श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय बाविसावा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
स्वस्ति श्रीगणनायका । सर्वाद्या भवभयांतका । तूंचि शारदामूळपीठ नायिका । भक्ततारका गुरुराया ॥१॥
असो श्रीगुंडा सोडूनि पंढरी । मार्ग क्रमिती सहपरिवारीं । प्रत्येक ग्रामींचे भाविक निर्धारीं । देती परोपरी अयाचिती ॥२॥
गुंडासंगें राहती बहु याचक । तैसेच पंक्तीसी आगंतुक । नवस करिती कामनीक । कित्येक लोक नेती गृहां ॥३॥
गुंडा ज्या मार्गानें चालती । आधीं येवोनि पडे अयाचिती । कामिक भाविक वाट पाहती । येईल म्हणती गुंडा केव्हां ॥४॥
भेटीसाठीं कित्येक मनुष्य । करिती निराहार उपवास । कित्येक फेडावया नवस । साहित्यास सिध्द केलें ॥५॥
कित्येकीं गुंडा येती ऐकिलें । राजा प्रजेसह सामोरे गेले । कित्येकांनीं त्यासी पूजिलें । कोणी निंदिलें दुष्टांनीं ॥६॥
परी गुंडा सम असे सर्वां । निंदो कां वंदो दैवादैवा । अखंडानंदीं वृत्तीचा ठेवा । अद्वैतभावासम साम्य ॥७॥
जैसा कां तो रघुनंदन । सत्य एकपत्नी एकबाण । तैसा गुंडा असे पूर्ण । नटळे वचन बोलिल्या ॥८॥
असो मार्गानें दोहींकडून । अयाचित घेऊनि धांवती जन । आतां माझे तुझे घेती भांडून । संतर्पण करिताती ॥९॥
ग्रामोग्रामींचे पांडे पाटील । ग्रामासी चलावें म्हणती सकल । कित्येक देती गाई अमोल । गृहीं केवल पूजोनी ॥१०॥
कोणी त्यांचा देवजी नामें गुराखी । आवडता गुंडा होता विवेकी । गुंडासी मिळालेल्या गाई राखी । पूज्य लोकीं जाहला ॥११॥
तो आढिवग्रामीं राहे साचार । गाई गुंडाच्या चारीत अपार । तेथील पाटील होता अनिवार । दिधला मार गाईसाठीं ॥१२॥
तो तत्काळ चंदूपासीं गेला । सांगे मज गुंडाच्या गुराख्याला । पाटिलानें मार दिधला । घेऊनि गेला गाई सर्व ॥१३॥
गाई चरावया कारण । तेथे किंचितही नसे रान । गुंडासी सांगावें वर्तमान । तरी ते वचन नायकती ॥१४॥
म्हणूनि आलों तुम्हापाशी । गाईचा ताप हरावा वेगेंशीं । चंदूलाल लिहूनि सनदेशी । आढिव त्यासी देता झाला ॥१५॥
श्रीगुंडानामें करुनि सनद । सवें खर्चींही दिली अगाध । चार स्वार देऊनि प्रसिध्द । गाई निर्वेद चारी म्हणे ॥१६॥
त्या पाटलासी करोनि शासन । ग्राम केलें गुराख्यास्वाधीन । तो देवजी गुंडाकडे येऊन । सांगे वर्तमान वर्तलें जें ॥१७॥
श्रीगुंडा म्हणती बापा देवजी । त्वां विशाल बुध्दि खर्चिली सहजी । तरी आतां एक आज्ञा माझी । जाहगिर तुझी तूं सांभाळीं ॥१८॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरुवचन । देवाजीचें तुष्टलें अंत:करण । चूडामणि पुण्यतिथीकारण । देतसे धन पांच शत ॥१९॥
जगीं प्रगटली गुंडाची कीर्ति । देशोदेशींचे राजे येती । शरण होवोनि उपदेश घेती । धन अर्पिती अपरिमित ॥२०॥
गौड द्रविड हिंदुस्थान देख । तैलंग कोंकण कर्नाटक । पुण्यप्रांतींचे लोक अनेक । रावरंक शिष्य होती ॥२१॥
शिंदेहोळकरादिक बुध । उपदेश घेवोनि जाहले शुध्द । तरले कित्येक अविंध । ऐसी अगाधें गुंडाकीर्ति ॥२२॥
कित्येक शिष्य गुंडानामावरी । मठमंदिरें बांधिती परोपरी । कोणाची कोणा वार्ता निर्धारीं । नसे देशावरी ठाऊक ॥२३॥
सहस्त्रावधि ज्यांचें पीठ । शिष्यगणही असे अफाट । चौदा अभंग भजन वरिष्ठ । गाती श्रेष्ठ गुंडासी ॥२४॥
बहु वाढला गुंडासांप्रदाय । परी कोणी गाणपत्य होय । शैवशाक्त वैष्णव निश्चय । धरिती सोय मतांतरीं ॥२५॥
कोणी उपासिती वेंकटेश । कोणी म्हणती सर्वात्मा सर्वेश । कोणी गुरुमहिमाच विशेष । मानूनि निर्दोष राहिले ॥२६॥
आपासाहेब नामें ब्राह्मण । कोणी कण्वशाखी विद्वान । तो करी चौदा अभंगांचें भजन । गुंडाशिष्य म्हणून सर्वदा ॥२७॥
कवळासस्थ राजाचे घरीं । प्रतिष्ठित होता कारभारी । त्यानें वर्णिली गुंडाची थोरी । राजासामोरी येकदां ॥२८॥
सर्वांनी दिलें अनुमोदन । तत्काल राजा गुंडापाशीं येऊन । उपदेश घेतला प्रार्थून । केलें पूजन यथाविधी ॥२९॥
वस्त्रालंकारादि अर्पिती । प्रतिवर्षी गुरुदर्शना येती । एकदां वाटलें राजाचे चित्तीं । श्रीगुरुप्रती कांहीं द्यावें ॥३०॥
जरी द्यावे वस्त्रालंकार । तरी न ठेवी कोणी अंगावर । धनशपथ घेतली साचार । कांहीं विचार सुचेना ॥३१॥
हें अप्पासाहेबास पुसावें । म्हणूनि विचारिती मनोभावे । श्रीगुरुसी कांही ऐसें द्यावें । स्मरण व्हावें परंपरा ॥३२॥
आपासाहेबानीं विचार केला । जाहगीर द्यावी श्रीगुरुला । राजाचेही आले ते मनाला । ग्राम पाहिला एक मोठा ॥३३॥
मोघे ग्रामाचा लिहूनि लेख । चंदूलालकडे पाठवी देख । संगें जाऊनि आपाराव एक । वार्ता सकळिक कळविली ॥३४॥
मान्य करोनि चंदूलालें शुध्द । मोघ्याची दिली गुंडानामें सनद । येरु येवोनि राजासी प्रसिध्द । सांगतां आनंद जाहला ॥३५॥
आपासाहेब म्हणती राजा ऐक । गूज सांगतों तुजसी एक । हा गुंडा विरागी नि:शंक । मानी कनक गोमांस ॥३६॥
ही सनद नेवोनि देतां । भस्म करील पाहतां पाहतां । म्हणूनि एक युक्ति असे आतां । द्रव्य गुरुनाथा अर्पित जावें ॥३७॥
कोणी उत्तम कामदारा । ठेवूनि आणवी ग्रामसारा । प्रतिवर्षी सद्गुरु दातारा । अर्पावें नृपवरा तें धन ॥३८॥
राजा म्हणे तुम्हींच त्या गांवी । आपासाहेब देखरेख ठेवावी । गांवची रकम घेत जावी । ती पाठवावी गुंडाकडे ॥३९॥
राजाज्ञा शिरीं वंदोन । प्रतिवर्षी सारा देत नेऊन । ऐसेच लोटले कित्येक दिन । पुढील वर्तमान ऐकावें ॥४०॥
त्रिकालज्ञ साध्वी राजाबाई । म्हणे विपरीत गमे या समयीं । प्राणनाथा मज आज्ञा देई । म्हणूनि पायीं लागली ॥४१॥
गुंडा म्हणे करावें गमन । मीही येतों तुम्हामागून । ज्वरें जाहला विकल प्राण । केलें प्रयाण पतीपुढें ॥४२॥
मासांत पाहूनि ज्येष्ठमास । शुध्दपक्ष पंचमी दिवस । परलोका जाती सूर्योदयास । पांच वर्षे पतिआधीं ॥४३॥
मिळोनि सर्व ग्रामस्थ लोक । देहाचें केलें यथोक्त सार्थक । घेती कुंकुम सौभाग्यदायक । स्त्रिका सकळिक ग्रामींच्या ॥४४॥
असो गुंडा आठवोनि सद्गुरुचरण । नित्य करी हरिनामस्मरण । कोणी वंदिती कोणा निंदिती दुर्जन । तेव्हां विंदान एक झालें ॥४५॥
कीर्ति ऐकोनि एक चांडाळ । गुंडासी पाहतां करी तळमळ । म्हणे आम्हां कोणी न पुसे केवळ । यासीच सकळ मानिती ॥४६॥
आतां यासी यत्न काय करावे । विचार ठरविला मनोभावें । गुंडासी जादू करोनी मारावें । तरिच अवघे भजती आम्हां ॥४७॥
प्रयोग करी श्रीगुंडावरी । परी तो न चाले निर्धारीं । चांडाळ तो बहु यत्न करी । शेवटीं अंतरीं त्रासला ॥४८॥
गुंडा रिकामा न राहे रात्रंदिन । सदैव करी श्रीहरिभजन । तेथें प्रयोगासी रीघ कोण । नामें महाविघ्न भस्म होती ॥४९॥
गुंडा शौचासी जाती एके वेळीं । दुष्टासी संधि मिळाली त्या काळीं । प्रयोग करितां उतावळी । गुंडाजवळी येऊनि फिरे ॥५०॥
गुंडा केवळ पुण्यमूर्ति । तेथें मुष्टिप्रयोग तो किती । गुंडावरी जावया नसे शक्ति । पाहोनि म्हणती गुंडा तेव्हां ॥५१॥
ऐसेंच श्रीहरि तुझें मानस । तरी निवारुं नको हा दोष । कर्त्याचा जरी यांत संतोष । होऊंदे स्पर्श यथेच्छ ॥५२॥
किंचित पायीं स्पर्श घडला । तत्काळ अंगुष्ठ काळा जाहला । नंतर नामघोष आरंभिला । परत फिरला प्रयोग तो ॥५३॥
प्रयोज जाऊनियां माघारी । आदळे कर्त्याच्या हृदयावरी । घाबरा होऊनि दुराचारी । आला सत्वरी गुंडापाशीं ॥५४॥
गुंडाचे दृढ धरोनि चरण । अट्टाहास्यें करितसे रुदन । श्रीगुरुराया राखीं माझा प्राण । आलों शरण तुम्हासी ॥५५॥
तूं महायोगी आहेसी प्रसिध्द । तें न जाणतां केला अपराध । प्रयोग करी तुज मी मतिमंद । परतला शुध्द माझा मज ॥५६॥
परघातइच्छें झाला स्वघात । त्राता तुजविण आतां निश्चित । मज कोणी नाहीं म्हणूनि येथ । आलों त्वरित धांवोनी ॥५७॥
गुंडामनीं येवोनि कळवळा । म्हणे धैर्य धरोनि शांत बाळा । श्रीहरि दूर करिल या वेळां । पांडुरंग दयाळा आठवी ॥५८॥
जेव्हां नाम मुखीं निघालें । तेव्हां सर्व विघ्न लया गेलें । पाप देशधडी लागले । नाहीं राहिलें अणुमात्र ॥५९॥
शरण जाहला पदकमलीं । तेणें श्रीगुरुकृपा झाली । उपदेश घेवोनि तत्काळीं । त्याच स्थळीं वास केला ॥६०॥
सोडूनि प्रपंचावरी पाणी । सदा सद्गुरु आठवी ध्यानीं । अविट नाम घेतसे वदनीं । अघटित करणी जाहली ॥६१॥
असो गुंडा मैलारासी गेले नीट । म्हाळसाकांताची घेतली भेट । त्रिरात्र राहूनि तेथे शेवट । धरिली वाट ग्रामाची ॥६२॥
आज्ञा घेवोनि गुंडा निघाले । एक कोसपर्यंत आले । तंव देव पळत मागे पातलें । गुंडानें पाहिलें परतोनि ॥६३॥
तेव्हां गुंडा म्हणे हांक देऊन । तेथेचि थांबा येतो परतोन । जातां लक्ष्मीतीर्थाजवळी जाण । ठेविलें नेवोनि खंडेरायें ॥६४॥
काय नरसप्पासी दृष्टांत देती । साहित्य आण सत्वरगती । सहस्त्र कर्तव्य गुंडाप्रती । न्यून निश्चिती पडों नेदी ॥६५॥
येरुनें तत्काळ साहित्य केलें । भोजनसमारंभा आरंभिलें । सहस्त्राचे वरी ब्राह्मण जमले । सप्तदिन केलें सोहळ्यासी ॥६६॥
जमले हरिदास गायक । अगणित ब्राह्मणादि याचक । द्याकार आणि वस्त्रें अनेक । वांटिलीं देख सर्वांसी ॥६७॥
यावरी श्रीगुंडा जोडोनि कर । उभे खंडेरायासमोर । म्हणती शेवटचें हें दर्शन साचार । पुन्हा येणार नाहीं गुंडा ॥६८॥
हें ऐकोनि वदे म्हाळसापती । धन्यधन्य गुंडा तुझी भक्ती । आतां तुझ ऐसा त्रिजगतीं । भक्त निश्चिती कैंचा होय ॥६९॥
एकमेकांसी भेटून । गुंडा निघाला वंदूनि चरण । देवपुरासी आले तेथून । पुढील विंदान ऐकावें ॥७०॥
ऐसे पंढरीहून प्रतिवर्षी । गुंडा जात होते मैलारासी । शेवटी बोधोनि स्वपुतण्यासी । ठेविले त्यासी देगलुरीं ॥७१॥
ऐसें कृत्य सारोनि सर्व । गुंडा पंढरीसी निघाले तंव । गुरुपूजा होतसे गांवोगांव । शिष्य अपूर्व संगें होते ॥७२॥
एकें ग्रामीं जावोनि उतरले । तेथें अयाचित नाहीं मिळालें । बिर्हाडासह गुंडा परतले । बाहेर आले ग्रामाच्या ॥७३॥
ग्रीष्मऋतु अति उष्णकाळ । दोनप्रहर अयाचित ना जळ । तेणें मंडळी होय व्याकुळ । वरी पायपोळ चालों नेदी ॥७४॥
बाहेर येतां ग्रामासी आग । लागली तेव्हां लोक सवेग । धांवोनि यत्न करिती लगबग । परि अग्निवेग नावरे ॥७५॥
लोक बोलती कां ऐसी गती । तेव्हां सुज्ञ त्यांसी सांगती । माध्यान्हीं साधूसी दवडिती । तयांसी प्रतिती ये ऐसी ॥७६॥
लोक आले गुंडासी शरण । ते म्हणती न येऊ परतून । लोक प्रार्थिती येथेंच आणून । करुं अर्पण अयाचिती ॥७७॥
शरण येतां जाहली आग शांत । कांहीं भाविकांची गृहें त्यांत । राहिलीं त्यांनीं दिलें अयाचित । भोजन होत सर्वांसह ॥७८॥
तेव्हांपासूनि अयाचित नेम । ग्रामस्थ चालवूं म्हणती उत्तम । असो गुंडा तेथूनि यथानुक्रम । पावले सप्रेम पंढरीसी ॥७९॥
चंद्रभागेतटीं रात्रीं आले । देवतारुं होऊनि नावेत नेलें । नामदेवा भेटूनि राउळीं गेले । विठ्ठला भेटले स्वानंदें ॥८०॥
गुंडा म्हणती मज वृध्दपण । पासष्ट वर्षे जाहलीं जाण । किती वार्या कराव्या अजून । देहबंधन किती सोसूं ॥८१॥
देव म्हणती तुज ऐसा युक्त । गुंडा कोणरे असे मज भक्त । कां होसी तूं देहासी विरक्त । पूर्वीच मुक्त असोनि ॥८२॥
हा एवढा तरी चातुर्मास । संपवोनि त्यागीं तूं देहास । पाहूं म्हणूनि सांगती त्यास । ऐकतां संतोष हरीसी ॥८३॥
कारण हा गुंडा महाहट्टी । त्याचेंच मानावें लागे शेवटीं । म्हणूनि आलींगी स्वयें जगजेठी । गुंडा हनुवटी कुरवाळी ॥८४॥
गुंडा श्रीहरिआज्ञा वंदून । करीतसे महाद्वारीं भजन । नित्य भेटे श्रीहरिलागून । नामस्मरण अखंड करी ॥८५॥
एकदां गुंडा बैसले निवांत । विप्रस्त्री एक आली तेथ । लक्ष्मणाख्य बाळक अकस्मात । संगें त्वरित घेवोनी ॥८६॥
तिच्या संगें होती दुसरी बाई । तिनेंही मूल आणिलें त्यासमयीं । दोघी अर्पूनि लागती पायीं । काय हें बाई गुंडा पुसे ॥८७॥
दोघीही म्हणती सद्गुरुराया । आम्हीं नवसिलें तुमचे पायां । म्हणूनि अर्पिलें मुलांसी या । आतां उभयां सांभाळावें ॥८८॥
गुंडा म्हणती मज कां देतां व्यर्थ । घेणार उभा श्रीहरि समर्थ । त्यासी अर्पितां होईल अर्थ । अथवा परमार्थ लाभेल ॥८९॥
किंवा हीच इच्छा तुमचे मनीं । तरी जा बाई येथें सोडूनी । विश्वपालक चक्रपाणी । रक्षील दोनी बाळक ॥९०॥
त्या बाळकां ठेवोनि वरचे वर । घेती त्या बाया समाचार । असो ऐसीं मुलें अपार । अर्पिली साचार कित्येकांनीं ॥९१॥
गुंडा राहे हरिध्यानीं रत । स्वप्नीं प्रपंचाची नेणे मात । महाद्वारीं भजन करित । देहपात जवळी आला ॥९२॥
असो यावरी हरिसी भेटून । गुंडा सांगे जवळी प्रयाण । तेथूनि महाद्वारीं येऊन । करी भजन शेवटचें ॥९३॥
भजनीं चढला अत्यंत रंग । परी सखेद श्रीपांडुरंग । संपवोनी चौदा अभंग । आरती सवेग लाविली ॥९४॥
गुंडा तैसाचि सहपरिवारी । प्रदक्षिणेसी निघाला सत्वरी । आला चंद्रभागेतिरीं । होते श्रीहरि संगें त्याच्या ॥९५॥
येवोनि चंद्रभागेतटीं । भजन करीत वाळवंटीं । पुंडलिकानें दिधली भेटी । श्रीहरि ओटी पसरी त्यासी ॥९६॥
माझा गुंडा राहील तुजपाशी । तूं प्रेमें सांभाळ यासी । ठाव देऊनि एक प्रदेशीं । प्रेम मानसीं धरावें ॥९७॥
पुंडलिक आणि हरि येऊन । जागा दाविली गुंडा लागून । तेथेंचि बैसला करीत भजन । येती जन दर्शनासी ॥९८॥
सिध्द साधु संत महंत । गुंडादर्शनासी येती तेथ । शके सत्राशें एकुणचाळिसांत । तृतीया निश्चित आश्विनशुध्द ॥९९॥
करीत असतां हरिभजन । ब्रह्मांडीं तेव्हां नेला प्राण । आठवोनियां श्रीहरिचरण । देहावसान जाहलें ॥१००॥
भोवंती सहस्त्रावधि मंडळी । दिंडयापताका येती त्या वेळीं । सुरवर वर्षिती पुष्पांजली । नामआरोळी एकसरा ॥१॥
एक प्रहरपर्य्म्त तेथ । लोकांसी नाहीं देहभ्रांत । गुलालबुका उधळिती अमित । पुष्पें अगणित वर्षिती ॥२॥
घेती सर्वही गुंडादर्शन । मंत्रघोष गर्जती ब्राह्मण । कित्येक टाळविणा घेऊन । भजनकीर्तन करिताती ॥३॥
कोणी करिती नामघोष । कोणी रडती करुनि आक्रोश । नौबदी सनया असंमास । वाजती सुरस एकविध ॥४॥
आणूनि चंदन तुलसी काष्ठ । चिता रचियेली वरिष्ठ । वरी बसवूनि मूर्ति श्रेष्ठ । अग्नि उत्कृष्ट चेतविला ॥५॥
अग्नीसीही वाटे आनंद । जनदहनाचें जें पाप अगाध । तें सत्संगें जावोनि होईन शुध्द । म्हणोनि मोद मानित ॥६॥
धन्यत्व मानिती काष्ठादिभूमि । कृतकृत्य जाहलों खरे आम्ही । कुसंगें भ्रष्टविती आम्हां कर्मीं । सत्संगमीं शुध्द होऊं ॥७॥
प्रत्येकांनी प्रसाद म्हणून । एकेक चिमटी रक्षा तेथून । नेतां उरली नाहीं जाण । तेथें निदान कांहींचि ॥८॥
पुत्रवत्सल श्रीगुंडा खरा । एकदोन पुत्र असती इतरां । ज्याची संतती दिगंतरा । प्रगट निर्धारा अगणित ॥९॥
प्रत्येक शिष्याचा पुत्रधर्म । आपुलाले गृहीं क्रियाकर्म । गुंडाचे करिती उत्तम । धरोनि नेम यथाविधि ॥११०॥
असो त्यांच्या चुलत बंधूचे पुत्र । नारायणबुवा हरिबुवा पवित्र । देगलुराश्रमीं होतें स्वतंत्र । दोघे एक मठामाजी ॥११॥
यशवंतपुत्र नारायण वडील । दुजा हरिबुवा धाकटा मूल । पंधरा वर्षांचे वय केवळ । होते सुशील स्वभावें ॥१२॥
त्यांसी कळतां गुंडानिर्याण । दु:ख पावलें दोघे जण । परी दोघांसी गुंडाकृपा पूर्ण । पूर्वीच जाण अनुग्रह ॥१३॥
वडील नारायणबुवा विरागी । गुंडाची उत्तरक्रिया करी अंगीं । भजनपूजनादि तो योगी । स्वानंद भोगी गुरुध्यानीं ॥१४॥
गुंडाचा सर्व मठाधिकार । त्यांचे नांवे चालिला साचार । पुढें तेही सहा महिन्यानंतर । लोकांतर पावले ॥१५॥
असो पंढरीसी येतां वारकरी । त्यांसी गुंडा भेटले वाटे माझारी । देवपुरा जातों बोलिल्यावरी । पावले पंढरी लोक ॥१६॥
पंढरीत कळलें वर्तमान । कीं झालें गुंडाचे निर्याण । आश्चर्य वाटे तें ऐकून । काल भेटून आलों म्हणती ॥१७॥
पंढरीत कळाली ऐसी ख्याती । आश्चर्य वाटे सर्वाचे चित्तीं । गुंडामाहात्म्य अद्भुत म्हणती । काय करिती तें नकळे ॥१८॥
श्रोतीं पुढें ऐकावें सादर । श्रीहरिबुवा कथासुंदर । सद्गुरु ध्यावा निरंतर । कृपा कर नारायणा ॥१९॥
इति श्रीगुंडामाहात्म्य उत्कृष्ट । विठ्ठलसंवाद मल्लारिभेट । जागीर कथा गुंडाचा सस्त्रीशेवट । बाविसावा श्रेष्ठ अध्याय हा ॥१२०॥
॥ श्रीसदुगुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय २२ वा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP