ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १०
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
निर्दोष जें सुख निरंजन तें म्हणावें
दोषासि अंजनहि बोलति याचि भावें
कीं दोष अंजन जसें तमरुप काळें
यालागिं काजळपणें कथिलें निराळें ॥२७१॥
सुख निरंजन नित्य हरी स्वयें म्हणुनि बोलियला विधि निश्वयें
परम जें सुख लक्षण येरिती स्तविल यावरि भारतिचा पती ॥२७२॥
श्रुति सुख वदती हें सामवेदांत तत्त्वें
अधिगत सुख संतां जें असाधारणत्वें
श्रुति वदति सुखाचें जे स्थळीं नाम भूमा
निपुण म्हणति भूमा तें जयाला न सीमा ॥२७३॥
सतत्कुमाराप्रति नारदानें केला असा प्रश्न विशारदानें
कीं तूं गुरु केवळ दीन - बंधू माझा निवारीं भव - शोक - सिंधू ॥२७४॥
हे दोघही पुत्र विधातयाचे परस्परेंझ बोल असे तयांचे
गाती श्रुती सामक सामवेदीं प्रमाण जे कां सुख - दुःख - भेदीं ॥२७५॥
त्या नारदालागिं सनत्कुमारें दिलें असे उत्तर या प्रकारें
कीं शोक सिंधू उतरोनि जाणें तेव्हां सुखाचें निजरुप जाणे ॥२७६॥
तो नारद प्रश्न करी तयातें कीं तें सुख सांग मातें
स्वरुप तो त्यास वदे सुखाचें कीं नाम भूमा सुख तेंचि साचें ॥२७७॥
या वै भूमा तत्सुखं या श्रुतीचा बोले अर्थ स्पष्ट जो येरितीचा
कीं जो भूमा तोचि आनंद साचा भूमाशब्दें अंत नाहीं जयाचा ॥२७८॥
न देशें न काळें कधीं अंत ज्याला अहो बोलती वेद भूमा तयाला
जडें स्थावरें जंगमें अंतवंतें श्रुती बोलती दुःखरुपें तयातें ॥२७९॥
असी असाधारणता सुखाची या प्रस्तुतीं वर्णितसे विरंची
कीं तूं हरी पूर्ण म्हणूनि धाता या पूर्ण शब्दें स्तवितो अनंता ॥२८०॥
सुख - समुद्र अखंड रमापती लहरिया विविधा विषयाकृती
जळधि तोचि जरी लहरी जळीं जलधि पूर्ण न त्या अवघ्या स्थळी ॥२८१॥
विस्तीर्ण अत्यंत समुद्र जैसा विस्तार नाहीं लहरींस तैसा
समुद्र अंशें लहरींत आहे तरी न पूर्णत्व तरंग साहे ॥२८२॥
तें सर्वकाळीं सुख सर्व ठायीं तो एक नारायण शेषशायी
सुखांशलेशें विषयीं जरी तो तेथें अपूर्ण त्वचि दाखवी तो ॥२८३॥
एवं प्रपंच लटिका अतिदुःखस्वरुपी
आनंद केवळ अनन्य हरिस्वरुपीं
त्याच्या सुखेंचि विषयीं सुख हें विधाता
श्लोकांत भाव वदला स्तवितां अनंता ॥२८४॥
सुखस्वरुपें हरि वर्णियेला तथापिही शंकित चित्त झाला
कीं ज्यामधें हें जग दुःख रुपीं हें द्वैत तों बाधक त्या स्वरुपीं ॥२८५॥
त्दृदयिं शंकित होउनियां विधी मृगजळांत म्हणे रविचे कधीं
किरण हे बुडती जरि ते धवां अनृत - दुःखहि बाधक माधवा ॥२८६॥
जें सत्य तें सत्य असत्य नाहीं न विश्व आहे हरि माजि कांहीं
या कारणें अद्वय तूं अनंता म्हणूनियां वर्णितसे विधाता ॥२८७॥
मिथ्या प्रपंच हरि एकचि सत्य सर्वी
हें चिज्जडैक्य कथिलें विधिनेंच पूर्वी
श्लोकांत या सकळ जीव चिदैक्य आलें
हें सर्व अद्वयपदें स्फुट सूचवीलें ॥२८८॥
नसे द्वैत जेथें नसे त्रास तेथें विधाता असा दावितो भास येथें
असीं लक्षणें रत्नसंख्या हरीचीं स्तुतीमाजि या बोलियेला विरेंची ॥२८९॥
श्लोकांत या भारतिच्या पतीनें निरुपिलें तत्व असे रितीनें
हीं लक्षणें केवळ निर्गुणाचीं साशंक यालागिं मनीं विरंची ॥२९०॥
सगुण सुंदर निर्गुण हा कसा कमळ संभव शंकित तो असा
विमळ ईश - उपाधि मनीं स्फुरे सगुण निर्गुण भेद न तो उरे ॥२९१॥
ब्रम्हीं उपाधि करितां सगुणत्व आलें
साकार रुप मग त्या करितांचि झालें
त्याला स्वयें अगुण हेचि सदां प्रतीती
तेव्हां कसे सगुण - निर्गुण - भेद होती ॥२९२॥
त्दृदयिं येरिति भारतिचा पती धरुनि भाव असा स्वपित्याप्रती
अमृत आणिक मुक्त - उपाधि तो म्हणुनि मूळ पदद्वय बोलतो ॥२९३॥
अमृत म्हणति मोक्षा तोचि तूं अंबुजाक्षा
सगुण - अगुण - लक्षा येसि जो भक्तपक्षा
श्रवण - मनन - साक्षात्कार ज्या ज्ञानदीक्षा
तव तनु करि शिक्षा कीं जगीं धर्मरक्षा ॥२९४॥
जो उपाधि तुजला सगुणत्वीं नित्यमुक्तचि तया शुभसत्वीं
निर्गुणीं सहज नित्य समाधी ज्यास जो हरि तुझा सदुपाधी ॥२९५॥
अगुणताच अखंड पणीं स्फुरे सगुणता मग केविं दुजी उरे
अमृत आणिक मुक्त उपाधि तो द्विपदभाव असा विधि दावितो ॥२९६॥
श्रुति मणि - गण - मेळा श्रुद्ध - बुद्धींत गोळा
करुनि रचुनि माळा लक्षणें जींत सोळा
सजळ - जलद - नीळा अर्पुनी विश्वपाळा
चरण धरुनि भाळा वंदितों त्या कृपाला ॥२९७॥
श्लोकामधें पूर्विलिया अनंता जीं लक्षणें बोलियेला विधाता
तद्वोध कोणेरिति होय संतां प्रकार तो वर्णिल येथ आतां ॥२९८॥
अनन्यें तुझीं लक्षणें हीं मुरारी तुतें जाणती शांत ऐशा प्रकारीं
परी स्वात्मतेनें अशेपात्म भावें न भेदें जना वाटतो जो स्वभावें ॥२९९॥
प्रतिशरीरिं तुझीं प्रतिबिंबकें स्वतनुमात्रचितीं अवलंबकें
म्हणुनि जे सकळात्मक आत्मता हरि तुझी तिस जाणति तत्वता ॥३००॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP