ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १४
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
श्रुत्यर्थ कीं ज्योति - शरीर जैसा हा सूर्य नाना उदकांत तैसा
क्षेत्रीं अनेंकीं जगदात्म देव स्वयें असा एक अनेक जीव ॥३९१॥
एवं प्रतीतिकर सर्प असत्य जेव्हां
त्याचा अभाव वदवेल भल्यांस तेव्हां
वंध्या सुतादिक अभाव कसा म्हणावा
या कारणें निगम - संमत पक्ष घ्यावा ॥३९२॥
मिथ्यात्व ऐसे भवबंध - मोक्षा म्हणूनि बोले विधि अंबुजाक्षा
सर्वज्ञतेनें हरि वामनात्मा तदर्थ बोले निजबोधवर्त्मा ॥३९३॥
न तरतां तरले अनृतांबुधी म्हणुनिजें वदला पहिलें विधी
अनृत बंधहि मोक्षहि येरिती म्हणुनि तो वदला स्वगुरुप्रती ॥३९४॥
जें वेदगर्भ वदला स्फुट हेंचि वेदीं
हे तों नमानिति कदापिहि भेदवादी
धिःकारितो कमळ संभव त्यांस आतां
त्याचें कधीं न मत संमत होय संतां ॥३९५॥
आत्माचि तूं तुजहि मानुनि भिन्न देवा
भिन्नास आत्म पण मानुनि वासुदेवा
बाहेरि धुंडिति असी जन - अज्ञता हे
आश्वर्य हें विधि म्हणे हरिलागिं पाहें ॥३९६॥
श्लोकार्थ हा तों इतुकाचि येथें भावार्थ आहे अतिदिव्य जेथें
आत्मा गमे भिन्न कसा विकारें भिन्नास आत्मत्व कशा प्रकारें ॥३९७॥
हरी तोचि हे अर्थ भावार्थ आतां स्वयें वर्णीतो जेथ आनंद संतां
निजात्मा न तो भिन्न वाटे कदापी प्रतीतीस भिन्नत्व येना स्वरुपीं ॥३९८॥
मूढां जरीं कवण आपण हें कळेना
भिन्नत्व आत्मगत त्यांसहि सांपडेना
आत्माच तूं तुजहि मानिति भिन्न ऐसें
हें वाक्य ये अनुभवाप्रति येथ कैसें ॥३९९॥
आत्माच तंतु पट त्यांत शरीर झालें
भिन्नत्व आत्मगत येरितिनेंच आलें
आत्माच तो इतर येरिति मानियेला
जे ज्ञानहीन तिहिं हे विधि बोलियेला ॥४००॥
विधाता म्हणे तूंचि देहादिरुपीं पटीं तंतु जैसा जडीं चित्स्वरुपीं
दिसेना असेना विना तंतु जैसा पटाकार आत्म्याविणें देह तैसा ॥४०१॥
तंतूस त्या विसरतां पट सत्य ज्यांला
आत्मा नजाणति खरा जड देह त्यांला
नाहींच जो पट तयासि खरें म्हणावें
सत्यास तंतुस पटाकृतिनें पहावें ॥४०२॥
तंतूमधें पट दिसे परि तो परावा
दावी नसोनि नयनीं पटरुप - भावा
तंतूचि तो पट तरी लटिक्या विकारें
भासे तयास इतरत्वहि या विचारें ॥४०३॥
आत्माचि तूं हरि तथापि शरीरभावें
अज्ञा जनासि दिससी जड तें परावें
जे आत्मयास इतरत्व - जडत्व - रीती
मानूनि वर्तति वृथा क्षितिभार होती ॥४०४॥
या एक अज्ञ - जन - अज्ञपणासि धाता
सांगे असें नवल मानुनियां अनंता
त्याची असी रचियली हरिनेंच टीका
श्रोत्यांस येरिति - इथें उपजेल शंका ॥४०५॥
कीं हा चिदात्मा तरि तंतुरुपीं शरीर मिथ्या पटवत् तथापी
तंतूस तों तंतु दुजा न वाटे मेल्या शरीरास न जीव भेटे ॥४०६॥
आत्मा जयीं टाकुनि देह जातो तंतूच गेल्या पट कां रहातो
त्द्या पूर्वपक्षा परिहार तेव्हां कळेल बिंबप्रतिबिंब जेव्हां ॥४०७॥
विचार हा तों बहुवार येथें झाला असे हा परिहार तेथें
टाकुनि जाणें प्रतिबिंब जीवा जडामधें वास्तव वासुदेवा ॥४०८॥
ज्या चित्प्रकाशें मृत - देह दृष्टी दिसेल तो रज्जु भुजंग सृष्टी
हें तथ्य कीं वस्त्र दिसे तथापी न भिन्नता तंतुस तंतुरुपीं ॥४०९॥
पटासि टाकूनि न तंतु जातो हा अर्थ बिंबांतचि सिद्ध होतो
टाकूनि जातो प्रतिबिंबरुपी बिंबीं न भिन्नत्व तया तथापी ॥४१०॥
बिंबात्मया सगुण निर्गुण दोनि रुपें
मायेकरुनि जगदाकृति चित्स्वरुपें
जीवांस त्यांतचि दिसे जरि विश्व नाना
बिंबीं प्रतीति दुसरी अणुही दिसेना ॥४११॥
देहादि भेद गमती प्रतिबिंब - रुपीं
अज्ञान त्यास निज - बिंब सुख - स्वरुपीं
बिंबीं घडे तरि सुषुप्तिस ऐक्य त्याला
तो भिन्न केंवि म्हणवेल चिदंश बोला ॥४१२॥
तद्रूप होउनि सुषुप्ति - सुखावलंबीं
भिन्नत्व - सांप्रतहि न प्रतिबिंबबिंबीं
देहादिरुप निज बिंबचि भासताहे
आत्मज्ञतेविण असे रितिनें नपाहे ॥४१३॥
या कारणें नवल मानुनियां विरंची
माया असी म्हणुनि वर्णितसे हरीची
वेदांत शास्त्रहि पढोनि असाच वेदीं
तत्वार्थ मानिति तयास न भेदवादी ॥४१४॥
जे कां नजाणति कधीं निगमाऽगमातें
तेथें नधिःकरण केवळ त्यांस होतें
आश्वर्य वस्तु नदिसे जरि डोळसाला
अंधा दिसे न तरि विस्मय काय बोला ॥४१५॥
श्लोकांत यांतचि वदेल असें विरिंची
कीं बात्द्य धुंडिति गती तुज आत्मयाची
बाहेर धुंडिति जरीं परमात्मयाला
शास्त्रज्ञ ते नव्हति केविं म्हणाल बोला ॥४१६॥
आतां म्हणाल भजती प्रतिमादिरुपी
बाहेरि धुंडिति हरीस असे तथापी
ते शास्त्र नेणति तयांस असें विधाता
बोले म्हणाल तरि तद्रुरु शास्त्रवेत्ता ॥४१७॥
द्वैतेंच जो भजन शिष्यगणास सांगे
शिष्यांस भेद भजन प्रतिमेंत लागे
शिष्यांस शास्त्र नकळे कितिएक तेही
तैसेचि वर्तति अनन्य विचार नाहीं ॥४१८॥
अद्वैत वेद पथ केवळ तो निषेधी
शिष्यांसि भेदचि खरा म्हणऊनि बोधी
त्याला जडाऽजड - विवेक - मुखें चिदात्मा
विश्वप्रकाश नकळे श्रुतिसिद्धवर्त्मा ॥४१९॥
अद्वैत भायें प्रतिमादि कांहीं जेपूजिती त्यांस पश्रुत्व नाहीं
दाटूनि जो दैवत अन्य पाहे पश्रुत्व त्याला श्रुति बोलता हे ॥४२०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP