श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय तेरावा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
ॐ नमोजी सगुणगणेशा । सकलाद्यशुध्द अविनाशा । सच्चिदानंद जगदादीशा । पूर्णपरेशा मंगलधामा ॥१॥
गण म्हणजे समुदाय । त्याचा ईश श्रीहरि चिन्मय । म्हणोनि नाम गणेश निश्चय । येणें नि:संशय सर्वाद्या ॥२॥
जी हंसवाहिनीमाया शारदा । अखिलाकृति शोभे अमर्यादा । देवो देवीरुपें विलास सदा । मृषा शब्दा अवलंबी ॥३॥
गुरु लघु आपणाचि झाली । सर्वज्ञ अहंता ज्ञानें धरिली । म्हणोनि वदती सद्गुरुमाउली । शाश्वत ठरली त्रिकाल जी ॥४॥
असो आतां पूर्वानुसंधान । द्वादशाध्यायीं सगुणदर्शन । गुंडासी दिधलें हरीनें प्रगटून । आतां कथन ऐका पुढें ॥५॥
सगुणरुपें रुक्मिणीपति । दर्शन देऊनि दोघांप्रती । आलिंगूनियां अतिप्रितीं । ऐश्वर्यें देती आपुली ॥६॥
चतुर्दश दिन गुंडा उपवासि । अघोर तप केलें अहर्निशीं । तेणें संतुष्ट झाला हृषीकेशी । तेव्हां भजनासी संपविलें ॥७॥
संपतांचि चौदा दिन । रुक्मिणीहस्तें पाक करुन । गुंडासी म्हणे उठा त्वरेंकरुन । करु भोजन मिळोनी ॥८॥
गुंडानें स्नानध्यान आटोपिलें । परी राजाई मनीं एक गमलें । तें तिनें श्रीहरीसी प्रार्थिले । म्हणे राहिलें एक मनीं ॥९॥
एकले भोजन करवेना । परिवारासह भक्तजनां । पाचारावें जगजीवना । येथें भोजना सत्वर ॥१०॥
हरि जाणोनि सतीचें अंतर । आणविला तेव्हां स्वपरिवार । छपन्न कोटि यादवभार । तेथें अपार भक्तांसह ॥११॥
सोळासहस्त्र अष्टनायिका । वसुदेवदेवकी अक्रूर सखा । उध्दवसात्यकिबळिरामादिकां । नामा तुका एकनाथ ॥१२॥
युगायुगीचें अनेक भक्त । पातले सर्व जीवन्मुक्त । तेव्हां अभंग म्हणे गुंडा विरक्त । मागतों युक्त दे हरी ॥१३॥
अभंग ॥
हेंचि देवासी मागणें । माझा लाड चालवणें ॥१॥
कबीर नामदेवभक्त । ज्ञानदेव जीवन्मुक्त ॥२॥
जनीं गोरा एकनाथ । चोखामेळा असे तेथ ॥३॥
तुकाराम भक्तबळी । रोहिदाससांवतामाळी ॥४॥
ऐशा संताचिया झुंडा । त्यांत मिळवावा गुंडा ॥५॥
पंढरिनाथा रुक्मिणीपति । ह्या वर्णिल्या ज्या संतमूर्ति । यांत मजही मिळवावें प्रीति । हेंचि निश्चिती मागतों मी ॥१४॥
भाव गुंडाचा अति चोखट । देव स्वमुखें वर्णी स्पष्ट । गुंडा ऐसा विरक्त ज्ञाना श्रेष्ठ । नोहे उत्कृष्ट जगीं पुढें ॥१५॥
जैसा विदेही रणशूर गुंडा । तैसा नि:संग हा झाला गुंडा । करीं घेऊनि हरिनाम खांडा । प्रबोधझेंडा लाविला जेणें ॥१६॥
मी आकुंचित स्वरुपीं शुध्द । निवांत होऊनि राहिलों बौध्द । परी हा गुंडाभक्त अगाध । केलें प्रसिध्द मज येणें ॥१७॥
ऐशा नि:सीम भक्तीकारण । मी जाहलों असें त्या आधीन । त्याचें जें जें पडेल न्यून । करणें पूर्ण मज अवश्य ॥१८॥
मी भक्त एकनाथगृहीं । गंगोदक कावडी आणिलें पाहीं । नाम्याची जनी दासीही । राबवी गेहीं मजलागीं ॥१९॥
ऐसे अनेक भक्त असती । मज विदेहा देह धरविती । कित्येक मज हातीं सेवा घेती । कित्येक देती सुख मज ॥२०॥
असो ऐशा भक्तांमाझारी । गुंडासी देवें नेऊनि सत्वरी । घातलें त्यांच्या चरणांवरी । भेटवी हरि येरयेरां ॥२१॥
सकळही भक्तजनांप्रती । देव बध्दपाणि करी विनंती । श्रीवत्सकौस्तुभाहून अती । विशेष प्रीति गुंडावरी ॥२२॥
माझे कंठींची सुरत्नमाळा । तेजोमय ती सखी चित्कला । याहूनि भक्तांनो वेळोवेळां । गुंडा सांभाळा प्रीतीनें माझा ॥२३॥
ऐसें बोलूनि जगजीवन । वोसंगा घेतला गुंडा जाण । आतां याचें तुम्ही सज्जन । करावें रक्षण प्रीतीनें ॥२४॥
मी देव आणि माझा भक्त । यांत भेद कांहीं नसे यथार्थ । ऐशा बोधें संतसमर्थ । बोधिले तेथ गुंडास्तव ॥२५॥
जेथें राबत रुखमाबाई । तेथें न्यून पडेल काई । पाक सिध्द करोनि ते समईं । जेविती सर्वही एकपंक्ति ॥२६॥
भजन करोनि भक्तमंडळी । अंतरधान पावली त्या वेळीं । गुंडासी बोलावूनि जवळी । बोधी वनमाळी प्रीतीनें ॥२७॥
मी सदा तुजपाशीं मनोभावें । अखंड राहतों हें स्वभावें । परी मूळपीठ पंढरीसी यावें । अवश्य जाणावें कार्तिकीसी ॥२८॥
पंढरीक्षेत्र परमश्रेष्ठ । प्रत्यक्ष असे हे भूवैकुंठ । चंद्रभागेचें वाळवंट । मुख्य पेठ वैष्णवांची ॥२९॥
काय सांगूं तेथील महिमा । वैष्णवी नामघोषसीमा । असंख्य भक्त आणि रामा । निजधामा म्यां नेल्या ॥३०॥
असो गुंडा भक्तशिरोमणी । तूं अवश्य यावें माझे स्थानीं । चौदा अभंग तुझी वाणी । माझिये कर्णी ऐकवावी ॥३१॥
चौदा अभंगांचें माहात्म्य । प्रगट गातीचल चारी धाम । अद्भुत भजनीं तुझा प्रेम । अनुपम न वर्णवे ॥३२॥
ऐसी आज्ञा करुनि श्रीकृष्ण । पावले तेव्हां अंतर्धान । पुढें कार्तिकी यात्रेलागून । स्त्रीसह जाण गुंडा निघे ॥३३॥
रामकृष्णहरि महामंत्र । नाम मुखीं गातसे स्वतंत्र । सदा भजन करी पवित्र । कधीं अणुमात्र विसरेना ॥३४॥
निरपेक्ष असे सदावृत्ति । म्हणूनि देवालयीं उतरुं देती । किंवा कोठें पुण्याश्रमीं रहाती । सत्संगती असे जेथें ॥३५॥
सेविती अयाचित आहार । सदा ज्यांचा हरिवरी भार । एकदां भोगावतीतीरीं साचार । महायोगीश्वर भेटले ॥३६॥
पारखिया असे रत्नज्ञान । कीं कसवटीं कळे सुवर्ण । तेंवि योग्यासी जाणे योगी पूर्ण । ज्ञाता जाण ज्ञात्यासी ॥३७॥
तेंवि गुंडाचा अधिकारु । जाणिता झाला योगीश्वरु । ठेवूनि घेत साचारु । दिन निर्धारु पांच तेथें ॥३८॥
पंचरात्र गुंडा तेथें राहिला । प्रसाद योग्याचा सेवन केला । पुढें पंढरीसी चालिला । येऊनि पातला क्षेत्रासी ॥३९॥
चंद्रभागेंत करुनि स्नान । घेतलें पुंडलिकाचें दर्शन । पुंडलिकें दिधलें आलिंगन । गुंडाकारण सप्रेमें ॥४०॥
तों महाद्वारापर्यंत । सामोरा आला रुक्मिणीकांत । गुंडासी तेव्हां भजन करित । नेलें आंत प्रीतीनें ॥४१॥
जेथे होतसे सांप्रत भजन । तेथें उभा राहिला भगवान । म्हणे बापा अखंड हेंचि स्थान । तुजला जाण भजनासी ॥४२॥
नामदेव राहिला द्वारावरी । त्वांही रहावें त्याचे शेजारीं । सकलही ऐश्वर्य असे द्वारीं । सन्मुख निर्धारीं जाण माझ्या ॥४३॥
ऐसें सांगूनि स्वयें भगवंत । राउळामाजी गुंडासी नेत । विटेवरी हरि उभा राहत । राउळीं जात गुंडा तेव्हां ॥४४॥
मग रंगशिळेवरी नाचून । गुंडा भेटला स्तंभा लागून । उपरी हरिपदीं भाळ ठेवून । दिलें आलिंगन सप्रेमें ॥४५॥
हरिस्तवन करुनि अपार । राउळा सव्य घेऊनि सत्वर । रुक्मिण्यादि हरि परिवार । नमिला निर्धार अतिप्रीति ॥४६॥
यावरी गुंडा एका विप्रगृहीं । कांतेसहित जावोनि राही । भजनास्तव मध्यान्ह समयीं । येतसे पाहीं महाद्वारीं ॥४७॥
अस्तमानपर्यंत हरिदिनी । रत होता गुंडा हरिभजनीं । सायंकाळीं आरती करोनी । बिर्हाडा लागूनी निघतसे ॥४८॥
रामकृष्णहरि म्हणत । आश्रमा येवोनि बैसला स्वस्थ । संग्रहीं नाहीं अत्र किंचित । किंवा अयाचित नाहीं आलें ॥४९॥
दुसरे दिनीं विप्रवेषधारी । गुंडा जवळी पातला हरि । येरु चंद्रभागेंत स्नान करी । मग पूजांतरीं ध्यानस्थ ॥५०॥
तंव विप म्हणे गुंडाप्रती । मज अन्न द्यावें क्षुधिताप्रती । माझे पंचप्राण व्याकुळ होती । गुंडा म्हणती अवश्य चला ॥५१॥
तेव्हां देव मनीं विचार करी । हा निमग्न असे भजनांतरीं । किंचित अन्न नसोनि पदरीं । भार मजवरी घातला ॥५२॥
आतां कोणी एका उपावें । या दोघांसी भोजन घालावें । याचा निश्चय मनोभावें । असे जाणावें मजवरी ॥५३॥
रुक्मिणीसी आज्ञापी सर्वेश । चला गुंडा असे उपोष । साहूचा हरि घेऊन वेष । पातला निमिष न लगतां ॥५४॥
राजाबाई होऊनि सोंवळी । बैसली असतां चुलीजवळी । अयाचित देतां वनमाळी । पाक तत्काळीं सिध्द केला ॥५५॥
बोलाविला वेषधर ब्राह्मण । इतक्यांत पातली रमा सुवासिन । दोघांसीही पंक्तीसी घेऊन । केलें भोजन गुंडानें ॥५६॥
तेव्हां भोजन झाल्यावरी । प्रसाद देती दोघें गुंडाकरीं । ते येरु घेऊनि झडकरी । चरण धरी विप्राचे ॥५७॥
हरि तुझी योगमाया । सर्व कळली मज या समया । धन्य करणी तुझी सखया । भक्तप्रिया साह्य होसी ॥५८॥
माझें क्षुधेचें तूं संकट । वाहसी न धरितां मनीं वीट । आज भोजनाचा केला थाट । उपोषित पोट राहूं न देसी ॥५९॥
हरि म्हणे भक्तांचा अभिमान । युगायुगीं मी अवतरोन । वाहून करितों त्यांचें रक्षण । हेंचि जाण ब्रीद माझें ॥६०॥
मज काय जाणतील इतर । यदर्थीं पाहे गुंडा चमत्कार । तो उद्यांच पाहीं सादर । दावितों साचार गुंडोराया ॥६१॥
एका साहूनें प्रयोजन केलें । तेथें ब्राह्मण भोजना बैसले । म्लेंच्छवेषें देव पंक्तीत आले । विप्र उठले सर्वही ॥६२॥
क्रोधें संतप्त विप्र सर्वत्र । म्हणती हा चांडाळ अपवित्र । येवोनि यानें विटाळिलें पात्र । म्हणतां विचित्र झालें ऐका ॥६३॥
तेथेंचि देव अदृश्य झाले । पाहोनि ब्राह्मणा आश्चर्य वाटलें । म्हणती कैसें हें नवल वर्तले । आश्चर्य दाविलें देवानें ॥६४॥
मग तेथें न लगतां क्षण । पुन्हां पात्रीं बैसले ब्राह्मण । गुंडासी म्हणे जगज्जीवन । पहा विंदान कैसें हें ॥६५॥
त्वां चौदा दिन निरशन केलें । मी बहुरुपीं तुज भेवविलें । परी आसन नाहीं चळलें । म्हणूनि घडलें दर्शन माझें ॥६६॥
मी भक्तांचा असें सेवाधारी । त्यांची आज्ञा मी धरीं शिरीं । त्यांच्यायोगेंच माझी थोरी । म्हणोनि साहकारी होणें लागे ॥६७॥
असो पांच दिन ऐसें ध्याऊनि विठ्ठला । महाद्वारीं उभा राहिला । गोपाळपुरींची काला केला । गुंडा निघाला ग्रामासी ॥६८॥
तंव मार्गी येतां तुळजापुरीं । तुकाई भेटली पादुकेवरी । दिवटी पोत घेऊनि करीं । आली सामोरी गुंडासी ॥६९॥
गळ्यांत कवड्यांची माळ । मळवट भाळीं शोभे विशाळ । विश्वरुपी घाली गोंधळ । भूतमेळ घेवोनियां ॥७०॥
प्रणवाद्य माया अष्टभुजा । अष्टायुध कर शोभे गिरिजा । चौंडकडमरु वाजवी वोजा । नाचे कमलजा स्वच्छंदें ॥७१॥
ऐसी भेटोनी जगदंबाई । आणिला गुंडा देवालयीं । पूजासामग्री आणूनि त्या समयीं । पूजिली तुकाई गुंडानें ॥७२॥
मग गुंडा भजन करिती । असंख्य जन पहावया येती । शूद्रवेशें तेथें शिवशक्ती । भजनीं नाचती स्वच्छंदें ॥७३॥
भंडार उधळी हिमनगबाळी । भस्म उधळी चंद्रमौळी । कोणी भाविक बुक्का उधळी । टाळी आरोळी हरिनामें ॥७४॥
सर्वांचेंहि उडालें देहभान । आरती होतां संपलें भजन । काल्यासी प्रसाद आणिलें अन्न । दुरडी भरुनि देवीनें ॥७५॥
गुंडा धांवूनियां सामोरी । दुरडी घेऊनि करींचे करीं । वृध्द वेषधर शिवगौरी । तोषविले निर्धारी नैवेद्यें ॥७६॥
देवी तीर्थप्रसाद घेत । शेष गुंडा मुखीं घालीत । पाहूनि ब्राह्मण वदती व्यर्थ । कोण म्हणत विप्र यासी ॥७७॥
हा गुंडा जरी असता ब्राह्मण । तरी कां सेव्विता शुद्रान्न । हे साधू कैंचे भ्रष्ट पूर्ण । चला उठोन राउळीं ॥७८॥
राउळीं पाहतां देवी नाहीं । मग विप्र घाबरले सर्वही । गुंडासी पाहतां दिसे तुकाई । लागती पायीं निंदक ॥७९॥
गुंडा म्हणे जा प्रसाद घेवोनि । शुद्रकल्पना जरी होती मनीं । तरी धाकेंचि घेती विप्र जाऊनी । पाहतां नयनी पंचखाद्य ॥८०॥
सर्वांचे गेले कल्पनापिसें । गुंडा स्तुति करिती तेव्हां हर्षें । परस्परें बोलती आम्ही कैसे । निंदादोषें नाडलों ॥८१॥
गुंडा हा केवळ भगवद्भक्त । महाशुध्द साधु असे विरक्त । त्यांत कित्येक जाहले सक्त । उपदेश युक्त घेतला ॥८२॥
त्रिरात्र तेथें गुंडा राहून । पुढें जाती मार्ग क्रमून । रामपुरासी पातले येऊन । भगवद्भजन करीत ॥८३॥
तंव एके दिनीं दत्तनिरंजन । षड्भुजायुध विराजमान । त्रिशूळ डमरु पीतवसन । विद्युत्समान शंखचक्र ॥८४॥
करीं शोभे कमंडलूमाला । त्रिगुणात्मकरुपें पातला । गुंडानें तो अवधूत पाहिला । पदीं नमिला साष्टांग ॥८५॥
येरयेरांसी भेटून । अतर्क्य संवाद होय गहन । परस्परां पावली खूण । अंतर्धान पावले ॥८६॥
देवपूरग्रामींचे दुष्ट नर । गुंडासी त्रास देती अपार । छलना केली वारंवार । म्हणोनि दूर वास केला ॥८७॥
भणभणित ग्राम चहूहाट । दिवाळें निघालें साहूचें चेंगट । दुष्काळामुळें न भरे पोट । सर्वांसिही कष्ट बहु होती ॥८८॥
ग्रामावरी पडलें अवर्षण । पीक नपिके मिळेना अन्न । प्रजाक्षय होतसे दारुण । घाबरले जन सर्वही ॥८९॥
तव मस्तानसाहेबवली थोर । सांगे लोकांसी चमत्कार । गुंडा आणावा ग्रामासि सत्वर । नातरी फार विघ्न पुढें ॥९०॥
स्वप्नीं दृष्टांत सांगे हनुमंत । गुंडा बोलवा सत्वर येथ । नातरी तुमचा नि:पात । होईल निश्चित जाणावें ॥९१॥
देव घरोघरीं लोकांलागून । विक्राळरुपें दाखवी स्वप्न । सर्प भालू टिटवेजाण । फिरती येऊन नगरांत ॥९२॥
तंव ग्रामांतील जन सर्वही । विचारी बैसले एकेठाई । गुंडासि आणावें म्हणती पाही । व्यर्थ त्या समयीं दवडिलें ॥९३॥
तो येथून गेल्यापासून । येऊं लागले बहुतविघ्न । दृष्टांत होती अतिकठिण । नाहीं मन स्थिर कोणाचें ॥९४॥
त्यांची शुध्दि सत्वर आणावी । म्हणोनि फिरती गांवोगांवीं । पुरें पट्टणें ग्रामें जाणावीं । सेवका करवीं शोधिती ॥९५॥
असो इकडे अकस्मात । रामपुरीं म्हालसाकांत । एकाएकीं प्रगट होत । गुंडा ठेवित भाळ पदीं ॥९६॥
गुंडासि हृदयीं धरुन । आलिंगूनि करी समाधान । म्हणती धन्य तुझें प्राक्तन । देवाधीन केला त्वां ॥९७॥
अश्वारुढ मार्तंड आगळा । हातीं खंडा वेष पिंवळा । पाठी म्हाळसा सुंदरचपळा । हिमनगबाळा शोभत ॥९८॥
सवें विवेक असे कुतरा । गुरगुर करी काम चोरा । गोंडा घोळोनि फिरे सामोरा । नपाहे माघारा कधीं जो ॥९९॥
अंगीं उधळिला भंडार । तेणें शोभे मार्तंड सुंदर । प्रेमें गुंडा जोडूनि कर । घाली नमस्कार वरीवरी ॥१००॥
गुंडासी विठ्ठल सर्वांठायी । ऐसा दृढभाव असे हृदयीं । विठ्ठलावाचूनि न दिसे कांहीं । म्हणोनि अक्षयीं नाम वदे ॥१॥
म्हणे पांडुरंगा जगदीशा । अनंत अवतार स्वप्रकाशा । अनंतरुप द्वारकाधीशा । धरोनि अविनाशा दाविसी ॥२॥
तेव्हां स्वमुखें म्हाळसापती । बोलते झाले गुंडाप्रती । धन्य तुझी एकविध भक्ति । अभेद रीती ऐसीच असे ॥३॥
भक्ति असे ज्याची जैसी । मी इच्छा पुरवितों त्याची तैसी । परी तूं पूर्ण अद्वैत आहेसी । म्हनोनि मजसी जिंकिलें ॥४॥
असो गुंडा तूं मैलाकारण । प्रतिवर्षी चंपाषष्टी लागून । येवोनि लक्ष्मीतीर्थी राहून । करोनि स्नान जावें तुवां ॥५॥
ऐसी आज्ञा वंदोनि शिरीं । दिनावधीनें निघोनि या उपरी । स्त्रीसह मार्ग क्रमोनी सत्वरीं । वंजरानदीतीरीं पातले ॥६॥
तेथें मकरपर्व साधिलें । प्रेमपुरासी मग आले । लक्ष्मीतीर्थी स्नान केलें । नंतर भेटले खंडोबासी ॥७॥
धनिकवेषें म्हाळसापति । गुंडासी देत अयाचिती । राजाई पाक करी शीघ्रगती । नैवेद्य दाविती खंडेराया ॥८॥
ब्राह्मणासह करोनि भोजन । गुंडा करीत चक्रीं भजन । ही दक्षिणकाशीं असें म्हणून । ब्रह्मांडपुराण वदतसे ॥९॥
सकळ अवनीचीं जीं तीर्थें । गुप्तरुपें वसती तेथें । तापसी यांचे मनोरथें । मार्तंडसत्तें पूर्ण होती ॥११०॥
म्हाळसापति सुमनमाळा । स्वकरें घाली गुंडाचे गळां । आज्ञा घेऊनि त्याच वेळां । आला स्वस्थळा रामपुरीं ॥११॥
तंव वार्ता कळली देवपुरीं । गुंडा आले असती रामपुरीं । मग ग्रामस्थ जन तेथवरी । पातले सत्वरी भाविक ॥१२॥
सर्वांनीं नमोनियां प्रीति । कर जोडोनि प्रार्थना करिती । तुमची केवळ नि:सीम भक्ति । अद्भुतकीर्ति जगीं झाली ॥१३॥
निष्कारण आम्हीं पीडिलें तुम्हांला । त्याची क्षमा करावी आम्हांला । तुमचा महिमा नाहीं कळला । बोलिलों बोल अमर्याद ॥१४॥
आमचा अन्याय घालोनि पोटीं । आम्हांसी रक्षावें कृपादृष्टीं । आम्ही आलों तुमच्या भेटीसाठीं । विनंती शेवटीं कीं ग्रामा चला ॥१५॥
गुंडा कांहीं न बोलतां वचन । रामा कृष्णा हरि करिती भजन । तंव परस्पर बोलती जन । धरा मौन पुरे आतां ॥१६॥
त्यांची वृत्ति होय प्रसन्न जेव्हां । आम्ही ग्रामासी नेऊं तेव्हां । परी प्रसन्न होती कैसे केव्हां । विचार बरवा करुं पुढें ॥१७॥
अयाचित आदि करुन । नित्य पाठवूं ग्रामांतून । ऐसा निश्चय करोनि पूर्ण । मागुती जन परतले ॥१८॥
यावरी पुढें कथा रसाळ । परमपावन असे केवळ । श्रोतीं ऐकावी होऊनि निश्चळ । गुंडा प्रेमळ भक्ताची ॥१९॥
दीनवत्सला रमानायका । हृदयनिवासा भक्ततिलका । दीनोध्दारा भवभयहारका । वरदायका नारायणा ॥२०॥
इति श्रीगुंडामाहात्म्य निर्धारी । गुंडा संतांत मिळवी श्रीहरी । पांडुरंगा भेटोनि आले मैलारीं । पूर्ण यावरी त्रयोदशाध्याय ॥१२१॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय १३ वा समाप्त
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP