ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १३
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
या पूर्वपक्षाख्य तमासही तो श्री सूर्य - दृष्टांतचि येथ येतो
बुद्धीस जेथें उभय - प्रतीती स्फुरोनि दोनी न विचाररीती ॥३६१॥
बंध दुःख मति जाणत होती मुक्ति ती करुनि मुक्त पहाती
हें घडेच परि मोक्ष जयाला तो स्वबिंबसुख त्यांत मिळाला ॥३६२॥
बंध मोक्ष करिजे प्रतिबिंबीं बुद्धि तेच उरली मग बिंबीं
बंध मोक्ष तिस दोनि न तेथें दीसती अगुण केवळ जेथें ॥३६३॥
जाणें जरी ते मति बंध मोक्षा बिंबांत तो तीस तयेच लक्षा
जो कां दिवारात्रिस जाणता हे तोही न सूर्यात तयांस पाहे ॥३६४॥
अरुण कश्यपनंदन सारथी सतत जो वसला रविच्या रथीं
दिवस - रात्रिस जाणतसे जरीं न रवि - मंडळिं देखतसे तरीं ॥३६५॥
बंध - मोक्ष दिसती प्रतिबिंबीं त्यास ऐक्य घडल्यावरि बिंबीं
मुक्त दोनिहि नदेखति तेथें जीतमुक्त जरि वर्तति येथें ॥३६६॥
कर्मभोग सरल्यावरि बुद्धी नाशल्या वरिल ईश उपाधी
मुक्ति देउनिहि जो प्रतिबिंबा वर्ततोचि अवलंबुनि बिंबा ॥३६७॥
तो लयीं मिळतसे जरि बिंबीं सृष्टिकारण पुन्हा अवलंबी
तो असत्य परि बिंब म्हणावा मोक्ष - नित्यपण येरिति भावा ॥३६८॥
बंध मोक्ष म्हणऊनि न बिंबीं ते कधीं नचुकती प्रतिबिंबीं
पक्ष संमत न हाच जयाला बंध मोक्ष म्हणवे न तयाला ॥३६९॥
बद्धता न म्हणती प्रतिबिंबा बंधमोक्ष घडती मग बिंबा
मुक्ति ज्यास भव बंधहि त्याला ब्रम्ह बद्ध कवणेपरि बोला ॥३७०॥
जडास तों मोक्ष कधीं घडेना बंधामधें ब्रम्हहि सांपडेना
या कारणें हें प्रतिबिंब घ्यावें तें बद्ध तें मुक्त असे म्हणावें ॥३७१॥
बंध - कारण जसीच अविद्या मोक्ष - कारण तसी निजविद्या
कारणें अनृत दोनिहि जेव्हां बंध मोक्षहि असत्यहि तेव्हां ॥३७२॥
विद्या अविद्या जरि बिंबरुपीं हा बंधही मोक्षहि त्या स्वरुपीं
ज्ञानें जरी बंध गळोनि गेला आत्मा असे मोक्ष जयासि झाला ॥३७३॥
गेली जरी ग्रंथि सुटोनि दोरी जो सूटला तो नवजाय दूरीं
जों मुक्त तों मुक्ति असेचि त्याची हें बोलतां मुक्ति तयासि साची ॥३७४॥
म्हणाल कीं ईश उपाधि आहे तो मुक्तिच्या मुक्तपणा नसाहे
मुक्तीस मिथ्यात्वहि याप्रकारें म्हणाल हेंही जरि या विचारें ॥३७५॥
स्वरुपीं जया बोलतां हा उपाधी स्वरुपीं तया मानितां बंध आधीं
अहो चित्स्वरुपांत एकांत ऐसें वदा बंधही मोक्षही नित्य कैसे ॥३७६॥
हा नित्य - मुक्त रविरुप उपाधि जेथें
अज्ञानबंध तम अंधहि केविं तेथें
होता असें प्रथम साधुनि मुक्ति त्याला
या नित्य - ईश्वर - उपाधि करुनि बोला ॥३७७॥
आतां अवस्थात्रय एकजीवा बद्धत्व मुक्तत्व असेंचि भावा
म्हणाल ऐसें जरि झोंप जेव्हां प्रबोध नाहींच तसाच तेव्हां ॥३७८॥
जडा अवस्था परि त्या जयाला जडत्व हें तों वदवे न त्याला
तिन्ही अवस्था जरि त्याचलागीं एके अवस्थेंत दुजी न भोगी ॥३७९॥
हा नित्यमुक्त सदुपाधि जया स्वरुपीं
तेथेंचि एकसमयीं भव बंध रुपीं
होतो उपाधि म्हणतांचि विरुद्ध येतें
यालागिं बद्ध म्हणतां प्रतिबिंब होतें ॥३८०॥
हेंही असो प्रस्तुत एक येथें कीं सूर्य दृष्टांत असेल जेथें
तेथें नघेतां प्रतिबिंब - पक्षा श्लोकार्थ सिद्धांत नयेचि लक्षा ॥३८१॥
दिवस रात्रि असोनिहि भूतळीं दिसति तीं न जसीं रविमंडळीं
घडति बंधहि मोक्षचि जें जिवा दिसति ते मुजमाजि न माधवा ॥३८२॥
बंध मोक्ष दिसती प्रतिबिंबीं तेचि दीसति कदापि न बिंबीं
अर्थ अन्यरिति येथ घडेना संत त्दृत्पदकिं रत्न जडेना ॥३८३॥
जे विकल्प धरिती प्रतिबिंबीं त्यांस भोक्तृपण येईल बिंबीं
दुःख आणि सुख तों न जडाला कोण भोगित असे तरि बोला ॥३८४॥
मिथ्या म्हणाल तरि रज्जुंत सर्प नाहीं
द्रष्टा खरा म्हणुनियां भयकंप देहीं
श्रुक्तींतही रजतलाभ सुखास मानी
मिथ्या प्रपंच परि भोग घडे निदानीं ॥३८५॥
श्लोकांत या तरि अहो प्रतिबिंब नाहीं
शंका अशी जरि धराल मनांत कांहीं
श्लोकांत याच म्हणतो विधि अंबुजाक्षा
तूझ्या अखंडितपणीं अनृतत्व मोक्षा ॥३८६॥
नसे खंड तूझ्या चिदात्म - स्वरुपीं नसे बंध ही मोक्ष ही त्याच रुपीं
विधाता असें बोलिला स्पष्ट जेव्हां नसे टाव त्या बंध मोक्षांसि तेव्हां ॥३८७॥
चैतन्य खंडित न हें प्रतिबिंब घ्यावें
बद्धत्व मुक्तपण ही कवणा म्हणावें
याची प्रतीति नसतां तुजमाजि नाहीं
हें बोलणें उचित तों नदिसेच कांहीं ॥३८८॥
नसे तूजला त्रास बंध्या सुताचा असें बोलतां येरिती व्यर्थ वाचा
म्हणूनीच जें खंड चैतन्य रुपीं म्हणे तें न तूझ्या अखंड - स्वरुपीं ॥३८९॥
या कारणें निगमही प्रतिबिंब बोले
दुःखें सुखें जड - उपाधिजळांत डोले
हे बंध मोक्ष हरि त्यास असे तथापी
त्यालाचि दोनिहि तुझ्या न निज - स्वरुपीं ॥३९०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP