ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ७
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
हें कार्यरुपहि असत्यचि देवराया ॥१८१॥
मिथ्याचि कारण हि कार्य हि या प्रकारीं
तें सत्य जें परम कारण तूं मुरारी
मृत्पिंड आणि घट दोनि असत्य माया
माती खरी परमकारण देवराया ॥१८२॥
माती खरी घट मृषा परि सत्य झाला
माती कडूनचि खरेपण कीं तयाला
माती करुनि घट यद्यपि सत्य वाटे
काळत्रयांत घट मातिस तों न भेदे ॥१८३॥
मातींत आधीं नव्हताचि जैसा अंतीं न मातींत उरेल तैसा
मातीविणें तों घटवस्तु नाहीं माती नसे ही तरित्यांत पाहीं ॥१८४॥
ब्रम्हीं प्रपंच नव्हता पहिलाच जैसा
संहार होइल तयीं न तयांत तैसा
आतां असोनिहि दिसोनिहि तो न कांहीं
ब्रम्हीं प्रपंच म्हणऊनि कदापि नाहीं ॥१८५॥
अधिष्ठान सत्यें करुनीं विवर्ता दिसे सत्यता येरिती विश्व वार्ता
मृषा होउनी ही जसें सत्यदीसें स्वयें दुःख ही तें सुखाभास भासे ॥१८६॥
ऐसें असत्य जग होउनि दुःस्वरुपी
तेथें गमं सुख तुझ्याच सुख - स्वरुपीं
जेथें भुजंग लटिका भय - कंप - कारी
तेथें सुगंध सुख कारक पुष्प हारी ॥१८७॥
तूं सत्य यास्तव असत्यहि सत्य झालें
ज्ञानें तुझ्या जड सचेतनतेस आलें
दुःखांत या सुख तुझ्याच सुखें अनंता
भावार्थ हा धरुनि बोलियला विधाता ॥१८८॥
कोठें अचेतन दिसे जग हें तथापी
तंतू मधें पट जसा तव - चित् - स्वरुपीं
याही मधें नवल एक वदे विधाता
कीं हें चराचर नसोनि दिसे अनंता ॥१८९॥
खरें हेम तेथें अलंकार माया नसोनी असेसा दिसे देवराया
न पूर्वी न अंतीं अलंकार काहीं नसे वस्तुता भास तो तेधवांही ॥१९०॥
झुझी एक सत्ता खरी तींतनाना दिसे हें जरी विश्व काहीं असेना
नहें आदि अंतीं दिसे विश्व आतां तरी तूंचि तें विश्व नाहीं अनंता ॥१९१॥
स्वरुपीं तुझ्या विश्व मिथ्या अनंता असें बोलिला पूर्व पद्यें विधाता
अलंकार - सोन्यास एकत्व जेव्हां म्हणूनी म्हणे विश्व हें तूंचि तेव्हां ॥१९२॥
म्हणूनीच सर्व खलु ब्रम्ह ऐसें श्रुती बोलती साधलें तेंचि तैसें
घडे ऐक्य हें चिज्जडाचें तथापी दिसे जीवनामात्मता चित्स्वरुपीं ॥१९३॥
चिदात्मत्वही एक ऐसें विरंची स्वतः सिद्ध जीवात्मता श्रीहरीची
वदों पाहतो या प्रसंगी विधाता वदे लक्षणें वस्तुचीं श्री अनंता ॥१९४॥
तूं एक ऐसें म्हणतो विरंची या एक शब्दें स्तुति काय त्याची
एक स्वयें तो भलताचि आहे या लागिं हा अर्थ न येथ साहे ॥१९५॥
हरिहि एक अनेक पणें जरी स्फुरण दाउनि भेदहि तो हरी
तरिच एक तथा म्हणणें बरें म्हणुनि एक म्हणे विधि आदरें ॥१९६॥
तूं बिंब एक अवघे प्रतिबिंब देव
चिट्रूप जीव म्हणती श्रुति वासुदेवा
हे स्वप्न - जागृति मध्यें जरि वेगळाले
तुर्या - सुषुप्ति - समयीं नुरती निराळे ॥१९७॥
भोगार्थ हे तुझि अनादि विचित्र युक्ती
कीं वासना - फळहि भोगुनि नित्य मुक्ती
भोक्ता अनीश्वरहि तूं प्रतिबिंब - रुपें
तें तद्विलक्षणहि बिंब निज - स्वरुपें ॥१९८॥
जें एक तूं म्हणउनी विधि बोलियेला
भावार्थ हा विशद त्यांतुनियां निघाला
या कारणें पुढलियाच पदीं विधाता
आत्माच तूं म्हणुनि बोलतसे अनंता ॥१९९॥
बिंबत्व आणि तुजला प्रति बिंबताही
आत्मा असा म्हणुनि तूंचि समस्त - देहीं
याकारणें पुरुषनाम तुझें अनंता
ऐसें पदीं तिसरिया वदतो विधाता ॥२००॥
वससि या सकळां विविधा पुरीं पुरुषनाम तरीच तुझें हरी
दिसति भेद परस्पर मीपणें पुरुष तूं प्रतिबिंब अशागुणें ॥२०१॥
लव - सुषुप्ति - उपाधिस जेधवां उरसि केवळ बिंबचि तेधवां
पुनरपि प्रतिबिंबपणें तयीं मिरवसी करिसी जग हें जयीं ॥२०२॥
उदक निर्मळ सत्वहि येरिती तरि चिदंश पृथक् प्रतिबिंबती
चिखल सत्वजळीं तम कालवें स्मृति न सत्वगुणीं मग बोलवे ॥२०३॥
गढुळ सत्व तमोमय जे धवां प्रतिमुखें न जळीं मग ते धवां
तंई सुषुप्तिंत बिंबचिदैक्यता श्रुतिहि हें स्फुट बोलति तत्त्वता ॥२०४॥
जइं वसे दृढ कर्दम तो तळीं नितळतां प्रतिबिंब दिसे जळीं
पुरुष तूं प्रतिबिंबपणें असा पुरुष बिंबतसा म्हणवे कसा ॥२०५॥
मिळति तूजमधें प्रतिबिंबके निघति होति जयीं अमलोदके
तुज असे रिघणें निघणें नसे पुरुष ते तुजतुल्य वदों कसे ॥२०६॥
पुरुष बिंब रिघे ननिघे कधीं म्हणुनि येथ चतुर्थपदें विधी
म्हणतसे पुरुषांत पुराण तूं अगुण होउनि ईश सुजाण तूं ॥२०७॥
तव पुराणपणेंचि पुराणता प्रतिमुखा पुरुषां तुजला स्वता
तुजमधें रिघती - निघती जरी तुजकडूनि पुरातन ते हरी ॥२०८॥
जीवात्मता सकळ येरितिने हरीची
यां चौंपदें करुनि बोलियला विरंची
कीं बिंब तूंचि सकळां प्रतिबिंबकांचें
बोलेल याउपरि कीं हरितेंचि साचें ॥२०९॥
आत्मा पुराणपुरुषा हरि सत्य तो तूं
मिथ्या चराचर पटांतिल सत्य तंतू
श्लोकांत हें पहिलिया वदला विरंची
ते सत्यता विशद वर्णिल येथ साची ॥२१०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP