श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय पंधरावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरवे नम: ॥
ॐ गणाद्य मंगलमूर्ति । कार्यारंभीं ज्यातें श्रुति गाती । तोचि वाग्वरद शारदा शक्ति । गुरु निश्चिती प्रत्यगात्मा ॥१॥
असो आतां पूर्वानुसंधान । गुंडाभक्तीचें अद्वय वर्णन । एकदां गुंडा आषाढी लागून । यात्रेसी जाण निघाले ॥२॥
तेव्हां पर्जन्य नाहींसा झाला । तेणें मोठा दुष्काळ पडला । अन्न मिळेना यात्रेकरुंला । बहु मांडिला आकांत ॥३॥
ओस पडली ग्रामखेडी । लोक लागले देशधडी । अपार फिरती वाटपाडी । न सोडिती कवडी कोणाची ॥४॥
ऐसा क्रमोनि मार्ग कठिण । पंढरीसी आले दोघेजण । तेव्हां राजाई होती गर्भिण । नवमास पूर्ण संपले ॥५॥
उभयतां पंढरीसी पातले । श्रीविठ्ठलाचें दर्शन घेतलें । येवोनि बिर्‍हाडीं उतरले । पुढें जाहलें काय ऐका ॥६॥
गुंडा जावोनि महाद्वारीं । उभा राहोनि भजन करी । गृहीं प्रसूत जाहली सुंदरी । परी अंतरीं चिंता नसे ॥७॥
तेव्हां रुक्मिणी बिर्‍हाडीं येऊन । स्वयें करितसे बाळंतपण । गुंडा म्हणे चातुर्मास पूर्ण । राहावें म्हणून देवा वाटे ॥८॥
तेव्हांपासूनि पंढरींत । गुंडा चातुर्मास राहत । असो पूर्व कथा ऐका समस्त । दुष्काळ बहुत वाढला ॥९॥
गुंडासी सात दिवस पाही । निश्चक्र झालें अयाचित नाहीं । सर्वांचे स्वप्नीं देव लवलाहीं । दृष्टांत त्या समयीं दावित ॥१०॥
मी सात दिवसांचा निराहारी । गुंडारुपें आहें महाद्वारीं । त्यासी भोजना द्यावें सत्वरीं । बडव्यासी हरि आज्ञापी ॥११॥
बडवे उठोनि प्रात:काळी । सत्वर आले गुंडाजवळी । क्षुधा पीडित परी त्या वेळीं । चित्तीं वनमाळी ध्यातसे ॥१२॥
ऐसा गुंडा पाहूनि क्षेत्रस्थ । तत्काळ आणिती अयाचित । परी भजनवेळे राउळांत । उभे राहत भजनासी ॥१३॥
भजन करोनि यथासांग । पाक करी राजाई मग । मुक्तद्वारें प्रसाद अव्यंग । सेविती सवेग ब्राह्मणादि ॥१४॥
अयाचिती पक्वान्न अनेक । नित्य घेऊनि येताती लोक । याचक जमती अधिकाधिक । तसेच पांथिक पंक्तीसी ॥१५॥
भजनीं नाचोनि शिष्य श्रमती । म्हणोनि पर्युषित रक्षिती । स्नानसंध्या सारोन निगुती । तेचि सेविती प्रात:काळीं ॥१६॥
स्नानसंध्यादेवतार्चन । गुंडा प्रात:काळींच सारुन । राउळीं विठ्ठलासि नमून । करिती भोजन अतिप्रीति ॥१७॥
तंव पंढरीचे ब्राह्मण कुटाळ । म्हणती हा बोलघाटी केवळ । साधु कैंचा भोंदू निवळ । मायाजाळ पसरितो ॥१८॥
हा पर्युषित अन्न ठेवून । निर्भय करितो नित्य भक्षण । यासी बहिष्कृत करुन । अपांक्त जाण ठेवावें ॥१९॥
परी अंगीं नाहीं सत्ता थोर । म्हणोनि पाध्यापासीं आले सत्वर । वृत्त कळविला सविस्तर । गुंडा फार अनाचारी ॥२०॥
या क्षेत्रीं एक अनाचार होतो । कोणी गुंडा साधू म्हणवितो । नित्य पर्युषित अन्नसेवितो । आणि भोंदितो भोळेभोळे ॥२१॥
ब्राह्मणत्व म्हणजे आज । केवळ बुडालें की सहज । भ्रष्टविले सकळ द्विज । दूषण लाज वाटे आम्हां ॥२२॥
विधवा स्त्रिया असती संगतीं । एकेठायीं भोजना बैसती । त्यांनी अनाचार या रीती । पंढरीप्रती माजविला ॥२३॥
परमहरिभक्त पाध्ये आद्य । ज्यांची विद्या जगद्वंद्य । धर्मसिंधु ज्यांचा केवळ वेद्य । धर्मप्रतिपाद्य शिरोरत्न ॥२४॥
ते पाध्ये म्हणती समस्तांसी । कोण मूर्ति आहे नेणो कैसी । व्यर्थ कां करितां द्रोह त्यासी । लाभ तुम्हांसी काय यांत \।२५॥
ऐसें बोधितांही नायकती । उठा चला आतां पहा म्हणती । हस्त धरोनियां शीघ्र गती । पाध्याप्रती आणिलें तेथें ॥२६॥
तंव गुंडा पंक्तींच बैसोन । करीत होते प्रसादग्रहण । शिळ्या भाकरी आणि वरण । सर्व मिळोन त्यावेळीं ॥२७॥
तेव्हां घेऊनि ग्रामस्थमंडळी । पाध्ये आले गृहाजवळी । हें पाहूनि शिष्य तये वेळीं । मानसीं सकळी दचकले ॥२८॥
ग्रासोग्रासीं नाम उच्चारित । गुंडा निर्भय कवल सेवीत । शिष्य सांगती आले तेथ । पाध्ये ग्रामस्थ भेटीसी ॥२९॥
गुंडा ऐसें ऐकूनि वचन । म्हणती आंत यावें सर्वजण । तंव पुढें पातले ते दुर्जन । कौतुक पूर्ण पाहूं म्हणती ॥३०॥
अद्भुत गुंडामहिमा साचार । साह्य ज्यास रुक्मिणीवर । पात्रोपात्रीं तेव्हां अपार । पक्वान्न सुंदर दिसती ॥३१॥
सर्व जनांसह पाध्यादिक । आश्चर्य करिते झाले देख । गुंडानें सन्मानोनि सकळिक । पुसती आणिक क्षेम त्यांसी ॥३२॥
तेव्हां पाध्ये गुंडासी सांगती । संशय होता सकळांचे चित्तीं । तुम्ही त्यांची केली निवृत्ती । साह्य श्रीपति सत्य तुम्हां ॥३३॥
तुम्ही सेवितां पर्युषित अन्न । परी आम्हां भासलें तें पक्वान्न । साधूचा महिमा जाणेल कोण । तुमचें विंदान तुम्हांठावें ॥३४॥
येरयेरांसी आलिंगिती । अंतरींच्या खुणा बोलताती । परमानंद पावोनियां चित्तीं । गेले निश्चिती पाध्ये गृहा ॥३५॥
सर्वही जाहले नि:संशय । दुर्जन स्वगृहा जाती निरुपाय । असो एकदां करितां शास्त्रनिर्णय । आला संशय पाध्यांसी ॥३६॥
विठ्ठलाचें करितां चिंतन । दृष्टांत झाला पाध्यांलागून । गुंडासी पुसावें तुम्हीं जाऊन । संशयपूर्ण हरील तो ॥३७॥
अस्तमानीं गुंडागृहाप्रती । जावोनि धर्मशास्त्रार्थ पुसती । तेथें संशय आला म्हणती । ग्रंथ दाविती गुंडासी ॥३८॥
गुंडानें त्यांचा संशय हरिला । तेणें पाध्यासी आनंद जाहला । सत्यसाह्य हरि तुम्हांला । म्हणोनि गृहाला पाध्ये जाती ॥३९॥
असो पंढरीस एके वर्षीं । पर्जन्य नाहींच चातुर्मासीं । विप्र बैसले अनुष्ठानासी । अहर्निशीं ठायींठायीं ॥४०॥
तीन दिन करोनि निराहार । अघोर तप मांडिती विप्रवर । मंत्रघोष गर्जती अपार । परी नीर न पडेची ॥४१॥
मग सर्वत्रांनीं निश्चय केला । आतां गुंडावरी भार घाला । हें संमत वाटोनि सर्वांला । आले मठाला गुंडाच्या ॥४२॥
म्हणती कृपाळा दयाघना । मान्य करावी आमुची प्रार्थना । मुकताती सर्व जीवप्राणा । वर्षोनि घना शांत करीं ॥४३॥
कृपा करोनि आम्हांवरी दातारा । करुणा भाकावी रुक्मिणीवरा । करितां पिके वसुंधरा । सुखी करा जीव सर्व ॥४४॥
ऐसें प्रार्थितां सकल जन । कळवळले गुंडा प्रेमें करुन । न करितां निराहार उपोषण । करी भजन देवापुढें ॥४५॥
मुखें रामकृष्णविठाई । भजन आरंभिलें ज्या समईं । तेव्हां अभ्रलेश नसोनि पाही । कांहीं कांहीं जमूं लागे ॥४६॥
चहूंकडोनि ओळले मेघ । जलवृष्टि जाहली अमोघ । तुंबळ सरिते चालिला ओघ । बाहेरी रीघ नसे कोणां ॥४७॥
ग्रामस्थ येऊनि नारीनर । गुंडासी प्रार्थिती जोडोनि कर । पुरे वृष्टि पडतील घर । आरती सत्वर करा स्वस्थाना ॥४९॥
यावरी एकदां पंढरींत । गुंडा होते ज्या गृहांत । एक बैसला होता साहु तेथ । उपवास करीत दारापुढें ॥५०॥
गुंडा पातले भजन करोनी । पाहिले तेथें साहु आणि घरधनी । बैसले उपोषित नेम करोनि । अन्नपाणी विरहित ॥५१॥
गुंडा पुसती उभयतांसी । येथें कां बैसलां उपवासी । मूळ कारण काय यासी । सत्वर मजसी सांगवें ॥५२॥
धनिक म्हणे धन दिल्याविण । जरी हा गृहधनी करी भोजन । तरी गोमांस भक्षिल्या समान । म्हणोनि आण घातली म्यां ॥५३॥
तंव हरेराम हरेकृष्ण । मुखें गुंडा म्हणे करिती भजन । तेथें जिजाबाई धनसंपन्न । आली जाण पिंगळीकर ॥५५॥
द्रव्यभांडार घेऊनि स्वतंत्र । पंढरींत आली होती पवित्र । नित्य ब्राह्मणभोजन सहस्त्र । दक्षिणावस्त्र अर्पीतसे ॥५६॥
पाहूनियां गुंडाची स्थिती । आनंद वाटला जिजाईचित्तीं । म्हणोनि ती गुंडादर्शनाप्रती । येत होती तैसी आली ॥५७॥
जिजाई करी नमस्कार । परी गुंडा कांहीं न दे उत्तर । घरधन्यासी पुसतां विचार । सविस्तर सांगतों ॥५८॥
साहूनें मज घातली आण । म्हणोनि येथे बैसलों जाण । ऋण दिल्याविण नाहीं भोजन । म्हणोनि भजन करितीहे ॥५९॥
जिजाई म्हणे ऋण किती असे । तंव साहु बोले आहे तीनशें । येरु म्हणे हे घे तुझे पैसे । ऊठ संतोषें येथूनि ॥६०॥
धनिक द्रव्य घेऊनि गेला । जिजाबाई म्हणे गृहधन्याला । हें गृह द्यावें आम्हाला । मोल तुम्हाला देतें याचें ॥६१॥
गृहधनी अवश्य म्हणोन । दिला विक्रीकागद करुन । जिजाई अयाचित देऊन । करी प्रयोजन त्याकाळीं ॥६२॥
मत ती जागा बांधोनि उत्कृष्ट । गुंडासी अर्पिला तिनें तो मठ । चातुर्मास्याचा केला थाट । नित्य दे चोखट अयाचिती ॥६३॥
यावरी भेटूनि रुक्मिणीवरा । गुंडा स्त्रीसह आला रामपुरा । चंपाषष्ठीस जावोनि मैलारा । म्हाळसावरा पूजिलें ॥६४॥
तेथूनि तीर्थयात्रा करित । शिवरात्रीसी रामपुरा येत । देवपुरींचे वाट पाहत । होते बहुत लोक तेथें ॥६५॥
ऐसें सर्व प्रार्थिती श्रीगुरुराया । कांहो केली कठिण माया । तुम्ही द्वादशवर्षे तपश्चर्या । रामपुरीं या पूर्ण केली ॥६६॥
अझूनि पाहतां किती अंत । आम्ही तुम्हांवीण समस्त । परदेशी जालों ग्रामस्थ । आतां त्वरित ग्रामा चला ॥६७॥
गुंडासी विनवोनि अपार । ग्रामासी चला म्हणती सत्वर । सर्वांचा पाहूनि सत्य निर्धार । निघाला गंभीर ग्रामासी ॥६८॥
वाद्यें वाजती संभ्रमें विविध । सामोरे आले थोर बुध । येतां सरोवरतटासन्निध । गुंडा शुध्द उभे तेथें ॥६९॥
कोणीही त्यांचे पुढें न जाती । ग्रामाधिकारी प्रार्थना करिती । आपणा जी आवडेल क्षिती । तेथें निश्चिती राहावें ॥७०॥
गुंडा ऐसें ऐकोनि वचन । जेथें होतें अविंधस्मशान । निंब अश्वत्था वृक्ष मिळोन । त्या तळीं जावोनि बैसले ॥७१॥
अखंडनामाची गर्दी जाहली । तेणें तेथील पिशाचें पळालीं । ग्रामस्थांनीं गुंफा बांधूनि दिधली । शुध्द केली भूमि सर्व ॥७२॥
पूर्वी श्रीगुंडा प्रतिवर्षी । करीत होते रामनवमीसी । एक विरागी त्या समयासी । येवोनि त्यांसी बोलत ॥७३॥
अनायास येथें रामनवमी । उत्सव होत आहे नेहमीं । म्हणे मूर्तीं स्थापितां काय तुम्ही । आणून आम्हीं देऊं तुम्हां ॥७४॥
म्हणॊनि आपुलेजवळील मूर्ती । रामलक्ष्मण सीतासती । हनुमंतासह गुंडासि देती । स्थापिले निश्चिती देवालयीं ॥७५॥
शामराज शिष्य होते थोर । त्यांनी देवीची मूर्ति सुंदर । करुनि धाडिली गुंडासी सत्वर । स्थापिली साचार दक्षिणेसी ॥७६॥
इष्टदैवत श्रीपांडुरंग । रुक्मिणीसहित ते सुरंग । कोणी भक्तांनीं दिली सवेग । स्थापिले अभंग उत्तरेसी ॥७७॥
कुंडलवाडीकर कृष्णाबाई । दर्शनासी आले एके समयीं । तिनें मठ बांधूनि त्याठायीं । सद्गुरुपायीं अर्पिला ॥७८॥
असो श्रीगुंडा प्रतिवर्षीं । पंढरींत राहती चातुर्मांसी । नंतर जाती मैलारासी । चंपाषष्ठीसी नेमानें ॥७९॥
पुन्हां येवोनि देवपुरीं । कांहीं दिवस वास करी । एकदां साधूनि पंढरीवारी । निघाले सत्वरीं मैलारा ॥८०॥
वंजरेमाजीं करोनि स्नान । सारिलें संध्या देवतार्चन । इतक्यांत अयाचित आणून । भाविक जन देताती ॥८१॥
सर्वांनी प्रसादासी सेविलें । पंथ क्रमोनि प्रेमपुरा गेले । खंडेरायाचें दर्शन घेतलें । गुंडा उतरले तीर्थाजवळीं ॥८२॥
गुंडा विरागी धनहीन । त्यांसी तीर्थोपाध्याय मिळे कोण । आशाबध्द क्षेत्रस्थ ब्राह्मण । नाहीं ज्ञान कोण कैंसे ॥८३॥
जेव्हां सहस्त्र होऊं लागले । तेव्हां मी उपाध्याय म्हणूं लागले । परी अज्ञानें स्वार्था मुकले । नाहीं जाणिलें गुंडासी ॥८४॥
असो लक्ष्मीतीर्थाजवळी । उतरला गुंडा त्यावेळीं । नित्य जेवीत सहस्त्र मंडळी । मनीं तळमळी उपाध्याय ॥८५॥
असो गुंडाभजनीं पाही । खंडोबाचे कवच त्या समयीं । सुवर्णाचें दिसे गुंडा देहीं । पाहती सर्वही भजनांत ॥८६॥
कोटितीर्थांत एक लक्ष्मीतीर्थ । गुंडा जेव्हां भजन करीत । नाहीं राहिली देहभ्रांत । कीर्ति अद्बुत जयाची ॥८७॥
गुंडा विरागी ज्ञाता शुध्द । कीर्ति जाहली त्रिलोकीं प्रसिध्द । एतद्विषयीं कथा अगाध । ऐका बुध श्रोते तुम्हीं ॥८८॥
जग असे त्रिगुणात्मक । त्यांत भाविकाभाविक लोक । त्यांतील कीर्तिमान्‍ भाविक । होता एक चंदूलाल ॥८९॥
राजा धृतराष्ट्र मंदबुध्दि । अंत:समयीं स्वइच्छें शोधी । म्यां राज्य नेत्रीं न पाहिलें त्रिशुध्दि । आतां अवधी तरी नाहीं ॥९०॥
या इच्छें अंध तो मृत्यु पावला । म्हणोनि तोचि अविंध जाहला । मध्यें एक विकार वाढला । दोही बोलां अर्थ एक ॥९१॥
आणि कर्णराजा दैवयोगें । कौरवांसी मंत्रीपर्णें वागे । तेथें नाहीं जाहलें मनाजोगें । येथें त्याभोगे चंदू झाला ॥९२॥
प्रसिध्द दाता कर्णवीर । तोचि हा चंदूलाल दानशूर । ज्याचें दातृत्व असे अपार । तैसा थोर पुन्हां न कोणी ॥९३॥
अन्नवस्त्रधनकनक । भूमिइनाम ज्यागिरा कित्येक । ज्या दातृत्वावरी अद्यापि लोक । वांचती अनेक वृत्तिवान ॥९४॥
नित्य गायन पुराण कीर्तन । देशोदेशींचे साधुसज्जन । भांड कापडीगारोडी विद्वान । गातीब्राह्मण कीर्ति ज्याची ॥९५॥
मठराउळेंघाट पवित्र । कित्येक अद्यापि अन्नछत्र । स्त्रियां ओंव्या गती स्वतंत्र । केवळ जगमित्र चंदू तो ॥९६॥
अवनीचे यात्रेकरु कापडी । येतां धन देवोनि तीर्था धाडी । ज्यांसी ज्या कांहीं इच्छा गोडी । त्यातें तेव्हडी पुरवित ॥९७॥
धर्म सोमार्कमंगळवारीं । श्रावणमासीं उत्सव करी । कृष्णजन्माष्टमी निर्धारी । कुळधर्म धरीं थोर होय ॥९८॥
आब्रह्मपिपीलिकादि सर्व । अद्वय ज्यासी ब्रह्मभाव । म्हणोनि तोषवी सर्व जीव । पुण्यठेव अपार ज्याची ॥९९॥
अल्प कर्मांत अपार पुण्य । ऐसा योजक नसे सामान्य । एवं युक्त चंदू जाहला मान्य । मानव अन्य नसे ऐसा ॥१००॥
आबालवृध्दां क्षेमवार्ता पुसे । पिपीलिकांसी शर्करा घालीतसे । जगाची क्षेमइच्छा करीतसे । शत्रू नसे कोणी ज्यासी ॥१॥
असो ऐसा दानशूर केवल । दक्षिणभूवरी चंदूलाल । त्यानें गुंडासत्कीर्ति निर्मल । ऐकिली सकल बुधमुखें ॥२॥
सद्भक्तगुंडा तीव्र विरागी । निपुणसंप्रदाय राजयोगी । आत्मानात्मज्ञान पूर्णअंगीं । प्रपंचीं भोगी परमार्थ जो ॥३॥
ऐसा गुंडामहिमा ऐकतां । ध्यान लागलें चंदूचे चित्ता । ऐसा साधू कधीं भेटेल आतां । लागली ममता गुरुपदीं ॥४॥
एकाग्र करोनि अंत:करण । निशिदिनीं करी गुंडाचिंतन । माझ्या सदनीं सद्गुरुचरण । येतील पूर्ण कधीं न कळे ॥५॥
आतां कैसा करुं विचार । माझे माथां राज्यकारभार । मृगयाव्याजें जावें सत्वर । त्रियोजनावर जाऊं नये ॥६॥
शास्त्रमर्यादा उल्लंघूनि पद । टाकूं तरी घसरेल राज्यपद । येईल राज्यनीति अपवाद । होईल आनंद शत्रूशीं ॥७॥
आतां योग्य तें हेंचि घडावें । श्रीगुंडाचें चरण येथें यावे । तरीच जन्मसार्थक जाणावें । नसतां व्हावें प्राणांत ॥८॥
राजसभा भरली घनदाट । तेथें चंदूलाल आले नीट । मात केली सर्वांसि प्रगट । दर्शनीं उत्कट गुंडाचे ॥९॥
श्रीगुंडायोगी मुगुटमणी । यांचे दर्शनाची इच्छा मनीं । कोण समर्थ पाचारुनी । आणील चरणीं लागेन त्या ॥११०॥
गुंडा असती प्रेमपुरीं खास । त्यांच्या दर्शनाची मजला आस । कोण भेटवील अनायास । त्याचा दास मी होईन ॥११॥
सद्गद रोमांचित चंदुलाल । आरक्त झालें नेत्रकमल । म्हणे भेटवा कोणीं गुरुदयाळ । विरागी अमोल असे जो कां ॥१२॥
ऐसें ऐकतां चंदुवचन । समस्त उठले जी जी म्हणोन । शतस्वार संगें देऊन । धाडूं सज्जन कोणी यांत ॥१३॥
ती कथा पुढील अध्यायांत । ऐकावी सज्जन श्रोते समस्त । चंदूलाल पत्रिका लिखित । धाडील निश्चित गुंडाकडे ॥१४॥
धांव पावगा श्रीगुरुराया । दुस्तर ही निवारीं भवमाया । विरह न साहे दीनासि या । दावीं पाया नारायणा ॥१५॥
इति श्रीगुंडामाहात्म्य सुंदर । चातुर्मास्यादि पाध्येयासि चमत्कार । मठ बांधिले स्मशानावर । कथासार पंचदशाध्यायीं ॥११६॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥

अध्याय १५ वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP