श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय नववा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॥ श्री गुरवे नम: ॥

ॐ नमो तुज सर्वगणाद्या । कुलस्वामीया वेदप्रतिपाद्या । वागीश्वरी शारदा विद्याविद्या । स्वसंवेद्या श्रीगुरुराया ॥१॥
मूळध्वनी जो प्रणवोच्चार । त्रिमात्राबिंदूसह ॐकार । मिळवितां व्यंजनस्वर । बोलिलें अक्षर तयातें ॥२॥
ॐकार् रुप चारी वेद । विधाता बोधिला ईशें नि:शब्द । सूत्रशास्त्रपुराणविशद । जाहलें अगाध त्रिजगीं ॥३॥
कर्मउपासना ज्ञान अखंड । वेद ऐसा असे त्रिकांड । येणें जग वाढलें उदंड । सुरासुर प्रचंड नरवीर ॥४॥
जरी पाहतां भासे अभिनव । सांख्यमतें जगदाकृति सर्व । एकचि आत्मा स्वयमेव । दृश्य अपूर्व नटनाटय ॥५॥
आकारविकारादि दृश्याकृति । ज्या दिसे भासे नासे त्रिजगतीं । त्या स्वयें परमात्मा निश्चिती । सच्चिदानंद मूर्ति अद्वय ॥६॥
जरी नेत्रविकारें भिन्न भासे । तरी तो एक अनायासें । सुवर्णचि नग जेंवि विलसे । चिन्मय असे जग तेंवि ॥७॥
निगमागम सांख्य प्रांजळ । न्यायमीमांसादि सकळ । व्याकरणवेदांत अतिकुशळ । वर्णिती निश्चळ तुज एका ॥८॥
गणगंधर्वयक्षादिक । तूंचि नटलासी गा नि:शंक । अक्षयपदींचा नायक । दाविसी कौतुक तुझें तूं ॥९॥
ऋग्यजु:सामाथर्वण । नानाविधकरिती तुझें स्तवन । परी तूंचि सगुणनिर्गुण । होसी अभित्र एक पदें ॥१०॥
परापश्यंतिमध्यमावैखरी । या चार वाचा गाती तुझी थोरी । चारी पुरुषार्थ एकाकारीं । नांदती द्वारीं तूझिया ॥११॥
तो तूं निर्गुण भक्तीकारण । अनंत अवतार घेसी सगुण । अक्षय विटे अभय विधान । कर ठेवून कटीं उभा ॥१२॥
सकळ पापांचा करिसी नाश । म्हणोनि नाम तुज वेंकटेश । तो तूं परब्रह्म अविनाश । सच्चित्संतोष जगद्रूपी ॥१३॥
ऐसा विश्वात्मा सगुण सहज । गाळूनि शाश्वत ज्ञानार्क तेज । निर्मिला स्वानंद सद्गुरुराज । वैराग्यबीज श्रीगुंडा ॥१४॥
जो भवध्वांतनाशक चिद्भास्वत्‍ । अखंडानंदारुप गुंडा संत । सगुण परी न लागे अंत । म्हणोनि अनंत तोचि हा ॥१५॥
पाहतां चिद्गुंडाचि जग हें । अनंतरुपें तोचि कीं आहे । मग नारायणा केंवि लाहे । वेगळीक पाहे विचारें ॥१६॥
तें वेगळें कें म्हणो आलें । म्हणतांहि वाचे काय गेलें । सुवर्णाचि नग घडलें । गेलें आलें बोल मृषा ॥१७॥
मग गुंडा मज बुध्दिस्थ । बोलवी तें बोलूं आतां स्वस्थ । कर्ताकरविता तोचि येथ । निमित्त व्यर्थ कां न घ्यावें ॥१८॥
असो पूर्वाध्यायाचे अंती । संगें घेऊनि राजाई सती । गुंडा वाराणसीस जाती । अभेदभक्ति धन्य ज्याची ॥१९॥
ज्याचें मन लागलें प्रभूकडे । हरि पुरवी तयाचें कोडें । सदा नामीं गुंडाचा लय घडे । म्हणोनि सांकडें हरि सोसी ॥२०॥
धन्यधन्य सानुकूलविशेष । राजाईगुंडा स्त्रीपुरुष । यांसी सरी नये कधीं कोणास । जरी असंमास संत झाले ॥२१॥
स्त्रीपुरुषांत कांहीं तरी न्यून । रहावेंचि हें ठरलें निदान । परी गुंडाराजाई जोडा पूर्ण । अणुप्रमाण न्यून नाहीं ॥२२॥
प्रपंचपरमार्थी हे निर्मळ । परस्परां राहती सानुकूळ । साठीं यांचा परमार्थ सबळ । गेला केवळ तडीसी ॥२३॥
असो आतां हे हळुहळू दोघे । क्रमीत जातां वाराणसीमार्गे । कोठें अयाचिती मिळे सवेगें । कोठें व्यंग येताती ॥२४॥
कोठें पक्वान्नांचें भोजन । कधीं होत फलाहारग्रहण । केव्हां घडे शुध्द लंघन । लिंब वांटून केव्हां घेती ॥२५॥
ऐसा मार्ग क्रमितक्रमित । मकर साधिला प्रयागांत । बिंदूमाधवासी भेटूनि त्वरित । पूजन निश्चित पैं केले ॥२६॥
कथा ऐका पुढें सादर । कांतेसह गुंडा स्थीर । जें पुण्यभूमिमोक्षकर । श्रीकाशीपूर क्षेत्रा आले ॥२७॥
क्षेत्रस्थ पंड्ये पुढें धावती । आलिंगोनि सन्मानें ग्रामीं नेती । बिर्‍हाड देऊनि स्नानाप्रति । नित्य नेती शिवदर्शना ॥२८॥
जेकां साक्षात्‍ कैलासनगरी । तेचि प्रत्यक्ष हे ऊर्वीवरी । दशमखंड क्षेत्र काशीपुरी । ब्रह्मांडोडरीं पुण्यभूमि ॥२९॥
सकल क्षेत्रांत हें महाक्षेत्र । विश्वेश्वरलिंग अतिपवित्र । गिरजेसह प्रगटे त्रिनेत्र । जो दर्शनमात्रें मुक्ति दे ॥३०॥
सिध्दचारणमुनीश्वर । देवगणगंधर्वकिन्नर । तप अनुष्ठिती जेथें योगीश्वर । शिवा प्रियकर स्मशान जेथें ॥३१॥
आनंदवन महाक्षेत्र काशी । मोक्षमाहेरा येती स्वर्गवासी । देह ठेवितां सायुज्य त्यासी । पुनरावृत्तीसी नये कधीं ॥३२॥
महाप्रळयीं जी अक्षरधरा । ज्या त्रिवेणीसंगमस्नानें नरा । सप्तपूर्वजांसह पामरा । मोक्ष त्वरा होतसे ॥३३॥
बिंदुमाधवाचे घेतां दर्शन । विष्णुपदीं गया वर्जन । अतुलपुण्य विष्णुपदीं जाण । देतां पिंडदान पितृमुक्ति ॥३४॥
गयाश्राध्द वटश्राध्द । माघस्नान प्रयागीं प्रसिध्द । चातुर्मास्य तेथें राहतां शुध्द । सुख अगाध स्वर्गतुल्य ॥३५॥
महापुण्य जरी पदरीं असे । तरी ते यात्रा घडे अनायासें । चारी धामांचें पुण्य गिंवसे । अंतीं संतोषे एक या क्षेत्रीं ॥३६॥
जो कावडी भरोनी गंगोत्री । नेवोनियां रामेश्वरक्षेत्रीं । अभिषेकील रामलिंगमंत्रीं । तरी एकछत्री राज्य पावे ॥३७॥
जो रामेश्वराहूनि काशीस चाले । जाणावें त्याच्या एकेक पाउलें । स्वर्गपायर्‍यांसी उभारिलें । पितर पावले सायुज्यता ॥३८॥
त्या गंगायमुनासरस्वती । ऐसा पुरुषाची भेट इच्छिती । त्या त्याचे स्नानें पवित्र होती । दर्शनें तरती जड जीव ॥३९॥
ऐसा हा तीर्थक्षेत्रमहिमा । न वर्णवे निगमागमा । म्हणोनि तिष्ठे सुरेंद्रब्रह्मा । विप्र सीमाप्रात:स्नाना ॥४०॥
धन्यधन्य तें क्षेत्र या अवनीं । ज्यायोगें वैराग्य सहस्त्रगुणीं । भक्ति प्रगटे हृदयभुवनीं । ज्ञानविज्ञानीं बुध्दि मुरे ॥४१॥
ज्या तीर्थाठायीं तप करितां । अलभ्य लाभ लाभे हातां । भक्तिमुक्तिपद सायुज्यता । मिळे तत्वतां अनायासें ॥४२॥
ज्या तीर्थाचें भेणें समंध । भूतप्रेतपिशाच बहुविध । रानोरानीं पळती अगाध । बोलिलें प्रसिध्द प्रत्ययें ॥४३॥
धन्य तें क्षेत्र धन्य ती पृथ्वी । धन्य नरनारी किती वर्णावी । तेथील तृणपाषाण आघवी । धन्य सदैवी पशुपक्षी ॥४४॥
सर्व जपतपांचे जें फळ । एका क्षेत्राठायींच सकळ । शतगुणें त्याहूनि केवळ । माहात्म्य सबळ तीर्थाचें ॥४५॥
मुख्य तीर्थासि सामर्थ्य जें आदि । तें विलसे एक संतपदीं । तीर्थ तें सुरेंद्रशिरीं वंदी । प्रेमानंदीं हरिहरही ॥४६॥
असो गुंडा येतां काशीनगरा । आनंद झाला विश्वेश्वरा । देवालयीं कोंदला एकसरां । हरहर बरा महाध्वनी ॥४७॥
महाभागीरथीचें जीवन । हेलावलें उल्हासें करुन । श्रीगुंडा करितां तेथें स्नान । आनंदपूर्ण स्थिरावलें ॥४८॥
सत्यक्षमाशांतिदया । अखंड शोभती पदीं तया । शुध्दसत्वें मंडित साधुवर्या । म्हणावें जया तीर्थराज ॥४९॥
देखोनी श्रीगुंडा पुण्यमूर्ति । गंगायमुनासरस्वती । येवोनियां अत्यंत प्रीती । प्रगट होती मूर्तिमंत ॥५०॥
स्वयें कामिनीवेष धरोनी । नमन करिती गुंडाचरणीं । कोण कोठील तुम्ही म्हणोनी । गुंडा वचनीं पुसतसे ॥५१॥
आम्ही अत्यंत दीन दुर्बळ । पहावया आलों चरणकमळ । तुम्ही कृपावंत दीनदयाळ । आम्हां समूळ पावन करा ॥५२॥
आमचें वास्तव याच नगरीं । जे येती या क्षेत्रा यात्रेकरी । त्यांचे सेवे तत्पर आम्ही निर्धारीं । लागे तें सत्वरी पुरवितों ॥५३॥
कोणी श्रमले यात्रें चालून । त्यांचें करितों पादसंवाहन । कोणी उपवासी अन्नावीण । त्यांसी भोजन घालितों ॥५४॥
कोणी वस्त्रावीण उघडे । त्यांसी देतों आम्ही कपडें । ज्यांसी जीं जीं असती कोडें । तीं तीं साकडें निवारितों ॥५५॥
अशा वदतां त्या युवती । समाधान पावला गुंडा चित्तीं । धन्य तुम्ही परोपकारी सती । देह निश्चिती झिजवितां ॥५६॥
धन्य धन्य ते क्षेत्रस्थ समर्थ । ज्यांचे अंगीं दयाधर्म यथार्थ । जनांचा जो पुरवी मनोरथ । सकळ अर्थ देऊनी ॥५७॥
आपलें द्रव्यदारा कलेवर । हें न वंची कदा सेवेवर । निरभिमानी तो विश्वेश्वर । प्रत्यक्ष नर ब्रह्मारुप ॥५८॥
जो प्राणी अन्नोदकीं पीडिला । स्वाहार ज्यानें त्यासी अर्पिला । अनंत यागांचे पुण्य तयाला । वेदशास्त्रांला मान्य जो ॥५९॥
जो क्षेत्रीं वसोनि कृतघ्न । दयाक्षमाशांतिविहीन । यात्रेकर्‍यां पीडी जो दुर्जन । तो जन्ममरण आकल्प भोगी ॥६०॥
परी धन्य या क्षेत्राची थोरी । जरी हो कां ऐसाही दुराचारी । भावें एका स्नानमात्रें निर्धारीं । दोघां सरी पावे येथें ॥६१॥
जेंवि दिवाकर असे निर्द्वंद्व । कीं परिसासी नाहीं धातुभेद । स्पर्श होतांचि करी अभेद । तैसा अगाध महिमा येथें ॥६२॥
धन्य येथील स्त्रिया सकळ । साक्षात्‍ भागीरथीच केवळ । आमचें भाग्य अतिविशाळ । तुम्हां निर्मळ देखिलें ॥६३॥
धन्य आजिचा दिन वाटे मना । पावलों त्रिवेणीच्या दर्शना । मातें भासतां तिघी जाणा । गंगायमुनासरस्वती ॥६४॥
आजि आल्हाद वाटे घनदाट । पूर्वज पावले कैलासपीठ । तुम्ही प्रत्यक्ष देऊनि भेट । केली अलोट कृपादृष्टि ॥६५॥
अष्ट सात्विक भाव दाटला । प्रेमा बहु मनीं उचंबळला । रोमांचित देहभाव विराला । कंठ जाहला सद्गदित ॥६५॥
निरखोनि अवलोकितां चिन्ह । तिघीही जरी भिन्नभिन्न । परी एकाकार रुपसंपन्न । गुणनिधान अवतरल्या ॥६७॥
विष्णुपदीं एक जन्मली । ते शिवें जटेमाजी धरिली । तेथूनि जेव्हां मुक्त झाली । सर्व क्रमिली वसुंधरा ॥६८॥
येतां जन्हुयज्ञासमीप । भयें वाटला महाकल्प । स्वबळें तळीं दडपी भूप । प्रगट प्रताप करोनी ॥६९॥
पितरोध्दाराकारण । भगीरथें घेतली मागून । ओघ सोडितां जन्हू तेथून । जान्हवी जाण नाम आलें ॥७०॥
भगीरथीनें प्रयत्नें आणिली । म्हणोनि भागीरथी बोलिली । भगीरथाची पितृमुक्ति झाली । मग निघाली प्रवाहरुपें ॥७१॥
जी मोक्षद देवतटिनी । ती असे शंतनूची कामिनी । जी कां शुभ्रजलवाहिनी । त्रिपथगामिनी विख्यात ॥७२॥
विष्णुपदापासून जे निघत । स्वर्गोध्दारक ऐशी विख्यात । मंदाकिनीनामें निश्चित । ओघ प्रख्यात स्वर्गी वाहे ॥७३॥
दुजा ओघ जो पृथ्वीवरी । भागीरथी नामें निर्धारीं । अलकनंदा हे तीसरी । पाताळा माझारीं वाहत ॥७४॥
ऐशी भागीरथी प्रत्यक्ष । मूर्तिमंत गुंडा पाहे समक्ष । रुप सौंदर्य कृपादक्ष । भक्तां मोक्षदायिनी ॥७५॥
कोटीमन्मथ गाळुनि । सकल सिध्दीसी वळोनीं । चंद्रमुखी शोभे कामिनी । चपला नयनीं भासत ॥७६॥
कुंकुमारक्तबालार्कगति । पक्व दाळिंबबीज दंतपंक्ति । कंकण केयुरमुद्रिका हातीं । पदीं गर्जती गुजरिया ॥७७॥
रत्नमुक्तचापें मोहनमाळा । कंठीं चंद्रहार रुळे गळां । पीतांबर चपलेहूनि आगळा । सगुण वेल्हाळा गौरतनु ॥७८॥
तंव दुसरी सूर्यकुमरी । यमभगिनी यमुना सुंदरी । श्यामलांगी भूषणें साजिरीं । पक्व ज्यापरी जंबूफल ॥७९॥
कुरळ केस गुंफिली वेणी । सरळनासिक विशालनयनीं । कंकणजडित युग्मपाणी । भक्तवरदायिनी देखिली ॥८०॥
तिसरी असे ती सरस्वती । गौरतनु चंद्रकांति । भूषण मंडित शांतमूर्ति । जगीं कीर्ति प्रसिध्द जिची ॥८१॥
ऐशा मूर्तिमंत तिन्ही अंगना । प्रत्यक्ष आल्या श्रीगुंडादर्शना । पाहतां गुंडासी हर्षमना । नमोनि चरणा स्तविताते ॥८२॥
त्रिवेणीसंगम झाला प्रयागीं । एकाच ओघानें वाहती वेगीं । परी वेगळालें नीर अंगीं । गुंफिले रंगी गोफ जेविं ॥८३॥
भागीरथीचें शुभ्र पाणी । यमुना वाहे नीलवर्णी । सरस्वती असे ताम्रवाहिनी । चालती वेणी गुंफिल्या ऐशा ॥८४॥
प्रत्यक्ष या जगदोध्दारा । आल्या स्वर्गीहूनि त्या सुंदरा । पंचमहापातकीही नरा । मुक्ति त्वरा अर्पिती ॥८५॥
गुरुदारादि अगम्यगमन । मातृपितृगोब्राह्मण । हत्या अभक्ष्यभक्षणपानापान । दोषी दारुण उध्दरिती ॥८६॥
श्रीगुंडानें त्यांसी नमन केलें । म्हणती धन्य दर्शन दिधलें । मातापित्यांसह मज उध्दरिलें । पावन झाले नेत्र माझे ॥८७॥
परी एक शंका माझे चित्तीं । भागीरथी यमुना सरस्वती । तुम्ही प्रत्यक्ष प्रगटलांती । तेणें वृत्ति आनंदली ॥८८॥
तिघी म्हणती धन्य गुंडासी । अनंतसुकृतें भेटी आम्हांसी । तुवां दिधली तेणें तुजसी । कृपा हृषीकेशी करील ॥८९॥
शिवशक्तिविष्णुपूजा । पूर्ण केली तुवां गुंडोराजा । भक्ततारक विजयध्वजा । पूर्णतेजा सिध्दमूर्ति ॥९०॥
या त्रिलोकीं जे कां तारक । तुझें भजन मुख्य एक । चौदा भुवनींचे लोक । कीर्ति नि:शंक गातील ॥९१॥
तुझ्या भजनानंदीं तीर्थें । तुझ्या दर्शनें होतील मुक्त । देशोदेशींचे भूप समस्त । पूजोनि निश्चित गातील ॥९३॥
तूं आहेसी पुण्यवान । म्हणोनी घडलें तुज दर्शन । एर्‍हवीं विषयांध कृतघ्न । त्या कारण कैंची भेटी ॥९४॥
आमुचें दर्शन न होतां । जळानें कैंची पवित्रता । रोगी औषध न सेवितां । आरोग्यता केंवि पावे ॥९५॥
असो मग म्हणती सुंदरा । आमुचें अयाचित तुम्ही स्वीकारा । गुंडा स्वीकारितां खरा । पाक त्वरा सिध्द म्हणती ॥९६॥
तंव गुंडा स्नान करोनि आले । संध्यातर्पणपूजन सारिलें । नैवेद्यवैश्वदेवादि केलें । बाहेर टाकिलें बलि अन्न ॥९७॥
तेव्हां बाहेरी प्रसादाकारण । विप्ररुपें जमले देवगण । गुंडा चलावें म्हणतांचि जाण । पात्रीं येऊन बैसले ॥९८॥
इतक्यांत अपूर्व झालें एक । हुंडी गुंडानांवें आली नि:शंक । ते पंडयानें आणूनि देख । म्हणे घ्या रोख दोन सहस्त्र ॥९९॥
गुंडा म्हणे धन कोठील कैचें । मी नेणें देणें कोणाचें । मग हें आलें केंवि साचें । सांगा वाचे कृपें तुम्ही ॥१००॥
पंडया म्हणेजी ऐका स्वामी । हुंडी द्रव्य घेणार तुम्ही । धाडणार साहू देवपूरग्रामीं । देणार हा मी दास आपुला ॥१॥
गुंडा म्हणे धाडिलें धर्मासाठीं । मग हें द्रव्य कां ठेवितां गांठीं । ब्राह्मण बोलवा उठाउठीं । देऊनि शेवटीं अन्न घेऊं ॥२॥
पंडयासी दिली पावती । द्रव्यासाठीं ब्राह्मण येती । धन वांटी पंडया स्वहाती । संतोष पावतीं ब्राह्मण ॥३॥
दान देऊनियां ब्राह्मणां । पांथस्थांसह बैसले भोजना । भोजनोत्तर देती विडादक्षिणा । श्रीहरिभजना आरंभिलें ॥४॥
ऐसी श्रीगुरु गुंडाक्रीर्ति । काशीपूरवासी वर्णिती । अचूक दर्शनासी येती । नित्य देती अयाचित ॥५॥
जान्हवी यमुना सरस्वती जया । सर्वस्वी साह्य जाहालिया । काय न्यून पडेल तया । सर्व लया कोडें जाती ॥६॥
त्यावरी साह्य विश्वेश्वर । उमेसहित श्रीशंकर । भेटी इच्छिती नित्य सुरासुर । निरंतर प्रेमभावें ॥७॥
ऐसें नित्य करी त्रिवेणीस्नान । नानालिंगाकृतींचे दर्शन । काशीविश्वेश्वरांसी भेटून । विधिपूजन गुंडा करी ॥८॥
मग भजन तेथें अभंग । गुंडा करितां नाचे पांडुरंग । विश्वेश्वर नाचती नि:संग । पाहती तो रंग सुरपाल ॥९॥
नभीं विमानांची दाटी । ग्रामस्थ आबालवृध्द पाठीं । नाचती ओरडती भजनथाटी । कोणी वांटी मिठाई तेव्हां ॥११०॥
स्वानंदें जेव्हां नाचे गुंडा । विदेही होती जनझुंडा । अद्वयनाम येतसे तोंडा । कैशाही बंडा रामकृष्ण ॥११॥
भजन संपतां ये अयाचिती । ग्रामस्थ जनचि पाक करिती । सकल मंडळी प्रसाद घेती । सुर तिष्ठती शेषइच्छे ॥१२॥
ऐसा कांहीं काळ क्रमितां । नवल जाहलें ऐका कथा । गुंडा परीक्षावा वाटे विश्वनाथा । म्हणोनी स्वतां येताती ॥१३॥
विश्वेश्वर जाहले विप्र वृध्द । गलितकुष्ठ अंगीं दुर्गंध । माध्यान्हीं पातले सक्रोध । पोर लागले अगाध मागें ॥१४॥
गुंडासी म्हणे सर्व यात्रा फिरलों । आतां शेवटीं तुम्हांपांशी आलों । तुमचें औदार्य पहावया पातलों । फार थकलों फिरुनी ॥१५॥
कोणी धि:कारुनी बोलती । बीभत्सशब्दें मज निषेधती । कठोरवचनें ताडन करिती । ढकलोनि लाविती बाहेर ॥१६॥
मी अंध वृध्द रोगी बहिरा । संगोपनीं मातापिता ना दारा । ब्रह्मचर्यांत जन्म गेला सारा ।  नाही खरा स्त्रीभोग ॥१७॥
काम होवोनि अतिप्रबळ । प्राण जाऊं पाहे दु:खे व्याकुळ । मेहानें झाला कुष्ठ कुश्चळ । परी तळमळ राहिली ॥१८॥
ऐसें ऐकतां माझें वचन । जे ते धि:कारिती मज लागुन । हरहर कोणी मारिती पाषाण । कोणी मौन ढकलिती ॥१९॥
यात्रा फिरोनियां सकळ । बहु श्रमें आलों तुम्हाजवळ । तुम्ही दानशूर आहां केवळ । धैर्यप्रबळ सांगती लोक ॥१२०॥
आशापाशादि तोडूनी बंध । धरोनि चित्तीं विरागबोध । तीर्थाटना निघालां शुध्द । आलां प्रसिध्द महाक्षेत्रीं ॥२१॥
पूर्वीं मोठे दानशूर जाहले । त्यांच्यानींही हें नाहीं घडले । तें तुझ्यानें काय होय ठरलें । होतां बोलिलें कीर्तिप्रद ॥२२॥
शिवशिव आतां जातो प्राण । गुंडा देई स्त्रीदान । एवढें ऐक माझें वचन । कीर्ति पूर्ण जगीं करीं ॥२३॥
गुंडा हें वाक्य ऐकोनी त्या वेळीं । निजकांतेसी आज्ञापी तत्काळीं । म्हणे जा राहीं विप्राजवळी । ब्रीद सांभाळीं पतिव्रते ॥२४॥
हा विप्र नव्हे जगजीवन । आला परीक्षावया लागून । क्षणभंगुर देह हा पूर्ण । काळाचें जाण खाजें हें ॥२५॥
हेंचि गयावर्जन जाणावें । विष्णुपदीं पिंडदान द्यावें । येणें देहाचें सार्थक मानावें । आतां जावें विलंब नको ॥२६॥
गुंडा विनवी विप्रोत्तमा । बहू श्रम घडले जी तुम्हां । दासी सांभाळा न्यावी आश्रमा । पूर्णप्रेमा असो सदा ॥२७॥
ही केवळ असे अज्ञान । जरी कांहीं उल्लंघी वचन । तरी क्षमा द्या हेंचि देऊन । न्यावें मन इच्छा तेथें ॥२८॥
राजाईनें पतिआज्ञा ऐकिली । बहू आनंदातें पावली । देह सार्थक जाहलें माउली । विऊनि झाली मज धन्य ॥२९॥
देहदान झालें पतिहस्तीं । सार्थक होऊनि पावलें गति । कर जोडोनि पतिची स्तुती । करी सती सद्गद कंठें ॥१३०॥
राजाई म्हणे धन्य स्वामिया । सांभाळिली हे जड मूढ माया । शेवटीं माझी अमंगळ काया । कारणीं सखया लाविली ॥३१॥
धन्य झालें आज माझें शरीर । किती वर्णू तुमचा उपकार । जन्मोजन्मीं तुम्हां ऐसा भ्रतार । मिळो निर्धार हाचि माझा ॥३२॥
ऐकोनि सतीचें मृदुवचन । आनंद पावलें गुंडाचें मन । सती आज्ञा मागे पतीसि नमून । जावें म्हणून गुंडा सांगे ॥३३॥
विप्र न्यावया अनमान करी । गुंडा दे स्त्रीसी विप्रकरीं । येरु निघाला तंव झडकरी । मोक्षपुरी त्यागोनी ॥३४॥
आतां पुढें श्रोतीं व्हावें सावध । श्रीगुंडासी स्त्रीप्राप्ति नारदबोध । गयावर्जनांती ग्रामीं प्रसिध्द । पूजा श्रीगुरुपद घडेल ॥३५॥
नारायणा हृदयाब्जविलासा । भक्तवरदा अनंतवेषा । मनश्रीकरसगुणाधीशा । शिव सर्वेशा श्रीगुरु ॥३६॥
इतिश्री गुंडामाहात्म्यश्रेष्ठ । काशींत सगुण त्रिवेणीभेट । स्त्रीदान विप्रासी करुं स्पष्ट । जाहला शेवट नवमाचा ॥१३७॥

॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय ९ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP