ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग ६
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
तूं जन्म - श्रून्य तुज जन्म - निमित्त कांहीं
अज्ञान - कर्म - फळ बंधन रुप नाहीं
लीलाऽमृतें जन तरोत सरोत पापें
तूं जन्मसी अजहि केवळ या प्रतापें ॥१५१॥
मायामयीं स्थिरचरीं अवतार ऐसे
मायाचि यद्यपि समान तथापि कैसे
जे कर्म बंध रचिते परतंत्र - रुपें
तैसीं तुझीं म्हणवतील कसीं स्वरुपें ॥१५२॥
ब्रम्हात्मता - स्फुरण रुपिणि नित्य विद्या
माया तुझी विमळ येरिति विश्व - वंद्या
देहात्मता - स्फुरण - रुपिणि ते अविद्या
माया तुझी कसि तसी भव - रोग - वैद्या ॥१५३॥
अविद्येस विद्येस मिथ्यात्व साम्यें अनीशत्व ईशत्व हें तारतम्यें
विधाता असें बोलिला स्पष्ट जेथें उठे एक शंका मनामाजि तेथें ॥१५४॥
स्वातंत्र्य जेव्हां अवतार - रुपी विद्यामय ब्रम्ह सुखस्वरुपीं
न कर्म - संबंध तयासि जेव्हां मत्स्यादि कां देहहि तुच्छ तेव्हां ॥१५५॥
मागावया बळि - गृहासि किमर्थ जावें
सीता - वियोग - विरहें तरि कां रडावें
कंसासही भिउनि कां मथुरा त्यजावी
हे मूर्ति नंद - सदनास किमर्थ यावी ॥१५६॥
शंका असी उपजली विधिच्याच पोटीं
तों आठवे त्दृदयिं विक्रम कोटिकोटी
चित्तीं स्मरोनि निज योग बळें हरीची
शंकेस या हरिल येथुनियां विरंची ॥१५७॥
श्लोकांत या म्हणतसे विधि देवराया
तूं क्रीडसी पसरुनी निज - योग - माया
कोठें कसा करिल काय असा विवेकी
जाणों शकेल तुज कोण असा त्रिलोकीं ॥१५८॥
लीला अतर्क्य त्दृदयीं स्मरतां विरंची
संबो धनें तदनुरुप वदे हरीचीं
कीं तूं अनंत भगवंत पराख्य माया
आत्मा प्रकाशक तिचा पति देवराया ॥१५९॥
योगेश्वरा अकळ या तव दिव्य लीला
जाणों शके कवण नील - सरोज - नीळा
श्लोकार्थ हाचि परि भाव विचार - रीती
भावार्थ सार बहु फार अपार होती ॥१६०॥
भ्रू वक्रमात्र करि काळ शरीर जेव्हां
ब्रम्हांड - भांड शत कोटि जळेचि तेव्हां
तो भूमित्वा असुर - भार हरावयाला
झाला कसा भिउनि येथ कसा लपाला ॥१६१॥
व्यापूनि विश्व उरलाचि तया अनंता
लंकेमधेंचि कसि अंतरली स्व - सीता
व्यापी त्रिविक्रम चराचर विश्व पायीं
तोही बळीस पसरी कर शेषशाची ॥१६२॥
इत्यादि सर्वहि अनीश्वरता घडेना
जेथें अनीशपण लेशहि सांपडेना
लीला जशा रुचति लोकरिती मनाला
तैशा करुनि हरि उद्धरितो जनाला ॥१६३॥
माया अचेतन चराचर ज्या प्रकारें
मायामयेंचि हरिचीं सगुणें शरीरें
मायामयत्व उभयत्र वदोनि साम्यें
धाता तथापि वदला बहु तारतम्यें ॥१६४॥
ईशत्व आणिक अनीश्वरता तथापी
मिथ्यात्व तों समचि ईश - अनीश - रुपीं
या कारणें अनृत विश्व म्हणूनि आतां
सिद्धांत हा दृढ करीत असे विधाता ॥१६५॥
ज्या विश्वकारण तुझ्या अवतार - मूर्ती
त्याही मृषा जरि समर्थ पवित्र - कीर्ती
त्याकारणास्तव समस्त असत्य देवा
स्वप्नास सचराचर वासुदेवा ॥१६६॥
स्वप्ना असें अनृत नश्वर दुःखरुपी
तें सत्य शाश्वत दिसे तव - चित् - स्वरुपीं
मायेच पासुनि असत्य जरी उदेलें
जाणों खरेंचि जग येरिति त्यास झालें ॥१६७॥
मायाच विश्व म्हणती निगमीं पुराणीं
मायेचपासुनि तयास विरंचि - वाणी
उत्पत्ति बोलत असे तरि दोनि माया
कैशा म्हणाल तरि सावध आयका या ॥१६८॥
मातींत जेविं घट - कारण शक्ति कांहीं
आहे जरी अनुभवा प्रति येत नाहीं
नाहीं म्हणाल तरि घागरि होय कैसी
ब्रम्हीं प्रपंच करणार हि शक्ति ऐसी ॥१६९॥
झाला जरीं घटविकार न मृत्ति केला
दुग्धासि जेविं दधिरुप विकार केला
दुग्धांत ही असति शक्ति तसीच जेव्हां
दुग्धत्व - हानि नव्हती दधिमाजि तेव्हां ॥१७०॥
होती घटाकृति नसोनि उगीच माती
ती माजि जेविं घट - कारक शक्ति होती
ब्रम्हीं प्रपंच नसतां असतेचि माया
जे कां असी तसि म्हणूनि नये म्हणाया ॥१७१॥
रज्जूंत सर्प करणार असीच कांहीं
जे शक्ति ते अनुभवा प्रति येत नाहीं
जे कां अवस्तुहि असोनि दिसे न दृष्टी
जैसी दिसे अनृत - कार्य हि सर्प - सृष्टी ॥१७२॥
अज्ञान शुक्तिविषयीं करितेच शक्ती
जे कां रुपें करुनि दाखवि शुद्ध शुक्ती
अज्ञान तें न म्हणवे बहुतांस विद्या
देऊनियां उरलियोस करी अविद्या ॥१७३॥
अज्ञान तेंचि असती तरि शुक्ति जेव्हां
एक जणास कळली तिस नाश तेव्हां
अज्ञान शुक्ति - विषयीं मग आणिकांला
होऊं नये उपजते तरि केविं बोला ॥१७४॥
निर्माण शुक्ति विषयीं करि जे अविद्या
निर्माण शुक्ति - विषयीं करि तेच विद्या
दोहींस कारण असी निज - शक्ति कांहीं
जे ते प्रतीतिस कदापिहि येत नाहीं ॥१७५॥
ब्रम्हीं असी सकळ - कारण शक्ति कांहीं
माया असोनिहि दुजेपण जीस नाहीं
माशब्द नास्ति म्हणतो नदिसे स्वरुपीं
या शब्द जे म्हणुनि तीस वदे तथांपी ॥१७६॥
ब्रम्हीं दुजेपण करी न म्हणूनि नाहीं
कार्या मृषा वरुनि कारण शक्ति कांहीं
मायार्थ कारणपणांत असेरितीचा
नामार्थ कार्य पण ही वदिजेल तीचा ॥१७७॥
माशब्द नास्ति म्हणिजे घटवस्तु नाहीं
या शब्द जे असिहि ते घट - सृष्टि कांहीं
मातींत येरिति नसो नि दिसे म्हणूनी
माया तिला म्हणति वर्ण तिचेच दोनी ॥१७८॥
या शब्द त्यांत पहिलें मग मा म्हणूनीं
या मा तिला म्हणति वर्ण तिचेच दोनी
या शब्द जे म्हणुनि दाउनि दे अविद्या
माशब्द तीसहि निषेधुनि दे स्वविद्या ॥१७९॥
इत्यादि अर्थ बहु फार असोत आतां
या प्रस्तुतीं हरिस काय वदे विधाता
मायेच पासुनि म्हणे जरि विश्व झालें
सत्या असेंचि जग सर्व दिसोनि आलें ॥१८०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP