ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ८
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
कीं दृश्य विश्व जरि केवळ सत्य होतें
तूं ब्रम्ह सत्य म्हणतांच विरुद्ध येतें
कीं ब्रम्ह कारण चराचर कार्य तेव्हां
कां तंतु सत्य म्हणणें पट सत्य जेव्हां ॥२११॥
या कारणें पट असत्य म्हणूनि तंतू
जैसा खरा म्हणति कारण सत्य तो तूं
जैसीं स्वयें दिसति तंतु सुवर्ण माती
तैशा स्वयें न पट - कुंडल - कुंभ - जाती ॥२१२॥
तंतू विणेंचि असता पट वस्तु कांहीं
तंतू विणेंचि दिसता तरि सत्य तोही
सोन्या विणें कटक कुंडल येचरीती
तैसें असत्यचि घटादिक सत्य माती ॥२१३॥
दृष्टांत हे सकळ सत्य पणास ऐसे
हे ही पदार्थ जड होतिल सत्य कैसे
जे हे स्वयें सकळ होतिल सत्य जेव्हां
कोण्ही प्रकाशक न यांस दिसेल तेव्हां ॥२१४॥
विश्व ब्रम्हविना स्वयेंचि नदिसे मिथ्या म्हणूनि स्वयें
ज्याणें विश्व दिसे प्रकाशक तया कोणी नसे निश्वयें
तेव्हां तोचि खरा म्हणूनि म्हणतों कीं तूं स्वयं ज्योति तो
आत्मा निर्गुण तो प्रकाश्रुनि जडा विश्व स्वयें भासतो ॥२१५॥
ब्रम्ह स्वयं ज्योति जसें तसा हा जीव स्वयंज्योतिहि कां न पाहा
दोष स्वयं ज्योति पणास तेव्हां जीव स्वयं ज्योति अनेक जेव्हां ॥२१६॥
हरावया या दृढ - पूर्वपक्षा अनंतशब्दें कमळायताक्षा
ब्रम्हा म्हणे तूंचि अनंत जेव्हां दूजा स्वयं ज्योति घडे न तेव्हां ॥२१७॥
अनंत स्वयं ज्योति हा पूर्ण साचा न देशें न काळें गमे अंत याचा
जसा सर्वकाळीं तसा सर्वदेशीं प्रकाशे स्वयें भास मिथ्या प्रकाशीं ॥२१८॥
दहाही दिशा नेणती अंत ज्याचा अनंत स्वयं ज्योति तो तूं विसाचा
शरीराहुनी जीव बाहेरि नाहीं प्रकाशत्व सर्वत्र ज्याला न कांहीं ॥२१९॥
स्वदेहाविणें जो नसे अन्य देहीं स्वयं ज्योति बिंब स्वयें तो न कांहीं
असाही तरी जागृति - स्वप्न - काळीं सुषुप्तींत सत्ता दिसेना निराळी ॥२२०॥
सुषुप्तिकाळीं प्रतिबिंब बिंबीं मिळे स्वबिंबात्म - सुखाऽवलंबीं
तेथें न आनंदहि जाणतो तो उपाधि योगें मग आठवीतो ॥२२१॥
आनंदमात्र परि त्यांत न धर्म कांहीं
नेणे सुधा स्वमधुरत्व असेंचि तेंही
बिंबीं तया मिळतसे प्रतिबिंब जेव्हां
आनंदमात्र परि वृत्तिविहीन तेव्हां ॥२२२॥
रज - तम - कृत दुःखें जाणतो बुद्धियोगें
अनुभव असुखाचा त्याच जीवास भोगें
परम असुख मी तों कीं तुझें आणि माझे
म्हणुनि मनिं वहातो नित्य हें जीव ओझें ॥२२३॥
कोणी शिरीं धरुनि चालति भार जेव्हां
भोगोनियां म्हणति हें उतरेल केव्हां
मी - तूं पणें करुनि जो करि जीव धंदा
कंटाळतो मग गुणात्मक - वृत्ति - वृंदा ॥२२४॥
चित्तांत ज्या उठति चित्र - विचित्र वृत्ती
निद्रेमधें प्रबल तें तम त्याच चित्तीं
वृत्तिप्रतीति नसतां मग भार त्याला
नाहीं स्व - बिंब - सुख ऐक्य तयीं जयाला ॥२२५॥
सुषुप्तींत मी तूं तुझें आणि माझें नवाहे शिरीं जीव हें वृत्ति ओझें
विना दुःख जो काळ निद्रेंत गेला प्रबोधीं निजानंद वाटे तयाला ॥२२६॥
सुषुप्तीमधें तों सुखाची प्रतीती नसे मानितां ते घडेना सुषुप्ती
समाधींतही वीसरे सर्व कांहीं तयीं विस्मृति स्वात्मतेचीच नाहीं ॥२२७॥
सुषुप्तींतही नाठवे अन्य जेव्हां निजानंद मात्र स्फुरे यासि तेव्हां
सुषुप्ती - समाधीमधें भेद कांहीं दिसेना असें बोलतां येत नाहीं ॥२२८॥
विना बुद्धि निर्धर्म नेणे प्रतीती तमोलीनता तीस जेव्हां सुषुप्तीं
विना दुःख निद्रेंत जो काळ गेला प्रबोधीं सुखत्वें स्मरे जीवत्वाला
सबिंबीं असा काळ निद्रेंत जातां न काळें अनंतत्व त्याला अनंता
तुझा अंश तूझें अनंतत्व त्याला न देशें न काळें स्वयें तें जयाला ॥२३०॥
अनंत स्वयं ज्योति तो तूं मुकुंदा स्वयं ज्योति कैसें म्हणों जीव वृंदा
धरुनी असा भाव पोटीं विधाता अनंताख्य - नामें स्तवी श्रीअनंता
सुषुप्ति काळीं सुख बिंब - रुपें तें मानिती सर्व निज - स्वरुपें
तेव्हां स्वयंज्योति तुझीच ज्योतीजीच्या प्रतिज्योति अनेक होती ॥२३२॥
स्वयंज्योतिच्या जीवज्योती अनेका असे तेधवां व्तर्थ नानात्मशंका
तरी देश - काळें अनंतत्व ज्याला स्वयं ज्योति कैसे वदावें तयाला ॥२३३॥
अनंत स्वयं ज्योति हें सिद्ध जेथें स्वयें सिद्ध सत्वत्व झालेंच तेथें
नव्हे सत्य जें दीसतें विश्व नाना प्रकाश स्वयें त्या जडाला असेना ॥२३४॥
स्वयं ज्योति शब्दें असें सिद्ध झालें प्रपंचा जडालागिं मिथ्यात्व आलें
विना मृत्तिका कुंभ जेव्हां असेना विना मृत्तिका कुंभ तेव्हां दिसेना ॥२३५॥
असत्यत्व सत्यत्व एके रितीनें असें सूचिलें भारतीच्या पतीतें
स्वयें मृत्तिका दीसते सत्य ऐसें तिणें भासतें कुंभ - मिथ्यात्व तैसें ॥२३६॥
प्रकाश स्वयें ब्रम्ह त्यावीण कांहीं दिसेना असें त्यास सत्यत्व नाहीं
दुजे रीतितें सत्य मिथ्यात्व आतां सुचे येरितींनें स्तवी श्री अनंता ॥२३७॥
तूं आद्य नित्य हरि अक्षर तूं म्हणूनी
सत्यत्व वर्णित असे त्रिपदें करुनी
तूं आद्य कीं प्रथम एकचि तूं मुकुंदा
जो निर्मिसी सकळ या जड - तत्व वृंदा ॥२३८॥
न निर्माण होता मृषा कुंभ जेव्हां स्वयें मृत्तिका सिद्ध होतीच तेव्हां
नव्हे विश्व होतें जई श्री अनंता तुझा एक लक्षाश चिन्मात्र होता
सरस्वतीचा पति याच भावें म्हणे हरी आद्य तुतें म्हणावें
तसाच अंतीं उरसी मुकुंदा गिळूनियां सर्व - अनित्य - वृंदा ॥२४०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP