श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय सतरावा
प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.
॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥
ॐ नमोजी गणपति । कार्यारंभीं मंगलमूर्ति । तूंचि शारदा आदिशक्ति । वक्तृत्वमति जिचेनी ॥१॥
प्रत्यगात्मा शिवसद्गुरु । अद्वय वरद तूं कल्पतरु । सर्वाद्यकुलदैवत शंकरु । भवब्धितारुं लक्ष्मीनाथ ॥२॥
असो पूर्वाध्यायीं तो छलक । शरण झाला गुंडासी नि:शंक । आतां तेथूनि गुंडा देख । निघती सकळिक शिष्यांसह ॥३॥
जेव्हां तेथूनि गुंडा निघाला । शिष्यसमुदाय पाठीं चालिला । पाहतां गुंडा स्त्रीसह एकला । बहू माजला शिष्यभार ॥४॥
तंव वंजरेच्या वाळवंटीं । सद्गुरु एक मास काळ कंठी । पौषसंक्रमण शीतवृष्टि । क्रमिलें तटीं भजनानंदें ॥५॥
तेथें एक कोसापर्यंत । पडिला होता शिष्य अवर्त । स्नानसंध्या भजन करित । काल क्रमीत गुंडा तेथें ॥६॥
पीक करपे ऐसा शीतकाळ । परी गुंडा योगबळें सबळ । कोणासी शीत बाधूंनेदी अमळ । होते सकळ स्वस्थचित्तें ॥७॥
पुढें पौषमास संपतां । श्रीगुरु निघाले ग्रामपंथा । एक नगर लागलें वाटे जातां । ऐका कथा तेथींची ॥८॥
ग्रामीं देशपांडिये बंधू चार । ज्याची सेना होती फार । पंचशत होते घोडेस्वार । महाकठोर पायदळ ॥८॥
अतिउन्माद क्रोध उघडा । कठोर भाषण बोलती तडतडां । सदैव करिती प्रजापीडा । समुदाय गाढा दुर्जनाचा ॥१०॥
ऐसे होते ते दुर्जन बळी । गुंडा येतां त्या ग्रामाजवळी । तेथील येऊनि कांहीं मंडळी । श्रीगुंडासी त्या वेळीं प्रार्थिती ॥११॥
म्हणती सद्गुरु कृपा करोन । ग्रामांत चलावेंजी आपण । तंव जाणोनि गुंडा तेथील चिन्ह । बोलती वचन येणें नाहीं ॥१२॥
तंव त्या सर्वांनी पद धरिलें । म्हणोनी गुंडासी शिष्य बोलिले । एक रात्र क्रमितां काय गेलें । ऐकूनि राहिले श्रीगुरु ॥१३॥
शिष्यासह जावोनि ग्रामीं । गुंडा राहिले एके धामीं । विप्र लागले पाक कर्मीं । उभे स्वामी भजनांसी ॥१४॥
मागें होती कांहीं मंडळी । त्यांनी घेतली चनकाची डाहळी । एक एक मुष्टि करकमळीं । येतीं उतावळी गुंडाकडे ॥१५॥
तंव रक्षक आले धावत । डाहळी उपटली सांगतां मात । राव स्वरांसी आज्ञापित । आणा त्वरित धरुनि त्यां ॥१६॥
स्वार उन्मत्त पळवोनि घोडा । हात उगारुनियां कोरडा । सर्वांसी त्यां घातला वेढा । मारिती फडफडा बोलूनी ॥१७॥
ते सर्वही रडत येती । गुंडालागीं वृत्तांत सांगती । सद्गुरु शांतमनें ऐकती । काहीं न बोलती कोणासी ॥१९॥
ऐसा पाहूनि रावाचा प्रमाद । कोपला तेव्हां शिष्यवृंद । म्हणती नको या दुष्टांचा संबंध । चला सर्व सिध्द होवोनी ॥२०॥
ऐसें ऐकूनि गुंडा निघाला । त्यामागें समुदाय चालिला । ग्रामाधिकारी तो आडवा आला । पायीं लागला श्रीगुरुच्या ॥२१॥
गुंडा म्हणत रामा कृष्णा हरि । न बोलतां उतरले पायरी । सवेंचि गेले वाडयाबाहेरी । पदर पसरी राव तेव्हां ॥२२॥
तेव्हां कोणाचेंही न चले बळ । म्हणोनि करिती सर्व तळमळ । म्हणती साधु कोपला प्रबळ । केंवि शीतळ होय आतां ॥२३॥
ग्रामस्थ म्हणती सुज्ञ श्रेष्ठा । अन्याय नसतां कांहीं मोठा । व्यर्थ ताडिलें हा मार्ग खोटा । केला काय तोटा म्हणूनि ॥२४॥
असो तेथूनि श्रीगुरु सत्वरी । तैसेच गेले ग्रामाबाहेरी । वार्ता कळली ग्रामग्रामांतरीं । आले झडकरी जन तेथें ॥२५॥
तत्काळ आणूनि अयाचित । सद्गुरुपुढें ठेविती बहुत । पाक करोनि जेविले समस्त । जवळी तेथ सरितातटीं ॥२६॥
तेव्हां खिन्न जाहले देसाई । ग्रामस्थ गांजिती म्हणती सर्वही । गुंडासी शरण जा या समयीं । आम्ही अन्यायी म्हणोनि ॥२७॥
अवश्य म्हणूनि तये वेळां । पालखीमाजी बैसोनि निघाला । येऊनि साष्टांग प्रणाम केला । कृपें दीनाला क्षमा करा ॥२८॥
तेथें ज्ञाते म्हणती पावन । करोनि घ्यावें याचें अन्न । अद्वेष्टा गुंडा तें करी मान्य । म्हणे परतून ग्रामा न येऊं ॥२९॥
तेथे उद्यानीं दिधला ठाव । उतरला शिष्यसमुदाव । अयाचित आणोनि सर्व । पाक अपूर्व सिध्द केला ॥३०॥
यथासांग जाहलें भोजन । शिष्यांनी बाग नासिला संपूर्ण । देसाई प्रात:काळीं उठोन । आला दर्शन घ्यावया ॥३१॥
पुढारी म्हणती आम्हां माझारीं । हा एक असे ब्रह्मचारी । तो आशिर्वाद देईल जरी । आम्हां निर्धारीं मान्य तो ॥३३॥
आठही म्हणती ब्रह्मचारिया । कांहीं आशिर्वाद द्यावा यया । येरु म्हणे सप्तजन्म ऐसिया । दुर्गती निर्दया होईल ॥३४॥
संतति संपत्ति विवर्जित । पद भ्रष्ट होईल यथार्थ । ऐकोनि गुंडा म्हणती अनर्थ । केला किमर्थ स्वामी तुम्ही ॥३५॥
अल्पान्याया थोर दंड । करुं नये तुम्ही स्वामी प्रचंड । हा शाप न चुके जरी उदंड । अखंड केले अन्य यत्न ॥३६॥
परी राया करीं हरिभजन । येणें चुके तंव भवबंधन । मग तो करी नामस्मरण । रात्रंदिन सद्गुरुचें ॥३७॥
येणें चुके सर्व अपाय । कृपा करी जेव्हां सद्गुरुराय । दीनबंधु अभिमानी बापमाय । केला नि:संशय शापमुक्त ॥३८॥
असो अग्राहार एक सिध्दस्थळ । तेथूनि तादळापूर जवळ । एकेक रात्र राहूनि गुंडा केवळ । आले तत्काळ रामपुरा ॥३९॥
रामपुरीं भजनपूजन । करुनि केलें संतर्पण । पुढें देगलुरा येऊन । राहिले जाण स्वाश्रमीं ॥४०॥
राहती ब्रह्मानंदीं सदोदित । अपार येती अयाचित । सहस्त्रावधि जेविती संत । विप्र अगणित पांथस्थही ॥४१॥
ऐसा वर्णिती सर्व धन्य गुंडा । ज्यानें लाविला परमार्थीं झेंडा । भेटीसी येती साधुसंत झुंडा । प्रिय मार्तंडा म्हणोनि ॥४२॥
गोविंद बक्ष औरंगाबादी । असतां आरुढ राज्यपदीं । गुंडाकीर्ति ऐकूनि प्रसिध्दि । निघाला अवधी पाहूनी ॥४३॥
जो चंदूलालाचा भाऊ जाण । सत्यकर्मीं न्यायनिपुण । याचकासी इच्छित दे दान । विद्याधन संपन्न ॥४४॥
ब्रह्मज्ञानही बहुतां परी । परी शांति नाहीं ज्यासि अंतरीं । सद्गुरुवीण आत्मप्राप्ति खरी । नाहीं निर्धारीं तळमळी ॥४५॥
ऐसा त्या होवोनि अनुराग । सद्गुरुकडे येत लागवेग । दोघां पुत्रांसह क्रमोनि मार्ग । सैन्य सवेग घेऊनी ॥४६॥
सुरेख जदित बहु भूषण । पूजासमारंभा अत्यंत धन । घेऊनि पातला गुरुकारण । प्रेमें पूजन करावया ॥४७॥
येऊनि उतरला देगलुरीं । डेरे दिधले चहूं फेरी । धरोनि दोघां पुत्रां दों करीं । पातला सत्वरी दर्शनासी ॥४८॥
करोनि साष्टांग प्रणिपात । उभा कर जोडूनि प्रार्थित । सद्गुरु होऊनि कृपावंत । दीन अनाथ उध्दरावा ॥४९॥
तुम्ही साक्षात् सद्गुरु सर्वेश । मजला द्यावा जी उपदेश । आतां नसे मज प्रपंचीं आस । जाहलों उदास गुरुसाठीं ॥५०॥
ऐसें बोलूनि ते अवसरीं । स्नान करोनि सहपरिवारीं । पूजासामग्री घेऊनि करीं । आला सत्वरीं गुंडापाशीं ॥५१॥
तेव्हां स्नानसंध्या सारुन । संपलें ज्ञानेश्वरीपुराण । हातीं वीणा चिपळ्या घेऊन । बैसले भजन करीत ॥५२॥
येरुनें सुवर्णस्नान घातलें । तें ब्राह्मणांनीं वेंचूनि नेलें । नानालंकार भूषण दिधलें । लेवविलें मुगुटादि ॥५३॥
नेसविला पीतांबर । नाना पुष्पतुलसीहार । गौरविला शिष्यसंभार । घेतला सत्वर अनुग्रह ॥५४॥
दधिशर्कराघृतसंयुक्त । पक्वान्नें करविलीं अगणित । संतर्पण केलें आनंदभरित । जाहला तृप्त ब्रह्मवृंद ॥५५॥
व्यजन चामर उत्तम पीठ । पादुका दिधल्या अति चोखट । शृंगार रत्नादि अत्युत्कृष्ट । अर्पिले ताट रत्नांचे ॥५६॥
ऐसें अर्पिलें सुंदर रत्न । परी गुंडा न पाहे अवलोकून । ब्राह्मण नेताती उचलूण । आपण निमग्न भजनांत ॥५७॥
विरागी पाहूनि श्रीगुरुमूर्ति । गोविंदबक्ष बहु आनंदती । धन्यधन्य श्रीगुरु म्हणती । अवतार क्षितीं दत्ताच ॥५८॥
जो कां निरपेक्ष निरामय । तोचि श्रेष्ठ सद्गुरु होय । जैसा तेजस्वी प्रखरसूर्य । सद्गुरु माय तैसी माझी ॥५९॥
एकांतीं बोलूनि कांहीं शब्द । गुरुचा घेतला पूर्ण प्रसाद । जे महावाक्य बोलती वेद । तोचि बोध लाधला ॥६०॥
पाहूनि गुंडाभजनाचा महिमा । वाटे आलों वैकुंठधामा । कधीं खंडा नाहींच नामा । लाधला प्रेमा नित्य नवा ॥६१॥
ऐसा सप्तदिनपर्यंत । उत्सव झाला अत्यद्भुत । यावरी रामबक्ष निरोप घेत । गेला त्वरित भाग्यपुरा ॥६२॥
असो आतां श्रोते सावध । कथा ऐकावी रसाळ बुध । गुंडा पंढरी जातां प्रसिध्द । भक्त अगाध भेटले ॥६३॥
हणमंतराय संतुकराय । मार्गी भेटूनि धरिले पाय । प्रार्थूनि नेला सद्गुरुराय । पूजा होत जाय प्रतिग्रामीं ॥६४॥
वाटे जात असतां ग्रामीं एक । सिध्द पुरुष भेटले भाविक । ते होते शक्तिउपासक । असती आणिक साक्षात्कारी ॥६५॥
अखंड चाले अग्निहोत्र । सर्वांभूतीं अन्नसत्र । तेथें गुंडा राहिले एक रात्र । गृह पवित्र जाणोनि ॥६६॥
तीर्थप्रसाद केला ग्रहण । पावली एकमेकां आत्मखूण । धन्य म्हणती आजिचा दिन । आनंद पूर्ण जाहला ॥६७॥
वंजरातीरीं ब्राह्मणविष । धरुनि बैसले रामदास । मुख्य प्राणमंदिरीं सावकाश । ध्यानीं रामास आणोनि ॥६८॥
सद्गुरु गंडा आलें त्याठायीं । रामदासपदीं ठेविली डोयी । कळतां आत्मखूण तें समयीं । आनंदहृदयीं न समाये ॥६९॥
एक शंकर एक विष्णु । एक प्रभा एक किरणू । एक वृकोदर एक जिष्णु । समसमानु दोघेही ॥७०॥
एकमेकांसी देऊनि भेट । धरुनि जाती आपुलाली वाट । भक्तोध्दारक दोघेही श्रेष्ठ । जाताती नीट प्रियपुरा ॥७१॥
गुंडा मार्गी जातां दोन्ही भागीं । लोक धांवती दर्शनालागीं । स्वगृही नेवोनि सभाग्यी । पूजिती अंगीं गुरुराज ॥७२॥
कित्येक सज्जन पूजा करिती । कित्येक निंदक त्यासी निंदिती । कित्येक दुर्जन अपमानिती । परी खंती गुंडा न धरी ॥७३॥
ज्याची सत्ता त्रिजगीं थोर । अज्ञान धारक यमकिंकर । त्यापुढें किती मूर्ख नर । शांतिघर असे ज्याचें ॥७४॥
परी छलक कित्येक संकल्प । करोनि घालिती नाना आरोप । कित्येक शिष्य कित्येक ताप । देती अमूप दुष्टपणें ॥७५॥
असो एकदां घोर वनांतूनी । सद्गुरु चालिले त्वरेंकरुई । पुत्रस्नुषासह राधा म्हणूनि । शिष्यगणी मागें होती ॥७६॥
भ्रतार तिचा मरण पावला । द्वादश वर्षांचा मुलगा तिला । लहान स्नुषा घेऊनि अबला । वास केला गुंडापासीं ॥७७॥
वाट चालतां मंडळी समस्त । मागें पुढें विस्तृत होत । राधा थकली पुत्रासहित । म्हणूनि बैसत वृक्षातळीं ॥७८॥
ग्रीष्मऋतु अतिउष्ण । तेणें तृषित व्याकुळ प्राण । जवळी कोठेंही नाहीं जीवन । पुसतां खूण सांगे एक ॥७९॥
पैल तो वृक्ष पहा केवळ । त्यांत जंबूवृक्ष तो विशाळ । त्याखालीं जीवन असे तुंबळ । अति शीतळ जावें तुम्हीं ॥८०॥
तंव तो ब्राह्मणीचा कुमर । जळ आणावया जात सत्वर । तेथें शार्दूल निघाला थोर । लोक समग्र पाहती ॥८१॥
तों अकस्मात झांप घालून । विदारुनि भक्षिला ब्राह्मण । अस्थिपंजर तेथें टाकून । गेला निघून निमिषांत ॥८२॥
तंव ती राधा घाबरली । दीर्घ आक्रंदोनी धाय मोकली । चिमणी स्नुषा जवळ घेतली । मूर्च्छित पडली भूमीसी ॥८३॥
हा कर्म माझें कैसें गहन । हारपलें माझें पुत्र निदान । मज अंधाची काठी हिरोन । नेली जाण व्याघ्ररुपें ॥८४॥
माझें एकुलतें एक बाळ । अति कोमळ परमस्नेहाळ । पत्नी याची सुंदर वेल्हाळ । केला भाळ सुना हिचा ॥८५॥
जळो जळो हे माझे नयन । करिती अनर्थाचें दर्शन । जन्मजन्मांतरींचें पाप गहन । फळासी पूर्ण आलें हें ॥८६॥
जेव्हां विप्रपत्नी ती मुलगी रडे । तेव्हां काळजाचे होती तुकडे । आहा वैधव्य कैसें रोकडें । आलें बापुडें अल्पवयीं ॥८७॥
तेव्हां चंडांशु अस्त । येरु वृक्षातळीं निचेष्टित । गुंडासी ध्यानीं कळतां वृत्तांत । शिष्य धाडित आणावया ॥८८॥
तेव्हां शिष्य येवोनि दोघे । पाचारोनि राधा नेली संगें । सद्गुरुसी साकल्ये वार्ता सांगे । जाहलें मागें तें सर्व ॥८९॥
तेव्हां राधा बोले आक्रंदून । व्याघ्रें मारिला माझा नंदन । गुंडा बोलती हास्यवदन । येतो निदान पुत्र तुझा ॥९०॥
पुत्राचें नाम घेवोनि एक । राधा मारीतसे हाक । तत्काळ पाठीसी मातेच्या देख । उभा नि:शंक राहिला ॥९१॥
ऐशी अगम्य गुंडालीला । प्रत्यक्ष व्याघ्रानें जो भक्षिला । तो पुनश्च शिशु उभा देखिला । अघटित घडला प्रताप हा ॥९२॥
राधा नमूनि करी स्तवन । सद्भावें धरिलें गुंडाचरण । म्हणे सोडविलें काळापासूण । जेंवि कृष्ण गुरुपुत्रा ॥९३॥
धन्यधन्य गुंडामहिमा । पूर्ण कळूं आला आम्हां । शिष्यें धरिले पादपद्मा । म्हणती सीमा जाहली आतां ॥९४॥
स्नुषेसी वदे राधा वदनीं । तूं श्रीगुरुप्रसादें करुनी । झालीस सौभाग्यवर्धिनी । लाग चरणी गुंडाचे ॥९५॥
त्या आनंदासी कोठें काहीं । उपमा द्यावया ठाव नाहीं । असो अखंडानंदें पाही । गुंडा राही भजनांत ॥९६॥
ऐसा चमत्कार दावून । पुढें केलें पंढरीस गमन । चंद्रभागेंत करुन स्नान । पुंडलिकदर्शन घेतलें ॥९७॥
पांडुरंगाची घेऊनि भेट । महाद्वारीं भजन केलें चोखट । गोपाळपुरींचा काला श्रेष्ठ । क्रमिला उत्कृष्ट चातुर्मास ॥९८॥
ऐसें हें गुंडा माहात्म्य सुंदर । श्रोतीं श्रवण करावें सादर । पुढील अध्यायीं कथा मोदकर । मोक्ष देणार भाविकां ॥९९॥
मंगलधामा भवभयांतका । जगजीवना भक्तपालका । साह्य होसी तूं लक्ष्मीनायका । विघ्नांतका नारायणा ॥१००॥
इति श्रीगुंडामाहात्म्य सुरस । मकर क्रमी गुंडा गंगेत मास । आणिलें व्याघ्र भक्षिल्या मुलास । पूर्ण सप्तदश अध्याय हा ॥१०१॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥
अध्याय १७ वा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : September 14, 2022
TOP