ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ९
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
भावें अशा बोलतसे विधाता कीं नित्य तूं या करितां अनतां
नासे मृषा - कुंभ असेच माती तूं सत्य तो एकचि आदि अंतीं ॥२४१॥
जें आदि अंतीं उरतें तयातें सत्यत्व मिथ्यात्व दुज्यास येतें
मध्येंच निर्माण घटादि होती ते पाहतां एकचि सत्य माती ॥२४२॥
घट दिसे परि वस्तुचि तो नसे अनृत होउनि मातिमधें वसे
तरि नसेचि म्हणा घट यारिती अनृत हें जग सत्य रमापती ॥२४३॥
प्रपंच - उत्पत्ति - लया वरुनी न आदिअंतीं जग हें म्हणूनी
मिथ्यात्व मध्यें सहजेंचि आलें तथापिही शंकित चित्त झालें ॥२४४॥
न हें विश्व झालें न हें विश्व नाशे जगीं बोलती एक पाषांड ऐसें
जसें होउनी सर्वही नाशताहे तसें विश्व झालें पुढें ही नराहे ॥२४५॥
जसा पुत्र होतो तसा बाप झाला पित्याचा दिसे जन्म तर्के सुताला
समस्तां दिसे नाश - उत्पत्ति होती जगा नाश उत्पत्ति तर्कें करीती ॥२४६॥
न यां पंच भूतां दिसे अंत आदी तरी साधतें येरिती हेंचि वेदी
जसे देह होती तसीं पंचभूतें जसा नाश यांला तसा नाश त्यांतें ॥२४७॥
जसीं सर्व भूतें क्षरें लोकदृष्टी असी सर्वही हे क्षयी ब्रम्हसृष्टी
उरे अक्षर ब्रम्ह जें सर्व अंतीं खरें तेंचि हें साधिलें सर्व संतीं ॥२४८॥
मधेंही क्षरें भौतिकें येचिरीती क्षरें पंचभूतें न हें आदि अंतीं
स्थितीमाजिहि या क्षरत्वें अनंता खरा तूंचि हें बोलताहे विधाता ॥२४९॥
नित्यत्व वर्णुनिहि अक्षर तूं म्हणूनी
बोले विरंचि मनिं भाव असा धरुनी
काळत्रयीं हरिच सत्य न अन्य कांहीं
भासे तथापि हरि वांचुनि अन्य नाहीं ॥२५०॥
सत्यत्व - लक्षण असें उभय प्रकारें
मिथ्यात्व - लक्षण - विलक्षण ज्या विकारें
श्लोकांत यारिति असें विधि बोलियेला
तस्मात् प्रपंच हरिरुप समस्त झाला ॥२५१॥
पटचि तंतु घटादिक मृत्तिका कनकताचि जसी कटकादिका
भुजग रज्जुचि श्रुक्तिरुपें जसें हरिच विश्व समस्त हि हें तसे ॥२५२॥
विनवितां हरिचीं निजल क्षणें हरिच सत्य म्हणूनि विचक्षणें
कथियले विपरीत - विलक्षणें जगमृषात्व - कटाक्ष - निरीक्षणें ॥२५३॥
जग मृषा तरि कां विषयी सुखें म्हणुनि येरिति येथ चतुर्मुखें
किमपि शंकित मानस देखिलें सुखहि तें हरिरुपचि लेखिलें ॥२५४॥
सुख म्हणों हरिरुपचि हें जरी क्षणिक आणि सदोष कसे परी
मग म्हणे विषयात्मक निश्वयें क्षणिक आणि सदोष न तें स्वयें ॥२५५॥
या लागिं नित्यसुख तूं म्हणतो विधाता
हें बोलवे न तुज नश्वरता अनंता
वारी मृषा विषयदोष तया वरुनी
कीं नित्य तें सुख निरंजन तूं म्हणूनी ॥२५६॥
दुःख प्रपंच सुख त्यांतहि वासुदेवा
तेंतों स्वरुपचि तुझें जगदात्म - देवा
आनंद नश्वर सदोष जगीं तथापी
निर्दोष नित्यसुख तूं स्व - सुख - स्वरुपी ॥२५७॥
सुमन हार सुशीत सुधास तो अनृत सर्प तयावरि भासतो
सुख तया वरिल्या पवनें क्षणें किमपि तों भय सर्प निरीक्षणें ॥२५८॥
घडिघडी विषयीं सुख जें हरी सुख तुझेंच तथापिहि यापरी
विषय सर्प मृषा भय दाविनी सुख न तथापिहि तूंच रमापती ॥२५९॥
सुख तुझें विषयाकरितां हरी क्षणिक आणि सदोष गमे परी
सुख निरंजन नित्यचि तूं स्वयें क्षणिक आणि सदोष न निश्वयें ॥२६०॥
जे हार नेणति तयांसचि सर्प होतो
जे जाणती मृदु सुगंध तया जना तो
हें विश्व दुःख परि जो विषयांत कांहीं
आनंद - लेश तुजवांचुनि अन्य नाहीं ॥२६१॥
आनंद नाहीं विषयांत कांहीं आनंद तूं व्यापक सर्व - देहीं
मानूनि पाणी रविरश्मि तृष्णा वाटे जसी कां हरणासि तृष्णा ॥२६२॥
जैसें मृगांसि लटिकें जळ सत्य वाटे
त्यालागिं धांवति पथीं जळ सत्य भेटे
त्यातें पिऊनि म्हणती जळ तेंचि प्यालों
लक्षूनि जें उदक धांवत येथ आलों ॥२६३॥
ऐसे विलास करितां विषयीं जनाला
आनंद त्यांत गमतो जितुका मनाला
तें तों स्वरुप - गत केवळ सौख्य आहे
जो अज्ञ तो सुख तयां विषयांत पाहे ॥२६४॥
जरि अनित्य तरी सुख तों खरें म्हणसि सौंख्य तथापुइ न तें बरें
सुख निरंजन एकचिं तूं हरी म्हणुनि बोलियला विधि यापरी ॥२६५॥
म्हणति अंजन यद्यपि काजळा परि तमोगुण त्याहुनि आगळा
विषय - निर्मित दुःख तया तमा सुख निरंजन तूं पुरुषोत्तमा ॥२६६॥
सहज अग्नि सधूम मधीं नसे जळति त्यांत तया करितां दिसे
असुख जें उपजे सुख भोगितां विषय - भोगचि कारण पाहतां ॥२६७॥
विषय तामस राजस इंद्रियें मिसळलें जरि सत्व मन स्वयें
त्रिगुण वात असी घृत कामना करि सुखाग्नि निरंजन अंजना ॥२६८॥
ज्या जीवाच्या उपाधी त्रिगुणमय अहो वासना - स्नेह - तेला
जाळी जो वातिरुपें सुख अनळ करी अंजनप्राय त्याला
वाती तेलासि जाळी जरि अनळ करी काजळातें तथापी
त्याला तों लेप नाहीं विषय - सुख असें चित्सुखें चित्स्वरुपीं ॥२६९॥
येणेंकरिती सुख तुझें विषयीं मुरारी
झालें असे क्षणिक आणिक दुःखकारी
तेतों मृषा विषय वाटत तूज देवा
यालागिं तूं सुख निरंजन वासुदेवा ॥२७०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP