ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ४
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
N/Aऐसें म्हणाल तरि उत्तर काय द्यावें
प्रत्यक्षही जग असत्य कसें म्हणावें
तें याच कृष्ण - अवतार - कथेंत आतां
म्या देखिलें म्हणुनियां वदतो विधाता ॥९१॥
येथेंचि माया - हरणाऽवतारीं प्रपंच - मिथ्यात्व मला मुरारी
मृद्भक्षणीं दाखविले मुकुंदा पाहे जयीं विश्व मुखीं यशोदा ॥९२॥
प्रत्यक्ष जें दिसतसे जग तेंचि पोटीं
देखें असें जरि म्हणो तरि गोष्टि खोटी
बाहेरि जी तुज धरुनि करीं यशोदा
जैसी उभी तसिच आंत कसी मुकुंदा ॥९३॥
बाहेरि विश्व अवघें उदरांत तैसें
विश्वांत विश्व हरि सांटवणार कैसें
एकांत एक घट तुल्य जसे न माती
सत्या जगांत जग सत्य असेचरीती ॥९४॥
या कारणें उदरिं दाखविली स्वमाया
देखोनि जीस भुलली व्रज - नाथ - जाया
आंतील विश्व लटिकें हरि येचिरीती
ब्रम्हांड - भांड शतकोटि मृषाच होती ॥९५॥
स्वप्न - प्रपंच नकळोनि खराच वाटे
तो या प्रपंच - रचनेंत कधीं न दाटे
एके क्षणीं बहुत लोक जयीं निजेले
स्वप्न - प्रपंच तितके इतक्यांत माले ॥९६॥
पोटांत येरिति चराचर वासुदेवा
मातेसि दाखविसि तें लटिकेंचि देवा
पोटांमधील जग सर्व मृषाच जैसें
हें विश्वही सकळ दाखवितोचि तैसें ॥९७॥
म्हणतिल जन येथें आरशामाजि जैसें
स्थिरचर जननीनें देखिलें सर्व तैसें
प्रतिफळित शरीरीं विष्णुच्या विश्व जेव्हां
अघटित अवघें हें पूर्वपद्योक्त तेव्हां ॥९८॥
विधाताचि तो या अशा पूर्वपक्षा निवारुनियां बोलतो अंबुजाक्षा
जसे आरशामाजि ऐसें न तेव्हां दिसे दाविलें विश्व मातेसि जेव्हां ॥९९॥
कुक्षींत हें जगहि हा व्रज - नाथ आहे
तूझ्याच येथ जननी तुजमाजि पाहे
मृद्भक्षणीं जननि युक्त जसा अनंता
पाहे जसें त्वदुदरीं तुज तेचि माता ॥१००॥
दिसे कुक्षीमध्यें सकळ जग ज्याच्या हरिहितो
व्रजीं या ज्या रुपें सतत जननीलागिं दिसतो
तयारुपें तोही निज - उदरि भासे त्रिभुवनीं
अहो पाहे जेव्हां जग हरि - शरीरांत जननी ॥१०१॥
तूं आरसा तुजमधें जग दीसताहे
हें बोलणें इतकियावरि केविं साहे
तूं आरसा तरि कसें तुजमाजि देवा
देखेल तूज जननी तुझि वासुदेवा ॥१०२॥
जया दर्पणींजें दिसे विश्व नाना तयामाजि तो आरसा तों दिसेना
शरीरीं दिसे विश्व नाना - स्वभावें तुवां आरशातें न तेथें दिसावें ॥१०३॥
तुझी मूर्ति जेव्हां तुझ्याचा शरीरीं समस्तांमधें देखिली याप्रकारीं
पहातां तुवां दाविली सर्व माया तसें विश्व मायाच हे देवराया ॥१०४॥
प्रकारांतरें याच पद्यांत आतां निवारील या पूर्वपक्षा विधाता
म्हणे तूं जसा आणि हें विश्व जैसें जशाचें तसें दर्पणामाजि कैसें ॥१०५॥
आकारवंत जितुकें प्रतिरुप त्याचें
कांहीं विलक्षण दिसे नयनासि साचें
जो उत्तराभिमुख तो प्रतिबिंब पाहे
तो दक्षिणाभिमुख त्यासचि दीसताहे ॥१०६॥
जसी गोकुळी मूर्ति तूझी मुकुंदा उभी ज्यामुखीं आणि जैसी यशोदा
जसें जेथ तैसें तुझ्या सर्व पोटीं दिसे दर्पणाची तयीं गोष्टी खोटी ॥१०७॥
चैतन्यरुप तरि तत्प्रतिबिंब कैसें
हा पूर्व पक्ष दिसतो तरि तत्व ऐसें
साकारतो विण विलक्षणता घडेना
चिन्मात्र त्यांत तरि आकृति सांपडेना ॥१०८॥
व्यापूनि सर्वहि दिशा उरलेंच जैसें
हे व्योम चिद्गगत सर्वजगांत तैसें
आकाश दर्पणिं जळांत दिसे जनाला
कैसें विलक्षण म्हणाल तयासि बोला ॥१०९॥
एके दिशेस नभ सन्मुख होय जेव्हां
त्याचें विलक्षण तसें प्रतिरुप तेव्हां
सर्वाकडे सम अरुप अनंत ऐसें
चैतन्य तें प्रतिफळे विपरीत कैसें ॥११०॥
अनंतत्व त्यालाच बिंब - स्वरुपीं परिच्छिन्नता त्यासही जीवरुपीं
घटासारिखा सूर्य पाण्यांत भासे तयीं स्वप्रकाशत्व त्याचें न भासे ॥१११॥
हें बिंब आणि प्रतिबिंब तैसें विचार हा सार जगन्निवासें
भाषाप्रबंधीं स्फुट वर्णियेला जो कर्मतत्वाख्य निबंध झाला ॥११२॥
त्य कर्ततत्वीं बरव्या प्रकारें श्री - कर्मतत्वाख्य निबंधकारें
केला असे वामननामरुपें तेथें पहावीं उभय स्वरुपें ॥११३॥
या प्रस्तुतीं या अवताररुपीं हें सर्व मायामय चित्स्वरुपीं
केलें असें दाखविलें अनंता म्हणूनियां बोलियला विधाता ॥११४॥
आणीक हे आजिच सर्व माया अनेक विश्वें मज देवराया
तुवांचि कीं दाखविलीं मुकुंदें ब्रम्हा वदे तत्त्व - कथानुवादें ॥११५॥
मिथ्या भुजंग परि सत्य सुगंध हारें
भासे दिसे जगहि साच अशाप्रकारें
सत्ते करुनि तुझिया तुजवीण कांहीं
हें पाहतां जड चराचर वस्तु नाहीं ॥११६॥
ब्रम्हा म्हणे म्हणुनि येरिति देवराया
कीं तूजवांचुनि असत्य समस्त माया
मायाम यत्व मज आजिच हें जगाचें
दाऊनि तत्व निज सूच विलेंच साचें ॥११७॥
कीं वत्स वत्सपहि म्या हरितां अनंता
तूं एकलाचि उरलासि म्हणे विधाता
झालासि त्याउपरि वत्सप वत्स देवा
होतासि वर्षभरि येरिति वासुदेवा ॥११८॥
वर्षाभरीं परतलों तुजला पहाया
तों दाविली मज तुवां निज योगमाया
ते वत्स वत्सप चतुर्भुज सर्व केले
ब्रम्हे चतुर्मुख अपारचि दाखविले ॥११९॥
ज्या त्या चतुर्भुज तुझ्या घननील मूर्ती
शास्त्रें - पुराण - निगमाऽगम गाति कीर्ती
मूर्ती तुझ्या जितुकिया तितुके विधाते
ब्रम्हांड - कोटि - रचनेसह जेथ होते ॥१२०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP