कांहीं जाणावया ॥५३॥
पूर्वी जाणिलें वेदान्तशास्त्राला । परी प्रत्ययमात्र राहिला । त्यासीच गुरुबोधलाधला । आत्मा आला अनुभवासी ॥५४॥
जें पाहिलें शास्त्रांत । तेंचि श्रीगुरुनाथ । तेणें प्रत्यय आत्मा शाश्वत । आला निश्चित तयासी ॥५५॥
यावरुनि व्हावें ज्ञान प्रथम । मग भक्ति करुं ये नि:सीम । भक्ति म्हणजे अद्वय परम । विभक्ति धर्मरहित ॥५६॥
ज्या ज्ञानांत अद्वय अलंकार । त्यासीच म्हणावें ज्ञान साचार । अभेदभक्तिच भक्तिनिर्धार । वैराग्य सुंदर निष्काम भोग ॥५७॥
विभक्ति म्हणजे वेगळेपण । तिळही नसे ज्यांत द्वैतभान । या नांव भक्ति अद्वयपूर्ण । अन्य यावीण भक्ति नोहे ॥५८॥
भक्ति म्हणजे मूर्ख कित्येक । मृन्मय पाषाणचि देव एक । भावना करावी म्हणती देख । शास्त्र भ्रामक दाऊनी ॥५९॥
सारांश भावनाचि असे भक्ति । बहु सुज्ञपणें सांगती युक्ति । परी न कळे ही द्वैतासक्ति । भ्रमचि मुक्ति दैवीं त्यांचे ॥६०॥
आत्मा कळल्यावीण ज्ञान नाहीं । ज्ञानावीण ऐक्यता कैंची पाहीं । ऐक्यतेवीण भक्ति नोहे कांहीं । भक्तिवीणही वैराग्य नोहे ॥६१॥
आधीं आत्म्यासी शास्त्रें जाणावें । मग ऐक्यभक्ति करावी भावें । येणें पाठीं लागे स्वभावें । वैराग्य पाहावें न इच्छितां ॥६२॥
जो कोणी यथार्थ कार्या गुंतला । दुजें न दिसे नाठवे मनाला । तेविं जो स्वात्मानुभवा लागला । दुजें त्याला काय आठवे ॥६३॥
चित्ताचा स्वभाव एकदेशी । एका स्मरतां दुजें नाठवे त्याशीं । हा अनुभव असे सकळांसी । म्हणोनी यासि बोलणें नको ॥६४॥
जेविं वृक्षासि होतां पक्वफळ । आपोआप गळे तत्काळ । बळें तोडितां अपक्व केवळ । नासे समूळनिष्कारण ॥६५॥
वैराग्य मुख्य चिदाद्वयपणा । सहज भोग सुखदु:ख मना । इतर वैराग्य तें विटंबना । उदंड कल्पना ज्यामाजीं ॥६६॥
कित्येक वैराग्यवरोपचारा । भस्म लावोनि सर्व शरीरा । पोटीं विषयलोभ पामरा । असोनी दारा त्यागीतसे ॥६७॥
कित्येक पत्रफल सेविती । कंदवायू आहार करिती । धूम्रपानादि मुद्रा लाविती । परी नेणती वैराग्य काय ॥६८॥
किती सांगूं शुष्क वैराग्य ऐसें । धिक् ऐशा मूढा लागलें पिसें । वरि वरि त्यांचें वैराग्य असे । ध्यानस्थ बैसे बक जेंवि ॥६९॥
जरी बाह्य विषयांचा केला त्याग । परी अंतरीं राहिला कीं रोग । तरी तो म्हणावा काय विराग । जाळितो राग भोगेच्छें ॥७०॥
बाह्य त्याग अत्याग वृथा काय । अवश्य तो मनोनिग्रह होय । मन ब्रह्मादिकां ठकवोनि जाय । नाहीं उपाय तेथें कांहीं ॥७१॥
त्याग ग्रहणस्फूर्ति अंत:करण । कांहीं कल्पूं इच्छिसी तेंचि मन । हेंचि करावें बुध्दि निश्चयपूर्ण । स्मरणविस्मरण तेंचि चित्त ॥७२॥
मी हेंचि करीन हा अहंकार । जर कां नसे या पांचांचा व्यापार । तरी तो मृत्यु म्हणावा साचार । सर्व व्यवहार बुडाला ॥७३॥
एवं पंच मनोमय विकार । ज्ञानेंद्रियद्वारें करी व्यापार । प्रथम होत ग्रहणविचार । त्यागनिर्धार पुढें करीत ॥७४॥
पूर्वी ग्रहणेच्छा कां धरावी । मग त्यागबुध्दि कां करावी । ग्रहणबुध्दिच मुळीं नसावी । हे युक्ति घ्यावी ऐकोनी ॥७५॥
बुध्दि स्वानुभवीं राहतां । मग कैंची त्यागग्रहणव्यथा । आपोआपें निष्कर्मत्व ये हातां । प्रपंचममता विरेल ॥७६॥
यावीण बळें त्यागिती वेडे । तेणें प्रपंच अधिक गळां पडे । देव ना संसार वृथा सांकडें । सोशिती उघडे मूख्रत्वें ॥७७॥
असो कल्पनाबळें जें वैराग्य । शुध्द नागवण जाण अभाग्य । धन्य ज्ञानोत्तर भक्तियोग । विरागभाग्य सहजवरी ॥७८॥
एवं मुख्य ठरलें ज्ञान । तें ज्ञान चार प्रकारें जाण । अज्ञान ज्ञान आणि विज्ञान । अन्यथा ज्ञान तें चौथें ॥७९॥
अज्ञान तें कांहीं नकळणें । ज्ञान असे प्रपंचा जाणणें । जीवशिव ब्रह्म मीच कळणें । विज्ञान म्हणणें या नांव ॥८०॥
चौथें जाणावें ज्ञान अन्यथा । खरे एक असोनि त्याचे माथा । दुजा आरोप लावणें वृथा । प्रपंचपरमार्था दोहीतें ॥८१॥
पाहतां ज्ञान असोनि एक । कार्यपरत्वें कल्पिती अनेक । प्रपंचपरमार्था ज्ञान सम्यक । एक नि:शंक वेद बाहे ॥८२॥
तंव गुंडा वदे पुरे हें ज्ञान । पंचतत्त्वांचें विवरण। परी सांगा मी आणि ईश कोण । कैसें लक्षण माझे ठाईं ॥८३॥
सद्गुरु म्हणती कारे बापा । अजुनि कां न जाणसी स्वरुपा । पहावया दीप आपुल्या रुपा । अन्यदीपा इच्छी काय ॥८४॥
तूं प्रत्यक्ष स्वसंवेद्य होसी । देहासह आपणातें जाणसी । ते जाणीवपणाचि तूं अससी । मग कां पुससी मी कोण ॥८५॥
स्वसंवेद्य म्हणजे आपणाला । आणि जाणणार जें दुसर्याला । ऐशा जाणीवरुपज्ञानाला । पूर्वीच समजला अससी तूं ॥८६॥
यासाठीं ऐक महावाक्यबोध । सर्वांसीही मुख्य असे वेद । तो त्रिकांड बोलिला प्रसिध्द । प्रमाणसिध्द सर्वांसी ॥८७॥
कर्म ज्ञान आणि उपासना । ऐसी वेदाची त्रिकांडरचना । आपुलाल्या मतें वागणूक जना । जाहली जाणा विधियुक्त ॥८८॥
रजोगुणें कर्मासी सक्त । तमोगुणें उपासनायुक्त । सत्वगुणें ज्ञाते ज्ञानमुक्त । राहती भक्त ब्रह्मानंदें ॥८९॥
जरी त्रिकांड वेद असे । परी ज्ञानचि बोलिला विशेषें । वाक्य आणि महावाक्य ऐसें । बोलें विलासें परमात्मा ॥९०॥
प्रपंच आब्रह्मस्थावरांत । याची रचना कथन सार्थ । ऐशा शब्दासी वाक्य निश्चित । बोलती यथार्थ वेदविद ॥९१॥
आतां जें ब्रह्म अपरोक्षज्ञान । ज्या वाक्यें जिज्ञासूंसी होय पूर्ण । तें महावाक्य आहे म्हणून । बोलिले जाण स्वानुभवी ॥९२॥
तंव गुंडा म्हणे सद्गुरुराय । महावाक्य म्हणजे असे काय । तें आम्हांसी सांगा कळावया निर्णय । म्हणोनि पाय धरियेले ॥९३॥
तंव चूडामणि म्हणती वेद चार । आपुलाल्या मतें चार प्रकार । वेगळाले बोलिले असती सविस्तर । ऐक साचार सांगतों ॥९४॥
ऋग्वेद बोले प्रज्ञानं ब्रह्म । यजुर्वेदीं अहंब्रह्मास्मि वर्म । तत्वमसि शिष्यातें वदे साम । अयमात्मा ब्रह्म अथर्वण ॥९५॥
ऐसे हे चार महावाक्य । वेदीं बोलिले परी अर्थ एक । ते विशद करुं पृथक पृथक । ऐका भाविक श्रोते हे ॥९६॥
प्रथम ऋग्वेदांतील विशद । ऐतरीयारण्यकोपनिषद । यांतील प्रज्ञानंब्रह्मशब्द । जाणावें शुध्द महावाक्य ॥९७॥
प्रज्ञानशब्दार्थ ऐका वेगें । जो इंद्रियद्वारां चैतन्ययोगें । ऐके पाहे गंध स्पर्श घे अंगें । जिव्हे भोगे गोडकडू ॥९८॥
त्या जाणिवेचें नांव असे ज्ञान । प्रकर्षें जाणीव ते प्रज्ञान । प्रत्यगात्माचैतन्य संबोधन । साक्षी जाण जीवशिवादी ॥९९॥
वेगळाले पंचज्ञानेंद्रिय । आपापले घेऊं धांवती विषय । ज्ञाताभोक्ताचिदाद्वय । प्रपंच होय या नांव ॥१००॥
एक शर्करा बहु प्रकार । हेम जेंवि नाना अलंकार । तेंवि इंद्रियज्ञान तें निर्धार । प्रज्ञान साचार ब्रह्म असे ॥१॥
असो गुंडा म्हणे सद्गुरुस्वामी । प्रज्ञान शब्दार्थ जाणिला आम्हीं । आतां ब्रह्म काय हें नेणें मी । कृपे तुम्हीं सांगावें ॥२॥
अरे ब्रह्मादि स्थावरांत । गवाश्वादिपशुमानवांत । भूतस्थितिलयोद्भव होत । सर्वत्र व्याप्त असणार जें ॥३॥
तेंचि चैतन्य जाण ब्रह्म असे । एणें अवांतर वाक्यार्थहि तैसे । जाहलें तुज सांगितलें ऐसें । आणिक पुसे गुंडा तेव्हां ॥४॥
ऐसें जें प्रज्ञानव्याप्त सर्वही । तेंचि ब्रह्म ठरलें या समयीं । मग जें प्रज्ञान माझे ठायीं । असेल तेंहि ब्रह्मचि कीं ॥५॥
श्रीगुरु म्हणे यांत शंका काय । तुझें प्रज्ञानहि ब्रह्मचि होय । ऐसें ऋग्वेदांतील तात्पर्य । केला निर्णय महावाक्याचा ॥६॥
आतां यजुर्वेदांत केवळ । बृहदारण्यकोपनिषदांतील । अहंब्रह्मास्मि महावाक्य मूल । ऐक प्रांजल अर्थ याचा ॥७॥
प्रथम जो कां अहंशब्दार्थ । गुंडा ऐक सांगतों यथार्थ । देशकालपरिच्छेदरहित । वस्तु शाश्वत परिपूर्ण ॥८॥
ऐसा हा तत्वज्ञानाधिकारी । याचे देहीं बुध्दिठायीं जो हरी । साक्षी होवोनि प्रकाश करी । ह्याअर्थें निर्धारी अहं येथें ॥९॥
आतां ब्रह्मशब्दाचा ऐक अर्थ । देशकालवस्तुनाशरहित । वस्तु सर्वत्र व्यापूनि राहत । तो परमात्मा येथ ब्रह्म असे ॥११०॥
अस्मि या क्रियापदें करुन । अहं आणि ब्रह्मपदें दोन । समानाधिकरण्य होऊन । जीवब्रह्मैक्यपण दाविलें ॥११॥
म्हणोनि मीच ब्रह्म आहें । ऐसें महावाक्य तात्पर्य लाहे । प्रज्ञानब्रह्म अहंब्रह्मास्मि हें । महावाक्य पाहे संपलें ॥१२॥
सद्गुरु म्हणे सामवेदामधील । तत्वमसि छांदोग्यश्रुतींतील । महावाक्याचा अर्थ जो केवळ । ऐक समूळ सांगतों ॥१३॥
सदैव सौर्म्येऽदमग्र आसीत् । एकमेवाद्वितीयं यथार्थ । या श्रुतीनें सृष्टिपूर्वी अद्वैत । भेदरहित स्वगतादि ॥१४॥
नामरुपरहित वस्तुशुध्द । होती तैशीच आतांहि अबाध । आहे हें कळण्यासाठी प्रसिध्द । तत्पदबोध केला येथें ॥१५॥
म्हणोनि तत्पद अर्थभावें । तीच सद्वस्तु आहे जाणावें । आतां त्वंपद अर्थें काय घ्यावें । श्रवण करावें गुंडा तुवां ॥१६॥
उपदेश श्रोता जो असे शिष्य । त्याचा देहेंद्रियसाक्षी जो नि:शेष । जाण त्रयावस्थेच्या ज्ञात्यास । त्वंपदें त्यास दाविलें ॥१७॥
आतां असि जें कां क्रियापद । या वाक्यें तत् आणि त्वं हे शुध्द । दोन्ही पदैक्य दाविला बोध । अनुभवप्रसिध्द कळावया ॥१८॥
आतां तें महावाक्य चतुर्थ । अयमात्मा ब्रह्म याचा अर्थ । प्रथम अयंवाक्य हें यथार्थ । सांगतों येथ गुंडा तुज ॥१९॥
आत्मा हा स्वसंवेद्य असून । स्वयंप्रकाश अप्ररोक्षपूर्ण । तो अदृश्य वस्तु ऐसा नसून । नाहीं जाण परोक्षहि ॥१२०॥
हा घटाऐसा दृश्यहि नाहीं । हें दावावयासाठीं याठायीं । अयं या पदाची योजनाही नाहीं । केली पाहीं शिष्यवर्या ॥२१॥
तंव शिष्य म्हणे आत्मा हा शब्द । केव्हां देहासिही लाविती बुध । मग याचा अर्थ यथार्थ शुध्द । सांगा प्रसिध्द काय असे ॥२२॥
अहंतेपासूनि देहापर्यंत । जगीं जीं कां जड तत्वें आहेत । त्या सर्वांचा साक्षी जो तोचि येथ । आत्मा बोलत श्रीगुरु ॥२३॥
तंव शिष्य म्हणे ब्रह्म म्हणून । ब्राह्मणादि कांहीं म्हणति जन । यासाठीं ब्रह्माचा अर्थपूर्ण । कृपा करुन सांगा स्वामी ॥२४॥
सद्गुरु म्हणति हेंहि खरें । या वाक्यांतील ब्रह्मार्थविचारें । ऐसे कीं जितकें दृश्यसारें । आहेत वारे पदार्थ ॥२५॥
त्या सर्वांचें अधिष्ठानतत्व । तेंचि येथें ब्रह्म शुध्दसत्व । सच्चिदानंद जें कां स्वयमेव । सकल वैभव त्याचेनी ॥२६॥
ऐसा ब्रह्म आणि आत्मा देख । पूर्वी वर्णिला ते दोन्ही एक । या महावाक्याचें तात्पर्य चोख । जाहले नि:शंक ज्ञानावरी ॥२७॥
श्रोतीं सावध ऐकावें आतां । पुढील अध्यायीं रसाळ कथा । गुंडालग्नीं द्वैताद्वैत मता । होय बोधिता चूडामणी ॥२८॥
मन श्रीविलासा लक्ष्मीरमणा । भवाब्धितारक नारायणा । कर्ताकरवित तूं जगजीवना । आनंदघना प्रत्यक् रुपा ॥२९॥
इति श्रीगुंडामाहात्म्य अद्वय । कथन समष्टिदेवतामय । महावाक्यादि भूतप्रळय । षष्ठाध्याय गोड हा ॥१३०॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ६ वा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP