ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ३
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
नारायणासि सकळात्मकताचि जेव्हां
आत्मा चिदात्मक जडात्मक तोचि तेव्हां
जीवैक्यतेस्तव चिदात्मकता तसी हे
चैतन्य आणि जड - ऐक्य असेंचि आहे ॥६१॥
जीवास देहद्वय हे उपाधी
तत्वें जडें त्यांसि निमित्त आधीं
झालीं जसा सर्प असत्य दोरीं
नारायणीं सर्व अशा प्रकारीं ॥६२॥
जीवांला म्हणती जसे नर तसे त्यांच्या उपाधीप्रती
शास्त्रीं व्याकरणांत नार म्हणती तत्त्वें जडें मोजिती
त्याचा आश्रय रज्जु जेविं लटिक्या सर्पा प्रकाशी धरी
श्री नारायण नार - आश्रय असा आत्मा जडाचा हरी ॥६३॥
चैतन्य आणि जड दोनिच भेद लोकीं
आत्मा जसा उभयतांसिहि एक तूं कीं
या कारणें नव्हसि केवळ तूंचि कैसा
नारायणा त्रिभुवनात्मक तूंचि ऐसा ॥६४॥
नारायणाख्य हरिनाम तदर्थ धाता
आणीकही करुनि अर्पितसे अनंता
की तूं अधीश सकळात्मक ईश जेव्हां
नारायण त्रिभुवनेश न केविं तेव्हां ॥६५॥
जे जीव ते नर तुझे प्रतिबिंब देवा
तूं बिंब ईश्वर निया मक वासुदेवा
जो नार जीव - समुदाय समस्त - देहीं
नारांसि त्या अयन आश्रय तूं असाही ॥६६॥
आणिक नारायण - नाम धाता
व्याख्यानरुपें विनवी अनंता
कीं सर्वसाक्षी हरि तूंचि जेव्हां
नव्हेसि नारायण केविं तेव्हां ॥६७॥
तंतूंत जेविं पट हें जड चित्स्वरुपीं
तें श्रुद्ध - सत्वमय तूं हरि साक्षिरुपीं
नारांसि जो अयन तोचि अधीश साक्षी
नारायणाख्य तरि तूंचि समस्त - पक्षीं ॥६८॥
नारायणार्थ वदला इतुके विरंची
झाली तथापि बहु शंकित बुद्धि त्याची
कीं नारसंज्ञक - जळीं प्रळयीं निजेला
नारायण प्रभु असें म्हणती तयाला ॥६९॥
तो पद्मनाभ उदकीं भुजगें द्रशायी
मी चोरितों पशुपदनंदनवत्स गायी
नारायणत्व घडतें मजलागिं कैसें
ब्रम्हा म्हणे झणि मुकुंद म्हणेल ऐसें ॥७०॥
या कारणें कमळ - संभव बोलता हे
कीं बोलणें हरि कदापिहि हें नसाहे
रुपें तुझीं दिसति भिन्न तरी तथापी
रुपें समस्त लटिकीं हरि तूं अरुपी ॥७१॥
नारें ज्या प्रळयोदकासि म्हणती येथें निजे श्रीपत्ती
तेव्हां आश्रयतें जळेंचि हरिला ऐसें श्रुती बोलती
श्रीनारायण - नाम यास्तव जया देहास तोही असा
मायामात्र न सत्य येरिति पहा बोले विधाता कसा ॥७२॥
नसोनी करी सर्प रज्जू तसाच
म्हणोनी म्हणे कीं जसा सर्प साच
नसोनी असेला दिसे विश्व सारें
म्हणोनी जडें हीं नरांचींच नारें ॥७३॥
जे रज्जु नेणति तयांस भुजंग आहे
सर्वज्ञ रज्जुच असा समजोनि पाहे
पाहे निजीं लथ जळें हरि याप्रकारें
त्याकारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७४॥
संहार सर्वहि करुनि जळीं निजेला
द्रष्ट्यास दृश्य जळ मात्र उरे तयाला
त्याला अखंड निजरुपचि दृश्य सारें
याकारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७५॥
सृष्टि - स्थिति - प्रळय - कार्य करी तथापी
जीवांस सत्य हरिलागिं मृषा स्वरुपीं
जीं जीवदृष्टिस नविष्णुस सत्य नारें
या कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७६॥
जीवांत कोणिहि न तेसमयीं तथापी
तदृष्टिनें उदक पाहतसे स्वरुपीं
कीं जीव - दृष्टिस जसीं दिसणार नारें
या कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७७॥
रज्जूस सर्प म्हणणार न अज्ञ जेव्हां
सर्वज्ञ दोंपरिहि पाहतसेच तेव्हां
पाहे हरी लय - जळांस अशा प्रकारें
या कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७८॥
जागाचि जोवरि जळांत अभाव - साक्षीं
ऐसा जळांस नरदृष्टि करुनि लक्षी
कीं रज्जु मी जळ भुजंग अशा प्रकारें
या कारणें म्हणति त्या उदकासि नारें ॥७९॥
नारें असीं लय जळें नर - हेतुभूतें
निद्रार्थ तें अयन आश्रय माधवातें
ऐसा समास करितां प्रळयां बुशायी
नारायणाख्य हरिरुप तथापि मायी ॥८०॥
तो तूंचि यास्तव न संशय येथ कांहीं
हा रुप भेद तरि रुपचि सत्य नाहीं
रुपें अनेक धरितो नट वेषधारी
रुपें असत्य नष्ट तूंचि खरा मुरारी ॥८१॥
या लागिं नारायण तूंचि जेव्हां
मीं पुत्र तूझा श्रुति - सिद्ध तेव्हां
हें पूर्वपद्यें वदला विधाता
स्थापूनियां तें स्तविलें अनंता ॥८२॥
अहो मायिकें सर्व रुपें हरीची
असा बोलिला श्लोक पूर्वी विरंची
पुढें बोलतो कीं मला जन्म जेव्हां
असत्यत्वही देखिलें म्याचि तेव्हां ॥८३॥
तें सत्य पाण्यांतील रुप जेव्हां
म्या काय तें देखियलें न तेव्हं
खरेंचि तें कां उदरीं दिसेना
जें बाह्य तें आंतहि कां असेना ॥८४॥
शरीर तें मागुति वासुदेवा
म्या देखिलें काय न देवदेवा
श्लोकांत हा केवळ अर्थ येथें
भावार्थ तो पूर्वकथाचि तेथें ॥८५॥
कीं तें म्हणो जरि जळांतिल रुप साचे
मिथ्यात्व म्याचि अवलोकियलें तयाचें
कीं त्यांत मी कमळ नाळपथें निघालों
धुडूनि वर्षशत त्यांतुनि मीचि आलों ॥८६॥
बाहेरि ये तंवहि एकसरें मुरारी
म्या देखिली सगुण सुंदर मूर्ति सारी
तेंही अरुप निजरुप तुझें मुकुंदा
भक्तासि दाविसि विचित्र - मुखाऽरविंदा ॥८७॥
बाहेरि मूर्ति दिसते निघतां शरीरीं
आकार तो किमपि हीन दिसे मुरारी
तेव्हां जसा पठ दिसे परि त्यांत कांही
तंतू विणें इतर वसु कदापि नाहीं ॥८८॥
एवं तुझें कमळनाभ शरीर दृष्टीं
जें देखिलें उदकिं तेथुनि सर्व सृष्टीं
तेंही न सत्य म्हणवे जगदात्मदेवा
भावार्थ हाचि वदला विधि वासुदेवा ॥८९॥
जे सर्व कारण शरीर न सत्य तेंही
ऐसें तयीं सकळ विश्वहि सत्य नाहीं
प्रत्यक्ष सत्यहि असत्य कसें म्हणावें
हा पूर्वपक्ष उठला त्दृदयीं स्वभावें ॥९०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP