ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १५
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
श्रुत्यर्थ या पहिलिया चरणांत येथें
झाला असे स्फूट विचार समग्र तेथें
सिद्धांत - भेद अवलंबुनि भेदवादी
कोणेरिती तरि भजो पशु तोचि वेदीं ॥४२१॥
प्रवर्तची दुर्मत बोल त्याला धिःकार हा त्यासचि बोलियेला
हें धुंडणें वात्द्यहि जें स्वभावें या श्लोकटीकेंत पुढें पहावें ॥४२२॥
येथें वदे विधि अभिज्ञहि शास्त्र - वेदीं
जे दुर्मतें रचिति केवळ - भेदवादी
ते यास रज्जुशरिरींच भुजंग देवा
जे मानिती नवल हें बहु वासुदेवा ॥४२३॥
आणीक अज्ञ - जन - अज्ञपणास धाता
वर्णूनियां नवल सांगतसे अनंता
कीं आत्म यास तुज मानुनि अन्यभावें
जें अन्य तें मिरविती स्वचि दात्मनावें ॥४२४॥
कीं बिंब एक दुसरें प्रतिबिंब देवा
हे आत्मता द्विविधनात्रचि वासुदेवा
बिंबात्मता जसि शरीरपणें पहाती
जीवात्मता असिच मानुनि अन्यरीती ॥४२५॥
कीं अन्यता धरुनि त्यासचि वासुदेवा
आत्माचि केवळचि हा म्हणताति देवा
तो अन्य तो कवण आणिक तोचि कैसा
आत्मा म्हणूनि म्हणताति विचार ऐसा ॥४२६॥
देहात्मता सकळ मानुनि हें प्रसिद्ध
ब्रम्हा म्हणे जरि असें तरि हें विरुद्ध
देहात्मता तरि न मानिति भेदवादी
देहाभिमान दृढ यद्यपिही अनादी ॥४२७॥
चार्वाक आणि जन केवळ मूढ त्यांची
निंदा म्हणाल करितो जरिही विरिंची
हे आंत बात्द्यहि न धुंडिति आत्मयाला
बाहेर धुंडिति तुतें म्हणवे न त्यांला ॥४२८॥
बाहेर धुंडिति तुतें परमात्मयासी
देहात्मता वदति तन्मत कार कैसी
आत्मा परास म्हणती कचण्या प्रकारीं
हें गुत्द्य वामन - मुखें वदता मुरारी ॥४२९॥
नानामतीं वदति भेदचि भेदवादी
अद्वैत दुषुनिहि जे परनिष्ठ भेटीं
जीवात्मता वदति सर्व अहंप्रतीती
तें अन्य मीपण तदात्मक मूढ होती ॥४३०॥
देहेंद्रियादिगुण टाकुनि वेगळेंही
जें मीपणस्फुरण वाटतसे स्वदेहीं
आत्मा तया म्हणति नेणति तत्त्वरीती
कीं मीपणें त्रिविध हें त्रिगुणेंचि होती ॥४३१॥
मी देह तामस अहंपण हें शरीरीं
मी इंद्रियें म्हणुनि हेंचि रजो विकारीं
या दोंविणें स्फुरण सात्विक - मीपणाचें
आत्मत्व केवळ तयास घडेल कैंचें ॥४३२॥
त्याही पुढें बुद्धि नियेपुढेंही जें चित्त आत्मत्व तयास नाहीं
या मीपणा ते थहि ठाव कैंचा जें वर्णिता लाजति वेदवाचा ॥४३३॥
जीवत्व ही गुरुकृपेविण हें कळेना
या मीपणें तरि कदापिहि आकळेना
वार्त्ता सुषुप्तिसमयीं न असे जयाची
श्रुद्धात्मतेंत गणना करिती तयाची ॥४३४॥
अद्वैत मानुनिहि मानिति हाचि आत्मा
कोणी तयांसहि न ठाउक तत्त्ववर्त्मा
याचा विचार बरवेरिति कर्मतत्त्वीं
तो पाहणें विशद वाचुनि शुद्धसत्त्वीं ॥४३५॥
अहंप्रत्यया मानिती शुद्ध आत्मा
सुषुप्तींत ज्याचा नसे लेश वर्त्मा
अनात्मा परावा अहंकार त्यासी
अहो आत्मता मानिती अज्ञ कैसी ॥४३६॥
बिंबात्मयातें तुज देहरुपें अहंपणालागिं निजस्वरुपें
अहो हरी मानिति अज्ञ कैसे म्हणूनि बोले विधि येथ ऐसें ॥४३७॥
बिंबात्मत हरि तुझी प्रतिबिंबताही
जे नेणती पढत - मूढ जनांत तेही
आत्मा कसा म्हणुनि मागुति तेचि देवा
बाहेर धुंडिति म्हणे तुज वासुदेवा ॥४३८॥
मायामयें हरि तुझीं बहु चित्र रुपें
मत्स्यादिकें म्हणति हेंचि निजस्वरुपें
प्रत्यक्ष जें दिसत गोचर इंद्रियांसी
तें वाटतें तव अतींद्रिय तत्त्व त्यांसी ॥४३९॥
दिसे बात्द्य दृष्टीस तें तत्त्व कैसें असे धुंडणें नेणणें बात्द्य ऐसें
जरी अंतरीं बोलती ध्यानरीती तरी तत्त्व साकार ऐसें पहाती ॥४४०॥
रचियलें मत शास्त्र असे रिती पढति तत्वहि तेंचि विचारीती
हुडकिती हरि बात्द्यहि तूजला धरुनि भाव असा विधि बोलिला ॥४४१॥
अहो बात्द्यही धुंडिती आत्मयाला म्हणूनी असें जें विधी बोलियेला
न तीर्थादि मूर्त्यादि पूजादि भावें कसा तो असा शास्त्र दृष्टीं पहावें ॥४४२॥
हा आत्मशब्द कथिला जगदीश - भावें
द्वैतेंचि धुंडिति असेंचि जरी म्हणावें
तोही कसा म्हणुनि धुंडिति शास्त्ररीती
तीर्थादिकें सुकृत - कारक मात्र होती ॥४४३॥
तीर्थे - व्रतेंकरुनि होइल चित्त शुद्धी
शास्त्रेंकरुनि तदनंतर सत्वसिद्धी
सत्संप्रदाय तरि हा जरि भेदवादी
तेही परात्मपण धुंडिति शास्त्र - वेदीं ॥४४४॥
असे तत्त्व तें केविं सर्वेश्वराचें विचारीं असें धुंडणें नाम याचें
घडेना कधीं धुंडणें अन्य रीती तरी भेद मानूनि जिज्ञासु होती ॥४४५॥
जिज्ञासेविण धुंडणेंचि न घडे ते तत्त्व - जिज्ञासुता
ज्याला तो गुरु शास्त्र टाकुनि कसा धुंडी न हें तत्वता
सच्छास्त्रें निज आत्मता हुडकिती दुःसंगतीनें वृथा
जें दृग्गोचर रुप तत्त्व म्हणती येथें तयाची कथा ॥४४६॥
बाहेर धुंडिति बहिर्मुखता तयांची
जे अज्ञरीती बदला अवघी विरिंची
जे धुंडिती निगममार्ग धरुनि आतां
ते रीती आणि विधि वर्णिल त्यांच संतां ॥४४७॥
देहींच संत तुज धुंडिति हे अनंता
जें अन्यथा त्यजिति त्या जड - अंतबंता
मिथ्या निषेधुनि भुजंग चिदात्म - दोरी
जे कां खरी तिसचि पाहति कीं मुरारी ॥४४८॥
असा येथें झाला चरण दुसरा या त्रिचरणीं
त्रिपादें जो मोजी धरणि हरि त्याचीच करणी
दिसे मूळ श्लोकीं बहुतचि खुजा वामनपणें
स्वयें टीकारुपें करुनि भरिलें विश्व निपुणें ॥४४९॥
श्रीभद्भागवतीं विचित्र - दशम - स्कंधीं विरिंची स्तुती
तेथें हा चरण द्वितीय चरणद्वंद्दीं हरीच्या श्रुती
रत्नें मस्तकिंचीं चतुर्मुख - मुखें अर्पूनि भूमंडळीं
श्रोत्यांच्या श्रुति - भूषणीं मिरवती निर्माल्य ती कुडलीं ॥४५०॥
ब्रम्ही द्वैत - विचार जो उपनिषद्भागीं श्रुती बोलती
तीं वाक्यें श्रुतिचीं शिरें मणिगणीं श्रुत्यर्थ जे साधिती
तें कृष्णासि निवेदिलें विधिमुखें वेदीं धरामंडळीं
श्रोत्यांच्या श्रुति भूषणें मिरवती रत्नें जसीं कुंडलीं ॥४५१॥
पृथ्वी आक्रमिली पदें करुनियां एक्या स्वभावें क्षिती
त्याचें केवळ पादपद्म म्हणती पायें दुज्या श्रीपती
गंगा आणुनि जेविं उद्धरि जना ब्रम्हांडही भेदुनी
तैसी या चरणीं दुज्या मिरवती हे ज्ञान - मंदाकिनी ॥४५२॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP