ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १२
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
मायाच बंध करणार जसी अविद्या
मायाच मोक्ष करणार अनादि विद्या
हे बंध मोक्ष म्हणऊनि न वस्तु कांहीं
रज्जूंत सर्प म्हणणें परि सर्प नाहीं ॥३३१॥
रज्जूंत सर्प नव्हताचि कधीं जयातें
रुपाविणें भुजगनामचि मात्र होतें
मिथ्याच उद्भवहि नाशहि त्यास जैसा
मिथ्याच बंध तरि मोक्ष मृषाचि तैसा ॥३३२॥
बंध मोक्षहि तसेच म्हणुनी नाम मात्रणि म्हणे विधि दोनी
नाममात्रचि न वास्तव कांहीं बंध मोक्ष पण आणिक नाहीं ॥३३३॥
हें खरें परि मृषापण यांचें त्यास कीं समजलें निज साचें
रज्जु जाणति असत्य तयांला सर्प - उद्भव - विनाशहि झाला ॥३३४॥
यालागिं बोले विधि येस्थळीं कीं जाणेल तो आत्मपणास जो कीं
सत्यज्ञभावास्तव त्यासि पाहे असत्यता या उभयांस साहे ॥३३५॥
निजात्म सत्यत्व कळे जयाला सत्यज्ञ संज्ञा म्हणती तयाला
जो मुक्त होऊनि जितो तथापी देखे मृषा मोक्षहि त्या स्वरुपीं ॥३३६॥
ऋतज्ञभावास्तव बंध मोक्षा मिथ्यात्व ऐसें सरसीरुहाक्षा
म्हणूनि जो बोलियला विरंची भावार्थटीका इतुकीच त्याची ॥३३७॥
ऐसें वदोनिहि विरंचि सशंक झाला
कीं जो ऋतज्ञ जन जीतचि मुक्ति त्याला
तो मोक्ष मागुनि असत्य कसा म्हणावा
ऐसा तरी अनृतसत्यपणें न घ्यावा ॥३३८॥
ते बंध मोक्ष विधि तों प्रतिबिंबरुपीं
देखे तदैक्य - निज - बिंब सुखस्वरुपीं
बिंबांत त्यांत तरि मोक्ष न बंध कांहीं
यालागिं मोक्ष - अनृतत्व विरुद्ध नाहीं ॥३३९॥
आणीक एक सुचली विधिलाची युक्ती
कीं बिंब एकपण तें प्रतिबिंब मुक्ती
जो नित्यमुक्त जगदीश उपाधिबिंबीं
त्याणेंचि जीव निज - बिंब सुखाऽवलंबी ॥३४०॥
तो ही उपाधि लटिकाचि जरी अनादी
मायीकमात्र वदती श्रुति हेंचि वेदीं
मुक्तांचि बिंबपण त्याकरितांचि मुक्ती
ते ही असत्य तरि या न विरुद्ध उक्ती ॥३४१॥
यालागिं आतां विधि उत्तरार्धे श्लोकांत याही हरितो विरुद्धें
कीं बिंब तूं त्यांतहि अंबुजाक्षा प्रतीति बंधा न तसीच मोक्षा ॥३४२॥
ब्रम्हा म्हणे तव - अखंड - चिदात्मकत्वीं
तूझ्या स्वकेवळपणांत अनंतकत्वीं
हे बंध मोक्ष न कदापि विचाररीतीं
सूर्यात जेविं नसती दिन आणि राती ॥३४३॥
चैतन्य खंडित दिसे प्रतिबिंबरुपीं
त्याचें अखंडपण बिंब - निज - स्वरुपीं
जेथें प्रतीति न कदापिहि बंध मोक्षा
तेथेंचि हे नसति यास्तव अंबुजाक्षा ॥३४४॥
जीवासि मायिकपणें जरि बंध - मोक्षा
देती प्रतीति सहसा सरसीरुहाक्षा
बंध प्रतीति तरि बिंबपणांत नाहीं
मोक्ष प्रतीति म्हणऊनि तुतें न कांहीं ॥३४५॥
जो नित्यमुक्त तव बिंबपणीं उपाधी
ज्याला अखंड - अगुणीं स्वसुखीं समाधी
हा जीवबंध अवलोकुनि नित्य मुक्ती
त्यालागिं बोलति तथापि वृथाच उक्ती ॥३४६॥
नसे रोग आरोग्य कैसें तयाला उगा नित्य आरोग्य हा बोल केला
असें नित्यमुक्तत्व तूझें मुकुंदा श्रुती वर्णिती लक्षुनी जीववृंदा ॥३४७॥
बंध सोक्षहि न निर्गुण तत्त्वीं येरितीच नसती सगुणत्वीं
निर्गुणत्व सगुणत्वहि बिंबीं बंध मोक्ष घडती प्रतिबिंबीं ॥३४८॥
हे बंध मोक्ष लटिकेचि तथापि होती
जीवास ज्यास्तव अवश्य घडे प्रतीती
बिंबींच हे नसति यास्तव अंबुजाक्षा
तूं बिंब हेतु सकळांसहि बंध मोक्षा ॥३४९॥
सूर्यामधें दिवस आणिक रात्र नाहीं
त्यावीण मागुति नव्हे दिनराति कांहीं
बुद्धीस बिंब नकळोनिचि बद्ध झाला
बुद्धीस बिंब कळलें तरि मोक्ष आला ॥३५०॥
सूर्यास आणि जगदृष्टिस आड जेव्हां
होयील अस्तगिरि रात्रि जनासि तेव्हां
तो लोक दृष्टि उदयाद्रिवरी प्रकाशी
तेव्हां जनास गमतो दिन सर्व देशीं ॥३५१॥
करी असा जो दिन रात्रि नेत्रीं नित्यामधें तो दिन आणि रात्री
जीवासि अस्ताचळ हे अविद्या ब्रम्हार्क बोधीं उदयाद्रि विद्या ॥३५२॥
ब्रम्हा म्हणे हरि असी न विचार दृष्टी
ज्यांलागिं ते मृगजळार्थ तृषार्त्त कष्टी
यालागिं तूं गुरु दिवाकर दृष्टि ज्यांला
देशी मृषा - जळधि कां बुडवील त्यांला ॥३५३॥
मृषा जसा बंध तसीच मुक्ती हे सिद्ध केली विधिनें स्वयुक्ती
कीं सूर्यबिंबीं दिनराति नाहीं बिंबीं तसा बंध न मोक्ष कांहीं ॥३५४॥
बिंबी मिळे हें प्रतिबिंब जेव्हां तेथें तया बंध न मोक्ष तेव्हां
जो बंध हा मोक्षहि तो अलीकडे तें बंध मोक्षाहुनिही पलीकडे ॥३५५॥
बिंबामधें बंध असेच जेव्हां बिंबामधें मुक्तिहि नित्य तेव्हां
उपाधि जो कां परमेश्वराचा तो नित्य हें बोलति वेदवाचा ॥३५६॥
बंध मोक्ष लटिके जरि तेथें पूर्वपक्ष उठला तरि येथें
श्लोक चारिवरि तो कथिजेतो पूर्वपक्ष मग खंडित होतो ॥३५७॥
बुद्धि जेच पहिली प्रतिबिंबीं तीकरुनिच तदैक्यहि बिंबीं
जीत मुक्त जन देखति जेव्हां बंध मोक्ष तिस ठाउक तेव्हां ॥३५८॥
प्रतीति बिंबांतहि त्या प्रकारें बंधास मोक्षासहि या विचारें
जे बुद्धिनें तीसहि नाश आहे प्रारब्ध याचें सरतां न राहे ॥३५९॥
जरी ईश्वरोपाधिनें मुक्ति याला तरी बुद्धि याची असे तेथ बोला
जितां मुक्ति ते बुद्धियोगेंचि जेव्हां अनित्यत्व मुक्तीस आलेंचि तेव्हां ॥३६०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP